पॅलेस्टाईन समर्थक निदर्शकांवर हल्ला केल्याचा आरोप, हन्ना यांच्याबरोबर नेमकं काय घडलं होतं?

    • Author, लाना लॅम,
    • Role, सिडनी

ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात या वर्षाच्या सुरुवातीला पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ करण्यात आलेल्या एका निदर्शनाच्या वेळेस निदर्शकांवर हल्ला केल्याचा आरोप न्यू साऊथ वेल्स (एनएसडब्ल्यू) पोलीस अधिकाऱ्यावर करण्यात आला आहे.

हन्ना थॉमस या ग्रीन्स पार्टीच्या माजी उमेदवार आहेत. त्यांचा आरोप आहे की जून महिन्यात बेलमोरमध्ये झालेल्या निदर्शनांच्या वेळेस एका पोलीस अधिकाऱ्यानं त्यांच्या चेहऱ्यावर ठोसा मारला होता.

त्यामुळे त्यांना दुखापत झाली आणि त्यावर शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता होती. एसईसी प्लेटिंग या कंपनीच्या बाहेर ही निदर्शनं झाली होती.

एसईसी प्लेटिंग ही कंपनी इस्रायलच्या लष्कराला शस्त्रास्त्रांचे सुटे भाग पुरवते असं निदर्शकांचं म्हणणं आहे. मात्र कंपनीनं हे दावे फेटाळले आहेत.

एनएसडब्ल्यू पोलीस म्हणाले की 33 वर्षांच्या एका वरिष्ठ कॉन्स्टेबलची चौकशी सुरू आहे आणि त्या गंभीर घटनेचा तपास सुरू आहे.

जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूशी निगडीत घटनेमध्ये किंवा गंभीर दुखापतीच्या घटनेमध्ये जेव्हा पोलीस अधिकाऱ्याचा सहभाग असतो, तेव्हा याप्रकारचा तपास किंवा चौकशी केली जाते.

शारीरिक दुखापत पोहोचवण्यासाठी हल्ला केल्याचा आरोप असलेला पोलीस अधिकारी नोव्हेंबर महिन्यात न्यायालयासमोर हजर राहणार आहे.

नेमकं काय झालं होतं?

27 जूनला (शुक्रवार) सकाळी एसईसी प्लेटिंग कंपनीच्या बाहेर डझनावारी निदर्शक जमा झाले होते. हन्ना थॉमसदेखील त्या निदर्शकांमध्ये होत्या.

या निदर्शकांचा दावा होता की, या कंपनीनं इस्रायली लष्कर वापर असलेल्या एफ-35 लढाऊ विमानांच्या सुट्या भागांचं उत्पादन केलं आहे.

निदर्शनांच्या ठिकाणी पोलिसांना बोलावण्यात आलं. पोलिसांचं म्हणणं होतं की ही निदर्शनं बेकायदेशीर होती. त्यानंतर पोलिसांनी निदर्शकांना तिथून जाण्याचा आदेश दिला.

त्यानंतर हाणामारीला सुरुवात झाली, असं एनएसडब्ल्यू पोलिसांनी त्या घटनेनंतर लगेचच दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

थॉमस यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली होती.

या कथित हल्ल्यानंतर 35 वर्षांच्या थॉमस यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि तिथे त्यांच्या चेहऱ्यावर झालेल्या दुखापतींवर उपचार करण्यात आले होते.

या निदर्शनांनंतर काही तासांमध्येच थॉमस यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकली. त्यात त्यांनी त्यांच्या फॉलोअर्सना सांगितलं की त्यांना कदाचित त्यांच्या उजव्या डोळ्याची दृष्टी कायमस्वरुपी गमवावी लागू शकते.

पोलिसांनी निदर्शकांना तिथून निघून जाण्याचा आदेश दिला होता. मात्र त्या आदेशाचं पालन न केल्याचा तसंच पोलीस अधिकाऱ्याला प्रतिकार केल्याचा आरोप थॉमस यांच्यावर ठेवण्यात आला.

पोलिसांवर खटला दाखल करणार

या महिन्याच्या सुरुवातीला सरकारी वकिलांनी थॉमस यांच्या विरोधातील सर्व आरोप मागे घेतले. तसंच त्यांना नुकसान भरपाईपोटी जवळपास 22,000 ऑस्ट्रेलियन डॉलर (14,500 डॉलर; 11,000 पौंड) देण्यात आले.

ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशननं (एबीसी) दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाबाहेर थॉमस यांचे वकील पीटर ओ'ब्रायन म्हणाले की या दुखापतीचा थॉमस यांच्या उजव्या डोळ्यावर दीर्घकालीन काय परिणाम हे अद्याप अस्पष्ट आहे.

पीटर ओ'ब्रायन म्हणाले की या घटनेसंदर्भात ते एनएसडब्ल्यू सर्वोच्च न्यायालयात ते पोलिसांविरोधात दिवाणी खटला दाखल करणार आहेत.

यात द्वेषाच्या भावनेनं कारवाई करणं, पोलिसांनी हल्ला आणि मारहाण करणं, सरकारी अधिकाऱ्यानं गैरवर्तन करणं आणि कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर करणं या आरोपांचा त्या खटल्यात समावेश असणार आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.