पॅरिस ऑलिम्पिक : आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करण्यास भारत सज्ज

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मनोज चतुर्वेदी
- Role, ज्येष्ठ खेळ पत्रकार, बीबीसी न्यूज
ऑलिम्पिक स्पर्धेकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलेलं असतं. पॅरिसमध्ये होत असलेल्या ऑलिम्पिकमध्ये दणदणीत कामगिरी करून पदकं जिंकण्यासाठी भारतीय खेळाडू सज्ज झाले आहेत.
यंदा विविध खेळांमध्ये भारतीय खेळाडू चमकदार कामगिरी करून दाखवतील अशी अपेक्षा आहे.
जगातील खेळांचा सर्वात मोठा उत्सव मानल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक खेळांचं आयोजन 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान पॅरिसमध्ये केलं जाणार आहे. ऑलिम्पिक स्पर्धांच्या तयारीमध्ये सध्या भारतीय खेळाडू गढून गेले आहे.
आतापर्यत पुरुष हॉकी टीमसह 83 भारतीय खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यासाठी पात्र ठरले आहेत.
मात्र. ऑलिम्पिकसाठी पात्रता फेऱ्यांचं आयोजन 30 जूनपर्यंत होणार आहे. त्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या संख्येत वाढ होणार आहे.
यंदाच्या ऑलिम्पिक खेळांचं आयोजन पॅरिसबरोबरच फ्रान्सच्या इतर 16 शहरांमध्येदेखील केलं जाणार आहे.
या स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंची संख्या 10,500 इतकी निश्चित करण्यात आली आहे. ऑलिम्पिकमध्ये 32 खेळांच्या 329 स्पर्धांचं आयोजन केलं जाणार आहे.

फोटो स्रोत, Getty Images
चार वर्षांआधी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यतची आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवत एका सुवर्ण पदकासह सात पदकं जिंकली होती. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये पदकांची संख्या दोन अंकात करण्याची भारताची इच्छा आहे.
ऑलिम्पिक नियमांनुसार, कुस्ती आणि नेमबाजी व्यतिरिक्त इतर सर्व खेळांमध्ये खेळाडूंना कोटा मिळतो. म्हणजे या खेळांमधील खेळाडूंची नावं निश्चित होतात. मात्र कुस्ती आणि नेमबाजीमध्ये कोटा खेळाडूला नाहीतर तर देशाला मिळतो. त्यामुळेच या खेळांमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंची नावं शेवटच्या क्षणी देखील बदलली जाऊ शकतात.
नीरज चोप्राकडून पुन्हा एकदा सुवर्ण पदकाची अपेक्षा
अॅथलेटिक्समध्ये भालाफेकीत भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा नीरज चोप्रा पहिला खेळाडू बनला होता. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये नीरज पुन्हा एकदा सुवर्णपदक मिळवण्याच्या तयारीत आहे.
आतापर्यत नीरजसह 12 पुरुष आणि 7 महिला अॅथलीट ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
मात्र या पात्र ठरलेल्या खेळाडूंमधील लांबउडी स्पर्धक मुरली श्रीशंकरने दुखापतीमुळे ऑलिम्पिक स्पर्धेतून माघार घेतली आहे.
नीरज चोप्राने ऑलिम्पिक, जागतिक चॅम्पियनशिप आणि आशियाई खेळांसहीत सर्व प्रमुख स्पर्धांमध्ये यश मिळवलं आहे.
आता 90 मीटर पेक्षा अधिक लांब भाला फेक करणं हे त्याचं एकमेव लक्ष्य आहे. भालाफेकीत या लांबीच्या जवळ तर नीरज पोचला आहे. मात्र ही मर्यादा ओलांडू शकलेला नाही. पॅरीस ऑलिम्पिकमध्ये हे लक्ष्य पार करत सुवर्णपदक जिंकण्याची नीरची जिद्द आहे.
किशोर जेनादेखील मिळवू शकतो पदक
हांग झू आशियाई स्पर्धेत किशोर जेना ने 87.54 मीटर लांब भाला फेक करत रौप्य पदक जिंकून सर्वांनाच थक्क केलं होतं. किशोर देखील ऑलिम्पिकसाठी जोरदार तयारी करतो आहे.
नीरजबरोबरच किशोर देखील पदक मिळवण्याची शक्यता आहे.

