2002 साली दंगेखोरांना ‘धडा शिकवला’- अमित शाह

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया

1. 2002 साली दंगेखोरांना ‘धडा शिकवला’- अमित शाह

गुजरातमध्ये पूर्वी झालेल्या जातीय दंगलींमध्ये समाजकंटकांचा सहभाग होता आणि काँग्रेसने ही सवय लागू दिली होती. मात्र, 2002 मध्ये दंगेखोरांना ‘धडा शिकवल्यानंतर’ गुन्हेगारांनी कारवाया थांबवल्या आणि भाजपने राज्यात ‘कायमस्वरूपी शांतता’ प्रस्थापित केली, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी केले. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

गुजरातमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्त शहा यांनी खेडा जिल्ह्यातील महुधामध्ये प्रचारासाठी फेरी काढली.

यावेळी ते म्हणाले की, “गुजरातमध्ये काँग्रेसच्या कार्यकाळात वारंवार जातीय दंगली झाल्या. काँग्रेस पक्ष विविध गट आणि जातींमधील लोकांना एकमेकांविरोधात उभे करत होता. काँग्रेसने दंगलींच्या माध्यमातून ‘व्होट बँक’ मजबूत केली होती.”

2001 साली नरेंद्र मोदी (गुजरातमध्ये) सत्तेत आले आणि 2002नंतर कुठेही संचारबंदी लावण्याची गरज उरली नाही. सर्वजण जागेवर आले. आता कुठे माफिया आहेत? कुठे गुंड आहेत?, असा सवालही अमित शाह यांनी केला आहे.

ते पुढे म्हणाले, “फेब्रुवारी 2002 मध्ये गोध्रा रेल्वे जळितकांडानंतर गुजरातमध्ये मोठय़ा प्रमाणात हिंसाचार उसळला होता. 2004 ते 2014 या काँग्रेसच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात 12 लाख कोटी रुपयांचे घोटाळे झाले. काँग्रेसवासियांनी त्यांची घरे पैशांनी भरली. गरिबी हटवण्याऐवजी त्यांनी गरिबांनाच हटवले.”

2. रामदेव बाबांना महाराष्ट्र महिला आयोगाने पाठवली नोटीस

महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी बाबा रामदेव अडचणीत आले आहेत. महाराष्ट्र महिला आयोगाने बाबा रामदेव यांना नोटीस पाठवून दोन दिवसांमध्ये वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी स्पष्टीकरण मागितलं आहे. महाराष्ट्र महिला आयोगाच्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

'ठाण्यातल्या एका कार्यक्रमात बोलताना बाबा रामदेव यांनी महिलांचा सन्मान आणि प्रतिष्ठेला ठेच लागेल, असं अभद्र वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची तक्रार महिला आयोगाकडे आली आहे.

महाराष्ट्र महिला आयोगाने या प्रकरणाची माहिती घेतली. आम्ही याचा तीव्र शब्दात विरोध करतो. बाबा रामदेव यांनी त्यांच्या वक्तव्याचा खुलासा दोन दिवसात आयोगाच्या कार्यालयात करावा,' असं ट्वीट महिला आयोगाने केलं आहे. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिली आहे.

महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात आणि काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, असं बाबा रामदेव म्हणाले आहेत.

3. प्रशांत दामले, आरती अंकलीकर टिकेकर यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर

संगीत, नृत्य, नाट्य क्षेत्रांत अमूल्य योगदान दिल्याबद्दल संगीत नाटक अकादमीतर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये 2019, 2020 आणि 2021 असे तीन वर्षांचे पुरस्कार एकत्रित जाहीर करण्यात आले आहेत.

त्यानुसार मराठी रंगभूमीवरील अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक प्रशांत दामले यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

नुकतंच प्रशांत दामले यांच्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचे 12 हजार 500 प्रयोग पूर्ण झाले. असा विक्रमी प्रयोग पार पाडणारे ते एकमेव कलाकार आहेत. त्यांच्या या मेहनतीची दखल घेत त्यांच्या कामाचं कौतुक म्हणून प्रशांत दामले यांना 'संगीत नाटक अकादमी पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे.

शास्त्रीय गायनातील योगदानाबद्दल आरती अंकलीकर टिकेकर यांनाही संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आणि लेखिका मीना नाईक यांना 2020 सालचा पपेट्रीसाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

4. 15 वर्षांपेक्षा जुनी सरकारी वाहनं भंगारात जाणार – नितीन गडकरी

पंधरा वर्षे जुनी असलेली सर्व सरकारी वाहनं स्क्रॅप होणार आहेत. या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात रोजगार निर्मिती होईल, असं केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केलं आहे. सकाळनं ही बातमी दिलीय. या निर्णयाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सहमती दर्शवल्याचं गडकरी यांनी सांगितलं.

गडकरी म्हणाले की, “भारत सरकारकडे जेवढी जुनी, पंधरा वर्षे पूर्ण झालेली वाहनं आहेत. ती आता लवकरच स्क्रॅप होतील. फक्त केंद्र सरकारचीच नाही प्रत्येक राज्याला याबाबत सूचना दिल्या आहेत. सरकारी संस्था आणि उपक्रमांसाठी वापरल्या जाणाऱ्या गाड्या मग त्या ट्रक, बस किंवा कार स्क्रॅप केल्या जातील.”

5. अमिताभ यांचा आवाज आणि फोटोच्या अनधिकृत वापरास निर्बंध

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचा आवाज, फोटो, नाव किंवा त्यांच्या खास वैशिष्टय़ांचा अनधिकृत वापर करण्यास संबंधितांना निर्बंध करण्याचा अंतरिम आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला आहे. आज तकनं ही बातमी दिली आहे.

आपल्या प्रसिद्धीविषयक अधिकारांचे उल्लंघन होत असल्याची याचिका अमिताभ बच्चन यांच्यातर्फे दाखल करण्यात आली होती. ‘केबीसी लॉटरी’ चालकांसह अनेकांना हा आदेश लागू केला गेला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)