कापूस, कांद्याचे भाव राहिले बाजूला; 'चोरमंडळ', शिव्यांनीच गाजला दिवस

    • Author, प्राजक्ता पोळ
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

“वीजेवाचून पंप नाही, पंपावाचून पिक नाही,

पिकावाचून मरतोय शेतकरी , सरकारला देणघेणं नाही.”

या घोषणांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस सुरू झाला.

आज (1 मार्च) शेतकऱ्यांच्या मुद्यावर चर्चा होणार होती. कापूस, कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याचा मुद्दा याआधीच चर्चेत आला होता. आमदारांनी कांद्याची तोरणं, कापसाच्या टोप्या - हार घालून कॅमेऱ्यासमोर बोलून झालं होतं.

अजितदादांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना राजकीय टीका-टिप्पणी, हास्यविनोद करून झालं होतं.

आज सरकारचा दिवस होता.

अजित पवारांचं भाषण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्षात सभागृहात बसून ऐकलं नसलं तरी अजित पवारांच्या ‘अंकलपासून ते फुटक्या काचांवरच्या मुख्यमंत्र्यांच्या जाहिराती’पर्यंत सगळ्यावर उत्तर मिळेल असं वाटतं होतं.

तितक्यात कोल्हापूरमध्ये संजय राऊत यांच्या झालेल्या पत्रकार परिषदेतलं ‘विधीमंडळ हे चोरमंडळ’ विधान चर्चेत आलं.

शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत पायऱ्यांवर घोषणा सुरू होत्या. बेल वाजली...विधानसभेत सर्व आमदार दाखल झाले. मागच्या अधिवेशनातील निलंबनानंतर जयंत पाटील पहिल्यांदाच भाषण करणार होते. विधानसभा सुरू झाली.

संजय राऊतांच्या हक्कभंगाची मागणी

विरोधी पक्षनेते अजित पवार स्थगन प्रस्तावाबाबत काहीतरी बोलतील असं वाटत असताना आशिष शेलार बोलायला उभे राहिले.

“संजय राऊत यांनी विधीमंडळाचा चोरमंडळ असा उल्लेख केला आहे. एका खासदारांनी हे वक्तव्य करणं म्हणजे महाराष्ट्रद्रोह आहे. यावर कारवाई झाली पाहिजे.”

त्यानंतर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांना अध्यक्षांनी बोलायची परवानगी दिली. भातखळकर यांनी संजय राऊत यांच्यावर विधीमंडळाचा अपमान केल्यासंदर्भात हक्कभंग आणण्याची सूचना केली.

‘विधीमंडळाला चोर मंडळ म्हणणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे,’ असं अतुल भातखळकर ओरडून सांगत होते. महाविकास आघाडीच्या नेत्यांची पंचायत झाली होती. सर्वजण एकमेकांकडे बघत होते.

अजित पवार बोलायला उभे राहिले. एरवी शिस्तीचे धडे देणारे दादा कोणाच्या बाजूने बोलणार हा प्रश्न होता. पण अजित दादांनी आशिष शेलार यांच्याशी सहमत असल्याचं म्हटलं.

अजित पवार म्हणाले, “कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याने कोणालाही चोर म्हणण्याचा अधिकार नाही. पक्षाची भूमिका बाजूला ठेवून सर्वांनी शिस्त पाळली पाहिजे. जर कोणी असं बोलले असेल तर विधीमंडळाने योग्य तो निर्णय घ्यावा.”

आता प्रश्नच संपला होता.

ठाकरे गटाच्या बाकावर उपस्थिती कमी होती. आदित्य ठाकरे सकाळपासून विधीमंडळाच्या परिसरात दिसले नव्हते. सत्ताधारी आमदारांना संजय राऊतांचं आयतं कोलीत हातात मिळालं होतं.

...तरीही अजित पवार शांत राहिले

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी संजय राऊतांच्या वक्तव्याचे समर्थन न करता सत्ताधारी पक्षाचेही कान टोचले.

त्यांनी म्हटलं, “शब्दांचा वापर दोन्ही बाजूने नीट केला पाहिजे. विधीमंडळाला चोर म्हणणं निषेधार्ह आहे. तसेच आमच्या नेत्यांना देशद्रोही किंवा महाराष्ट्रद्रोही म्हणणं चुकीचे आहे.”

शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले संजय राऊत यांच्याबद्दल बोलू लागले. ते बोलताना गोगावले यांची जीभ घसरली. त्यांच्या तोंडून अपशब्द निघाले. भरत गोगावले संजय राऊतांविषयी बोलतच होते. सभागृहात भरत गोगावलेंची जीभ घसरली तेव्हाही अजित पवार यांनी उठून आक्षेप घेतला नाही. अजितदादा शांत बसून होते. ‘भरत गोगावलेंनी शिवी दिली,’ ही कुजबूज सुरू झाली.

