You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तीन अपत्यं, आरक्षण ते हिंदू-मुस्लीम; मोहन भागवतांचे 'RSS च्या शताब्दी' कार्यक्रमातील 5 मोठे मुद्दे
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला यंदा 100 वर्षे पूर्ण होत आहेत.
यानिमित्ताने, 26 ते 28 ऑगस्ट दरम्यान राजधानी दिल्लीत संघाचा एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
100 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित तीन दिवसांच्या कार्यक्रमाचा आज शेवटचा दिवस होता.
या कार्यक्रमात संघप्रमुख मोहन भागवत यांनी अनेक मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केलं आहे.
1) 'भाजपाला आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो'
भाजप आणि संघाचं नातं कसं आहे, या अनुषंगाने विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर बोलताना मोहन भागवत म्हणाले की, "आमचा फक्त याच नाही तर प्रत्येक सरकारसोबत चांगला समन्वय राहिला आहे. राज्य सरकार तसेच केंद्र सरकारांशी तो आहे."
पुढे भाजप पक्षाचे निर्णय घेण्याबाबतच्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, "सगळं काही संघ निश्चित करतो, असं होऊच शकत नाही. उदाहरणार्थ, गेल्या पन्नास वर्षांपासून मी शाखा चालवतो आहे. तर त्याचा चांगला अनुभव मला आहे. मात्र, राज्य चालवण्याचा अनुभव त्यांना आहे. तर, आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो. मात्र, निर्णय घ्यायचा अधिकार त्यांनाच आहे. म्हणूनच आम्ही काही निश्चित करत नाही. आम्ही निश्चित करत असतो, तर इतका वेळ लागला असता का? आम्हाला हे निर्णय घ्यायचे नाहीयेत. तुम्ही वेळ घ्या आणि तुम्ही ठरवा."
तुरुंगात गेल्यानंतर राजकीय नेतृत्वानं पदमुक्त व्हावं का, या प्रश्नावर ते म्हणाले की, "नेतृत्वानं पारदर्शक आणि स्वच्छ असलं पाहिजे, हे मूलभूत तत्त्व आहे. आता हा कायदा असला पाहिजे की नाही, यावर चर्चा सुरु आहे. ते संसद निश्चित करेल. आता ती जे निश्चित करेल, ते होईल. पण, याचा परिणाम असा व्हायला हवा की, आपलं नेतृत्व स्वच्छ आणि पारदर्शक आहे, असा विश्वास सर्वांच्या मनात निर्माण व्हायला हवा."
2) इतर राजकीय पक्षांना संघ पाठिंबा का देत नाही?
इतर राजकीय पक्षांना संघ पाठिंबा का देत नाही, या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, "विरोधात असलेल्या राजकीय पक्षांच्या मनात बदल व्हावेत, अशी अपेक्षा संघ करतो."
संघाच्या विरोधात असलेल्या पक्षांच्या मनात बदल व्हावेत, अशी शक्यता आहेच, असंही ते म्हणाले. यासंदर्भात जयप्रकाश नारायण यांचं उदाहरण देत ते म्हणाले की, "1948 मध्ये हातात मशाल घेऊन जयप्रकाश नारायण संघाचं कार्यालय जाळायला निघाले होते. मात्र, नंतरच्या काळात, आणीबाणीनंतर आपल्या संघ शिक्षा वर्गात येऊन त्यांनी म्हटलं होतं की, परिवर्तनाची आशा तुमच्याकडूनच आहे."
पुढे ते म्हणाले की, "मौलाना अबुल कलाम आझाद यांच्यापासून ते आता आतापर्यंतचे प्रणब मुखर्जी आपल्या मंचावर आले. त्यांचे मत बदलले नाही, पण मन बदलले. त्यांचे संघाबाबत जे गैरसमज होते, ते दूर झाले म्हणून ते आले. मनुष्य आहे, तर त्याला मन आहे आणि मन परिवर्तन होणं, नेहमीच शक्य आहे. काहीचं फार लवकर होतं तर काहींना वेळ लागतो. म्हणून मन परिवर्तनाच्या शक्यतेला कधीही नाकारलं नाही पाहिजे, अशी आमची भूमिका राहिली आहे.
