शरद पवार आजही भाजपसोबतच, लवकरच समजेल - प्रकाश आंबेडकर

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर

फोटो स्रोत, @Prksh_Ambedkar

आज सकाळी विविध वर्तमानपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांचा थोडक्यात घेतलेला आढावा

1. शरद पवार आजही भाजपसोबतच, लवकरच समजेल - प्रकाश आंबेडकर

“शरद पवार हे आजही भाजपसोबत आहेत,” असा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. दोनच दिवसांपूर्वी ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांची राजकीय युती झाली. त्यानंतर एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी शरद पवार हे भाजप सोबत असल्याचं म्हटलं आहे.

शरद पवार यांच्याबद्दल बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी एका वृत्तसंस्थेने प्रकाशित केलेल्या बातमीचा दाखला देत म्हटले की, “एका वृत्तपत्रात अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊन सरकार स्थापन केल्यानंतर मुलाखत दिली होती. तेव्हा ते म्हणाले होते की, मला (अजित पवार यांना) का लोक दोष देतात? हे तर आमच्या पक्षाचं ठरलं होत. मी फक्त सर्वांत आधी गेलो. हे लोकसभेआधीच आमचं ठरलं होत,” असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

2. संघ आणि मुस्लिम नेत्यांची पुन्हा बैठक

देशातील काही प्रमुख मुस्लिम संघटनांचे प्रतिनिधी आणि आरएसएसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये नवी दिल्लीत बैठक झाल्याचं वृत्त द हिंदूनं दिलं आहे.

दिल्लीचे माजी राज्यपाल नजीब जंग यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. त्यावेळी इंद्रेशकुमार, रामलाल आणि कृष्णगोपाल आरएसएसकडून उपस्थित होते. तर जमात-ए-इस्लामी हिंद, जामियत-उलेमा-ए हिंदचे प्रतिनिधी आणि अजमेरच्या दर्ग्याचे प्रमुख सलमान चिश्ती यावेळी उपस्थित होते. या सर्वांमध्ये बंद दाराआड तीन तास चर्चा झाली.

यावेळी बुलडोझर पॉलिटिक्स आणि मुस्लिमांबाबतचे सध्याचे प्रश्न उपस्थित करण्यात आल्याचं द हिंदून त्यांच्या वृत्तात म्हटलंय. तसंच आरएसएसकडून काशी आणि मथूरामधील मशिदींचा मुद्दा उपस्थित करण्यात आल्याचा दावा वृत्तात करण्यात आला आहे.

3. एस. जयशंकर यांची माईक पॉम्पिओ यांच्यावर टीका

अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांनी त्यांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

तसंच परराष्ट्र व्यवहारात त्यांच्यापेक्षा आपण अजित डोभाल यांच्याशी जास्त संपर्कात असायचो. त्यांच्यावर मोदींचा जास्त विश्वास आहे, असा दावा त्यांनी केला आहे. सुषमा स्वराज यांची परराष्ट्र धोरणात कोणतीही मोठी भूमिका नव्हती, असंसुद्धा माईक यांनी त्यांच्या ‘नेव्हर गिव्ह ऍन इन्च : फायटिंग फॉर द अमेरिका आय लव्ह’ या पुस्तकात लिहिलं आहे.

भारताचे सध्याचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी माईक पॉम्पिओ यांचा हा दावा सुषमा स्वराज यांचा अनादर करणारा असल्याचं म्हटलंय.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार या पुस्तकात माईक यांनी एस. जयशंकर यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत.

चंद्रकांत पाटील

फोटो स्रोत, @ChDadaPatil

4. चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करू – पाटील

कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी आम्ही विरोधी पक्षातील नेत्यांना विनंती करणार आहोत, असं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

बुधवारी पिंपरीतील एका पत्रकार परिषदेत त्यांनी हे सांगितलं आहे. सकाळने हे वृत्त दिलं आहे.

येत्या 26 फेब्रुवारीला दोन्ही ठिकाणी निवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीच्या पूर्व तयारीची बैठक पिंपरीत एका खासगी हॉटेलमध्ये झाली. या बैठकीत आढावा घेतल्यानंतर पाटील पत्रकारांशी बोलत होते.

तसंच विधानसभा निवडणुकीचा उमेदवार कोण असावा हे आम्ही नव्हे तर; पार्लमेंटरी बोर्ड ठरवतं आणि त्याची दिल्लीतून घोषणा होते, असं उमेदवारीबाबतच्या तर्कांना उत्तर देताना पाटील म्हणालेत.

5. महाराष्ट्रातल्या 4 पोलिसांना उल्लेखनीय सेवेकरिता राष्ट्रपती पदक

देवेन भारती

फोटो स्रोत, Getty Images

प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला देशभरातील 901 पोलिसांना बुधवारी राष्ट्रपती पदकं जाहीर करण्यात आली.

पोलिस दलात केलेलं शौर्य, उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्वक कामगिरीबद्दल महाराष्ट्रातील 74 पोलिसांना गौरविण्यात येणार आहे.

त्यापैकी 4 जणांना उल्लेखनीय सेवेसाठी, 31 जणांना शैर्यासाठी तर 39 जणांना गुणवत्तापूर्वक सेवेसाठी पदक दिलं जाणार आहे.

देशातील 93 पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवेकरिता राष्ट्रपती पदकं जाहीर झाली आहेत. त्यात महाराष्ट्रातील चार पोलिसांचा समावेश आहे.

विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती, अतिरिक्त पोलिस महासंचालक अनुपकुमार सिंह, उपनिरीक्षक संभाजी देशमुख आणि दीपक जाधव अशी या अधिकाऱ्यांची नावं आहेत. महाराष्ट्र टाईम्सने ही बातमी दिली आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)