गुप्तहेर संस्थेच्या प्रमुखानंच राष्ट्राध्यक्षाची हत्या केली आणि तेही 'सेफ हाऊस'मध्येच; काय घडलं होतं?

किम जे-ग्यू (डावीकडे) आणि पार्क चुंग-ही

फोटो स्रोत, National Archives of Korea

फोटो कॅप्शन, किम जे-ग्यू (डावीकडे) आणि पार्क चुंग-ही जवळचे मित्र होते.
    • Author, सुनवूक ली
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

'फक्त दोन गोळ्या...'

असं म्हणत यू सिओक-सुल 26 ऑक्टोबर 1979 च्या त्या शुक्रवारच्या रात्रीचं वर्णन सुरू करतात.

दक्षिण कोरियाच्या गुप्तचर विभागाचे (केसीआयए) माजी सुरक्षा रक्षक राहिलेल्या यू सिओक-सुल यांच्याकडे सांगण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत.

पण ही घटना कदाचित सर्वात कुप्रसिद्ध आणि धक्कादायक अशी आहे.

त्यांना वेळ स्पष्ट आठवते, संध्याकाळचे सुमारे 7:40 वाजले होते. ते ब्रेक रूममध्ये म्हणजे विश्रांतीसाठीच्या खोलीत बसले होते.

आपली ड्युटी संपवून ते विश्रांती घेत होते. ही ड्युटी होती, त्या इमारतीच्या प्रवेशद्वारावर पहारा देण्याची, जिथे राष्ट्राध्यक्ष पार्क चुंग-ही आपल्या विश्वासू लेफ्टनंट्सना (अधिकाऱ्यांना) भेटायचे. ते या ठिकाणाला 'सेफ हाऊस' (सुरक्षित घर) म्हणायचे.

आता सत्तरीच्या आसपास वय असलेले, काटक शरीरयष्टीचे आणि तीव्र नजरेचे यू, सुरुवातीला थोडं थांबत थांबत बोलायला लागतात, पण त्यांना लगेचच सगळं आठवायला लागतं.

ते सांगतात, पहिल्या गोळीबारानंतर आणखी गोळीबार झाला. गार्ड सावध झाले होते, परंतु आदेश येईपर्यंत ते बाहेरच थांबले. त्या वेळी राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षारक्षकांसोबतच केसीआयएचे वरिष्ठ अधिकारीही आतमध्येच होते.

तेव्हा यू यांचे बॉस, ज्यांच्याकडे सेफ हाऊसच्या सुरक्षेची जबाबदारी होती. ते बाहेर आले. "ते माझ्याकडे आले आणि म्हणाले, बागेत काहीतरी पुरायचं आहे."

त्यात दोन बंदुका, गोळ्या आणि बुटाची एक जोड होती. गोंधळून गेलेल्या यू यांनी काहीही विचार न करता त्यांच्या आदेशाचं पालन केलं, असं ते सांगतात.

गोळ्या कुणाला लागल्या आहेत, हे त्यांना माहीत नव्हतं आणि त्यांनी विचारलंही नाही.

"ते राष्ट्राध्यक्ष असू शकतात, याची मी कल्पनाही केली नव्हती."

तब्बल 46 वर्षांनंतर 'ती' रात्र पुन्हा चर्चेत

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

यू यांनी ज्या बंदुका जमिनीत पुरल्या होत्या, त्याच बंदुकांचा वापर करून पार्क चुंग-ही यांची हत्या करण्यात आली होती.

पार्क हे त्यावेळी 18 वर्षे दक्षिण कोरियाचे अध्यक्ष होते. त्यापूर्वी किंवा नंतरही इतका काळ कोणताही अध्यक्ष सत्तेत नव्हता.

गोळी झाडणारा व्यक्ती म्हणजे त्यांचाच जुना मित्र किम जे-ग्यू, जो केसीआयए या भीतीदायक गुप्तचर संस्थेचा प्रमुख होता. ही संस्था पार्क यांच्या हुकूमशाहीचा मजबूत आधार होती.

