हिजबुल्लाहचे पेजर कसे फुटले? ते अजूनही पेजर का वापरत होते? पेजरबद्दल सर्वकाही

    • Author, मॅट मर्फी (बीबीसी न्यूज) जो टिडी
    • Role, (सायबर करस्पॉंडंट)

लेबनॉनमधील निमलष्करी संघटना हिजबुल्लाहच्या सदस्यांच्या खिशामध्ये असलेल्या पेजरचा स्फोट झाल्यामुळे हजारो लोक जखमी झाल्याची घटना लेबनॉनची राजधानी बैरुतमध्ये घडली आहे. एकमेकांशी संवाद साधण्यासाठी हे पेजर्स हिजबुल्लाहतर्फे वापरण्यात येतात.

देशभरात एकाच वेळी हे स्फोट झाल्यामुळे खळबळ उडाली. या स्फोटांमध्ये 9 लोकांचा मृत्यू झाला असून 2800 लोक जखमी झाले आहेत. त्यातील अनेक लोक गंभीर जखमी आहेत.

प्रथमदर्शनी हा हल्ला सुनियोजित दिसत असून हा हल्ला नेमका कसा घडवण्यात आला याबद्दल स्पष्ट माहिती मिळालेली नाही.

हिजबुल्लाहने हल्ल्यासाठी इस्रायल जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

या हल्ल्याविषयी आतापर्यंत हाती आलेल्या माहितीवर एक नजर टाकूया

पेजर म्हणजे काय?

मोबाईल्स नव्हते किंवा सुरुवातीच्या काळात भयंकर महाग होते, तेव्हा पेजर हे संपर्काचं एक साधन होतं. हे पेजर्स निरोप पोचवण्यासाठी - मेसेजिंगसाठी वापरले जायचे. साधारण 90च्या दशकात आणि 2000च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात पेजर्सचा मोठ्या प्रमाणात वापर होत होता.

काडेपेटीपेक्षा थोडे मोठा, पण सिगरेटच्या पाकिटापेक्षा लहान आकाराचा हा पेजर अनेकांच्या कमरेला बेल्टला अडकवलेला असायचा. या पेजरला लहानशी स्क्रीन असायची. ज्यावर मेसेज दिसायचा.

Numeric Pagers वर फक्त फोन नंबर दिसायचा. याचा अर्थ तुम्हाला या नंबरला फोन करायचाय.

Alphanumeric Pager वर आकडे आणि मजकूर असं दोन्ही दिसायचं.

प्रत्येक पेजरला एक नंबर असायचा. फोन करून तुम्हाला हा नंबर असणाऱ्या व्यक्तीसाठीचा निरोप ऑपरेटरला देता यायचा.

रेडिओ फ्रीक्वेन्सीचा वापर करत हा निरोप पेजरवर ट्रान्समिट व्हायचा. मेसेज आल्यावर पेजर बीप करायचा किंवा Vibrate व्हायचा. One Way Pager वर फक्त मेसेज यायचा तर Two Way Pager द्वारे मेसेजला उत्तरही देता यायचं.

हा हल्ला कधी आणि कुठे झाला?

लेबनॉनची राजधानी बैरुतमध्ये आणि देशाच्या इतर भागात मंगळवारी (17 सप्टेंबर) स्थानिक वेळेनुसार दुपारी 3 वाजून 45 मिनिटांनी हे स्फोट व्हायला सुरुवात झाली.

प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार काही लोकांच्या खिशातून धूर येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर छोटे स्फोट झाले. फटाके फुटल्यासारखे किंवा गोळीबारासारखे आवाज आले.

एका क्लिपमध्ये दिसणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती दुकानात उभी दिसते. अचानक त्याच्या खिशात छोटा स्फोट होतो.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार साधारण एक तास ही स्फोटांची मालिका सुरू होती.

पेजर्सचा स्फोट कसा झाला?

लेबनॉनच्या विविध रुग्णालयांमध्ये अनेक लोक दाखल व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला असं तिथल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं,

मंगळवारी झालेल्या या हल्ल्यांबद्दल तज्ज्ञांनी आश्चर्य व्यक्त केलंय. कारण आपली सुरक्षा व्यवस्था कशी चोख आहे याबद्दल हिजबुल्लाह कायम अभिमान बाळगून असतो.

काहींच्या मते एखाद्या हॅकद्वारे पेजरच्या बॅटरी जास्त गरम केल्या गेल्या (Overheat) आणि त्यामुळे पेजरचा स्फोट झाला. पण अशा प्रकारचा हल्ला अभूतपूर्व ठरेल.

काही तज्ज्ञांच्या मते हे शक्य नाही. कारण बॅटरी गरम होऊन स्फोट झाल्याचं फुटेजवरून वाटत नाही.

