'मला 31 व्या वर्षीच ब्रेन स्ट्रोकचा त्रास सुरू झाला, आता मी इतरांना मदत करते'

    • Author, जेनी रीस
    • Role, आरोग्य प्रतिनिधी, बीबीसी वेल्स न्यूज

अ‍ॅनघार्ड डेनिसला ब्रेन स्ट्रोकची लक्षणं माहिती होती. कारण तिच्या आजीला होणारा त्याबाबतचा त्रास तिनं पाहिला होता. डेनिसलाही मायग्रेन अर्थात डोकेदुखीचा त्रास होता. त्यामुळं आपल्यालाही भविष्यात स्ट्रोकचा धोका असू शकतो, असं तिला वाटायचं. पण हा स्ट्रोक आपल्या 32व्या वाढदिवसाच्या दोन दिवस आधीच येईल, याची मात्र तिनं कल्पना केलेली नव्हती.

मार्च महिन्यात स्ट्रोक आल्यानंतर, अगदी मोजे घालण्यासाठीही तिला तिच्या लहान मुलीवर विसंबून राहावं लागलं. त्यामुळं अ‍ॅनघार्ड डेनिस फारच बेचैन झाली.

"खरं तर माझ्या सहा वर्षांच्या मुलीला रोज मीच मोजे घालायचे, पण आता झालंय उलटंच," इंग्लंडच्या स्वानसी शहरात राहणारी डेनिस सांगत होती.

यातून बाहेर येण्यासाठी असा त्रास असणाऱ्या इतरही लोकांशी संवाद साधावा, असं या आजारामध्ये संशोधन करणाऱ्या ‘स्ट्रोक असोसिएशन’नं तिला सुचवलं.

डेनिस सांगत होती, की ‘‘मला नेमका काय त्रास होतोय, हे माझ्या लहान मुलीला समजावून सांगणं, ही माझ्यासाठी फारच अवघड गोष्ट होती.’’

“माणूस पडल्यावर त्याच्या हातापायाला प्लास्टर घालावं लागतं. पण आपण मेंदूला प्लास्टर घालू शकत नाही, हे मी कसं समजावून सांगणार?" डेनिस आपली हतबलता व्यक्त करत होती.

अशाच समदु:खी डेव्ह जोन्सकडून डेनिसला आधार मिळाला. त्यालाही सात वर्षांपूर्वी या आव्हानाचा सामना करावा लागला होता. एका मुलाचा बाप बनल्यानंतर सहा महिन्यांनीच त्याला स्ट्रोक आला होता. सध्या तो ‘स्ट्रोक असोसिएशन’चा समन्वयक आहे.

डेनिस सांगते, “स्ट्रोकनंतर त्याच्या मुलासोबत तो कसा जगला, याचा अनुभव डेव्हनं मला सांगितला. त्याचा उपयोग मला माझ्या मुलीसोबत वावरताना झाला.’’

स्ट्रोकच्या संकटाबद्दल सांगताना डेनिस म्हणाली, "आयुष्यात उलथापालथ करणारं असं काही क्लेशकारक घडू शकेल, याची कोणतीही चिन्हं मला जाणवली नव्हती."

“नोव्हेंबरमध्ये आमचं लग्न झालं. तेव्हा आम्ही सुखी वैवाहिक आयुष्याची स्वप्न पाहत होतो. संसाराचं नियोजन करत होतो." डेनिस सांगत होती.

स्ट्रोकनंतर हॉस्पिटलमध्ये दाखल असताना आपली मुलगी कॅरीबद्दलच्या विचारानं ती फार अस्वस्थ होती. घरी परतल्यानंतर तर गोष्टी अधिकच कठीण झाल्या.

व्यवस्थापक म्हणून काम करणारी डेनिस या शारीरिक स्थितीतून बाहेर येण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. मग त्यात अगदी कुबड्यांशिवाय कारमधून शाळेच्या गेटपर्यंत चालण्यासारखी छोटी गोष्ट असते. मात्र तिच्यासाठी तेही तेवढं सोपं राहिलेलं नव्हतं.

“माझ्या मुलीला माझ्याऐवजी दुसरं कोणीतरी उचलून शाळेत नेऊन सोडतं आहे, ते पाहणंही मला जड जात होतं," डेनिस म्हणत होती.

ब्रिटनमध्ये या आजाराबद्दलची स्थिती काय आहे?

‘चॅरिटी स्ट्रोक असोसिएशन’च्या माहितीनुसार ब्रिटनमध्ये दरवर्षी सुमारे 1 लाख लोकांना स्ट्रोक येतो. दर पाच मिनिटांनी एका व्यक्तीला हा त्रास होतो.

दरवर्षी 88 हजारांहून अधिक लोक यातून सावरतात. मात्र पुन्हा सर्वसामान्य जीवन जगण्यासाठीची लढाई त्यांच्यासाठी फार दीर्घ असते. एका संशोधनात असंही आढळून आलं आहे, की स्ट्रोकवरील उपचारादरम्यानच निम्म्या लोकांना नैराश्य येतं. तर सुमारे 14 टक्के लोक आत्महत्येचा विचार करतात.