त्या शुक्रवारी रात्री घडलेली घटना संपूर्ण दक्षिण कोरियाला हादरवणारी ठरली. पार्क चुंग-ही यांची दडपशाही संपली.

परंतु, त्यानंतरही देशात आणखी एक दशक लष्करी राजवटीखाली गेलं. किम जे-ग्यू यांना बंडखोरीच्या आरोपाखाली इतर पाच जणांसह फाशीची शिक्षा देण्यात आली.

आता, 46 वर्षांनंतर ती रात्र पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण न्यायालय किम जे-ग्यू यांनी केलेलं कृत्य देशद्रोह होता का, हे ठरवण्यासाठी यांच्यावरचा खटला पुन्हा सुरू करत आहे.

किम जे-ग्यू हे आजही एक वादग्रस्त व्यक्तिमत्त्व मानले जातात.

काही लोक त्यांना सत्तेच्या आणि अति महत्त्वाकांक्षेनं आंधळा झालेला मारेकरी मानतात, तर काहीजण त्यांना देशासाठी स्वतःचं बलिदान देणारा देशभक्त समजतात.

त्यांनी कोरियाला लोकशाहीच्या वाटेवर नेण्यासाठी स्वतःला झोकून दिल्याचं काहीजण मानतात.

किम जे-ग्यू

फोटो स्रोत, National Archives of Korea

फोटो कॅप्शन, पार्क चुंग-ही यांना गोळी झाडणारा व्यक्ती म्हणजे त्यांचाच जुना मित्र किम जे-ग्यू, जो केसीआयए या भीतीदायक गुप्तचर संस्थेचा प्रमुख होता.

ज्यांचं त्यांनी हत्याकांड केलं ते पार्क चुंग-ही हेही तितकेच वादग्रस्त होते. एकीकडे त्यांचं देशाच्या आर्थिक विकासासाठी कौतुक केलं जातं, तर दुसरीकडे त्यांच्या हुकूमशाही राजकारणावर तीव्र टीकाही केली गेली.

किम जे-ग्यू यांना देशद्रोही म्हणून ओळखलं जाऊ नये, यासाठी त्यांच्या कुटुंबाने वर्षानुवर्षे पुन्हा खटला चालवण्याची मागणी केली.

अखेर त्यांना शेवटी संधी मिळाली आहे. सोल उच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी सुरू झाली असून, बुधवारी (16 जुलै) याप्रकरणी पहिली सुनावणी झाली.

योगायोग म्हणजे, ज्या देशद्रोहाच्या आरोपामुळे किम यांना फाशी झाली होती, त्याच आरोपाखाली महाभियोग सुरू असलेले राष्ट्राध्यक्ष युन सुक योल यांच्यावरही खटला सुरू आहे.

डिसेंबरमध्ये युन सुक योल यांनी लागू केलेला मार्शल लॉ (लष्करी कायदा) काही तासांपुरताच टिकला. परंतु, त्यामुळे दक्षिण कोरियातील लोकशाहीबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले होते.

आता हेच वातावरण देशाच्या विचारांवर परिणाम करू शकतं. विशेषतः त्या व्यक्तीविषयी, ज्यानं असा हुकूमशहा ठार केला, ज्याच्यावर तो देशात मोठं रक्तपात घडवणार असल्याचा आरोप होता.

किम स्वतः सत्तेवर येण्याचा प्रयत्न करत होते का? की, न्यायालयात त्यांनी केलेल्या दाव्यानुसार, ते देशात क्रांती घडवून आणू इच्छित होते? हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे.

'माझा भाऊ असा नव्हता...'

सकाळी गोळीबाराच्या बातम्या समोर आल्या, तेव्हा संपूर्ण दक्षिण कोरिया हादरून गेला होता. सुरुवातीच्या बातम्यांमध्ये 'अपघात' असल्याचे सांगण्यात आलं होतं.

पार्क यांच्या जवळच्या मंडळींना काय घडलं होतं, ते समजून घेणंच कठीण झालं होतं. किम जे-ग्यू हे पार्क यांचे अत्यंत जवळचे सहकारी होते.