पण हा Supply Chain Attack म्हणजेच पेजर तयार होत असतानाच्या उत्पादन साखळी प्रक्रियेत हस्तक्षेप करून केलेला हल्ला असण्याचा अंदाज काही तज्ज्ञांनी व्यक्त केलाय.

हे पेजर्स तयार होत असताना किंवा तयार झाल्यानंतर ते पाठवले जात असताना Tampering म्हणजे छेडछाड करण्यात आल्याचा संशय आहे.

अशा प्रकारचे सप्लाय चेन अॅटॅक हे आता जगातल्या सायबर सुरक्षेसाठी डोकेदुखी ठरले आहेत. एखादं गॅजेट तयार होत असतानाच हॅकर्सनी त्याचा अॅक्सेस मिळवल्याच्या घटना याआधी घडलेल्या आहेत.

मात्र अशा प्रकारचे हल्ले सॉफ्टवेअरमध्ये करता येतात. हार्डवेअरमध्ये अशा प्रकारची छेडछाड दुर्मिळ आहे कारण त्यासाठी वस्तू प्रत्यक्ष हाताळावी लागते.

जर हा अशा प्रकारचा उत्पादन साखळीत हस्तक्षेप करून केलेला हल्ला असेल तर मग इतके पेजर्स हाताळण्यासाठी प्रचंड मोठं गुप्त कारस्थान करण्यात आल्याची शक्यता आहे.

पण प्रत्येक डिव्हाईसमध्ये 10 ते 20 ग्रॅम अत्यंत तीव्र क्षमतेची स्फोटकं एखाद्या खोट्या इलेक्ट्रॉनिक भागात लपवणं शक्य असल्याचं ब्रिटीश लष्करातल्या एका माजी स्फोटक तज्ज्ञांनी बीबीसीला नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितलं.

याच तज्ज्ञांच्या मते Alphanumeric Text Message म्हणजे आकडे आणि शब्द असणाऱ्या मेसेजद्वारे यांचा स्फोट घडवून आणण्यात आल्याची शक्यताही या तज्ज्ञांनी व्यक्त केली.

हल्ल्यातील पीडित कोण आहेत?

हिजबुल्लाहच्या निकटवर्तीय सूत्रांनी एएफपी या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये लेबनॉनच्या संसदेतल्या हिजबुल्लाहच्या दोन खासदारांच्या दोन मुलांचा समावेश आहे. हिजबुल्लाहच्या एका सदस्याच्या मुलीचाही मृत्यू झाला आहे.

लेबनॉनमध्ये असलेले इराणचे राजदूत मोज्तबा अमानी हेही या हल्ल्यात जखमी झाले आहेत. इराणी प्रसारमाध्यमातील बातम्यांनुसार त्यांच्या जखमा किरकोळ आहेत.

हिजबुल्लाहचे प्रमुख हसन नरसल्लाह या हल्ल्यात जखमी झाले नाहीत अशी माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

बहुतांश लोकांना हाताला आणि चेहऱ्याला जखमा झाल्याचं लेबनॉनचे सार्वजनिक आरोग्य मंत्री फिरास अबैद यांनी म्हटलंय.

बीबीसीच्या न्यूज अवर या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, “बहुतांश लोकांना चेहऱ्याला जखमा झाल्या आहेत. विशेषत: डोळ्यांना. तसंच काहींचे हात तुटले किंवा बोटं तुटली आहेत. तर काहींच्या शरीराला एका बाजूला जखमा झाल्या आहेत."

“रुग्णालयात येणाऱ्या जखमींपैकी बहुतांश साध्या वेशात आहेत. त्यामुळे ते हिजबुल्लाहचे सदस्य आहेत की अन्य कोणी ही ओळख पटवणं कठीण जात आहे,” ते पुढे म्हणाले.

“काही वृद्ध आणि काही अगदी लहान मुलं सुद्धा रुग्णालयात येत आहेत. एका लहान मुलाचाही दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. काही आरोग्य कर्मचारी सुद्धा आहे,” ते म्हणाले.

लेबनॉनच्या बाहेर अशाच स्फोटांत सीरियामध्येही अशाच पद्धतीने 14 जण जखमी झाल्याची माहिती सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राइट्स या संस्थेने दिली आहे.

या हल्ल्याला जबाबदार कोण?

आतापर्यंत या हल्ल्याची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही. पण लेबनॉनचे पंतप्रधान आणि हिजबुल्लाह यांनी इस्रायलला या हल्ल्यासाठी जबाबदार धरलं आहे.

हे स्फोट म्हणजे लेबनॉनच्या सार्वभौमत्वाला आणि सुरक्षेला मोठा धक्का असल्याचं पंतप्रधान नाजीब मिकाटी यांनी म्हटलंय.

या हल्ल्यांमागे इस्रायल असल्याचं हिजबुल्लाहने एका निवदेनात म्हटलंय.

