पंतप्रधान ट्रुडो यांच्या राजीनाम्यानंतर कॅनडापुढे कोणती नवीन आव्हानं आहेत?

    • Author, हॉली हॉन्डेरिच
    • Role, टोरोंटो

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी सोमवारी 6 जानेवारी रोजी (स्थानिक वेळेनुसार) सत्ताधारी लिबरल पक्षाच्या नेतेपदाचा आणि पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला.

अनेक आठवड्यांच्या दबावानंतर, त्यांनी आपलं नेतेपद सोडण्याची घोषणा केली. मात्र, लिबरल पक्षाचा नवा नेता निवडला जाईपर्यंत ते पंतप्रधानपदावर कायम राहतील, असंही त्यांनी सांगितलं.

ट्रुडो यांच्या राजीनाम्यामुळे कॅनडाच्या राजकारणातील एक दीर्घ अध्याय संपुष्टात आलाय. ते 2015 पासून या पदाची धुरा सांभाळत होते. त्यांनी लिबरल पक्षाला राजकीय अडचणीतून बाहेर काढून पुन्हा सत्तेत आणलं होतं.

कॅनडाला अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कॅनडात राजकीय अस्थिरता निर्माण झालीय.

पक्षाचा पुढचा नेता निवडला जाईपर्यंत ते पदावर राहतील, असं ट्रुडो यांनी सांगितलंय. मात्र, ट्रुडो यांच्यानंतर पक्षाचं नेतृत्व कोण करणार?

तसंच होऊ घातलेल्या केंद्रीय निवडणुकीचं व्यवस्थापन कशाप्रकारे होईल? पुढे काय होणार? असे अनेक प्रश्न समोर आहेत.

प्रोरोग्ड संसद म्हणजे काय?

सोमवारी कॅनेडियन नागरिकांना संबोधित करताना, जस्टिन ट्रुडो म्हणाले की, 'देशाच्या गव्हर्नर जनरलने संसद प्रोरोग करण्याच्या त्यांच्या विनंतीला मान्यता दिली आहे.'

प्रोरोग्ड म्हणजे एकप्रकारे संसद विसर्जित न करता सर्व कार्यवाही, चर्चासत्रं आणि मतदान थांबते. याला स्थगित संसद असंही म्हणता येईल.

हा संसदीय प्रक्रियेचा नियमित भाग असला तरी, कधी कधी राजकीय संकटाच्या काळात सरकार जास्तीतजास्त वेळ मिळवण्यासाठी याचा वापर करतात.

ऑगस्ट 2020 मध्ये, ट्रुडो यांनी त्यांच्या सरकारवर एका धर्मादाय संस्थेसोबतच्या करार हाताळणीवरून निर्माण झालेल्या नैतिक वादामुळे संसद स्थगित केली होती.

तर या नवीन प्रोरोगेशनमुळे संसद 24 मार्चपर्यंत स्थगित केली जाऊ शकते.

लिबरल पक्षाचं नेतृत्व कोणाकडे जाणार?

प्रोरोगेशन कालावधी संपण्यापूर्वी लिबरल पक्ष नव्या नेत्याची निवड करण्याचा प्रयत्न करेल, परंतु त्या नेत्याची निवड कशी केली जाईल, हे अद्याप स्पष्ट नाही.

सामान्यतः कॅनडाच्या केंद्रीय पक्षांचे नेते चार ते पाच महिन्यांच्या कालावधीत निवडले जातात, ज्यामध्ये औपचारिक नेतृत्व अधिवेशनाचा समावेश असतो.

ट्रुडो सोमवारी (6 जानेवारी) बोलताना म्हणाले की, नवीन नेत्याची निवड "सशक्त, देशव्यापी, स्पर्धात्मक प्रक्रियेद्वारे," केली जाईल.

यानंतर लिबरल पक्षाचे अध्यक्ष सचिन मेहरा म्हणाले की, पक्ष या आठवड्यात आपली राष्ट्रीय बोर्डाची बैठक बोलावून नवीन नेत्याची निवड करेल.