1961 मध्ये जेव्हा पार्क यांनी सैनिकी बंडखोरीतून सत्ता काबीज केली, तेव्हापासूनच ते दोघं एकत्र होते. ते दोघं एकाच गावचे होते आणि सैनिकी प्रशिक्षणही त्यांनी एकत्रित घेतलं होतं.

दक्षिण कोरियातील ज्येष्ठ पत्रकार चो गाब-जे मान्य करतात की, किम जे-ग्यू यांना पार्क यांच्या काही निर्णयांबाबत अस्वस्थता होती.

पण ते म्हणतात, "किम यांनी कधी प्रत्यक्षात त्या अस्वस्थतेवर काही कृती केली, याचा कुठलाही पुरावा नाही. त्यांनी राजकीय कैद्यांना सोडवलं, पार्क यांच्याशी उघडपणे भांडण केलं किंवा औपचारिक विरोध नोंदवला, असं कुठंही नोंदवलं गेलेलं नाही."

किम जंग-सूक

फोटो स्रोत, Suhnwook Lee/ BBC News

फोटो कॅप्शन, किम जंग-सूक आपल्या भावाच्या खटल्यासाठी वर्षानुवर्षे लढत आहेत.

किम जे-ग्यू यांनी न्यायालयात सांगितलं की, त्यांनी पार्क यांची हत्या करण्याचा किमान तीन वेळा विचार केला होता. परंतु, इतिहास काय सांगतो? किम यांनी प्रत्यक्षात पार्क यांना कायम पाठिंबा दिला.

जेव्हा पार्क यांनी सत्तेवर आपली पकड घट्ट केली होती, राष्ट्राध्यक्षपदासाठी थेट निवडणुका रद्द केल्या.

तसेच, कार्यकाळाची मर्यादा काढून टाकली, संसदेलाही आपल्या ताब्यात घेतलं आणि अगदी घटनात्मक हक्कही निलंबित केले, त्यावेळीही किम यांनी काहीच विरोध केला नाही.

"फक्त राष्ट्राध्यक्ष बनण्यासाठी अशी कृती करेल, अशा स्वभावाचा माझा भाऊ कधीच नव्हता," असं त्यांची 86 वर्षीय बहीण किम जंग-सूक ठामपणे सांगतात.

'किम यांना विरोध आणि पाठिंबाही'

किम जे-ग्यू हे केसीआयए या संस्थेचे प्रमुख होते.

परंतु, ती संस्था बदनाम होती, कारण तिथं निरपराध विद्यार्थ्यांना, सरकारविरोधकांना आणि विरोधी नेत्यांना अटक केली जायची, छळ केला जायचा आणि खोट्या आरोपांखाली फसवलं जायचं.

"ते लोकांना छळायचे, खोटे आरोप तयार करायचे, आणि तुरुंगात टाकायचे आणि जर कोणी त्यावर टीका केली, तर त्यालाही अटक व्हायची," असं फादर हॅम से-वूंग यांनी सांगितलं.

हॅम से-वूंग यांना 1970च्या दशकात सरकारवर टीका केल्यामुळे दोन वेळा तुरुंगवास भोगावा लागला होता.

किम जे-ग्यू यांना 'तारणहार' मानणं अनेकांना सहज शक्य नव्हतं. पण न्यायालयात दिलेल्या जबाबांनुसार, जे त्या काळात फारसे प्रसिद्ध झाले नव्हते. किम यांनी स्वतःला तसाच तारणहार मानलं होतं.

त्यांनी न्यायाधीशांना सांगितलं की, पार्क यांना थांबवणं अत्यावश्यक होतं, कारण त्यांची निर्दयी सत्ता दक्षिण कोरियाला अराजकतेत ढकलू पाहत होती आणि त्यामुळे देश अमेरिकेसारख्या महत्त्वाच्या मित्रदेशाला गमवू शकला असता.

