You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उचक्या का येतात? सतत उचक्या लागणं हे गंभीर आहे का?
तुम्हाला शेवटची उचकी कधी लागली होती?
काही लोकांना उचक्या सतत येत असतात. तर काहींना मात्र कधीतरीच एखाद्या वेळी उचक्या येत असल्याचं आपण पाहतो.
पण उचक्या आपल्याला नेमक्या का आणि कशामुळे येतात, याविषयी तुम्हाला काही माहिती आहे का?
उचक्या म्हणजे काय?
श्वसननलिका आणि फुफ्फुसांच्या आतील भागातील स्नायूंच्या अनियंत्रित आकुंचन पावण्याच्या क्रियेला साधारणपणे उचक्या असं संबोधलं जातं.
श्वसनयंत्रणेतील 'डायाफ्राग्म' हे स्नायू शरीरात छाती आणि पोट यांच्या बेचक्यात आढळून येतात.
मानवी श्वसनप्रक्रियेत हे स्नायू अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात.
वैद्यकीय भाषेत उचक्यांना सिंगल्ट असं संबोधण्यात येतं.
लॅटीन भाषेत सिंगल्टचा अर्थ होतो, 'रडता रडता श्वास रोखणे.'
आपल्यापैकी अनेकांना उचक्यांचा त्रास कधी ना कधी सहन करावाच लागलेला आहे. पण या उचक्या कधी आणि कशा येतात, काही कळत नाही.
पण काही लोकांच्या बाबतीच उचक्यांचा त्रास भयानक असू शकतो.
काहींना सलग दोनपेक्षा जास्त दिवस उचक्यांच्या त्रासाला सामोरे जावं लागू शकतं.
उचक्या का येतात?
उचक्या या काही अवयवांच्या प्रतिक्रियात्मक क्रियेमुळे येतात. शरीरात अचानक काही बदल झाल्यामुळे उचक्या येण्यास सुरूवात होऊ शकते.
मानवामध्ये मेंदू, कान, नाक, घसा, श्वसननलिका, छाती आणि पोट यांच्यापैकी कोणत्याही अवयवात तत्काळ काही बदल जाणवल्यास उचक्या येऊ शकतात.
या प्रक्रियेदरम्यान फुफ्फुसांना अधिकाधिक ऑक्सिजन पुरवण्याचा प्रयत्न शरिरामार्फत केला जातो. दरम्यान, श्वसननलिकेतील अडथळ्यामुळे उचक्यांचा मोठा आवाज तोंडातून बाहेर पडतो.
डॉक्टरांच्या मते, अति खाण्याने उचक्या येणं ही सामान्य बाब आहे. त्याशिवाय, तिखट जेवल्यानंतर, दारूचे सेवन, सिगारेट सेवन किंवा अतिथंड द्रवपदार्थ प्यायल्याने उचक्या येऊ शकतात.
काही प्रकरणांमध्ये उचक्यांची नोंद पोटाची अल्ट्रासाऊंड चाचणी करतानाही झाल्याची माहिती उपलब्ध आहे.
संशोधकांच्या मते, नवजात बाळाच्या जन्मावेळी फुफ्फुसामध्ये जास्तीत जास्त ऑक्सिजन पोहोचण्यासाठीच्या क्रियेदरम्यान बाळाला काही प्रमाणात उचक्या लागतात.
उचक्या कशा थांबवाव्यात?
साधारणपणे आपल्याला उचक्या लागल्यास कुणीही पाणी पिण्याचा सल्ला देतो. काही जण भाताचा गोळा करून खाण्यास सांगतात.
पण, त्याचा नेहमीच फायदा होतो, असं नाही.
काही लोकांच्या उचक्या दोन-दोन दिवस कायम राहतात.
डॉक्टर म्हणतात, दोन दिवस उचक्या आल्या तरी त्यामध्ये इतकी काळजी करण्याचं काही कारण नाही. काही काळाने या उचक्या आपोआप थांबण्याची शक्यता असते.
उचक्या थांबल्याच नाहीत, तर काय करावं?
उचक्या थांबत नसल्यास नसल्यास आपण त्यातून लक्ष वेगळ्या ठिकाणी गुंतवणे, भावनेवर नियंत्रण ठेवणे गरजेचं असतं.
यासाठी खालील एक प्रयोग तुम्हाला उपयोगी पडू शकेल.
- दीर्घ श्वास घ्या, तोंड बंद ठेवा. आणि श्वास काही काळ रोखून धरा.
- श्वास घेतल्यानंतर किमान 15 ते 20 सेकंद श्वास रोखून धरा.
20 सेकंदांनंतर तोंड उघडा आणि श्वास सोडून द्या.
उचक्या थांबेपर्यंत काही मिनिट हा प्रयोग करता येऊ शकेल.
उचक्या थांबवण्यासाठी एका प्लास्टिक बॅग प्रयोगाबद्दल सांगितलं जातं.
काही डॉक्टरांच्या मते, पेपर किंवा प्लास्टिकच्या बॅगेत श्वास सोडून एकदा तो पुन्हा घ्या. कार्बन डायऑक्साईटचं प्रमाण रक्तात वाढल्यानंतर त्यामुळे उचक्या निर्माण करणाऱ्या स्नायूंवर नियंत्रण मिळवता येऊ शकतं. पण याबाबत वाद आहेत.
पण, हा प्रयोग करताना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हृदयविकाराचा झटका बसण्याची शक्यता असून तो डॉक्टरांच्या निरीक्षणाखालीच करावा, असं डॉक्टरांचं मत आहे.
शिवाय, संशोधकांच्या मतेही या प्रयोगामुळे उचक्या तत्काळ थांबण्याचं प्रमाणही अत्यंत कमी आहे.
उचक्या गंभीर कधी बनतात?
उचक्या दोन दिवसांपेक्षाही जास्त काळ कायम असल्यास ती गंभीर बाब मानली जाते. अशा स्थितीत त्याला पर्सिस्टंट हिकअप असे म्हणतात. तर दोन महिन्यांपेक्षाही जास्त काळ ठाण मांडून बसलेल्या उचक्यांच्या त्रासाला इनटॅक्टेबल हिकअप म्हटलं जातं.
हे दोन्ही क्रोनिक उचक्यांचे प्रकार आहेत. असा त्रास तुम्हाला जाणवत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य ठरतं.
अशा प्रकारच्या उचक्या लागलेल्या लोकांची वैद्यकीय चाचणी करण्यात येते. चाचणीमुळे त्यांच्या उचक्यांचं कारण शोधता येऊ शकतं.
क्रोनिक हिकअप हे काही औषधे, ड्रग्ज, दारू सेवन, धुम्रपान आदींमुळे होऊ शकतात.
अशा प्रकारच्या त्रासाने पीडित व्यक्तीने आपले कान, नाक आणि घसाही तपासून घ्यायला हवेत.
कानाच्या पडद्यांना काही इजा झाली आहे किंवा नाही, याचा तपासही यावेळी करण्यात यावा.
उचक्यांमुळे चेहऱ्याचे स्नायू कमकुवत होत असल्यास, बोलण्यात अडथळा येत असल्यास मेंदूची चाचणी करणंही आवश्यक आहे, असं डॉक्टर सांगतात.
त्यामुळे, क्रोनिक उचक्यांचं नेमकं कारण कळू शकल्यास त्यावर तत्काळ उपचार सुरू करता येतात, असं डॉक्टरांनी सांगितलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)