बांगलादेशात IPL च्या प्रसारणावर बंदी; दोन्ही देशांत क्रिकेटवरून नेमकं काय चाललंय?

बांगलादेशच्या माहिती व प्रसारण मंत्रालयानं इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या बांगलादेशातील प्रसरणास पुढील आदेशापर्यंत बंदीचे आदेश दिले आहेत.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) बांगलादेशी क्रिकेटपटू मुस्तफिजूर रहमानला कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघातून वगळण्याचे आदेश दिल्यानंतर बांगलादेशच्या सरकारनं सदर निर्णय जाहीर केलाय.

बांगलादेश दोन्ही देशांमधील क्रिकेटवरील वादाचा मुद्दा पूर्वीपेक्षा जास्त गांभीर्याने घेत आहे, हे बांगलादेशच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या निर्णयावरून दिसून येत आहे.

बांगलादेशी खेळाडूंना वगळण्याचा BCCI चा निर्णय

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) शनिवारी (3 जानेवारी) एक मोठा निर्णय घेतला.

बांगलादेशी क्रिकेटपटू मुस्तफिजूर रहमानला कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघातून वगळण्याचे निर्देश देण्यात आले होते.

त्यानंतर, केकेआरनं एका निवेदनात, बीसीसीआयच्या सूचनेनुसार मुस्तफिजूर रहमानला संघातून वगळण्यात आल्याचं म्हटलं होतं.

भारतातील या घडामोडींवर बांगलादेशनंही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

बांगलादेश क्रीडा मंत्रालयाचे सल्लागार आसिफ नजरुल यांनी माहिती आणि प्रसारण सल्लागारांना बांगलादेशात आयपीएल सामन्यांचे प्रसारण रोखण्याची विनंती केली आहे.

तसंच, पुढील महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या टी-20 क्रिकेट विश्वचषकाचे सामने आणि बांगलादेशच्या खेळाडूंच्या सुरक्षेबाबतही आसिफ नजरुल यांनी वक्तव्य केलं आहे.

तसंच भारतातही बीसीसीआयच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरूर यांनी खेळांना राजकीय तणावापासून दूर ठेवलं पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली.

इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी हा एक अविचारी निर्णय असून त्यामुळं बांगलादेश आणि पाकिस्तानमधील जवळीक वाढेल, असं म्हटलं आहे.

तर, भाजप नेते संगीत सोम यांनी बीसीसीआयच्या निर्णयाचं स्वागत केलं आणि हा देशातील सर्व हिंदूंचा विजय असल्याचं म्हटलं आहे.

यापूर्वी, भारतातील उजव्या विचारसरणीच्या संघटना आणि भाजपच्या काही नेत्यांनी मुस्तफिजूर रहमानचा केकेआर संघात समावेश केल्याबद्दल शाहरुख खानवर नाराजी व्यक्त केली होती.

बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी शनिवारी हा निर्णय अलिकडच्या काळातील घडामोडी लक्षात घेऊन घेतल्याचं म्हटलं होतं.

बोर्ड केकेआरला मुस्तफिजूर रहमानच्या जागी दुसऱ्या खेळाडूला खेळवण्याची परवानगी देईल, असं ते म्हणाले होते.

आसिफ नजरुल काय म्हणाले होते?

बांगलादेश क्रीडा मंत्रालयाचे सल्लागार आसिफ नजरुल यांनी बीसीसीआयच्या या निर्णयाचा तीव्र विरोध केला आहे. नुकतेच बांगलादेश दौऱ्यावर गेलेले भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना भेटलेल्या काही जणांमध्ये नजरुल यांचाही समावेश होता.

त्यांनी फेसबूकवर एक पोस्ट करत म्हटलं की, "भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं कट्टरतावादी सांप्रदायिक गटांची भूमिका स्वीकारत कोलकाता नाईट रायडर्सला मुस्तफिजूर रहमानला संघातून काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. मी याचा तीव्र निषेध आणि विरोध करतो."

