तमन्ना भाटियाने दावा केल्याप्रमाणे थुंकी लावून चेहऱ्यावरचे मुरुम-पिंपल्स जातात का?

चेहऱ्यावर येणारी मुरमं किंवा फोड हा केवळ तारुण्यातच नव्हे तर त्यानंतरही चर्चेचा आणि त्रासाचा विषय असतो. बहुतांश वेळा इंग्रजीतल्या ॲक्ने (Acne ) आणि पिंपल्स हे दोन शब्द एकच असल्यासारखे म्हटले जाते. मात्र या दोन्ही संज्ञा वेगवेगळ्या आहेत.

ॲक्ने हा एक त्वचेचा आजार असून त्यात पिंपल्स, ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स, सिस्ट, नोड्युल्स अशा अनेक प्रकारचे त्रास असतात. तर पिंपल्स हा अक्नेचा एक भाग आहे. जेव्हा त्वचेवरील छिद्रांमध्ये तेल, धूळ, घाण, बॅक्टेरिया अडकतो तेव्हा लालसर, दुखणारे आणि पू भरलेले फोड तयार होतात. त्यांना पिंपल्स म्हणतात. थोडक्यात ॲक्ने मध्ये पिंपल्ससह अनेक प्रकारच्या आजारांचा समावेश होतो तर पिंपल्स हा एक फोड असतो.

आता हे फोड कसे घालवायचे यावर अनेक ठिकाणी वेगवेगळे उपाय सांगितले जातात. काही घरगुती उपाय सुचवले जातात. परंतु अयोग्य पद्धतीचा वापर झाल्यास हा आजार वाढू शकतो. तसेच तुमची त्वचा जास्त संवेदनशील असेल तर त्रास वाढतो. त्यामुळे स्वतः कोणताही निर्णय घेण्याआधी डॉक्टरांकडून योग्य निदान करुन घेणं आवश्यक आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली उपचार घेणं चांगलं.

अभिनेत्री तमन्ना भाटिया हिनं मध्यंतरी एका मुलाखतीत याबद्दल भाष्य केलं होतं. त्यानंतर त्यावर भरपूर चर्चा झाली होती. या मुलाखतीत तमन्ना भाटियानं "पिंपल्सवर मी थुंकी लावते, सकाळी उठल्यावर ब्रश करण्याआधी पिंपल्सवर लाळ लावल्यामुळे ते जातात' असा दावा तिनं केला होता. 'रात्रभर आपल्या तोंडात अँटिबॅक्टेरियल घटक तयार झालेले असतात असं तिचं सांगणं होतं. यामुळे पिंपल्स बरे होतात' असं तिनं या मुलाखतीत सांगितलं होतं.

तिच्या मुलाखतीवर अनेक उलटसुलट प्रश्न उपस्थित झाले असले तरी आपल्याला पिंपल्स कशामुळे येतात, लाळेमध्ये काय असतं याची माहिती असणं आवश्यक आहे.

ॲक्ने म्हणजे काय?

त्वचेच्या छिद्रामध्ये जास्त प्रमाणात तेल, मृत पेशी आणि बॅक्टेरिया साठतात तेव्हा ही छिद्रं बुजतात. तसेच आपल्या शरीरातील हार्मोनल बदलांमुळे तेलाचं प्रमाण वाढतं आणि या छिद्रांमध्ये दाह-जळजळ (इन्फ्लमेशन) झाल्यामुळे पिंपल्स, ब्लॅकहेड्स, नोड्युल्स आणि सिस्ट अशा त्रासांना सुरुवात होते.

मुंबईमध्ये कार्यरत असणाऱ्या त्वचारोगतज्ज्ञ डॉ. शरिफा चौसे सांगतात, "ॲक्नेसाठी सर्वात जास्त कारणीभूत असतात ते हार्मोन्समध्ये होणारे बदल. त्यातही तारुण्यात, मासिक पाळीच्या काळात, गरोदरपणात आणि तणावपूर्ण काळामध्ये ते जास्त होतात. या बदलांमुळे तेलाचं प्रमाण वाढतं आणि ते त्वचेवरील छिद्रं बंद करतात. काही लोकांमध्ये सतत याचा त्रास होण्यामागे हार्मोन्सचं कारण जास्त असतं."