राष्ट्राध्यक्ष पार्क चुंग-ही

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, राष्ट्राध्यक्ष पार्क चुंग-ही, हे त्यावेळी 18 वर्षे दक्षिण कोरियाचे अध्यक्ष होते.

"माझ्या आयुष्याची मी भीक मागणार नाही, कारण मला आता मरण्यासाठी कारण सापडलं आहे," असं किम जे-ग्यू यांनी न्यायालयात सांगितलं.

पण त्याच वेळी त्यांनी विनंती केली की, माझ्या आदेशांनुसार काम करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांना वाचवा. त्यांना त्यांनी 'निर्दोष मेंढरं' (इनोसंट शिप) असं म्हटलं.

ते म्हणाले, माझी इच्छा होती की, देशात शांततेत सत्ताबदल व्हावा, कारण आजवर दक्षिण कोरियात कधीही सत्ता शांततापूर्ण मार्गानं हस्तांतरित झाली नव्हती.

त्या काळात ही घटना कळाल्यावर, अगदी सरकारचे कठोर टीकाकार असलेले फादर हॅम सुद्धा किम जे-ग्यू यांना वाचवण्यासाठी मोहीम राबवायचा प्रयत्न करू लागले.

ते म्हणतात, "त्यांना अधिक रक्तपात टाळायचा होता. म्हणूनच आम्हाला त्यांना वाचवणं गरजेचं वाटलं."

फादर हॅम यांना यासाठी पुन्हा तुरुंगात टाकण्यात आलं, कारण किम जे-ग्यू यांचा खटला खूप संवेदनशील विषय बनला होता. तेव्हा देशात मार्शल लॉ लागू झाला होता.

खटला सुरू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांत 12 डिसेंबर रोजी हत्या प्रकरणाची चौकशी करणारे जनरल चून दू-ह्वान यांनीच बंडखोरी करून सत्ता काबीज केली.

चार जणांना मृत्यूदंड आणि इतरांना कारावास

लष्करी न्यायालयात खटल्याची प्रक्रिया विद्युत वेगानं पुढे सरकली.

20 डिसेंबर रोजी न्यायालयानं किम जे-ग्यू यांना हत्या करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल दोषी ठरवलं, आणि त्यांच्या सोबत आणखी सहा जणांनाही मदतीसाठी दोषी ठरवलं.

तर यू सिओक-सुल यांना बंदुका लपवल्याबद्दल तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली गेली.

पुढच्या वर्षी, 20 मेपर्यंत, किम जे-ग्यू यांचं शेवटचं अपीलही फेटाळलं गेलं.

चार दिवसांनी, त्यांना इतर चार जणांसह फाशी देण्यात आली. त्यातला एकजण वाचला आणि एकाला आधीच फाशी दिली गेली होती.

किम यांचा मृत्यू त्याच वेळी झाला, जेव्हा लष्कराने ग्वांगजू शहरात लोकशाहीसाठी सुरू असलेलं आंदोलन अत्यंत निर्दयतेने चिरडून टाकलं आणि त्यात 166 निष्पाप नागरिकांचा बळी गेला.

किम जे-ग्यू कुटुंबासोबत

फोटो स्रोत, Kim family

फोटो कॅप्शन, कुटुंबासोबतच्या फोटोमध्ये डावीकडून उभा असलेला पहिला व्यक्ती म्हणजे किम जे-ग्यू.

"मला असं वाटलं की, चून दू-ह्वान हे स्वतः सत्ता मिळवण्यासाठी पूर्वीची राजवट आणि तिच्याशी संबंधित सगळं काही लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करत आहेत," असं किम जंग-सुक म्हणतात.

या सगळ्यात मला माझ्या भावाला फक्त एकदाच भेटता आलं, फाशीच्या आठवडाभर आधी, असं किम जंग-सुक सांगतात.

"माझ्या वाट्याला ती शेवटची भेट असेल, हे त्याला कदाचित जाणवलं असावं. म्हणूनच तो आमच्या आईला शेवटचा नमस्कार करताना खालपर्यंत झुकला होता," असं त्या भावुक होऊन सांगतात.

