You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मोबाईल अॅप तुमचा पर्सनल डेटा चोरू शकतात? तुमचे प्रायव्हसी सेटिंग्ज कसे सुरक्षित ठेवाल?
- Author, अमृता दुर्वे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
संचार साथी अॅप आणि त्यासंबंधीचे प्रायव्हसी-सिक्युरिटीचे प्रश्न याबद्दल मोठी चर्चा झाली.
आपला फोन सतत आपल्या हातात असतो आणि त्यावर अनेक कामांसाठीची तसेच टाईमपाससाठीची अॅप्लिकेशन्स आपण डाऊनलोड करून ठेवलेली असतात.
मग त्या प्रत्येकाबद्दल प्रायव्हसी-सिक्युरिटीच्या दृष्टीनं विचार करायला हवा का? मुळात कोणतंही अॅप डाऊनलोड करण्याआधी कुठल्या गोष्टींचा विचार करायला हवा का? आपण काय काय तपासायला हवं? जाणून घेऊयात.
आपल्या फोनमधील अॅप्लिकेशन्स म्हणजेच अॅप्स वापरून रस्ता शोधणं, कॅब बुक करणं, जेवण मागवणं, सिनेमा-सीरिज-बातम्या पाहणं किंवा तासन्तास फुकट टाईमपास करणं या सगळ्याच गोष्टी अगदी सोप्या आणि सहज झालेल्या आहेत.
हेच टूल्स तुम्हाला धोक्यात आणू शकतात?
पण हेच टूल्स तुम्हाला धोक्यात आणू शकतात. कसं?
कोणतंही अॅप डाऊनलोड केलं की ते इन्स्टॉल होताना ते तुमच्याकडे काही परवानग्या मागतं. या सगळ्याला काही न वाचता, फारसा विचार न करता तुम्ही ओके म्हणत असाल, तर थांबा.
या परवानग्या तुमची खाजगी माहिती मिळवण्यासाठी असतात. तुमचे कॉन्टॅक्ट्स, कॉल लॉग्स, लोकेशन डेटा, कॅलेंडर यासारख्या तुमच्या फोनवरच्या गोष्टी पाहता येण्याची परवानगी हे अॅप मागतात.
अनेकदा योग्य कारणांसाठी या माहितीची गरज असते. जसं की फूड डिलीव्हरी किंवा टॅक्सी बुक करण्यासाठीच्या अॅपला तुमची ऑर्डर पोहोचवण्यासाठी किंवा टॅक्सी तुमच्यापर्यंत आणण्यासाठी तुमचा लोकेशन डेटा लागणारच.
पण जेवण देणाऱ्या अॅपला माझी कॉन्टॅक्ट लिस्ट का हवीय? किंवा माझ्या कॅलेंडरचा अॅक्सेस का हवा आहे? असा प्रश्न तुम्हाला पडलाय का?
डेव्हलपर्सना ही माहिती मिळाल्यावर ते ती थर्ड पार्टीला देऊ शकतात किंवा विकूही शकतात. म्हणजे कोण, तर तुमचं लोकेशन, तुमच्या आवडी-निवडी यांचा अभ्सास करून तुम्हाला टार्गेट करून जाहिराती दाखवणाऱ्या कंपन्या.
तुमच्या आरोग्याबद्दलचा डेटा, फायनान्शियल माहिती, तुमचं लोकेशन ही सगळी माहिती कंपन्यांसाठी अतिशय मोलाची ठरते. म्हणूनच आपण अॅपला परमिशन्स देताना सतर्क रहायला हवं. कारण ही माहिती चुकीच्या गोष्टींसाठीही वापरली जाऊ शकते.
पण मग तुमच्याबद्दलची माहिती अॅप्सनी गोळा करू नये म्हणून किंवा त्यांना मिळणाऱ्या माहितीचं प्रमाण आटोक्यात ठेवण्यासाठी काय करायचं?
तर, अॅप कायम ऑफिशियल सोर्सवरून, अॅप स्टोअरवरूनच डाऊनलोड करा. कुणीतरी पाठवलेली लिंक, Apk फाईल किंवा इतर कशावर क्लिक करून डाऊनलोड करू नका. Apk फाईल डाऊनलोड केली आणि फोन हॅक झाला, अशा अनेक घटना घडलेल्या आहेत.
प्ले स्टोअरमध्ये लिस्टिंग होण्याआधी त्या डेव्हलपर्सना अॅपसाठीचे काही निकष पूर्ण करावे लागतात. त्यामुळे ते अॅप अधिक सुरक्षित असतात.
पण असं असलं तरी काही चुकीचे हेतू असलेले अॅप (Malicious Apps) सुद्धा या स्टोअरमध्येही शिरकाव करू शकतात. म्हणूनच या अॅपचा डेव्हलपर कोण आहे, रिव्ह्यूजमध्ये लोकं काय म्हणतायत या गोष्टींवर नजर टाका.
हे अॅप तुमच्या फोनवरच्या कोणत्या गोष्टी अॅक्सेस करतायत, अॅपची प्रायव्हसी पॉलिसी काय आहे, तुमचा डेटा शेअर केला जाणार आहे का या गोष्टीही पहा.
हे अॅप तुमचा डेटा कुठे स्टोअर करणार आहे, हे पण महत्त्वाचं आहे. म्हणजे ऑफलाईन अॅप त्यांचा डेटा तुमच्या डिव्हाईसवरच स्टोअर करतात. काम करण्यासाठी त्यांना इंटरनेटची गरज नसते.