आसिफ नजरुल म्हणाले, "क्रीडा मंत्रालयाचा जबाबदार सल्लागार म्हणून मी या संपूर्ण प्रकरणाची माहिती आयसीसीला देण्याची सूचना क्रिकेट नियामक मंडळाला केली आहे. एखाद्या बांगलादेशी क्रिकेटपटूला करार असूनही भारतात खेळण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही, तर बांगलादेशचा संपूर्ण क्रिकेट संघ विश्वचषकात खेळण्यासाठी सुरक्षित कसा असेल."

बांगलादेशच्या क्रीडा मंत्रालयाच्या एका सल्लागारांनी दिलेल्या माहितीनुसार, "बांगलादेशचे विश्वचषकातील सामने श्रीलंकेत आयोजित करण्यासाठी आयसीसीला विनंती करण्याचे निर्देश त्यांनी बांगलादेश क्रिकेट बोर्डाला दिले आहेत."

भारत आणि श्रीलंका एकत्रितपणे या वर्षी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या टी-20 क्रिकेट विश्वचषकाचे आयोजन करत आहेत.

आयपीएल सामन्यांच्या प्रसारणाबाबतही आसिफ नजरुल यांनी कठोर भूमिका घेतली.

"माहिती आणि प्रसारण सल्लागारांना बांगलादेशमध्ये आयपीएल सामन्यांचे प्रसारण थांबवण्याची मी विनंती करतो," असं ते म्हणाले.

"आम्ही कोणत्याही परिस्थितीत बांगलादेश क्रिकेट, बांगलादेशी क्रिकेटपटू आणि बांगलादेशचा अपमान सहन करणार नाही. गुलामगिरीचे दिवस आता संपले आहेत," असंही त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

अविचारी पाऊल

रामचंद्र गुहा यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत याबाबत प्रतिक्रिया दिली.

"हे एक अतिशय मूर्खपणाचं पाऊल आहे. बांगलादेशशी चांगले संबंध राखणं भारताच्या राष्ट्रीय हिताचं आहे आणि दोन्ही देशांमधील क्रिकेट संबंध यामध्ये महत्त्वाचे ठरू शकतात. परंतु हा निर्णय ढाकाला इस्लामाबादच्या आणखी जवळ आणू शकतो," असं ते म्हणाले.

ज्येष्ठ पत्रकार प्रभू चावला यांनी बीसीसीआयच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. परराष्ट्र मंत्री जयशंकर ढाक्याला जाऊन बांगलादेश आणि पाकिस्तानच्या नेत्यांशी हस्तांदोलन करू शकतात, तर मग एखादा खेळाडू भारतात का येऊ शकत नाही? असं ते म्हणाले.

बांगलादेशी क्रिकेटपटू शकिब अल हसन आंतरराष्ट्रीय लीग टी 20 मध्ये एमआय एमिरेट्सकडून खेळतो.

शुक्रवारी, एमआय एमिरेट्सकडून खेळणाऱ्या शकिब अल हसननं 24 चेंडूत 38 धावा केल्या. त्याच्या खेळीमुळं एमआय एमिरेट्सने दुसऱ्या क्वालिफायरमध्ये अबू धाबी नाईट रायडर्सचा सात विकेट्सने पराभव केला आणि स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

शकिब अल हसनला त्याच्या खेळीसाठी सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं.

याचा संदर्भ देत ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई म्हणाले की, या प्रकरणात मुस्तफिजूर रहमान, शाहरुख खान आणि केकेआर यांना लक्ष्य करण्यात आलं आहे.

दरम्यान, भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी 2025 ला ढाका दौऱ्यानं निरोप दिला होता. जयशंकर यांनी 31 डिसेंबरला बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ढाक्याला भेट दिली.

द हिंदूच्या डिप्लोमॅटिक अफेयर्स एडिटर सुहासिनी हैदर यांनीही, परराष्ट्र मंत्री जयशंकर बांगलादेशला जाऊ शकतात, परंतु क्रिकेटपटू भारतात खेळू शकत नाही असं म्हटलं आहे.