यू सिओक-सुल वाचले, पण ते सांगतात की तुरूंगातून बाहेर आल्यानंतरही अनेक वर्षे कोणीतरी त्यांच्या मागावर होतं.

"मला कुठेही नोकरी मिळत नव्हती. मी माझ्या गावात परतलो, तरीही ते लोक माझ्यावर पाळत ठेवून होते. या प्रकरणाबद्दल मी एक शब्दही बोलू शकत नव्हतो," असं ते म्हणतात.

आता ते सोलच्या बाहेर एका खासगी पार्किंगमध्ये अटेंडंट म्हणून काम करतात.

किम जंग-सुक सांगतात की, त्यांच्या कुटुंबानं सुमारे दहा वर्षांपूर्वीपर्यंत या प्रकरणावर कधी उघडपणे काहीच भाष्य केलं नव्हतं. दक्षिण कोरियामध्ये लोकशाही परतली. तेव्हा पार्क यांची प्रतिमा हळूहळू सुधारू लागली.

काळाच्या ओघात आणि देशाच्या आर्थिक प्रगतीमुळे त्यांचं योगदान पुन्हा उजळून निघालं. त्यांची मुलगी राष्ट्राध्यक्ष झाली, आणि त्या अनेकदा पार्क यांच्या आर्थिक कामगिरीचं समर्थन करत त्यांचं वारसत्त्व जपण्याचा प्रयत्न करत असत.

त्यांच्याच (पार्क यांच्याच) मुलीचा पायउतार, म्हणजे भ्रष्टाचार प्रकरणावरून झालेल्या मोठ्या आंदोलनांनंतर तिची सत्ता गेली, तेव्हाच किम जे-ग्यू यांच्या खटल्याकडे पुन्हा पाहण्याचा मार्ग मोकळा झाला.

'अल्प पुरावे असतानाही खटला कसा चालवला?'

"हा खटला लष्करी न्यायालयात जायलाच नको होता, कारण हत्या झाली तेव्हा अजून मार्शल लॉ जाहीर झालेलाच नव्हता," असं ली सांग-ही म्हणतात. ली सांग या किम जे-ग्यू यांच्या पुनःपरीक्षणाच्या खटल्यात (रीट्रायल) वकील आहेत.

त्या असंही सांगतात की, "अर्धवट आणि गोंधळलेल्या नोंदी (ट्रान्सक्रिप्ट्स) अपीलवर परिणाम करू शकत होत्या, कारण बचाव पक्षाला खटल्याच्या कार्यवाहीची स्वतंत्र नोंद करायलाच परवानगी नव्हती."

"मी जेव्हा ही कागदपत्रं पाहिली, तेव्हा मला समजलंच नाही की इतक्या कमी पुराव्यांच्या आधारे त्यांना बंडखोरीसाठी दोषी कसं ठरवलं गेलं," असं ली सांग-ही म्हणतात.

"आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे यात छळ (टॉर्चर) झाला होता." फेब्रुवारीमध्ये न्यायालयाने पुन्हा खटला चालवण्याची परवानगी दिली, तेव्हा छळ झाल्याचंही एक महत्त्वाचं कारण म्हणून मान्य केलं होतं.

न्यायालयाने किम जे-ग्यू यांचं ते विधान स्वीकारलं, जे त्यांनी 1980 मधल्या अपीलमध्ये दिलं होतं (जे अपयशी ठरलं होतं). त्यात त्यांनी आरोप केला होता की, "चौकशीदरम्यान पोलिसांनी मला बेदम मारहाण केली आणि माझ्या बोटांवर इइ8 टेलिफोन वायर गुंडाळून इलेक्ट्रिक शॉक दिला."

किम जे-क्यू कुटुंबासमवेत

फोटो स्रोत, JUNG YEON-JE/AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, किम जंग-सूक त्यांच्या घरी आपला भाऊ किम जे-क्यूकडे बोट दाखवत आहेत.