"ज्यांना सहकार्य हवाय, त्यांना आम्ही करतो. ज्यांना सहकार्य करायला जाताना, जे लांब पळतात, त्यांना सहकार्य मिळू शकत नाही, त्याचं आम्ही तरी काय करु शकतो? तुम्हाला फक्त एक पक्ष असा दिसतो, ज्याला आम्ही सहकार्य करतो. पण असं नाहीये. मात्र, एकूण देश चालवण्यासाठी, वा पक्ष चालवण्यासाठीही, जर ते चांगलं असेल तर आमचे स्वयंसेवक संघाच्या आदेशाने मदत करतात."
3) 'भारतीयांना तीन मुले असली पाहिजेत'
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी प्रत्येक भारतीयाला तीन-तीन मुलं असली पाहिजेत, असं विधान केलं आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी समारोहामध्ये बोलताना त्यांनी म्हटलं की, "आपल्या देशाचं लोकसंख्या धोरण जे आहे, ते सांगतं की, देशाचा सरासरी जन्मदर 2.1 असावा. ते ठीक आहे. पण मूल झालं तर ते काही 'पॉईंट वन' असं होत नाही. गणितात 2.1 चा अर्थ 2 असा घेतला जातो. मात्र, मनुष्याच्या जन्मामध्ये 2 नंतर पॉईंट वन होत नाही तर तीन होतं. 2.1 म्हणजेच तीन होय. त्यामुळे, भारतातील प्रत्येक जोडप्याने आपल्या घरी तीन मुलं असतील, असं पाहिलं पाहिजे."
"हे मी देशाच्या दृष्टीने सांगतोय. लोकसंख्या ही संपत्तीही असू शकते आणि ओझंही. ही चिंता आहेच. कारण सर्वांना खायलाही घालावं लागतं ना. म्हणूनच लोकसंख्या धोरण असं सांगतं की, लोकसंख्या नियंत्रित असावी आणि आवश्यक तेवढी असावी. तीन असावेत, पण तीनहून अधिक असू नयेत. ही गोष्ट सर्वानी स्वीकारण्यासारखी आहे," असंही ते म्हणाले.
पुढे ते असंही म्हणाले की, "जन्मदर कमी होत असेल तर सर्वांचाच कमी होतो. हिंदूंचा कमी असेल तर त्यांचा अधिकच कमी होतो आहे. बाकी लोकांचा इतका कमी होत नव्हता त्यामुळे आज त्यांचा अधिक दिसतो. मात्र, त्यांचाही कमी होतोय. संसाधनं कमी असतील, तर प्रकृतीही तसं करतेच. म्हणूनच, त्यातून संदेश घेत लोकांनी तीन अपत्यं जन्माला घालणं योग्य ठरेल."
4) 'हिंदू मुस्लीम एकच आहेत, त्यांना काय एक करायचं?'
पाकिस्तानची निर्मिती, देशातील मुस्लीम आणि हिंदू-मुस्लीम एकता यासंदर्भातील प्रश्नांवर बोलताना मोहन भागवत म्हणाले की, "हिंदू-मुस्लीम एकता याबाबत मला असं वाटतं की जे एकच आहेत त्यांची काय एकता करायची. पुजा बददली आहे बाकी काय बदललं आहे?"
पुढे ते म्हणाले की, "पहिल्या दिवशी इस्लाम भारतात आला तेव्हापासून आजपर्यंत इस्लाम भारतात आहे आणि राहिल. इस्लाम राहणार नाही असा विचार करणारा हिंदू विचाराचा असू शकत नाही, कारण हिंदू विचार असा नाही. आपण सगळे एक आहोत, आधी स्विकारायला हवं. आपल्या भाषा, जातीपाती, पुजा असं सगळं वेगळं असलं तरी सगळ्यात वर आपला देश, समाज आहे आणि तो वेगवेगळा नाही."
