You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
काजोल : 'मुलीच्या जन्मानंतर माझं पहिलं वर्षं अगदी वेड्यासारखं गेलं'
- Author, सुप्रिया सोगले
- Role, बीबीसी न्यूजसाठी
काजोलच्या आयुष्यात जेव्हा न्यासा आली तेव्हा तिचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. त्यावेळी तिच्या सासूबाई तिला म्हणाल्या होत्या की, "बेटा, काम करणं सुद्धा गरजेचं आहे."
काजोलचा 'सलाम वेंकी' नावाचा चित्रपट या शुक्रवारी (9 डिसेंबर) प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने बीबीसीशी मारलेल्या गप्पांमध्ये तिने हा किस्सा सांगितला.
'सलाम वेंकी' चित्रपटात काजोलने आईची भूमिका साकारलीय. यात तिचा मुलगा मस्क्युलर डिस्ट्रॉफी (डीएमडी) आजाराने ग्रस्त आहे.
या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णाचे अवयव हळूहळू काम करणं बंद करतात. या चित्रपटात काजोल तिच्या मुलाचं आयुष्य सुधारण्याचा प्रयत्न करताना दिसते.
काजोल सांगते, सुरुवातीला तिला 'सलाम वेंकी' चित्रपटात काम करायचं नव्हतं, पण चित्रपटाची दिग्दर्शक रेवती असल्यामुळे तिला या भूमिकेला नाही म्हणता आलं नाही.
खऱ्या आयुष्यात काजोल दोन मुलांची आई आहे.
तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगताना काजोल म्हणते, "न्यासाचा जन्म झाल्यावर तिचं सुरुवातीचं एक वर्ष अगदी वेड्यासारखं गेलं. तिचं आयुष्य फक्त न्यासा आणि फक्त न्यासा एवढंच मर्यादित झालं होतं." काजोल सांगते, तिला या 'परीक्षेत' नापास व्हायचं नव्हतं.
त्या दिवसांची आठवण सांगताना काजोल म्हणते, "देवाने एक लहानगा जीव माझ्या पदरात टाकला होता, आणि मला त्याचा नीट सांभाळ करायचा होता."
काजोल सांगते, न्यासा जेव्हा एक वर्षाची झाली तेव्हा कुठं तिच्या जीवाला शांतता मिळाली.
सासूबाईंनी मुलांना सांभाळण्याची तयारी दाखवली
अनेक स्त्रिया त्यांच्या व्यक्तिगत जीवनातले अनुभव सांगतात की, आई झाल्यावर करिअरला ब्रेक लागतो. बऱ्याचदा यामागे कौटुंबिक दबाव असतो.
आणि हिंदी सिनेसृष्टी याला अपवाद नाहीये. काजोल आई बनली तेव्हा ती तिच्या करिअरच्या शिखरावर होती. तिच्या करिअरमध्ये पण ब्रेक आला होता.
पण, काजोल सांगते की तिने हा गॅप नीट विचारपूर्वक घेतला होता.
ती सांगते, "आर्थिकदृष्ट्या सांगायचं झालं तर मी स्थिर आहे. चित्रपटात काम न करणं ही माझी चॉईस होती. असा गॅप घ्यावा अशी ना माझ्या मुलांची इच्छा होती ना त्यांनी तशी काही मागणी केली होती. मला त्यांच्यासोबत वेळ घालवायचा होता, मी जर काम करत असते तर ते शक्य झालं नसतं. आणि माझ्या कामाचा जो वेग आहे तो बघता हे खरंच शक्य नव्हतं."
ती पुढे सांगते, "या निर्णयात ना अजय (देवगण) ना इतर कोणाचा काही संबंध होता. मी कोणाला विचारलं नाही. ही माझी मुलं आहेत आणि हा माझा निर्णय होता."
न्यासाच्या जन्मानंतर काजोलने दोन-तीन वर्षांचा गॅप घेतला. हा ब्रेक तिने तिच्यासाठी घेतला नसता. जेव्हा काजोल न्यासाचा सांभाळ करत होती तेव्हा तिच्या सासूबाईंनी तिला असं काही सांगितलं की, तिला पुन्हा चित्रपटात काम करण्याची इच्छा झाली.
करिअर करणाऱ्या महिलांच्या कुटुंबातून आलेली काजोल सांगते तिच्या सासूबाई एकदम भन्नाट आहेत.
काजोल सांगते, "न्यासा जेव्हा 10 महिन्यांची होती तेव्हा माझ्या सासूबाई मला म्हणाल्या की, बेटा काम करणं महत्त्वाचं आहे. बाळ जन्माला आलंय म्हणून काम करण्याचा विचार सोडून देऊ नकोस. तू पुन्हा काम करायला सुरुवात केली पाहिजेस. न्यासाची काळजी करू नकोस, तिला सांभाळायला आम्ही आहोत."
काजोल स्वतःला खूप भाग्यवान समजते. तिला असं वाटतं की, तिला प्रोत्साहन देणाऱ्या अनेक स्त्रिया तिच्या आजूबाजूला आहेत.
यात तिच्या आईपासून आजी, सासू आणि नणंद अशा सगळ्याच जणी आहेत. तिची मुलंही तिला काम करण्यासाठी प्रोत्साहन देतात.
तब्बल 16 वर्षांनंतर आमिरसोबत चित्रपट
2006 मध्ये काजोल आणि आमिर खानचा 'फना' चित्रपट रिलीज झाला होता. आज 16 वर्ष उलटली,
काजोल आणि आमिर पुन्हा एकदा 'सलाम वेंकी'च्या निमित्ताने सोबत काम करणार आहेत.
या चित्रपटात आमिर पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे.
काजोल सांगते, "एवढी वर्ष चित्रपटात काम करून सुद्धा आमिर कोणत्याही एका प्रकारच्या शैलीत काम करत नाही. तो त्याच्या भूमिकेला 500 टक्के न्याय देतो. आपण काही तरी चांगलं करू या अपेक्षेने तो नेहमीच काम करतो. या चित्रपटातही त्याने अशीच मेहनत घेतलीय."
काजोलने तिच्या करिअरमध्ये बऱ्याच भावनाप्रधान भूमिका साकारल्या आहेत. पण आता तिला लोकांना हसवायचं आहे. तिला विनोदी चित्रपट करायचे आहेत.
काजोल आणि दिग्दर्शक रेवती पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. काजोलला तिच्यासारखे धाडसी बनायचंय. रेवतीने तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात ज्या पद्धतीने धाडसी निर्णय घेतलेत तसे निर्णय काजोलला ही घ्यायचे आहेत.
रेवती दिग्दर्शित 'सलाम वेंकी' या चित्रपटात काजोल व्यतिरिक्त विशाल जेठवा, अहाना कुमरा, राहुल बोस आणि प्रकाश राज यांच्या मुख्य भूमिका आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)