त्या काळातील अहवालांमध्ये असा आरोप होता की, किम जे-ग्यू यांच्या पत्नीला, तिच्या भावाला आणि काही नातेवाईकांना अटक करून त्यांच्याही छळ करण्यात आला होता. परंतु, त्या वेळच्या अधिकाऱ्यांनी हे आरोप नाकारले होते.

आता नव्वदीत असलेल्या किम जे-ग्यू यांच्या पत्नी यांनी नेहमीच खटल्याच्या पुनर्परीक्षणाला विरोध केला आहे.

"तिने कधीच स्वतःवर काय गेलं ते सांगितलं नाही आणि आजही ती थरथरते," असं किम जे-ग्यू यांच्या बहीण किम जंग-सुक सांगतात.

किम जंग-सुक आपल्या भावाच्या समर्थनासाठी ठाम आहेत. त्या वारंवार म्हणतात, "तो एक प्रामाणिक आणि सच्चा माणूस होता."

"त्याने राष्ट्राध्यक्ष आणि सुरक्षाप्रमुखाची हत्या स्वतःच्या फायद्यासाठी केली नव्हती, यावर आम्हाला ठाम विश्वास आहे. हाच विश्वास असल्यामुळेच आम्ही हे सगळं सहन करू शकलो."

विरोधी पक्षनेत्यावरून मतभेद

सुरक्षाप्रमुखाचं नाव होतं चा जी-चोल. तो पार्क यांच्याशी अधिक जवळीक साधत होता आणि त्यामुळेच किम जे-ग्यू यांच्याशी त्याचे अनेकदा वाद होत असत. कारण दोघंही राष्ट्राध्यक्षांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करत होते.

हत्या होण्याच्या काही आठवड्यांपूर्वी, किम जे-ग्यू आणि चा जी-चोल यांच्यात मतभेद झाले होते.

कारण स्पष्टवक्ते विरोधी पक्षनेते किम यंग-साम यांच्याशी कसं वागायचं, यावर दोघांचं एकमत होत नव्हतं. पार्क यांना किम यंग-साम हे मोठा धोका वाटत होते.

'न्यूयॉर्क टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत किम यंग-साम यांनी अमेरिकेला पार्क यांची हुकूमशाही संपवण्याचं आवाहन केलं होतं.

त्यावर प्रतिक्रिया म्हणून, पार्क यांच्या ताब्यातील संसदेनं (नॅशनल असेंब्ली) त्यांची सदस्यत्वावरून हकालपट्टी केली.

राष्ट्राध्यक्ष पार्क चुंग-ही

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, राष्ट्राध्यक्ष पार्क चुंग-ही

या निर्णयानंतर किम यंग-साम यांच्या बालेकिल्ल्यात मोठं आंदोलन उभं राहिलं. चा जी-चोल यांना हे आंदोलन जोरात चिरडायचं होतं, तर किम जे-ग्यू यांनी संयम बाळगण्याचा सल्ला दिला होता.

कारण त्यामुळे पार्क यांच्या राजवटीबद्दल अस्वस्थ होत चाललेल्या वॉशिंग्टनलाही (अमेरिकेला) दिलासा मिळाला असता.

किम जे-ग्यू यांनी कोर्टात सांगितलं की, त्यांनी आंदोलकांवर गोळीबार करू नये असा इशारा दिला होता. कारण त्यामुळे लोकांचा संताप आणखी वाढेल.

त्यावर चा जी-चोल म्हणाले होते, "कंबोडियामध्ये तीन लाख लोक मारले गेले, तरी काहीच झालं नाही. आपण जर दहा लाख आंदोलक मारले, तरी आपल्याला काही होणार नाही."

त्या संध्याकाळी सेफ हाऊसमध्ये असताना, सरकारी प्रसारमाध्यमांनी बातमी दिली की अमेरिकेचे राजदूत किम यंग-साम यांची भेट घेणार आहेत.

