डेन्मार्कमध्ये सापडले 6 कोटी वर्षांपूर्वीचे माशाच्या उलटीचे अवशेष

पूर्व डेन्मार्कमधल्या समुद्रालगतच्या एका पर्वताचा स्टिवन्स क्लिन्ट हा कडा युनेस्कोच्या जागतिक पुरातन स्थानांच्या यादीत आहे. त्या कड्यावर जीवाश्मांचा अभ्यास करणारे स्थानिक संशोधक पीटर बेनिक्स यांना हे अवशेष सापडलेत.

आपण जीवाश्मांच्या अभ्यासात गढून गेल्याचं पीटर बेनिक्स सांगतात.

या कड्यावर त्यांना काहीतरी वेगळं दिसलं. जवळ जाऊन पाहिलं तर त्यात त्यांना खडूमध्ये असतो, तसा काहीसा पदार्थ दिसला. त्याचा अभ्यास केल्यावर समुद्रातल्या स्टार मासा आणि समुद्री अर्चिन्ससारख्या (अर्चिन हा समुद्रात आढळणारा एक काटेरी प्राणी आहे, त्याला मराठीत कलच असं म्हणतात.) दिसणाऱ्या समुद्री लीलीचे काही तुकडे सापडले.

एखाद्या फुलासारखा दिसणारा हा प्राणी कंटकचर्मी कुटुंबातला आहे.

कंटकचर्मी हे समुद्रात राहणारे अपृष्ठवंशी प्राणी असतात. या प्राण्यांची त्वचा कठीण आणि काटेरी असते.

हे अवशेष बेनिक्स यांनी म्युझिअम ऑफ झीलँड या संग्रहालयात आणले. तिथे त्याचा सखोल अभ्यास केल्यावर ही उलटी 6 कोटी वर्षांपूर्वीच्या क्रेटिशयन कालखंडातली असल्याचं निश्चित झालं आहे.

क्रेटिशयन हे नावही लॅटिन भाषेतल्या क्रेटा शब्दावरून आलं आहे. या शब्दाचा अर्थ होतो खडू.

टायनोसॉरस आणि ट्रायसेराटॉप्स या डायनॉसॉरच्या जमाती या युगात होत्या.

जॅस्पर मिलन हे जीवाश्मशास्त्रज्ञ या संग्रहालयाचे प्रमुख आहेत. हा "खरोखर अत्यंत दुर्लभ शोध" असल्याचं बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं. त्याने त्या युगातल्या अन्न साखळीविषयी बरीच माहिती मिळू शकते.

"6 कोटी वर्षांपूर्वी कोण कोणाचं भक्ष्य होतं याबद्दल या अवशेषात माहिती मिळू शकते," असं ते म्हणाले.

त्याकाळी शार्क आणि इतर मासे या समुद्री लीली खात असावेत. त्या पचायला अत्यंत जड होत्या. त्यामुळे न पचलेला खडूसारखा समुद्री लीलींच्या हाडाचा भाग ते ओकत असावेत, असं जॅस्पर मिलन यांनी पुढे समजावून सांगितलं.

"क्रेटिशन युगातल्या समुद्राच्या तळाशी दररोज काय सुरू असेल याची झलक यातून आपल्याला सापडू शकते. डायनोसॉरचा काळातला हा समुद्र आहे," असं ते म्हणाले.

या शोधामुळे प्राचीन परिसंस्थेची आपली समज वाढायलाही मोठी मदत होणार आहे.

या शोधाची माहिती मिलन यांनी स्थानिक पत्रकारांना दिली होती. पण जागतिक स्तरावर त्यात रस घेतला जात आहे.

"ही जगातील सर्वाधिक लोकप्रिय उलटी आहे," असं ते म्हणाले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)