मिस इंडिया इंटरनॅशनल ते आर्मी ऑफिसर; पुण्याच्या कशीश मेथवानीचा प्रेरणादायी प्रवास

    • Author, प्राची कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठीसाठी

न्युरोसायन्समध्ये देशातल्या ख्यातनाम संस्थेतून पदव्युत्तर शिक्षण, त्यानंतर सौंदर्य स्पर्धेत विजेतेपद आणि आता आर्मीमध्ये जाण्याचा निर्णय घेऊन तिथेही हव्या असलेल्या आर्मी एअर डिफेन्समध्ये स्थान मिळवणं.

या सगळ्या अचिव्हमेंट्स एका व्यक्तीच्या आहेत यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. मात्र, पुण्याच्या कशीश मेथवानीने हे सगळं करून दाखवलं आहे.

देशात दुसऱ्या क्रमांकावर स्थान पटकावत 2024 मध्ये कम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेसमधून प्रवेश घेणाऱ्या कशीशची 6 सप्टेंबरला चेन्नईच्या ऑफिसर ट्रेनिंग अकादमीत पासिंग आऊट परेड झाली.

खरंतर कशीशने आर्मीमध्ये जायचं स्वप्न लहानपणापासून पाहिलं नव्हतं. मात्र, अनेक गोष्टी करून पाहण्याची तिची सवय मात्र लहानपणापासूनच होती. अगदी नृत्यापासून खेळापर्यंत अनेक गोष्टींमध्ये ती भाग घ्यायची.

तिचं हे वेगळेपण असल्याचं तिसरीत असताना तिच्या आईला एका पालकाने सांगितलं होतं. "ही काहीतरी वेगळं करून दाखवेल," असं त्या पालकानं सांगितल्याचं तिची आई शोभा मेथवानी सांगतात.

मात्र शिक्षिका असणाऱ्या शोभा मेथवानींनी यामुळे तिच्याबाबत काहीही बदल केला नाही.

त्या सांगतात, "तिला सगळंच करायचं असायचं. नृत्यापासून वक्तृत्व स्पर्धेपर्यंत सगळ्यात सहभागी व्हायचं असायचं. आम्ही तिला कधी थांबवलं नाही, पण म्हणून काही वेगळी वागणूकही दिली नाही."

एनसीसीमध्ये प्रवेश घेतला आणि प्रवासाची दिशा बदलली

कशीशला जे शिकण्याची इच्छा होती त्यासाठी तिचे पालक तिला सतत पाठिंबा देत राहिले. एखादं शिक्षण शेवटपर्यंत पूर्ण करता आलं नाही, तरी ओळख व्हावी, पुरेसं माहीत व्हावं यासाठी ते प्रयत्न करत राहिले.

यातूनच कशीश भरतनाट्यम आणि तबला शिकली. शिक्षण सुरू असतानाच तिने एनसीसीमध्ये प्रवेश घेतला आणि इथूनच तिच्या प्रवासाची दिशा बदलली.

2021 मध्ये एनसीसीमधून तिला प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी जाण्याची संधी मिळाली. कॅम्पनंतर ती परेडमध्ये सहभागी झाली. तिथेही तिने सर्वोत्तम कामगिरी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बेस्ट कँडेटचं पदक मिळवलं.

कशीश सांगते, "तिथे मी ग्रुपसोबत होते. त्यांच्यासोबत राहणं, एकत्र काम करणं मला आवडत असल्याचं मला लक्षात आलं. त्यात पदक मिळाल्यावर आपण या दिशेनेच काहीतरी करावं असं मी ठरवलं."

अर्थात डिफेन्समध्ये जाण्याचं स्वप्न पाहिलं, तरी कशीशचा मोठा प्रवास बाकी होता. पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून मास्टर्स ऑफ सायन्सची पदवी मिळाल्यानंतर कशीशला बंगलुरूच्या प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये प्रवेश मिळाला.

तिथून तिने न्युरोसायन्समध्ये पदवीका अभ्यासक्रम पूर्ण केला. देशातील सर्वोत्तम संस्थांमध्ये गणल्या जाणाऱ्या या संस्थेतून पदवी मिळाल्यानंतर करिअरचे अनेक मार्ग खुले होतात. कशीशलाही हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश मिळत होता; पण कशीशने स्वप्न पाहिलं ते वेगळंच.

अन् ती मिस इंडिया इंटरनॅशनल झाली

याच्या पुढच्या टप्प्यावर कशीशने सौंदर्य स्पर्धेत भाग घेण्यासाठी तयारी सुरू केली. 2023 मध्ये ती मिस इंडिया इंटरनॅशनल झाली. अर्थात या स्पर्धेच्या तयारीच्या वेळीच आधी ठरवलेल्या ध्येयाकडे तिची वाटचाल सुरू होतीच.

कशीश सांगते, "सौंदर्यस्पर्धा ही माझ्या बकेट लिस्टमधल्या गोष्टींपैकी होती. मात्र, मी कधीच करिअर म्हणून त्याकडे पाहिलं नव्हतं. त्यासाठी कष्ट घ्यावे लागणार होतेच; पण त्याच वेळी मी माझ्या आर्मीतील प्रवेशासाठीही तयारी करत होते. सकाळच्या वेळेस परीक्षेसाठी अभ्यास आणि नंतर सौंदर्यस्पर्धेची तयारी असा दिनक्रम मी आखून घेतला होता."