तारुण्यात तसेच तेरा ते एकोणीस वयोगटात याचा त्रास जास्त होत असला तरी अनेक प्रौढांमध्ये विशेषतः महिलांमध्ये त्यांच्या विशी, तिशी आणि चाळीशीतही याचा त्रास होतो. ॲक्ने वयाच्या कोणत्याही टप्प्यात येऊ शकत असले तरी या वयोगटात ते जास्त आढळतात. प्रदुषणामुळे, धुळीमुळे त्वचेवरील छिद्रं बुजू शकतात, त्यामुळे त्वचेचा दाहही होतो. हवेतील प्रदुषकांमुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो आणि त्यामुळे त्वचेवर तेलाचं प्रमाण वाढतं व ती जास्त संवेदनशील होते.

डॉ. शरिफा सांगतात, "आहार, ताण, झोप यांचा अक्नेशी संबंध असतो. साखर जास्त खाणं, दुध-दुधाचे पदार्थ तसेच प्रक्रीया केलेले पदार्थ खाल्याने इन्फ्लमेशन वाढतं आणि तेलाचं प्रमाण वाढतं. ताणतणावामुळे कार्टिसोल सारखी संप्रेरकं वाढतात आणि मग त्रास वाढतो. तसेच झोप अपुरी झाल्यामुळे त्वचेची झालेली हानी भरुन निघत नाही. त्यामुळे योग्य आहार, पुरेशी झोप आणि तणावमुक्त असणं आवश्यक आहे."

आपल्या चेहऱ्याच्या त्वचेवरील छिद्रं स्वच्छ राहावीत यासाठी सौम्य क्लिन्झरने दिवसातून दोनवेळा चेहरा धुवावा असं डॉक्टर सुचवतात. तसेच चेहऱ्यावर आलेले पिंपल्स ओढणं, फोडणे असे प्रकार करू नयेत असं सांगतात.

डॉ. शरिफा चौसे सांगतात, चेहऱ्यावर अतिप्रसाधनांचा वापर करणं किंवा छिद्रं बुजतील अशा घटकांचा वापर करणं यामुळे त्वचेवरचं तेल आणि बॅक्टेरिया अडकून पडतात आणि ॲक्नेची स्थिती अधिक वाईट होते. चेहरा सारखा धुतल्यामुळे आणि जोरजोरात घासल्यामुळे, खरवडला गेल्यामुळे त्वचेचा दाह होतो आणि स्थिती बिघडू शकते. एकदम कडक सुगंध, अल्कोहोल आधारीत उत्पादनांमुळे त्वचेचं नुकसान होऊ शकतं आणि पिंपल्स वाढू शकतात.

ॲक्ने आणि पोटाचा काय संबंध?

आपलं पोट आणि त्वचेचं आरोग्य यांचा थेट संबंध आहे. जर पोट नीट नसेल तर शरीरात इन्फ्लमेशन वाढतं आणि त्यामुळे त्वचेवर त्याचा परिणाम दिसतो. पोट नीट साफ नसणं, आतड्यात हानीकारक बॅक्टेरिया असणं यामुळे हार्मोन्स आणि प्रतिकारक्षमतेवर परिणाम होतो आणि त्याचाही परिणाम ॲक्नेवर दिसून येतो.

थुंकीमुळे ॲक्नेसाठी कारणीभूत असणारे बॅक्टेरिया मरतात का?

पिंपल्स आणि अक्नेबद्दल अनेक गोष्टी कारणीभूत असतात. तसेच याबद्दल अनेक गैरसमजही असतात. पिंपल्स फोडल्यामुळे ते लवकर बरे होतात असं काही लोकांना वाटतं. पण तसं केल्यामुळे तिथं इन्फ्लमेशन वाढतं आणि डाग पडतात. तसेच तैलिय त्वचा असणाऱ्या लोकांनी मॉइश्चरायजर वापरू नये असंही मानलं जातं पण मॉइश्चरायजर न वापल्यामुळे ॲक्ने वाढू शकतात. तसेच पिंपल्सवर लाळ लावण्याचा गैरसमजही असतोच.

त्यामुळे आम्ही डॉ. कथिजा नासिका यांना याबद्दल माहिती विचारली. डॉ. कथिजा चेन्नईमधील रेला हॉस्पिटल येथे त्वचाशास्र विभागात कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत.