रागावलेले पार्क किम जे-ग्यू यांच्यावर ओरडले की, त्यांनी विरोधी पक्षनेत्याला अटक का नाही केली. न्यायालयात सांगितल्याप्रमाणे, जेव्हा किम यांनी प्रत्युत्तर दिलं, तेव्हा पार्क म्हणाले, "एजन्सीची भीती वाटली पाहिजे, आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे."

...आणि अशी हत्या झाली

ते दोघं समोरासमोर बसले होते, स्कॉच पीत होते आणि जेवण घेत होते. पार्क यांच्या शेजारी दोन महिला होत्या, एक लोकप्रिय गायिका आणि एक तरुण मॉडेल. चा आणि पार्कचे चीफ ऑफ स्टाफही तिथे होते.

त्या वेळी दोघांत तणावपूर्ण बोलणी सुरूच होती. एक प्रेमगीत सुरू असतानाच, किम जे-ग्यू म्हणतात की, त्यांनी पिस्तूल काढलं, पार्क यांच्याकडे रोखलं आणि म्हटलं, "सर, तुम्ही तुमची राजकीयदृष्टी अधिक मोठ्या मनानं बदलायला हवी."

गोंधळलेल्या किम यांनी शिवी घातली आणि बंदूक चालवली. चा गोळी रोखण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्या हाताला जखम झाली. त्यानंतर किमने अध्यक्षांच्या छातीवर गोळी झाडली.

बाहेर, किम यांच्या आदेशावरून केसीआयए एजंट्सनी राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांवर गोळ्या झाडल्या. त्यातले दोघे जेवत होते आणि दोघे जण ड्युटीसाठी तयार होते.

किम यांनी राष्ट्राध्यक्षांवर पुन्हा गोळी झाडण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची पिस्तूल बंद पडली. ते पटकन बाहेर गेले आणि आपल्या एका माणसाकडून रिव्हॉल्व्हर घेतली.

मग परत येऊन, पळणाऱ्या चा याला गोळी घालून ठार केलं. तेव्हा पार्क एका मॉडेलच्या आधारावर रक्तबंबाळ अवस्थेत बसले होते. किम पुढे गेले आणि त्यांच्या डोक्यात गोळी मारली.

त्या दोन महिलांना काहीही इजा झाली नाही. त्यांना गप्प बसण्यासाठी पैसे देण्यात आले. राष्ट्राध्यक्षांच्या मुख्य सल्लागारांना मात्र लक्ष्य केले गेले नव्हते.

यानंतर किम जवळच्याच दुसऱ्या इमारतीत गेले, जिथे त्यांनी आधीच बोलावलेले लष्कर प्रमुख वाट पाहत होते. तिथून दोघं कारने केसीआयए मुख्यालयाकडे रवाना झाले.

तपास अधिकाऱ्यांनी गोळीबाराच्या घटनेचं नाट्यरुपांतर केलं.

फोटो स्रोत, Alamy

फोटो कॅप्शन, तपास अधिकाऱ्यांनी गोळीबाराच्या घटनेचं नाट्यरुपांतर केलं.

बहुधा त्या लष्कर प्रमुखानं किम यांच्याशी वाद घातला नाही. कारण जरी किम थोडे घाबरलेले आणि बूट न घालता आलेले असले, तरी ते खूप प्रभावशाली होते आणि त्यांची माणसं परिसराची सुरक्षा करत होती.

पण वाटेत त्यांना लष्कराच्या मुख्यालयात जायला राजी केलं गेलं, आणि तिथेच मध्यरात्रीनंतर त्यांना अटक करण्यात आली.

किम यांनी न्यायालयात सांगितलं की, त्यांनी लष्कराचा वापर करून कदाचित देशात मार्शल लॉ लागू करून ही 'क्रांती' पूर्ण करायची आणि देशात लोकशाही आणायची योजना आखली होती.

पुनःचौकशीच्या खटल्याचा हा मुख्य मुद्दा आहे. सरकारी वकिलांचं म्हणणं होतं की, ही पूर्वनियोजित सत्ताबदलाची कटकारस्थानी योजना होती, पण किम यांचं म्हणणं होतं की, त्यामागे अधिक उदात्त हेतू होता.