पुढे ते घुसखोरीबाबतच्या प्रश्नावर म्हणाले, "घुसखोरी थांबवली पाहिजे. सरकार काही प्रयत्न करत आहे, ते हळूहळू पुढे जात आहे. आपल्या देशात मुस्लीम नागरिकही आहेत. त्यांनाही रोजगाराची गरज आहे. जर तुम्हाला मुस्लिमांना रोजगार द्यायचा असेल तर तो त्यांना द्या. तुम्ही बाहेरून आलेल्यांना का देत आहात? त्यांनीच त्यांचा देश सांभाळावा."
शहरांची आणि रस्त्यांची नावं का बदलली पाहिजेत याबाबत देखील मोहन भागवतांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, "शहरांची आणि रस्त्यांची नावं बदलणं तिथल्या लोकांच्या भावनांना हिशोबानं असायला हवं. आक्रमण कर्त्यांची नावं नसली पाहिजेत. तुम्ही हे समजून टाळा वाजवू नका की, मी असं म्हटलंय की, मुस्लिमांची नावं नसली पाहिजेत. मी असं म्हणालो नाही."
रस्त्यांची आणि शहरांची नावं बदलताना मुस्लीम विरोध नसल्याचं त्यांनी सांगितलं.
ते म्हणाले, "आक्रमण करणाऱ्यांची नका ठेवू, पण शहीद हवालदार अब्दुल हमीद नाव असलं पाहिजे. डॉ. अब्दुल कलाम नाव असलं पाहिजे. हा प्रश्न कोणाचा काय धर्म आहे याचा नाही, कोण देशभक्त आहे आणि कोण नाही, याचा आहे.
आपल्याला कोणाकडून प्रेरणा मिळते? जेवढी राम प्रसाद बिस्मिल यांच्याकडून मिळते तेवढीच अशफाक उल्लाह खान यांच्याकडूनही मिळते. मिळाली पाहिजे."
रस्त्यांची नावं बदलणं यात मुस्लीम विरोध नसून आक्रमक करणाऱ्यांची नावं सोडून बाकी सगळं स्वीकारार्ह आहे, असं ते म्हणाले.
5) 'आरक्षणाला संघाचं पहिल्यापासून समर्थन'
या कार्यक्रमात मोहन भागवतांनी आरक्षण आणि जातीभेद या मुद्द्यांवरही भाष्य केलंय.
ते म्हणाले, "जर हजारो वर्ष आपल्या लोकांनी सहन केलं आहे तर त्या आपल्या लोकांना वर घेऊन येण्यासाठी दोनशे वर्ष आपण सहन केलं तर काय फरक पडतो? आपल्या लोकांसाठी काहीतरी सोडावं लागतं, हाच धर्म आहे ना."
"संविधानात जेवढं आरक्षण आहे त्याला संघाचं पहिल्यापासून समर्थन आहे आणि राहिल. आणि जोपर्यंत त्या आरक्षणाच्या लाभार्थ्यांना असं वाटत नाही की आता याची गरज नाही, हे दुसऱ्या कोणाला तरी द्या, आता भेदभाव संपला आहे तो पर्यंत आम्ही आरक्षणाच्या समर्थनाच्या बाजूनं राहू", असंही ते पुढे म्हणाले आहेत.
मनुस्मृतीमध्ये असलेल्या जातीभेदाच्या संदर्भांना आपण मानत नसल्याचं सांगत ते म्हणाले, "ग्रंथांमध्ये असे संदर्भ असतील तर आम्ही त्याला नाही मानत. पूर्ण हिंदूच्या इतिहासात ग्रंथ खूप आहेत, पण त्यानुसार हिंदू वागले आहेत, असं कमीवेळा झालं आहे.
"पूर्ण इतिहासात मनुस्मृती अनुसार देश चालला, पूर्ण देश कधी नाही चालला. स्मृती काळानुसार बदलत असतात. नव्या स्मृतीची गरज आहे, याचा आपल्या धर्माचार्यांनी विचार करावा. समाजातील सगळे वर्ग, पंथ, जाती, उपजाती या सगळ्यांचा समावेश करून घेणारी नवी स्मृती निर्माण करण्यात यावी, असं आम्हाला वाटतं."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)