त्या सांगतात, "लाळग्रंथीत तयार होणारी विकरं म्हणजे एन्झाइम्स Procnibacterium acne सारखे बॅक्टेरिया मारू शकतात हे जरी पुस्तकी माहितीनुसार योग्य असलं तरी आपण जेव्हा लाळ लावतो तेव्हा आपल्या तोंडातले इतर बॅक्टेरियाही त्याबरोबर त्वचेवर लावत असतो त्यामुळे त्याचा उपयोग होण्याऐवजी तोटाच होतो. त्यामुळे पिंपल्सवर लाळ लावल्यामुळे काहीही फायदा होत नाही."

डॉ. कथिजा सांगतात, "पिंपल्स कमी होण्यासाठी डॉक्टर तुमची तपासणी करुन औषध सुचवतात. ही औषधं व्यक्तीनुरुप बदलतात. एकच औषध सर्वांना लागू पडत नाही. ॲक्नेमुळे येणारे डाग हे कोलॅजन कमी झाल्यामुळे किंवा पिगमेंटेशन आणि मेलॅनिनमुळे येतात ते लाळ लावल्यामुळे जाणार नाहीत."

आपल्या लाळेत नक्की काय असतं?

मानवी लाळेत मुख्यतः 98 टक्के पाणी असतं. उरलेल्या दोन टक्क्यांमध्ये अनेक रसायनांचं मिश्रण असतं. त्यातील प्रत्येक घटकाची स्वतंत्र भूमिका असते. त्यात अमायलेजसारखी विकरं असतात. अमायलेजसारख्या विकरांमुळे तुम्ही अन्नपदार्थ

चघळता तेव्हा स्टार्च तोडायला मदत करता. लिंग्वल लिपेस मेद पचवायला मदत करतात. तसेच लाळेमध्ये लायझोजाइम, लॅक्टोफेरिन इम्युनोग्लोबिनसारखी संरक्षक प्रथिनंही असतात. त्यांच्यामुळे तोंडातील जंतूसंसर्ग नियंत्रणात राहातो.

पुण्यातील अपोलो हॉस्पिटल येथे कान,नाक, घसा शस्त्रक्रिया विभागात कन्सल्टंट म्हणून कार्यरत असणारे डॉ. सुश्रुत देशमुख म्हणाले, "याशिवाय लाळेत इलेक्ट्रोलाइट्स (सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, बायकार्बोनेट), तिला गुळगुळीतपणा देणारे म्युसिन्स, तसेच अल्प प्रमाणात ग्रोथ फॅक्टर्स आणि अँटिमायक्रोबियल पेप्टाइड्स असतात. एकत्रितपणे पाहता, लाळ ही तोंडाच्या वातावरणासाठी खास बनवलेली संतुलित द्रवपदार्थ आहे.

चव घेणे आणि अन्न गिळणे याशिवाय लाळ तोंडाच्या आरोग्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ती तोंडातील ऊती ओलसर ठेवते, खाल्ल्यानंतर आम्लता कमी करते, अन्नकण धुवून काढते आणि दातांची कीड किंवा हिरड्यांच्या आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या जीवाणूंचे नियंत्रण करते."

डॉ. सुश्रुत देशमुख सांगतात, "त्वचेवर लाळ लावल्याने कोणताही फायदा होत नाही. लाळेत काही जंतूनाशक घटक असले तरी तिच्यात तोंडातील जीवाणूही असतात. ते एखाद्या पिंपलवर लावल्यास त्रास वाढू शकतो किंवा नवीन जीवाणूंचा तिथं संसर्ग होतो. त्वचेची स्वतःची संरक्षणभिंत (स्किन बॅरियर), स्वतःचे मायक्रोबायोम आणि स्वतःचे उपचार यंत्रणासुद्धा असतात. त्यांपैकी कोणतीही व्यवस्था लाळेवर अवलंबून नाही.

म्हणूनच, मुरुमांवर "स्पॉट ट्रीटमेंट" म्हणून लाळ वापरण्याला त्वचारोगशास्त्रामध्ये कोणताही आधार नाही. उलट, यामुळे त्रास होण्याची जास्त शक्यता असते."

जीवनशैलीमध्ये कोणताही महत्त्वाचा बदल करायचा असेल, आहारात, उपचारात, औषधांमध्ये बदल करायचा असेल तसेच शारीरिक व्यायामाची सुरुवात करायची असेल तर डॉक्टरांची आणि योग्य प्रशिक्षकांची मदत घेणं आवश्यक आहे. आपल्या शरीराची तसेच लक्षणांची योग्य तपासणी डॉक्टरांकडून करुन घेऊन त्यांच्या सल्ल्यानेच जीवनशैलीत बदल करणं योग्य आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)