'जोडीदार हवा की नको, लग्न का?'; 'मला बोलायचंय' उपक्रमात तरूण काय बोलत आहेत?

    • Author, प्राची कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठीसाठी

मला बोलायचंय! चीड असो की आनंद कोणत्याही क्षणी मनात येणारी साहजिक मानवी इच्छा म्हणजे आपल्याला जे वाटतंय, ते कोणाला तरी सांगण्याची. याच बोलण्यातून तरुणांचं आयुष्य बदलतंय. त्यांना निर्णय घेणं सोपं होतंय.

निर्णयांना दिशा मिळतेय. बोलण्यातून जगणं उलगडत आहे. हे शक्य झालं समीर शिपूरकर यांनी सुरू केलेल्या 'मला बोलायचंय' या 20 ते 40 वयोगटातल्या तरुण तरुणींसाठीच्या उपक्रमातून.

हा उपक्रम नेमका काय आहे आणि त्यातून तरुणांना काय मिळत आहे याविषयी आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

33 वर्षांचा जगदीश भोसले स्वतःची ओळख सांगताना तो क्विअर आहे हे नोंदवतो. जगदीश कथ्थक नृत्य शिकवतो. नृत्य शिकतानाच त्याने समाज कार्यात पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.

एमएसडब्ल्यू झाल्यानंतर त्याने काही सामाजिक संस्थांसोबत काम केलं. मात्र नृत्याची वाटणारी ओढ आणि सामाजिक क्षेत्रातील नोकरी यातील निवड करणं त्याला अवघड जात होतं. अशातच त्याने नृत्याला पूर्णवेळ देण्याचा निर्णय घेतला.

या सगळ्या गोंधळात असतानाच त्याला एका मैत्रीणीकडून 'मला बोलायचंय' या उपक्रमाबाबत कळलं.

जगदीश सांगतो, "मी गेलो ते बहुदा चौथं किंवा पाचवं सेशन असावं. मुळात क्विअर ही ओळख घेऊन मी जगतो. फेमिनीन पुरुषांना मुळात पटकन ट्रान्सजेन्डर म्हणून ओळख दिली जाते. मात्र, त्यापेक्षाही बराच मोठा भाग यात आहे. अशा जागा कमी आहेत जिथे मोकळेपणाने मांडणी करता येते."

"पहिल्याच सत्राला गेल्यानंतर मला लय सापडत गेली. गोष्टी समजायला मदत व्हायला लागली. नृत्याचा वापरही सामाजिक कार्य, अँक्टिव्हीजमसाठी करता येईल हे लक्षात आलं. अनेक जण स्ट्रगल करत आहेत हे देखील लक्षात आलं. ती जागा शेअरींगसाठी, मैत्रीसाठी, एक्सप्लोअर करण्यासाठी उपयोगाची आहे. मला दिशा शोधायला मदत झाली."

प्रकाशक असणाऱ्या 32 वर्षांच्या श्वेता खळदकरला अनेक प्रश्न सतावायचे. मात्र, त्याची मांडणी मात्र करता येत नव्हती. भावनांना किती महत्व द्यायचं असा प्रश्न तिला पडत होता. पण या गटात जायला लागल्यावर तिच्या विचारात स्पष्टता आली आणि भावना व्यक्त करता यायला लागल्याचं ती सांगते.

श्वेता म्हणते, "मी गेले तेव्हा गटचर्चा म्हणजे नक्की काय करतात हेदेखील मला माहीत नव्हतं, पण इथं बोलायलाच हवं असं बंधन नाही. तसंच जजमेंट नाही."

"मी गेले तेव्हा लग्नाचा विषय सुरू होता. म्हणजे लग्न करायला हवं का? नाही केलं तर काय? मग कसं रहायचं? आपल्या डोक्यातले विचार आणि भावनांना इथं वाट करून देता आली. पडताळून पाहता आलं. बहुतांश लोक अनोळखी असल्यामुळे इथं बोलायला सोपं वाटलं."

कोणाच्या नोकरी, जगण्याचे प्रश्न, तर कोणाला डिस्कनेक्टेड वाटण्याची अडचण अशी सगळीच मंडळी या गटात जमतात. ऋत्विक व्यास त्यापैकीच एक. त्याने फेसबुकवर या गटाबाबत वाचलं आणि तिथे जायचं ठरवलं.

