You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुलाला भेटायला पहिल्यांदाच लंडनला निघालेल्या सोलापूरच्या पवार दाम्पत्याचा अंत
- Author, भाग्यश्री राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान अहमदाबाद इथल्या मेघाणीनगर परिसरात कोसळलं. या विमानातील 242 जणांपैकी 241 जणांचा मृत्यू झाल्याचं एअर इंडियाकडून जाहीर करण्यात आलं आहे. एक ब्रिटिश नागरिक या प्रवासात वाचला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या विमानात महाराष्ट्रातील 2 नागरिकांसह 6 क्रू मेंबर होते. तसेच नागपुरातील एका मोठ्या व्यावसायिकाची मुलगी, नातू आणि मुलीच्या सासूचादेखील या अपघातात मृत्यू झाला. तसेच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील दाम्पत्याचाही मृत्यू झाला.
सोलापुरातील पवार दाम्पत्याचा मृत्यू
अपघातग्रस्त विमानात सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील महादेव पवार आणि त्यांच्या पत्नी आशा पवार पवार होत्या. पवार दाम्पत्याच्या पश्चात तीन भाऊ, एक मुलगी आणि दोन मुलं आणि नातवंडे आहेत. त्यांचा एक मुलगा गुजरात येथे चालक म्हणून काम करतो, तर दुसरा मुलगा लंडन येथे वास्तव्यास आहे. पवार दाम्पत्य आपल्या लंडन येथील मुलाकडे जात होते.
वृद्धापकाळात मुलाकडे जाण्याच्या त्यांच्या स्वप्नाचा अशाप्रकारे अंत झाल्याने कुटुंबावर आणि नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. विमान टेक ऑफ घेताच कोसळलं आणि इतर प्रवाशांसह पवार दाम्पत्याचाही मृत्यू झाला.
पवार दाम्पत्य मूळचं सांगोला तालुक्यातील हातीद गावचं राहिवासी आहेत. पण, ते गुजरातमधील नडियाद इथल्या मीलमध्ये काम करत असल्यानं ते गुजरातला स्थायिक झाले होते. काही दिवसांपूर्वीच ते निवृत्त झाले होते. त्यांची सांगोल्यातील हातीद गावात शेती आहे. तसेच त्यांचे दोन भाऊ देखील सांगोल्याला राहतात. अपघाताची माहिती मिळताच पवार कुटुंब गुजरातला रवाना झालं.
महादेव पवार यांचे बंधू भाऊसाहेब पवार यांनी माध्यमांना माहिती दिली.
वर्षातून एकदा गावात यात्रा भरते. त्यावेळी महादेव पवार नेहमी यायचे. तसेच शेती बघायला सुद्धा त्यांचं सांगोल्याला येणं-जाणं असायचं. इथं आल्यानंतर महिना महिना राहायचे असं त्यांचे बंधू भाऊसाहेब तुकाराम पवार यांनी माध्यमांना सांगितलं.
भावाच्या मृत्यूची माहिती समजताच त्यांनी पुणेमार्गे अहमदाबादकडे धाव घेतली. निघण्यापूर्वी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती.
ते म्हणाले, "आमच्यामध्ये कधीच काही भांडण झालं नाही. माझा भाऊ, त्याची बायको दोघंही गावी यायचे. काल रात्री माझं दोघाही नवरा-बायकोसोबत फोनवरून बोलणं झालं. जेवण झालं का? औषध-गोळ्या घेतल्या का? अशी माझी विचारपूस केली. आम्ही कायम एकत्र राहिलो."
नागपुरातील कामदार कुटुंबीयांचा एअर इंडियावर रोष
नागपुरातील क्वेटा कॉलनी परिसरात राहणारे व्यावसायिक मनिष कामदार यांची 32 वर्षीय मुलगी यशा, 15 महिन्यांचा नातू रुद्र आणि मुलीची सासू रक्षा मोढा या अहमादबादहून लंडनला निघाल्या होत्या. पण, विमान अपघातात इतर प्रवाशांसोबत त्यांचाही मृत्यू झाला.
यशाचं चार वर्षांपूर्वी पोरबंदरमधील किशन मोढा यांच्यासोबत लग्न झालं होतं. ते सुरुवातीला लंडन इथं राहत होते. पण, काही महिन्यांपूर्वी हे कुटुंब पुन्हा गुजरातमध्ये स्थायिक झालं.
यशा यांच्या सासऱ्यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं होतं. त्यामुळे लंडनमधील त्यांच्या जवळच्या लोकांनी तिथं शोकसभा आयोजित केली होती. त्यासाठी यशा आपला छोटा मुलगा आणि सासूसोबत लंडनला जायला निघाली होती. पण, विमानानं टेकऑफ घेताच विमान क्रॅश झालं.
आपली मुलगी आणि नातू ज्या विमानातून प्रवास करत आहेत त्याचा अपघात झाल्याचं कळताच कामदार कुटुंब नागपूरवरून समृद्धीमार्गे अहमदाबादला रवाना झालं. कामदार कुटुंबीय सध्या अहमदाबाद इथल्या हॉस्पिटलमध्ये आहे.
यशा यांचे नातेवाईक पारस कामदार यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना एअर इंडियावर रोष व्यक्त केला. "जे काही लिहायचं आहे ते एअर इंडियाच्या सेवेबद्दल लिहा. अशी कशी विमानाची सेवा देतात ज्यात इतके मृत्यू होतात," असं ते म्हणाले.
यशा कामदार यांचे वडील मनिष कामदार यांनी एअर इंडिया कंपनीबद्दल रोष व्यक्त केला. ते अहमदाबादच्या रुग्णालयात आपल्या मुलीचं शव घेण्यासाठी गेले आहेत.
याच अपघातात एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचाही मृत्यू झाला आहे. यापैकी मुख्य पायलट सुमीत सबरवालसह क्लाईव्ह कुंदार, अपर्णा महाडीक, मैथिली पाटील, दीपक पाठक, रोशनी सोनघरे या क्रू मेंबरचा समावेश आहे.
अपर्णा महाडीक या सुनील तटकरे यांच्या बहिणीची सून आहे, तर मैथिल पाटील या पनवेलच्या आहेत. तसेच दीपक पाठक बदलापूरचा असून रोशनी सोनघरे डोंबवलीची आहे. पायलट सुमीत सबरवाल हे पवईचे रहिवासी होते.
या बातमीसाठी मुस्तान मिर्झा यांचं सहकार्य घेतलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)