"जेव्हा जे करायचं ते पूर्ण लक्ष देऊनच करायचं आणि त्यावेळी सुरू असलेल्या दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचा विचार करायचा नाही, असं मी ठरवलं होतं. म्हणजे सौंदर्यस्पर्धेच्या तयारीवेळी परीक्षेचा विचार करायचा नाही आणि परीक्षेच्या अभ्यासाच्या वेळी सौंदर्यस्पर्धेचा विचार करायचा नाही", असंही ती सांगते.

एकीकडे 2023 मध्ये मिस इंडिया इंटरनॅशनलचा मुकुट डोक्यावर चढला आणि दुसरीकडे 2024 मध्ये सौंदर्यासाठी रूढ अर्थाने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या सगळ्या गोष्टी बाजूला सारत कशीशने चेन्नईच्या ऑफिसर ट्रेनिंग अकादमीत प्रवेश मिळवला.

डिफेन्स सर्व्हिसेसच्या प्रवेश परीक्षेत देशभरात दुसरी

प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या कम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षेत ती देशात दुसरी आली होती. आजवर शिकलेल्या सगळ्या गोष्टींचा या प्रवेश आणि प्रशिक्षणात फायदा झाल्याचं कशीश सांगते.

बीबीसी मराठीशी बोलताना ती म्हणाली, "सौंदर्यस्पर्धेसाठी मी तयारी करत असताना स्टेजची भीती, लोकांशी बोलण्याची भीती निघून गेली होती. मला कशाबद्दलच शंका वाटत नव्हती. मी खात्रीने सगळ्या गोष्टींचा सामना करत होते. याचा फायदा मला आर्मीतील निवड प्रक्रियेत झाला."

प्रवेश मिळाल्यानंतर मात्र तिला प्रशिक्षण पूर्ण करू शकू का याबद्दल साशंकता वाटत होती. पूर्ण दिवसभराच्या प्रशिक्षणात अभ्यासासोबतच बास्केटबॉलसारखे खेळ आणि इतर अनेक गोष्टी कराव्या लागत असत. दिवसभरात श्वासही घेता येईल का नाही अशी अवस्था होत असे.

तरीही तिने यातही चांगली कामगिरी करत एएडी मेडल, मार्चिंगसाठी गोल्ड मेडल, शूटिंग स्पर्धेत मेडल, ड्रिल आणि डिसिप्लिन बॅज मिळवले आणि एकही शिक्षा न होता अभ्यासक्रम पूर्ण केला.

अकादमीतल्या सर्वोत्तम शूटर्सपैकी असलेली कशीश तिथे बास्केटबॉल अल्फा स्ट्रिंगसाठी मेरिट कार्ड आणि इंटरकॉलेज बास्केटबॉल स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडूही ठरली.

आपल्या या कामगिरीबद्दल बोलताना ती म्हणते, "माझ्या अपयशाने मला शिकवलं की यशाकडे कसं जायचं. माझे पालक सांगायचे की, 'Aim for the stars and you will reach the moon'. मी तेच केलं. मोठं ध्येय ठेवून वाटचाल केली."

अशा कामगिरीसह सैन्यात जाणाऱ्या कशीशने आर्मी एअर डिफेन्सची निवड पुढच्या वाटचालीसाठी केली आहे. प्रत्येक निवडीत तिच्या सोबत उभे राहणारे पालक मात्र या निवडीबाबत साशंक होते.

तिची आई शोभा मेथवानी सांगते, "मला ती आर्मीमध्ये जात असल्याचा अभिमान होताच; पण मी आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षिका असल्याने मिळालेल्या माहितीनुसार तिने कमी भीती असणारं क्षेत्र निवडावं असा सल्ला आम्ही तिला देत होतो. ऑर्डिनन्स किंवा इतर तसं काही निवड म्हणून सांगत होतो. पण या सल्ल्यावरून ती आमच्यावर चिडली. त्यानंतर तिचं म्हणणं आम्ही मान्य केलं. तिला दीर्घायुष्य मिळावं इतकीच आमची इच्छा आहे."

आई शिक्षिका, वडील शास्त्रज्ञ आणि मुलगी सैन्यात

शिक्षिका असलेल्या आई आणि शास्त्रज्ञ असलेल्या वडिलांच्या पोटी जन्मलेली कशीश सैन्यात जाणारी तिच्या कुटुंबातील पहिलीच व्यक्ती आहे.

डिफेन्सची रूढ अर्थाने कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या कशीशचा आर्मीतील प्रवास 27 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. ती प्लाझ्मा डोनेशन आणि अवयव दानासाठी एक एनजीओही चालवते. पण अर्थात यादीतील सगळ्या गोष्टी मात्र इथे संपत नाहीत.

कशीश नॅशनल पिस्टोल शूटर होती; मधल्या काही वर्षांमध्ये हे प्रशिक्षण मागे पडले होते, पण ते तिला पुन्हा सुरू करायचं आहे.

एका भाषणात कशीश सांगते, "मला हे किंवा ते अशी निवड करायला आवडत नाही. मी हे आणि ते अशा दोन्ही गोष्टी करून पाहते. मला ज्यात जास्त आनंद मिळतोय त्याची निवड करत जाते."

याच तत्वावर चालत सुपरमॉडेल असणारी कशीश आता सैन्याच्या माध्यमातून देशसेवेसाठी सज्ज झाली आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)