अहमदाबाद विमान अपघातात कारणीभूत ठरलेलं फ्यूएल स्विच नेमकं काय असतं?

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा झालेला अपघात अजूनही अनेक प्रश्न निर्माण करत आहे. या प्रकरणाचा प्राथमिक तपास अहवाल समोर आला असून, त्यात एक गंभीर कारण समोर आलं आहे.

फ्यूएल स्विच बंद झाल्यामुळं इंजिनमध्ये इंधन पोहोचणं थांबलं आणि काही सेकंदातच विमान कोसळलं.

अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताबाबत भारत सरकारच्या विमान अपघात तपास विभागानं (एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो ऑफ इंडिया) आपला प्राथमिक अहवाल जाहीर केला आहे.

अहवालानुसार, विमानाने उड्डाण करताच दोन्ही इंजिनचे इंधन स्विच बंद (कट-ऑफ) स्थितीत गेले होते.

कॉकपिटच्या व्हाइस रेकॉर्डिंगमध्ये एक पायलट दुसऱ्या पायलटला, 'तू इंधनाचा स्विच का बंद केलास?, असा प्रश्न विचारत आहे.

दोन्ही इंजिनमधील इंधन थांबवण्याचा स्विच थोड्या उशिरानं बंद केल्याचे अहवालात म्हटलं आहे.

कोणता आवाज कोणत्या पायलटचा आहे, हे अहवालातून स्पष्ट झालेलं नाही.

उड्डाण करताना को-पायलट विमान चालवत होते, आणि कॅप्टन फक्त निरीक्षण करत होते.

अहवालानुसार, विमानाचा वेग 180 नॉट्सपर्यंत पोहोचताच लगेचच दोन्ही इंजिनचं इंधन बंद करणारे स्विच 'चालू' (रन) स्थितीतून 'बंद' (कट-ऑफ) स्थितीत गेले. हे दोन्ही स्विच फक्त एक सेकंदाच्या फरकाने बंद झाले.

ग्राफिक्स

मागील महिन्यात 12 जून रोजी अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान टेक ऑफ घेताच काही क्षणातच कोसळलं होतं. या विमान अपघातात विमानातील एकूण 260 जणांचा मृत्यू झाला होता. त्यात विमानातील 242 पैकी 241 जणांचा मृत्यू झाला होता. तर एक जण बचावला होता.

या 15 पानांच्या अहवालात विमान उडाल्यानंतर काही सेकंदातच त्याच्यासोबत काय घडलं होतं, हे सांगण्यात आलं आहे.

आता ज्यामुळे विमानाचा अपघात झाला असं अहवालात म्हटलं आहे, तो फ्यूएल स्विच म्हणजे इंधन स्विच नेमका काय असतो आणि तो विमानासाठी इतका महत्त्वाचा का असतो? ते समजून घेऊया.

फ्यूएल स्विच म्हणजे काय?

रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, फ्यूएल कंट्रोल स्विच म्हणजे असा स्विच जो इंजिनमध्ये जाणारं इंधन नियंत्रित करतो. म्हणजे इंधन चालू ठेवायचं की बंद करायचं, हे त्यावरून ठरतं.

पायलट विमान जमिनीवर असताना इंजिन सुरू करण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी किंवा उड्डाणादरम्यान इंजिनमध्ये बिघाड झाल्यास इंजिन मॅन्युअली थांबवण्यासाठी किंवा रिस्टार्ट करण्यासाठी त्यांचा वापर करतात.

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

हवाई क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात की, पायलट चुकूनही फ्यूएल स्विच बंद करू शकत नाही, कारण तो सहज किंवा चुकीने बंद होणारा नसतो.

पण जर पायलटनं तो स्विच बंद केला, तर त्याचा परिणाम लगेचच होतो. कारण त्याच क्षणी इंजिनला जाणारं इंधन तत्काळ थांबतं आणि इंजिन बंद होऊ शकतं.

अमेरिकेचे विमान सुरक्षा तज्ज्ञ जॉन कॉक्स यांनी 'रॉयटर्स'ला सांगितलं की, फ्यूएल कंट्रोल स्विचसाठी वेगळी वायरिंग आणि वीज पुरवठा (पॉवर सप्लाय) असतो. हा स्विच काम करतो त्यासाठी एक खास फ्यूएल वॉल्व (इंधन झडप) असते, जी इंधन थांबवते किंवा सुरू करते.

फ्यूएल स्विच कुठे असतो?