फोटो स्रोत, Getty Images
किशोन जेनाचे प्रशिक्षक समरजीत सिंह माल्ही म्हणतात, "प्रशिक्षणाबाबत किशोर खूपच सजग आहे. तो अतिशय नियमितपणं सराव करतो. स्पर्धेत भाग घेण्यासाठी त्याला लागणाऱ्या कालावधीला वगळल्यास फक्त तीन किंवा चार दिवसच असे असतील ज्या दिवशी त्याने सराव केला नसेल."
जेनाबद्दल असं म्हटलं जातं की भुवनेश्वर स्पोर्ट्स होस्टेलमध्ये तो फक्त व्हॉलीबॉल खेळण्यासाठी दाखल झाला होता. याच्या माध्यमातून सैन्यात नोकरी मिळवण्याचा त्याची इच्छा होती.
याचदरम्यान ओडिशाचा भालाफेक खेळाडू लक्ष्मण बराल याचं लक्ष किशोरवर गेलं. किशोरच्या हातातील ताकद पाहून त्याने किशोरचं मन भालाफेकीकडे वळवलं आणि आज जागतिक पातळीचा भालाफेक खेळाडू म्हणून किशोर आपल्याला मिळाला आहे.
अॅथलीट म्हणून साबळेचा समावेश
अविनाश साबळे आणि पारूल चौधरी हे दोघे पुरुष आणि महिलांच्या 3,000 मीटर स्टीपल चेज रे साठी पात्र ठरले आहेत.
2022 च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये रौप्य पदक जिंकून साबळे नावारुपाला आला.

फोटो स्रोत, Getty Images
तर उत्तर प्रदेशच्या असणारी पारूल, या स्पर्धेत नऊ मिनिटांपेक्षा कमी वेळ नोंदवणारी देशातील पहिली महिला अॅथलीट आहे.
भारतीय पुरुष आणि महिला खेळाडूंनी 4 बाय 400 मीटर रिले टीममध्येदेखील पॅरिस ऑलिम्पिकसाठी स्थान मिळवलं आहे. त्याचबरोबर मॅरेथॉन स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या प्रियंका गोस्वामी आणि आकाशदीप सिंह यांच्याकडून त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
सात्विक-चिराग घडवू शकतात इतिहास
सात्विक साईराज रैंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीव्यतिरिक्त, पुरुष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत एचएस प्रणय आणि लक्ष्य सेन, महिला एकेरी स्पर्धेत पी व्ही सिंधू आणि महिला डबल्समध्ये अिनी पोनप्पा आणि मनीषा क्रास्टो यांची जोडी ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे.
सात्विक आणि चिराग यांची जोडी सध्या जगातील नंबर वन जोडी आहे. मागील एक-दीड वर्षात प्रचंड यश मिळवून त्यांनी दबदबा निर्माण केला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
ऑलिम्पिक स्पर्धा आली की चीन आणि इंडोनेशियाच्या खेळाडूंच्या कामगिरीचा दर्जा खूपच उंचावतो. अशावेळी सात्विक आणि चिरागच्या जोडीकडून यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये कोणतं तरी पदक जिंकण्याची अपेक्षा नक्कीच केली जाऊ शकते.
दोन ऑलिम्पिक पदक विजेत्या पीव्ही सिंधूबरोबर लक्ष्य सेन आणि प्रणय यांचा विचार करता हे सर्वजण पदक जिंकण्याची क्षमता बाळगून आहेत. या स्पर्धेपर्यत या सर्वांनी आपला सूर कायम राखण्याची तेवढी आवश्यकता आहे.
निकहत सोबत चार बॉक्सर
दोन वेळा जागतिक चॅम्पियन असलेल्या निकहत झरीनच्या नेतृत्वाखाली आतापर्यत चार महिला बॉक्सर ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्या आहेत. अद्याप कोणताही पुरुष बॉक्सर यंदाच्या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला नाही. लवकरच पुरुषांच्या पात्रता फेरीचं आयोजन झाल्यानंतर बॉक्सिंग टीमचं पूर्ण चित्र स्पष्ट होईल.
निकहत व्यतिरिक्त बॉक्सिंगसाठी पात्र ठरलेल्या बॉक्सरमध्ये बेंटमवेट वर्गात प्रीती पवार, फेदरवेद वर्गात परवीन हुडा आणि बेल्टरवेट वर्गात लोव्हलिना बोरगेहन यांचा समावेश आहे.

फोटो स्रोत, Getty Images
लोव्हलिनानं टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकलं होतं. चार वर्षांपूर्वी टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिनं हे पदक जिकलं होतं ही बाब खरी असली तरी यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये ती मिडलवेट वर्गात भाग घेणार आहे.
निकहत झरीन कडून सर्वांना सुवर्ण पदकाची अपेक्षा असणार आहे.
नेमबाजांची सर्वात मोठी टीम
आतापर्यत 20 नेमबाजांनी भारतासाठी ऑलिम्पिक कोटा मिळवला आहे. पलक गुलिया 10 मीटर एअर पिस्टल मध्ये भाग घेण्यासाठी पात्र ठरली आहे. या रीतीनं रायफल आणि पिस्टलच्या सर्व 16 जागा पटकावण्यात भारताला यश आलं आहे.
शॉटगन मध्ये भारताने आतापर्यत चार जागा मिळवल्या आहेत आणि या महिन्याच्या अखेरीस लोनाटो मध्ये होणाऱ्या शॉटगन पात्रता स्पर्धेत या संख्येत आणखी वाढ होऊ शकते.