"या गुन्ह्यासाठी आणि सामान्य नागरिकांवर हल्ला करण्यासाठी हाच देश जबाबदार आहे. या विश्वासघातकी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या देशाला या हल्ल्याची शिक्षा नक्कीच मिळेल," असंही त्यांनी पुढे म्हटलं.

इस्रायली अधिकाऱ्यांनी या आरोपांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र या हल्ल्याच्या मागे त्यांचाच हात आहे असं अनेक विश्लेषकांना वाटतं.

लँकेस्टर विद्यापाठातील आंतरराष्ट्रीय संबंध विभागाचे प्रमुख प्रा. सायमन मेबॉन बीबीसीशी बोलताना म्हणाले.

"इस्रायल शत्रूंवर हल्ला करण्यासाठी असे प्रकार करू शकतं हे आपल्याला माहिती आहे," पण हा हल्ला अगदीच अनपेक्षित आणि अभूतपूर्व आहे असंही ते म्हणाले.

हिजबुल्लाह पेजर का वापरतात?

पेजर हा संवादाचा प्रकार फार अत्याधुनिक नाही. इस्रायलला हिजबुल्लाहच्या लोकांचं ठिकाण समजू नये म्हणून हिजबुल्लाहचे लोक पेजरचा वापर करतात.

पेजर हे वायरलेस टेलिकम्युनिकेशनचं माध्यम आहे. त्यावर अल्फान्युमरिक मेसेज (आकडे आणि शब्द) किंवा व्हॉइस मेसेज येतात.

1996 साली हिजबुल्लाहसाठी बॉम्ब तयार करणाऱ्या याह्या अय्याशच्या हातातल्या मोबाईल फोनचा स्फोट झाला आणि त्यात तो मारला गेला. इस्रायलने हा स्फोट घडवून आणला होता. त्यानंतर हिजबुल्लाहने संपर्कासाठी मोबाईल फोन्स वापरणं सोडलं.

मात्र आता स्फोट झालेले पेजर्स अगदी नवे होते, यापूर्वी वापरण्यात आले नव्हते असं हिजबुल्लाहच्या एका सदस्याने एपी या वृत्तसंस्थेला सांगितलं.

सीआयएच्या माजी विश्लेषक एमिली हार्डिंग यांच्या मते अशाप्रकारचा हल्ला हिजबुल्लाहसाठी अतिशय लाजिरवाणा आहे.

"सुरक्षा व्यवस्था भेदून केलेला अशा प्रकारचा हल्ला शारीरिकदृष्ट्या नुकसानकारक आहेच. मात्र त्याचप्रमाणे त्यांच्या संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे,” बीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या.

"माझ्या मते ते आता या हल्ल्याबद्दल सखोल अंतर्गत तपास करतील आणि त्यामुळे इस्रायलसोबतच्या होऊ घातलेल्या संघर्षापासून त्यांचं लक्ष हटेल."

या हल्ल्यामुळे हिजबुल्लाह - इस्रायल यांच्यातला संघर्ष वाढेल का?

इस्रायलचा मुख्य शत्रू इराणशी हिजबुल्लाह संलग्न आहे. इराणनं आपल्या सहयोगींचा 'अ‍ॅक्सिस ऑफ रेझिस्टन्स' हा अनौपचारिक गट तयार केला आहे आणि हिजबुल्लाह त्याचा एक भाग आहे. या गटाने इस्रायलविरुद्ध गेल्या काही महिन्यांत छोट्या स्वरुपात लढाया छेडल्या आहेत..

यामुळे दोन्ही बाजूंची मोठी लोकसंख्या निर्वासित झालीय.

इस्रायलच्या सुरक्षा समितीने त्यांच्या नागरिकांना देशाच्या उत्तर भागात सुरक्षितपणे हलवण्याचा निर्णय घेतल्याच्या काही तासांमध्येच हे हल्ले झाले.

देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलली जातील, असं इस्रायलच्या दौऱ्यावर असलेल्या एका अमेरिकन अधिकाऱ्याला पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सांगितलं.

इस्रायलच्या एका अधिकाऱ्याच्या हत्येचा हिजबुल्लाहचा कट उधळल्याची माहिती सोमवारी (16 सप्टेंबर)ला इस्रायलच्या स्थानिक सुरक्षा संस्थेने दिली होती.

दोन्ही देशांमध्ये तणाव असला तरी दोन्ही देशांनी थोडी मर्यादा ठेवली आहे आणि एकमेकांविरुद्ध युद्ध पुकारलेले नाही.

पण मंगळवारच्या हल्ल्यानंतर हिजबुल्लाहने या हल्ल्याला योग्य प्रत्युत्तर देण्याची धमकी दिल्यानंतर आता मात्र ही परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)