अहमदाबादमध्ये क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये, बोईंग 787 प्रकाराचं विमान होतं, त्यामध्ये दोन फ्यूएल कंट्रोल स्विच होते. हे दोन्ही स्विच विमानाच्या जीई इंजिन्सशी जोडलेले होते आणि ते थ्रस्ट लिव्हरच्या खाली बसवले होते.

हा थ्रस्ट लिव्हर म्हणजे असा हँडल असतो, जो पायलट विमानाच्या इंजिनला किती ताकद (पॉवर) द्यायची हे ठरवण्यासाठी वापरतो. हा थ्रस्ट लिव्हर कॉकपिटमध्येच असतो.

हा स्विच स्प्रिंगमुळे लॉक केलेला असतो, म्हणजे तो सहज हलत नाही. पायलटला जर तो चालू किंवा बंद करायचा असेल, तर आधी स्विच थोडा वर उचलावा लागतो, आणि मगच तो 'कट ऑफ' किंवा 'रन' केला जाऊ शकतो.

अहमदाबाद विमान अपघात

फोटो स्रोत, Getty Images

विमानातील फ्यूएल स्विचसोबत नेमकं काय झालं?

या विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालात एअर इंडियाच्या विमानाचं टेकऑफ झालं, त्यानंतर काही सेकंदांतच कोणत्या गोष्टी घडल्या, हे सांगितलं आहे.

विमान उडाल्यानंतर लगेच दोन्ही इंजिनचे फ्यूएल स्विच बंद स्थितीत गेले. त्यामुळे इंजिनपर्यंत इंधन पोहोचणं थांबलं आणि इंजिन हळूहळू बंद होऊ लागलं. यामुळे काही वेळातच विमान कोसळलं.

अहवालानुसार, "दुपारी 1 वाजून 38 मिनिटं आणि 42 सेकंदाला विमानाने कमाल 180 नॉट्सचा वेग गाठला. त्याच वेळेस लगेचच, दोन्ही इंजिनचे फ्यूएल स्विच बंद स्थितीत गेले. हे दोन्ही स्विच फक्त 1 सेकंदाच्या फरकाने बंद झाले होते."

अहवालानुसार, कॉकपिटच्या व्हॉइस रेकॉर्डिंगमध्ये एक पायलट दुसऱ्याला विचारतो, "तू फ्यूएल स्विच बंद का केलं?" त्यावर दुसरा पायलट उत्तर देतो, "मी बंद केलेलं नाही."

"सुमारे दहा सेकंदानंतर, 1 वाजून 38 मिनिटं आणि 56 सेकंदाला इंजिन-1 चा फ्यूएल स्विच पुन्हा बंद स्थितीतून चालू स्थितीत आणला गेला. त्यानंतर चार सेकंदात इंजिन-2 चा स्विचही पुन्हा चालू स्थितीत ठेवण्यात आला."

अहमदाबाद विमान अपघात

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

याचा अर्थ पायलटने दुसऱ्यांदा विमानावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.

सुमारे 9 सेकंदांनंतर, म्हणजे 1 वाजून 39 मिनिटं आणि 5 सेकंदाला, पायलटपैकी एकाने जमिनीवर असलेल्या एअर ट्रॅफिक कंट्रोलला 'मेडे' म्हणजे आपत्कालीन मदतीचा संदेश पाठवला.

पण त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, आणि त्यानंतर काही क्षणातच विमान कोसळताना दिसलं.

जेव्हा इंजिन बंद पडलं, तेव्हा रॅम एअर टर्बाइन हे एक छोटंसं पंख्यांसारखं यंत्र आपोआप सुरू झालं.

हे यंत्र अशा आपत्कालीन प्रसंगी विमानाला थोडीफार हायड्रॉलिक पॉवर (बचावासाठी लागणारी ताकद) देतं, जेणेकरून विमान काही वेळ सुरू ठेवता येईल.

अहवालामध्ये म्हटलं आहे की, "विमानतळावरचे सीसीटीव्ही फूटेज पाहिल्यानंतर असं दिसून आलं की, विमानानं उड्डाण केल्यानंतर लगेच वर जायला सुरुवात केली, आणि त्याच वेळी रॅम एअर टर्बाइन (रॅट) नावाचं यंत्र आपोआप सुरू झालं.

उड्डाण मार्गाजवळ मोठ्या पक्ष्यांच्या हालचालींबद्दल कुठलीही माहिती नाही. आणि रनवेच्या सीमारेषा पार करण्याआधीच विमानानं उंची गमावणं सुरू केलं होतं."

अहवालानुसार, इंधनाचे नमुने तपासले गेले आणि त्याचा रिपोर्टही 'समाधानकारक' आला आहे. म्हणजे इंधनात कोणताही दोष नव्हता.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)