ऑनलाइन अॅप त्यांचा डेटा कंपनीच्या सर्व्हरवर स्टोअर करतात आणि त्यांना काम करण्यासाठी इंटरनेट गरजेचं असतं. म्हणजे शॉपिंग अॅप्स किंवा मग फूड डिलीव्हरी अॅप्स ही तुमच्या फोनवरच डेटा स्टोअर करतात, पण ठराविक काळाने त्यांच्या सर्व्हरसोबत डेटा अपडेट केला जातो.
हे झालं त्या अॅप्सबद्दल, जी अजून डाऊनलोड केलेली नाहीत. पण जी ऑलरेडी तुमच्या फोनमध्ये आहेत, इन्टॉल केलेली आहेत त्यांचं काय?
या 5 गोष्टी करा
- अॅप परमिशन्सचा आढावा
तुमच्या फोनच्या सेटिंग्समध्ये जाऊन, प्रत्येक अॅपला कशाकशासाठीची परवागनी देऊन ठेवली आहेत, ते पहा. ज्या परवानग्यांची गरज वाटत नाही, त्या काढून टाका. म्हणजे एखादं अॅप म्हणतंय की कॅमेरा परमिशन गरजेची आहे, पण समजा तुम्ही त्या अॅपमधून कॅमेरा फंक्शन वापरणारच नसाल, तर तुम्हाला फारसा प्रॉब्लेम येणार नाही.
ज्या ज्या गोष्टींबद्दल शंका वाटतेय, त्या परमिशन्स बंद करा. फार फार तर काय होईल, तर ते अॅप तुम्हाला एरर दाखवून पुन्हा परवानगी द्यायला सांगेल. कॉन्टक्ट लिस्ट, कॅमेरा, स्टोरेज, लोकेशन, मायक्रोफोन या परवानग्या मागणाऱ्या अॅप्सकडे विशेष लक्ष द्या.
- लोकेशन परमिशन्स
अॅपला एकदा तुम्ही तुमचं लोकेशन पाहण्याची परवानगी दिली की त्यातून त्यांना खूप काही कळू शकतं. त्यामुळे शक्य तितका हा लोकेशन अॅक्सेस मर्यादित ठेवा. ज्या अॅप्सना लोकेशनची गरज आहे, त्यांना सरसकट परवानगी न देता, 'When app is in use' चा पर्याय निवडा.
- अॅप्स अपडेट करा
तुमची फोनची ऑपरेटिंग सिस्टीम, अॅप्स आऊटडेटेड असतील तर स्पायवेअर, मालवेअरपासून संरक्षण मिळणार नाही. त्यामुळे हे काम आज ताबडतोब करा.
- फोन रिकामा करा
जगातल्या प्रत्येक अॅपची गरज आपल्याला नसते. पूर्वी वापरलं होतं पण आता लागत नाही, अशी अनेक अॅप्स तुमच्या फोनवर असतील. त्यामुळे जी अॅप्स वापरली जात नाहीत, ती 'Uninstall' करा. फोन आणि डेटा सुरक्षित ठेवण्यासाठीची ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे.
- सोशल मीडिया नेटवर्क अकाऊंट
अनेक अॅप्स त्यांचं स्वतंत्र लॉगिन तयार करण्याऐवजी तुमचं गुगल, फेसबुक लॉगिन वापरण्याचा पर्याय देतात. आपलं काम सोपं होतं म्हणून आपणही एका क्षणात हा पर्याय निवडतो. पण असं केल्याने तुमचा आख्खा सोशल मीडिया त्यांच्या हातात पडतोय. त्यांना आयती सगळी माहिती मिळतेय. खरंच तुम्हाला त्यांना ही माहिती द्यायची आहे का?
फेसबुकचं लॉगिन कुठं कुठं वापरलंय हे तपासण्यासाठीचा पर्याय फेबुच्या सेटिंग्समध्ये आहे. तिथं जाऊन गरज नसलेली अॅप्स या यादीतून काढून टाका. आणि अॅपसाठी वेगळं लॉगिन तयार करणं कधीही चांगलं.
मुलांसाठी अॅप डाऊनलोड करताना काय काळजी घ्याल?
मुलांसाठी म्हणून एखादं अॅप डाऊनलोड करत असाल, तर आणखीन काही गोष्टींचा विचार करायला हवा. म्हणजे हा गेम खेळताना माझं मूल इतर अनोळखी गेमर्ससोबत बोलणार आहे का? तो संवाद एखाद्या फोरममध्ये होणार आहे की 'वन ऑन वन' या दोन्हींमध्ये खूप मोठे धोके आहेत.
तुमच्या मुलाबद्दलची नेमकी कोणती माहिती इतरांसोबत शेअर होणार आहे, तपासून घ्या. हे अॅप पैसे कसं कमावतं? फार कमी गेमिंग अॅप्स ही प्रत्यक्षात फ्री असतात. जर अॅप जाहिराती दाखवणार असेल, तर त्या तुमच्या मुलांसाठी योग्य आहेत का? हे नक्की तपासा.
हे अॅप तुमच्या मुलाला गुंतवून ठेवतंय का , नेमकं काय शिकवतंय, ते पहा. सगळी अॅप्स वाईट नसतात, पण ती धोकादायक ठरण्यासाठी लहानशी गोष्टही कारणीभूत ठरू शकते.
बाकी फोन सिक्युरिटीसाठीच्या गोष्टी तर कायम लक्षात असायलाच हव्यात.
ईमेल बँकिंग, ट्रेडिंग अॅप्ससाठी 2 फॅक्टर ऑथेंटीकेशन, फोन अनलॉक म्हणजे बंद किंवा रिस्टार्ट करण्यासाठी पासवर्ड, पिन किंवा बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन हे पर्याय वापरू शकता. म्हणजे तो हरवला किंवा चोरीला गेला तरी पटकन सगळ्या गोष्टींचा अॅक्सेस मिळणार नाही.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)