You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जेवणानंतर लगेच का झोपू नये? ॲसिडिटीचा त्रास सतत होत असेल तर हे नक्की वाचा
ॲसिडिटी हा शब्द रोजच्या दिनक्रमाचा भाग वाटावा इतका आपल्या कानावर येतो.
अरे माझी ॲसिडिटीची गोळी घ्यायची आहे, अमूक खाल्लं की मला ॲसिडिटी होते अशी वाक्यं सहज आपल्याला ऐकू येतात. पण हा शब्द जर इतक्यावेळा वापरला जात असेल तर त्यावर जास्त लक्ष देणं गरजेचं आहे.
आपली बदलती जीवनशैली, बैठं काम, व्यायामाचा अभाव आणि प्रक्रीया केलेलं खाणं यामुळे दिवसेंदिवस अनेक आजारांची भर पडत आहे. त्यातलाच हा एक भाग आहे.
पोटभर जेवणानंतर ढेकर, छातीत जळजळ किंवा तोंडात आंबटपणा येणं ही काही मोठं लक्षण नाही असंच अनेकांचं मत असतं.
पण वारंवार होणारी ही जळजळ जर दिवसातून अनेकदा किंवा आठवड्यातून तीन ते चार वेळा जाणवत असेल, तर ती केवळ साधी 'ॲसिडिटी' नसून GERD म्हणजेच गॅस्ट्रोईसोफेजल रिफ्लक्स डिसीज असू शकते.
जीवनशैलीमध्ये झालेल्या झपाट्याने बदलांमुळे म्हणजेच उशिरा जेवण, फास्ट फूड, बसून काम करण्याची सवय, वजनवाढ आणि सततचा ताण अशा गोष्टींमुळे GERD चे प्रमाण वाढते.
अनेक जण याकडे दुर्लक्ष करतात, पण उपचार न घेतल्यास GERD मुळे अन्ननलिकेत सूज, अल्सर, बॅरेट्स ईसोफेगस आणि पुढे जाऊन कॅन्सरचा धोकाही वाढू शकतो.
त्यामुळे साधी ॲसिडिटी आणि GERD यातला फरक ओळखणं, त्याची लक्षणं वेळेत समजून घेणं आणि योग्य उपचार सुरू करणं अत्यंत आवश्यक आहे.
या बातमीत आपण GERD नेमकं काय आहे, ते वाढण्यामागची कारणं, ओळखता येणारी लक्षणं, तज्ज्ञांनी सुचवलेले उपचार आणि भारतात उपलब्ध नवी तंत्रज्ञानं यांची सखोल चर्चा करणार आहोत.
हार्टबर्न म्हणजे छातीत जाणवणारी जळजळ. विशेषत: अन्ननलिकेत वर येणाऱ्या आम्लामुळे निर्माण होणारी त्रासदायक भावना असेल तर तिला हार्टबर्न म्हटलं जातं.
पोटातील आम्ल जेव्हा वर घशाकडे सरकते, तेव्हा या स्थितीला अॅसिड रिफ्लक्स म्हणतात. ही तक्रार कधीमधी होणे सामान्य आहे; परंतु वारंवार होत असल्यास त्याला गॅस्ट्रो-ओसोफेजियल रिफ्लक्स डिसीज किंवा GORD असे म्हणतात.
अॅसिड रिफ्लक्सची सर्वात ओळखण्याजोगी लक्षणं म्हणजे छातीत जळजळ (heartburn) आणि तोंडात आंबूस, कडवट चव येणे. पोटातील आम्ल वर आल्यामुळे घशात किंवा तोंडात जळजळ, तिखटपणा किंवा त्रास जाणवू शकतो.
काही लोकांमध्ये यासोबत पुन्हापुन्हा येणारी उचकी, खोकला, घरघर, तोंडाची दुर्गंधी, फुगल्यासारखे वाटणे, किंवा मळमळ यासारखी लक्षणेही आढळतात.
ही लक्षणे बहुतेकदा जेवल्यानंतर अधिक दिसून येतात. विशेषतः जेवल्यानंतर लगेच आडवे झाल्यास, झोपताना किंवा खाली वाकून काम करताना त्रास जास्त होतो. कारण अशा स्थितीत पोटातलं आम्ल वर येतं.
अॅसिड रिफ्लक्स होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. काही खाद्यपदार्थ आणि पेयं जसं की की कॉफी, तिखट किंवा तेलकट पदार्थ, चॉकलेट, मद्य यामुळे हा त्रास होऊ शकतो.
वाढलेलं वजन, धूम्रपान, ताण-तणाव, तसेच गर्भधारणा या अवस्थांमध्ये पोटात दाब वाढतो आणि आम्ल वर येण्याची शक्यता वाढते. काही वेळा प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेनसारख्या हार्मोन्सचाही प्रभाव दिसून येतो.
काही औषधेदेखील (उदा. आयबुप्रोफेनसारखे Anti-inflammatory औषधे) पोटाच्या अस्तराला त्रास देऊन अॅसिड रिफ्लक्स वाढवू शकतात.
हायटस हर्नियामध्ये पोटाचा वरचा भाग छातीच्या पोकळीत सरकतो, यामुळेही त्रास होऊ शकतो. तसेच stomach ulcer किंवा पोटातील जंतुसंसर्ग (H. pylori) हेही आम्लस्रावाचा समतोल बिघडवू शकतात.
साधारणपणे, जीवनशैलीत बदल केल्याने हा त्रास बराच अंशी आटोक्यात ठेवता येतो.
पण लक्षणे सतत आणि तीव्र असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे, कारण उपचाराशिवाय पोटातील आम्ल अन्ननलिकेला हानी पोहोचवू शकते.