तथापि, असंही लक्षात आलं आहे, की अशा स्ट्रोक बाधित लोकांनी परस्परांशी संवाद साधला, अनुभवांची देवणाघेवाण केली, तर या त्रासातून बाहेर येण्यास त्यांना मोठी मदत होते.

डेनिसला यातून बाहेर काढण्यासाठी जोन्सनं खूप मदत केली. जोन्सनं स्वत: एक वर्षात दोन मोठे स्ट्रोक सहन केले आहेत. 2017 मध्ये पूर्णपणे तंदुरुस्त असलेल्या 36 वर्षांच्या जोन्सनं स्ट्रोक आल्यानंतर स्वत:ला कसं सावरलं, याचा अनुभव डेनिसला सांगितला.

जोन्स म्हणाला, की त्यानं पहिल्यांदा अशा गोष्टी केल्या, ज्या तो स्ट्रोकनंतर सहजासहजी करू शकत नव्हता. स्ट्रोकच्या त्रासातून जाणाऱ्या व्यक्तींनी सांगितलेल्या युक्तीच्या चार गोष्टींमुळंच जोन्सची मानसिकता बदलू लागली.

"यातून बाहेर येण्यासाठी तुम्ही एकाग्र होऊन प्रयत्न करू शकता. 'मी हे करू शकेन, चला प्रयत्न करूया!', असा आत्मविश्वास मात्र बाळगायला हवा," जोन्स सांगत होता.

या त्रासादरम्यान भावनिक चढउताराला कसं सामोरं जायचं, याच्याही टिप्स जोन्सनं इतरांकडून घेतल्या.

स्ट्रोक्सचा त्रास असणाऱ्या सत्तरीतील लोकांना जोन्स प्रामुख्यानं मदत करतो. पण त्याला स्वत:ला 26व्या वर्षीच या संकटाला सामोरं जावं लागलं होतं.

‘स्ट्रोक असोसिएशन’च्या सहयोगी संचालक केटी चॅपेल यांनी सांगितलं की, वेल्समध्ये दरवर्षी सुमारे 7 हजार लोकांना स्ट्रोक येऊ शकतो. आत्तापर्यंत सुमारे 70 हजार लोक यातून वाचले आहेत.

"स्ट्रोक आल्यानंतर शारीरिक अपंगत्वापासून, संवाद साधण्यातील अडथळे ते मानसिक आरोग्य बिघडण्यापर्यंत काहीही होऊ शकतं. शिवाय प्रचंड थकवाही येतो," असे सांगतानाच चॅपेल म्हणाल्या, ‘‘ही परिस्थिती आटोक्यात आणण्यात आम्हालाही मर्यादा आहेत.’’

चॅपेल पुढं म्हणाल्या, "स्ट्रोकमधून वाचलेल्या लोकांना पूर्णपणानं बरं होण्यासाठी मोठा कालावधी लागतो. वेल्स सरकारही आता यावरील उपाययोजनांची नव्यानं आखणी करत आहे. वेळीच योग्य मदत केल्यास स्ट्रोकग्रस्त लोकांचं जीवन पुन्हा रुळावर येऊ शकतं."

स्ट्रोकच्या धक्क्यातून आता सावरणारी अ‍ॅनघार्ड डेनिस म्हणाली, की ‘‘अजूनही समोर आव्हानं आहेत. मात्र स्ट्रोकनंतर जीवनाकडं बघण्याचा माझा दृष्टीकोनच बदलून गेला आहे. रोज संध्याकाळी पाच वाजता कामावरून घरी येण्यापूर्वी मी तणावात असे. कुटुंबासोबत राहण्याऐवजी मला स्वत:साठी वेळ हवा असे. आता मात्र मी माझी मुलगी शाळेतून घरी येण्याची आतुरतेनं वाट पाहत असते. तिला आता मी पूर्वीपेक्षा अधिक वेळ देते."

"भरपूर पैसे मिळवणं, सुट्ट्या घेणं आणि ख्रिसमसची मजा करणं म्हणजेच सर्व काही, असं मला वाटायचं. पण तसं नाही, हे माझ्या आता लक्षात आलं आहे. मुलीला फक्त माझा वेळ हवा होता. स्ट्रोकसारखी घटना जीवनात आली नसती, तर मला ही जाणीव झालीच नसती."

स्ट्रोकची लक्षणं

FAST या इंग्रजी आद्याक्षरांनी स्ट्रोकची मुख्य लक्षणं लक्षात ठेवली जाऊ शकतात :

Face (चेहरा) - उतरलेला

Arms (खांदे) – उचलणं अवघड

Speech (बोलणं) - अस्पष्ट, तोतरं

Time (वेळ) - ताबडतोब रुग्णवाहिकेला डायल करा.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)