ट्रुडो यांचा कोणताही उत्तराधिकारी नसला तरी, माजी अर्थमंत्री क्रिस्टिया फ्रीलँड, वाहतूक मंत्री अनिता आनंद आणि माजी केंद्रीय बँकर मार्क कार्नी यांच्यासह अनेक प्रमुख लिबरल नेत्यांची संभाव्य नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे.

कॅनडाची निवडणूक कधी होणार?

कॅनडाची पुढील फेडरल निवडणूक ऑक्टोबरपर्यंत होणे आवश्यक आहे, परंतु त्यापूर्वीच निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काही दिवसांपूर्वीच झालेल्या टोरंटो पोटनिवडणुकीत कॅनडाच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाकडून ट्रूडो यांच्या लिबरल पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

मतदान सर्वेक्षणातही ट्रूडो मागे पडल्याचं दिसलं. डिसेंबरमध्ये केवळ 22 टक्के कॅनेडियन लोकांनी ट्रूडो यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला होता. यावरून त्याची घसरलेली लोकप्रियता स्पष्टपणे दिसून आली.

या सर्वेक्षणात कॅनडाच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते पियरे पोलिव्हिएर हे ट्रूडो यांच्यापुढे दिसले. ते 24 पॉईंट्सने ट्रूडो यांच्यापुढे होते. यावरून कॅनडाच्या पुढील निवडणुकीत लिबरल पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.

दुहेरी अंकाची आघाडी मिळाल्यानंतर विरोधकांचा विश्वास उंचावला आहे. त्यामुळे विरोधी कंझर्व्हेटिव्ह पक्षाकडून, संसदेत अनेक अविश्वास ठराव मांडून निवडणूक घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सरकारला अविश्वास ठरावासाठी संसदेच्या 338 सदस्यांपैकी बहुमताच्या पाठिंब्याची गरज आहे. लिबरल पक्षाकडे 17 जागा कमी आहेत, त्यामुळे त्यांना कॅनडाच्या इतर पक्षांच्या सदस्यांच्या समर्थनाची आवश्यकता आहे.

दुसरीकडे डाव्या विचारसरणीकडे झुकलेल्या न्यू डेमोक्रॅटिक पक्षाच्या (एनडीपी) सदस्यांनी ट्रुडो यांना पुरेशी मतं दिली होती. मात्र, सोमवारी ट्रुडो यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केल्यानं चित्र बदललं आहे.

ट्रुडो यांनी केलेल्या घोषणेनंतर एनडीपी नेते जगमीत सिंग म्हणाले की, नेता कोणताही असो, त्यांचा पक्ष लिबरल पक्षाला पराभूत करण्यासाठी मतदान करेल, "ते दुसरी संधी मिळण्यास पात्र नाहीत," असंही जगमीत सिंह म्हणाले.

परिस्थिती पाहता 24 मार्चपर्यंत जो कोणी लिबरल्सचा प्रभारी असेल त्याला शासन करण्यास जास्त वेळ मिळणार नाही. आणि प्रोरोगेशन संपल्यानंतर, पहिले मतदान हे विश्वासदर्शक ठराव असेल.

जर सरकारने तो विश्वासदर्शक ठराव गमावला, तर त्यांनी राजीनामा देणे किंवा संसद विसर्जित करणे अपेक्षित आहे, ज्यामुळे फेडरल निवडणुका सुरू होतील.

यातून असं दिसून येतंय की, जर आज कॅनडामध्ये निवडणूक झाली, तर अधिकृत विरोधी कंझर्व्हेटिव्ह पक्ष निर्णायकपणे जिंकेल अशी स्थिती दिसून येत आहे.

कोण आहेत पियरे पोलिव्हिएर?

पियरे पोलिव्हिएर हे कॅनडाच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते आहेत. सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार पोलिव्हिएर कॅनडाचे पुढील पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत प्रमुख दावेदार आहेत.

2022 मध्ये पक्षाची धुरा हाती घेतल्यापासूनच, पोलिव्हिएर पंतप्रधान ट्रुडो यांचे प्रबळ विरोधक आहेत, त्यांनी वारंवार ट्रुडो यांना लवकर निवडणूक घेण्याचं आवाहन करत आले आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)