फोटो स्रोत, Getty Images
आयएसएसएफ विश्वचषकांमध्ये भारतीय नेमबाजांनी सातत्याने विजयी कामगिरी केली आहे मात्र मागील दोन ऑलिम्पिक स्पर्धांपासून भारत या खेळात रिकाम्या हाताने परततो आहे.
भारतीय नेमबाज जर आपल्या पूर्ण क्षमतेने खेळण्यात यशस्वी झाले तर आतापर्यतची ऑलिम्पिकमधील सर्वोत्तम कामगिरी भारत नोंदवू शकतो.
मागील काही काळापासून पिस्टल शूटर्सच्या कामगिरीत खूपच सुधारणा झाली आहे. यामुळे यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये मनू भाकर, ईशा सिंह पदक जिंकतील अशी आशा ठेवली जाऊ शकते.
हॉकी संघाकडून पदकाची अपेक्षा
भारताच्या पुरुषांच्या हॉकी टीमने टोकियो ऑलिम्पिकमध्ये चार दशकांनतर पदक पटकावलं होतं. तेव्हापासून भारतीय हॉकी संघाच्या कामगिरी उंचावते आहे. यामुळे लागोपाठ दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघ पदक जिंकेल अशी अपेक्षा आहे.
ऑलिम्पिकमध्ये भारतासोबत पूल बी मध्ये बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अर्जेंटिना आणि आयर्लंड हे देश आहेत. ऑलिम्पिक फॉरमॅटनुसार भारताला क्वार्टर फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी पूल मधील पहिल्या चार संघांमध्ये स्थान मिळवावं लागेल.

फोटो स्रोत, Getty Images
मागील काही काळापासून भारतीय संघानं केलेली कामगिरी पाहता क्वार्टर फायनलमध्ये पोचण्यात भारतीय संघाला कोणतीही अडचण येईल असं वाटत नाही.
पूल मध्ये संघ जितक्या वरच्या क्रमांकावर असेल, क्वार्टर फायनलमध्ये तितक्याच कमकुवत संघाशी सामना करावा लागेल. मात्र ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारे सर्वच संघ पूर्ण तयारीनिशी येतात. त्यामुळे कोणत्याही संघाला कमी लेखता येणार नाही.
विनेश फोगाटवर देखील असणार लक्ष
विनेश फोगाट मागील काही काळापासून कुस्तीऐवजी आंदोलनात भाग घेण्याबद्दल चर्चेत होती. मात्र मागील महिन्यातच ती ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे.
विनेश व्यतिरिक्त आतापर्यत तीन इतर महिला कुस्तीपटू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्या आहेत. त्या तीन कुस्तीपटू म्हणजे अंतिम पघाल, रीतिका हुडा आणि अंशू मलिक.
कॉमनवेल्थ गेम्स आणि आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी विनेश फोगाट ही पहिली भारतीय कुस्तीपटू आहे.

फोटो स्रोत, Getty Images
त्याचबरोबर जागतिक चॅम्पियनशिपमध्येदेखील तिने एकापेक्षा अधिक पदकं जिंकली आहेत. आता फक्त ऑलिम्पिक पदक तेवढं जिंकायचं बाकी आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाट पदक जिंकणार का, हे पाहावं लागेल.
मीराबाई चानूकडून पदकाची अपेक्षा
महिला वेटलिफ्टर असलेली मीराबाई चानू पुन्हा एकदा ऑलिम्पिक पदक जिंकण्यासाठी प्रयत्नशील आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिने रौप्य पदक जिंकलं होतं. या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचा तिचा प्रयत्न असेल.

फोटो स्रोत, Getty Images
याव्यतिरिक्त टेबल टेनिससाठी पहिल्यांदा पुरुष आणि महिला संघ पात्र ठरले आहेत. यामुळे दोन्ही वर्गात दोन-दोन सिंगल्स खेळाडू देखील भाग घेण्यास पात्र ठरले आहेत.
याशिवाय सेलिंग मध्ये विष्णू सर्वनन आणि नेथ्रा कुमारन, रोइंगमध्ये बलराज पवार आणि घोडेस्वारीच्या ड्रेसाज स्पर्धेत अनुष अगरवाला हे पात्र ठरले आहेत.