पण काही जण यावर शंका घेतात, कारण या घटनेत नियोजनाचा अभाव दिसून येतो.

जी बंदूक त्यांनी वापरली ती जेवणापूर्वी तिजोरीतून काढण्यात आली होती, घटनास्थळी खूप साक्षीदार होते, जे हा कट बिघडवू शकत होते, आणि त्यांच्या तथाकथित 'क्रांती'साठी कोणतीही स्पष्ट योजना नव्हती.

ते तर केसीआयए मुख्यालयातसुद्धा पोहोचू शकले नाहीत.

किम यांच्या कुटुंबीयांना मोठी आशा

ते म्हणतात की, ही कदाचित सूडाची एक अचानक केलेली कृती असावी, कारण त्यांची शक्ती कमी होत चालली होती.

हत्येची चौकशी करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याने दोन दिवसांनी असा आरोप केला की, किम, जे राष्ट्राध्यक्षांनंतर दुसऱ्या क्रमांकावर होते, त्यांची सत्ता आणि स्थान गमावण्याच्या भीतीने अस्वस्थ झाले होते. कारण पार्क त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चा जी-चोलला जवळ करू लागले होते.

पुढच्याच महिन्यात, किम यांच्यावर बळजबरीने सत्तेवर ताबा घेण्याचा (उलथापालथीचा) प्रयत्न केल्याचा आरोपही लावला गेला.

वकील ली सांग-ही म्हणतात, "बंडाचा आरोप सिद्ध होण्यासाठी आरोपीने जबरदस्तीने राज्यघटनेनुसार चालणाऱ्या संस्था बंद पाडल्या पाहिजेत, पण या प्रकरणात तसं काही झालंच नाही."

वकील ली सांग-ही म्हणाल्या, "महाभियोग झालेले राष्ट्राध्यक्ष यून यांच्या खटल्यात त्यांनी लष्कराला संसदीय कामकाज रोखण्याचे निर्देश दिले की नाही हे न्यायालय ठरवेल.

पण किम जे-ग्यूच्या प्रकरणात त्यांनी सरकारी यंत्रणांचा ताबा घ्यायचा प्रयत्न केला, याचा कोणताही पुरावा नाही."

किम जे-ग्यू

फोटो स्रोत, Alamy

फोटो कॅप्शन, खटल्यादरम्यान किम जे-ग्यू

दक्षिण कोरियासाठी हा पुनर्विचार फक्त एका खटल्यापुरता मर्यादित नाही.

अनेकांना वाटतं की, ही वेळ आहे त्यांच्या लोकशाहीच्या प्रवासावर विचार करण्याची. जी केवळ सहा महिन्यांपूर्वीच एका मोठ्या संकटात सापडली होती.

ही संधी पार्क चुंग-ही यांच्या कामगिरीकडे नव्याने पाहण्याचीसुद्धा आहे. काही जण म्हणतात, त्यांची कामगिरी खूपच अतिरंजित आहे.

म्युंगजी विद्यापीठाचे अर्थशास्त्राचे प्राध्यापक किम डुओल म्हणतात, "त्यांनी केलेली प्रगती खरी होती, पण चुका देखील तितक्याच खऱ्या होत्या. असा हुकूमशाही कारभार नसता, तर दक्षिण कोरियाची प्रगती किंवा वाढ शक्य झाली असती का?"

किम यांच्या कुटुंबाला आशा आहे की, या नव्या खटल्यामुळे त्यांच्याबद्दलची लोकांची समज थोडी सौम्य होईल.

कोर्टात किम म्हणाले होते की, "पार्क यांना ठार मारणं ही एक अत्यंत 'वेदनादायक' पण आवश्यक अशी गोष्ट होती. मी युसिन राजवटीच्या काळजावर निशाणा साधला. एका रानटी प्राण्याच्या हृदयाने."

म्हणूनच माजी गुप्तहेर प्रमुख खरोखरच नायक ठरतो का? या प्रश्नाचं न्यायालयही उत्तर देऊ शकत नाही.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)