वर्क फ्रॉम होममुळे त्याला सगळ्यांपासून तुटल्यासारखं वाटायचं. त्यातच नाटकाची आवड असल्याने त्याला दोन्हीचा मेळ कसा साधायचा हा प्रश्न पडत होता.

ऋत्विक सांगतो "ध्येयाच्या मागे पळणं असं खरंच काही असतं का असा प्रश्न मला पडत होता. करिअरबद्दल स्पष्टता नव्हती. तो क्षण महत्वाचा असा दृष्टिकोन होता. मला याबद्दल बोलायचं होतं. मात्र माझी एक अडचण होती ती म्हणजे मी नाटक करत असल्याने आपण स्वत:ला छान प्रेझेंट केलं पाहिजे, असं वाटत रहायचं. पण हे वागणं खरं नव्हतं. इथे आल्यावर माझा चांगल्या अर्थाने अपेक्षाभंग झाला."

मला बोलायचंय नक्की काय आहे?

या सगळ्यांच्याच आयुष्यात एकत्र येण्याचा दुवा ठरला तो मला बोलायचंय हा उपक्रम. संकल्पना अगदी साधी - 20 ते 40 या वयोगटातल्या लोकांनी महिन्यातल्या ठरलेल्या दिवशी ठरलेल्या ठिकाणी भेटायचं.

या भेटी दरम्यान होणार्‍या चर्चेचा विषय आधीच निवडायचा आणि भेटल्यावर या विषयावर गटचर्चा करायची. बरं या चर्चेत भाग घेणं बंधनकारक आहे असं नाही. बोलावंसं वाटलं नाही, तर नुसतं बसून चर्चा ऐकण्याची, इतरांची मतं समजून घेण्याचीही मुभा इथं आहे. यामुळेच हा उपक्रम तरुणांमध्ये लोकप्रिय ठरत आहे.

हा उपक्रम सुरू केला समीर शिपूरकर यांनी. शिपूरकर सायकॉलॉजिस्ट आहेत. आपल्याकडे काऊन्सिलिंगसाठी येणार्‍या मुलांच्या गरजा ऐकूनच या कार्यक्रमाची संकल्पना सुचल्याचं ते सांगतात.

बीबीसी मराठीशी बोलताना शिपूरकर म्हणाले, " मला 20 ते 35 वयोगटातल्या मुलांचे प्रश्न फार गुंतागुंतीचे वाटले. एकाच वेळी खूप गोष्टी त्यांना हाताळाव्या लागत आहेत. हे वेगळं आहे."

"एकीकडे ते स्वप्रतिमेशी झगडत असतात, दुसरीकडे घरच्यांच्या अपेक्षा आहेत. त्यात आर्थिक स्थैर्य तातडीने हवं आहे. त्यात जाती धर्मातून सामाजिक स्थान स्थिर नसतं."

"जोडीदार हवा का नको, लग्न हवं का असे अनेक प्रश्न असतात. त्यात दरवेळी थेरपिस्टकडे जाणं हा पर्याय नाही. कारण थेरपिस्ट हा क्रायसिससाठी असतो. त्यामुळे सुरुवातीला 3 महिन्यांसाठी हे करुया म्हणून मी हा संवादाचा कार्यक्रम सुरू केला," असं शिपूरकर सांगतात.

3 महिन्यांसाठी म्हणून सुरू झालेल्या या उपक्रमाला दीड वर्ष झालं आहे आणि मिळणारा प्रतिसाद वाढत जात आहे.

सुरुवातीला 20 ते 30 असा वयोगट निवडला गेला होता तो आता 20 ते 40 असा करण्यात आला आहे. या गटातले तरुणच विषयांची निवड करतात. यात आत्तापर्यंत विवाहसंस्था, नाती, करिअर, माय कन्फ्युजन, भीती, राग, नातेसंबंध अशा अनेक विषयांवर चर्चा झाली आहे.

भेटणारे तरुण तरुणी गोलात बसतात आणि मग आपली मतं, प्रश्न या चर्चेदरम्यान मांडतात. त्यात एका विषयावर चर्चा एका सेशनमध्येच संपायला हवी असंही बंधन नाही. गुंतागुंतीच्या विषयांवर सलग तीन चार महिनेही चर्चा सुरू राहिली आहे. या चर्चेतूनच अनेकांना आपला सूर सापडल्याचं ते सांगतात.