ॲसिडिटी सतत होत असेल तर मात्र तुम्ही डॉक्टरांचं मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे. त्यांच्याकडून निदान करुन घेणं आणि त्यांच्या सल्ल्याने उपचार घेणं आवश्यक आहे.
यासाठी कधीकधी सखोल तपासणी, चाचण्याही आवश्यक आहेत.
त्यामुळे GERD आणि असिडिटी यात काय फरक आहे असा प्रश्न आम्ही मुंबईतल्या कोकिलाबेन धिरुभाई अंबानी रुग्णालयात गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. दत्तात्रय सोळंके यांना विचारला.
डॉ. सोळंके म्हणाले, "GERD किंवा गॅस्ट्रोइसोफेगल रिफ्लक्स डिसीज ही एक दीर्घकालीन स्थिती आहे यामध्ये पोटातील आम्ल वारंवार परत अन्ननलिकेत येते. लोअर इसोफेगल स्फिंक्टर म्हणजे अन्ननलिकेच्या खालच्या टोकावरील झडप कमकुवत किंवा सैल झाल्यावर ही स्थिती निर्माण होते.
या वारंवार येणाऱ्या आम्लामुळे अन्ननलिकेत दाह किंवा जळजळ होते आणि छातीत जळजळ (हार्टबर्न), आंबट ढेकर, छातीत अस्वस्थता, खोकला आणि आवाज बसणे अशी लक्षणे दिसतात.
जास्त खाल्ल्यानंतर कधीकधी होणारी आम्लपित्ताची समस्या सामान्य आणि साधारणपणे फारशी त्रासदायक नसते, पण GERD मध्ये ही लक्षणे सतत किंवा आठवड्यात किमान दोन वेळा तीव्र स्वरूपात दिसतात. यामुळं झोपेवरही परिणाम होतो आणि दैनंदिन कामावर त्याचा परिणाम होतो."
डॉ. सोळंके सांगतात, "जास्त खाणे किंवा जड, मसालेदार अन्नामुळे उद्भवणारी आम्लता साध्या अँटॅसिड्सने कमी होते आणि सतत परत येत नाही. दुसरीकडे, GERD मध्ये लक्षणे आठवड्यात किमान दोन वेळा दिसतात.
ही लक्षणं बहुतेक वेळा रात्री दिसतात, झोपेतून जागही येऊ शकते. गिळताना त्रास होतो, कार्यक्षमतेत घट किंवा भूक कमी होणे यावर परिणाम करू शकतात.
वजन घटणे, वारंवार उलट्या होणे, काळे शौच होणे किंवा सतत छातीत वेदना अशी लक्षणं असतील तर तात्काळ वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असते."
नेरुळ, नवी मुंबई येथे असलेल्या आरोग्यधाम नर्सिंग होमचे डॉ. उस्मान मापकरही या आजारासाठी बदलत्या जीवनशैलीला कारणीभूत ठरत असल्याचं सांगतात.
त्यांच्या मते, "भारतात आधुनिक जीवनशैली, तणावयुक्त जीवन आणि आहारात झालेला बदल यामुळे GERD चं प्रमाण वाढत आहे.
तेलकट, तिखट आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाणं, लठ्ठपणा, बैठं जीवन, रात्री उशीरा झोपणं यामुळे यात भर पडत आहे. ते सांगतात धूम्रपान, दारू आणि काही पेनकिलर्स यामुळेही याची वाढ होत आहे."
डॉ. उस्मान मापकर सांगतात की, "काही लोकांमध्ये ठराविक लक्षणं दिसत नसली तरीही GERDमुळे तयार होणारी गुंतागुंत तयार होऊ शकते.
त्यांच्या अन्ननलिकेसंदर्भात गुंतागुंत तयार होऊ शकते. अन्ननलिका अरुंद होणे, बॅरेट्स इसोफॅगस किंवा पुढे कॅन्सरपर्यंतही परिस्थिती जाऊ शकते."
या आजारात शस्त्रक्रिया करावी लागते का? असा प्रश्न आम्ही डॉ. दत्तात्रय सोळंके यांना विचारला.
ते म्हणाले, "जे रुग्ण औषधांना पुरेसा प्रतिसाद देत नाहीत किंवा जीवनशैलीत योग्य बदल करत नाहीत तसेच जे रुग्ण दीर्घकाळ औषधं टाळू इच्छितात त्यांच्यासाठी शस्त्रक्रियेचा पर्याय विचारात घेतला जातो.
जे रुग्ण औषधे आणि जीवनशैलीतील बदलांना पुरेशी प्रतिक्रिया देत नाहीत, किंवा जे दीर्घकालीन औषधोपचार टाळू इच्छितात, त्यांच्यासाठी शस्त्रक्रियेचा पर्याय विचारात घेतला जातो.
लॅप्रोस्कोपिक फंडोप्लिकेशन किंवा कमीत कमी त्रास असलेल्या एंडोस्कोपिक तंत्रांमुळे लोअर इसोफेगल स्फिंक्टर मजबूत होण्यास मदत होते.
एंडोस्कोपी किंवा pH मॉनिटरिंग सारख्या तपासण्यांद्वारे निदान निश्चित केल्यानंतरच शस्त्रक्रिया सुचवली जाते."
जीवनशैलीमध्ये कोणताही महत्त्वाचा बदल करायचा असेल, आहारात, उपचारात, औषधांमध्ये बदल करायचा असेल तसेच शारीरिक व्यायामाची सुरुवात करायची असेल तर डॉक्टरांची आणि योग्य प्रशिक्षकांची मदत घेणं आवश्यक आहे.
आपल्या शरीराची तसेच लक्षणांची योग्य तपासणी डॉक्टरांकडून करुन घेऊन त्यांच्या सल्ल्यानेच जीवनशैलीत बदल करणं योग्य आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)