अध्यक्ष नार्वेकर हे गोगावले यांना खाली बसण्यास सांगू लागले. गोगावले बोलत होते. सत्ताधारी पक्षाचे आमदार गोंधळ घालू लागले.

ठाकरे गटाकडून रविंद्र वायकर बोलायला उठले आणि म्हणाले, “ यावर निश्चितपणे चर्चा झाली पाहिजे. काही लोक कसेही शब्द वापरत आहेत. भरत गोगावले यांनी आता काय शब्द वापरला. ते मागे घ्यायला सांगा.”

सत्ताधारी पक्षाने गोंधळ सुरू केला. त्यानंतर सभागृह 10 मिनिटं तहकूब झाले. अजित पवार जागेवर बसून होते. एरवी नियम आणि शिस्तीचं पालन करणारे आणि दुसऱ्यांना नियम दाखवणारे अजितदादा भरत गोगावलेंनी केलेल्या भाष्यावर काहीच बोलले नाहीत.

सभागृह तहकूब झाल्यावर आशिष शेलार अजित पवारांकडे जाऊन बोलू लागले. त्यात थोड्यावेळाने गिरीश महाजन सहभागी झाले. आशिष शेलार काहीतरी गांभीर्याने सांगत होते. गिरीश महाजन आल्यानंतर मस्करी सुरू झाल्याच पत्रकार कक्षातून दिसत होतं. पुन्हा विधानसभेची बेल वाजली. सभागृह सुरू झाल्यानंतर लगेच 20 मिनिटं पुन्हा तहकूब करण्यात आले.

दुसऱ्यांची जीभ घसरली हे सांगताना भरत गोगावले यांनी स्वतः चुकीचे शब्द वापरले. ही चर्चा सुरूच होती. सभागृह पुन्हा सुरू झाले. जागेवर उठून भरत गोगावलेंनी आपले शब्द लगेच मागे घेतले. (कदाचित त्यांना शब्द मागे घेण्यास सांगितले.) पुन्हा गोंधळ सुरू झाला. विधानसभा पुन्हा तहकूब करण्यात आली.

सभा सुरू झाल्यावरही आमदारांचे आरोप प्रत्यारोप सुरू राहीले.

“ ज्या सभागृहाचं नेतृत्व उध्दव ठाकरे यांनी अडीच वर्ष केलं. त्यांना संजय राऊत चोर म्हणाले, आदित्य ठाकरेंना ते चोर म्हणाले, अजित पवारांना चोर म्हणाले, भास्कर जाधव यांना चोर म्हणाले,” असं संजय शिरसाट यांनी म्हटलं.

त्यावर लगेच भास्कर जाधव लगेच उठून उत्तर देऊ लागले. “ संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे आणि माझं नाव घेऊन आम्हाला उचकवण्यात आलं. चहापानादिवशी हे मुख्यमंत्री आम्हाला देशद्रोही म्हणाले. हे मुख्यमंत्री आमच्या मांडीला मांडी लावून अडीच वर्ष बसले होते”.

सत्ताधारी आमदारांचा गोंधळ सुरू होता. चारवेळा विधानसभा तहकूब करून नंतर सत्ताधारी आमदारांच्या गोंधळामुळे सभागृह दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली.

ठाकरे गट विरूध्द शिवसेनेची चिखलफेख

सभागृह संपल्यावर शिवसेनेचे आमदार बाहेर येऊन घोषणा देऊ लागले. ‘नीम का पत्ता कडवा है, संजय राऊत …’ या घोषणा देत संपूर्ण विधीमंडळाला फेरी मारली.

त्यावेळी शिवसेनेच्या एका आमदाराशी बोलताना म्हटलं, की संजय राऊत चुकीचं बोलले आहेत ते सांगताना तुमचे आमदारही शिव्याच देतायेत. ते कुठे चांगल्या शब्दात सांगतायेत?

त्यावर “आम्ही जे बोललो ते नंतर बोललो. आधी तर ते म्हणाले ना!” असं म्हणत ते निघून गेले. एकमेकांवरची चिखलफेक सुरूच राहिली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फार बोलत नव्हते. सभागृह चाललं पाहिजे ही भूमिका काँग्रेसने घेतली होती. पण तसं झालं नाही. अनेक नेते निघून गेले.

मुख्यमंत्री विरोधी पक्षाला देशद्रोही म्हणाले त्यावरही हक्कभंग आणला पाहिजे अशी चर्चा विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये सुरू होती. दुपारनंतर तसं पत्र अध्यक्ष आणि उपसभापतींकडे देण्यात आलं. दिवस पुढे गेला आणि हक्कभंगाच्या चर्चेने संपला.

विधीमंडळाच्या राजकीय आखाड्यात शेतकऱ्यांचा मुद्दा आजही फक्त आंदोलनापुरता राहिला. या मुद्यावर चर्चा कधी होणार? या प्रश्नाचं मात्र उत्तर मिळालंच नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)