तरुणांच्या चर्चेच्या सोबतीनेच आता काही लोकांना बोलावून त्यांच्याशी संवाद देखील सुरू करण्यात आला आहे. यामध्ये अभिनेत्री पर्ण पेठे, प्रा. देवकुमार अहिरे यांना पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आलं होतं. ज्यांना हा गुंता थोडा सोडवता आला आहे त्यांच्याकडून गुंत्यात अडकलेल्यांना काही मिळावं यासाठीचा हा संवाद प्रपंच असल्याचं शिपूरकर सांगतात.

त्यांच्या मते, हा स्वत: ला आतून बाहेरून समजून घेणं शक्य आहे का याचा शोध आहे.

पण बोलल्याने काय होतं?

एका सेशननंतर श्वेताने समाज माध्यमावर पोस्ट शेअर करत लिहिलं, "आजूबाजूला सुरू असलेल्या गोंधळात, अस्थिरतेत – आम्ही एक असा अवकाश निर्माण करत आहोत, जिथे थोडासा ओलावा, थोडी विश्रांती आणि शांततेचा श्वास घेण्याचा प्रयत्न केला जातो."

तिच्या मते या गटाने तयार केलेली 'मोकळेपणाची जागा' एक आश्वासक आधार बनते. इथे कोणतीही अट नाही, कोणताही पूर्वग्रह नाही, जजमेंट नाही, मतभेद असले, तरी द्वेष नाही, तुम्ही बोलू शकता, स्वतःचे अनुभव शेअर करू शकता, मनातले प्रश्न विचारू शकता, आपल्या विचारांना व भावनांना पडताळून पाहू शकता.

इथे बोलणं ही 'जबाबदारी' नाही, तर स्वत:ला समजून घेण्याची एक प्रक्रिया आहे. इथे ऐकून घेतलं जातं, समजून घेतलं जातं आणि तुम्हाला स्वतःलाही नवं काही उमगून जातं.

पण हे नेमकं कसं होतं? शिपूरकर सांगतात, " संवादाची गरज सगळ्यांनाच आहे. पण या वयोगटात गुंता जास्त आहे. याच वयात अटीतटीचे निर्णय होतात."

"तीव्र भावना, न्यूनगंड असतो. आपण विचित्र परिस्थितीत आहोत, असं वाटतं. त्याचे शरीरावर परिणाम होतात. ती व्यक्ती मानसिक आजाराकडे वाटचाल करू शकते. या पिढीचा एक प्रश्न आहे की, त्यांचा मित्रांवर विश्वास नाही. एकाकीपण व्याकूळ करणारं आहे."

"या इन्फॉर्मल संवादातून भीती गेली आहे. मी अबनॉर्मल नाही, माझा प्रश्न एकट्याचा नाही ही भावना अनेकांना वाटत आहे."

याचं महत्व सांगताना डॉ. निकेत कासार "आत्ताच्या पिढीकडे व्यक्त होण्यासाठी साधनं कमी आहेत. ते समाज माध्यमांवर व्यक्त होतात. प्रत्यक्ष व्यक्त होणं नाही होत.

अनेकांना वाटतं पण त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही. त्यामुळे संवादातून आपले प्रश्न सोडवायला मदत होणं साहजिक आहे. इथे जजमेंट नसण्याचा फायदा होतो. संवादाला दिशा देण्याचं काम केलं जातं. याचाही फायदा होतो.

आपल्या प्रश्नांशी रिलेट करता आल्याची जाणीव निर्माण झाल्यानं अडचणींची तीव्रता कळते. प्रयत्न केले जातात. इन्साईट मिळतात. लर्निग, री-लर्निंग होतं. त्यामुळे मेंदूच्या दृष्टीने ही शिकण्याची प्रक्रिया आहे. नुसतं ऐकलं तरी त्याचा फायदा होतो.

ग्रुप थेरपी हा एक भाग असतो तो वेगळा असतो. इथे संवाद होत आहे. पालकांशी जे शेअर करता येत नाही ते अशा प्लॅटफॉर्मवर शेअर करण्याचा फायदा होतो."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)