सरकार सोशल मीडियावरील कॅम्पेनला बळी पडून शेजारी देशांबरोबरच्या संबंधांवर परिणाम होऊ देत आहेत. त्यामुळं आपली सॉफ्ट पॉवर कमी होत आहे, असं त्यांनी म्हटलं.

कोण आहे मुस्तफिजूर?

मुस्तफिजूर बांगलादेश क्रिकेट संघातील स्टार खेळाडू आहे. तो डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. त्यांनं 15 कसोटी सामन्यांमध्ये 31 विकेट घेतल्या आहेत. तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 116 सामन्यांत 177 विकेट घेतल्या आहेत.

टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्यांच्या नावावर 158 विकेट आहेत.

आयपीएलमध्येही मुस्तफिजूर रहमाननं चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळंच 30 वर्षीय मुस्तफिजुरला केकेआरने खरेदी केलं आहे.

2016 च्या सुरुवातीला सनरायझर्स हैदराबादनं त्याला संघात घेतलं होतं. त्यानंतर इंग्लंडमधील घरगुती मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी ससेक्ससोबतच्या त्यानं करार केला होता.

वर्ल्ड टी20 स्पर्धेत ते स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज होता.

काय म्हणाले होते संगीत सोम?

देवकीनंदन ठाकूर यांनी बांगलादेशमधील हिंदू तरुणाच्या हिंसाचाराच्या मुद्द्यावरून केकेआरच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.

एएनआयशी बोलताना त्यांनी म्हटलं होतं की, "बांगलादेशमध्ये हिंदूंची निर्दयपणे हत्या होत आहे. त्यांची घरं जाळली जात आहेत. माता आणि मुलींवर बलात्कार होत आहेत. हे पाहिल्यानंतर कोणी इतकं निर्दयी कसं असू शकतं की त्या देशातील क्रिकेटपटूला संघात घेईल."

देवकीनंदन ठाकुर यांनी शाहरुख खानबाबत म्हटलं की, "या देशानं तुम्हाला हिरो, सुपरस्टार बनवलं आणि तुम्हाला इतकी शक्ती दिली की तुमची स्वतःची क्रिकेट टीम आहे. याआधी तुम्ही काय होता. तुम्ही टीव्ही मालिकांमध्ये काम करून दररोज 500 ते 1000 रुपये कमावत होता."

केकेआर मॅनेजमेंटनं या क्रिकेटपटूला संघातून काढून टाकण्याची मागणी करत ठाकूर यांनी मुस्तफिजुरला दिले जाणारे 9.2 कोटी रुपये बांगलादेशमध्ये मारल्या गेलेल्या मुलांच्या लोकांना वाटावे असं म्हटलं होतं.

दरम्यान, भाजप नेते आणि उत्तर प्रदेशच्या सरधना मतदारसंघाचे माजी आमदार संगीत सिंह सोम यांनी मुस्तफिजुरसा कोलकाता नाईट रायडर्स संघात घेतल्यानं शाहरुख खानला 'गद्दार' म्हटलं होतं.

शाहरुख खानला भारतात राहण्याचा अधिकार नसल्याचंही ते म्हणाले होते.

शाहरुख खान, अभिनेत्री जुही चावला आणि त्यांचे पती जय मेहता हे केकेआर फ्रँचायझीचे मालक आहेत.

विरोधी पक्षातील नेते आणि मुस्लिम धार्मिक संघटनांनी याचा तीव्र निषेध केला आहे.

काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या की, "बांगलादेशी खेळाडूंना त्या लिलावात कोणी घेतले हे मला सर्वात आधी विचारायचे आहे. बीसीसीआय आणि आयसीसीसाठी हा प्रश्न आहे."

"बांगलादेशी खेळाडूंना आयपीएल खेळाडूंच्या लिलावाच्या गटात कोणी टाकलं, याचं उत्तर गृहमंत्र्यांचा मुलगा जय शाह यांनी द्यावं. ते आयसीसीचे प्रमुख आहेत आणि जगभरातील क्रिकेटचे मुख्य निर्णय घेणारे आहेत," असं त्यांनी म्हटलं होतं.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन