अजय कानू : जहानाबादमध्ये घडलेल्या भारतातील सर्वांत मोठ्या तुरुंगफोडीचा 'मास्टरमाईंड'

    • Author, सौतिक बिस्वास
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

नोव्हेंबर 2005 ची ही घटना. रविवारचा दिवस होता आणि शांत संध्याकाळ होती. बिहारमधील एक पत्रकार आपल्या घरी असताना त्याला एक फोन आला.

समोरून आवाज आला, “माओवाद्यांनी तुरुंगावर हल्ला केला आहे. लोकांना मारताहेत. मी एका बाथरुममध्ये लपलो आहे,” हा आवाज एका कैद्याचा होता. तो प्रचंड घाबरला होता. त्याचा आवाज थरथरत होता. मागून गोळीबाराचे आवाज ऐकू येत होते.

तो जहानाबाद येथील तुरुंगातून फोन करत होता. या जिल्ह्यात प्रचंड गरिबी होती आणि अति डाव्या विचारांचा प्रचंड प्रभाव होता.

हा तुरुंग मोडकळीला आला होता, तो लाल विटांचा ब्रिटिशांच्या काळातला आणि कैद्यांनी गच्च भरलेला तुरुंग होता. हा तुरुंग एक एकर भागात पसरला होता, त्यात 13 बरॅक, कोठड्या होत्या. अधिकृत अहवालाप्रमाणे तो अतिशय अंधारलेला, गलिच्छ आणि घाणेरडा तुरुंग होता. 230 कैद्यांसाठी तयार करण्यात आलेल्या या तुरुंगात 800 कैदी होते.

1960 च्या दशकात पश्चिम बंगालमधील नक्षलबारीमध्ये माओवाद्यांनी घुसखोरी करायला सुरुवात केली होती. ती नंतर बिहारसह भारताच्या इतर भागातही पसरली. जवळजवळ 60 वर्षांपर्यंत नक्षलवादी भारत सरकारविरोधात कम्युनिस्ट समाज तयार करण्याच्या मुद्यावर लढले. या चळवळीत 40 हजार लोकांचा जीव गेला.

जहानाबादचा तुरुंग उद्रेकाच्या उंबरठ्यावर होता. तिथे अनेक माओवादी आणि त्यांचे वर्गशत्रू होते. हिंदू धर्मातील काही संघटनाचे कट्टर कार्यकर्ते तिथे होते.

एकमेकांविरुद्ध झालेल्या संघर्षात खटला सुरू होण्याची वाट पाहत होते. अनेक भारतीय तुरुंगाप्रमाणे काही कैद्यांकडे मोबाइल फोन होते. तिथल्या सुरक्षारक्षकांना लाच देऊन हे मोबाइल मिळवले होते.

“या तुरुंगात प्रचंड प्रमाणात बंडखोर होते. अनेक लोक आरामात ये-जा करायचे,” असं त्यावेळी असलेल्या 659 कैद्यापैकी एका कैद्याने पत्रकार राजकुमार सिंह यांना हळूच सांगितलं होतं.

13 नोव्हेंबर 2005 रोजी जहानाबाद तुरुंगातून 389 कैदी फरार झाले. त्यात अनेक बंडखोरांचा समावेश होता. जेल फोडून जाण्याची ही भारतातील आणि कदाचित आशियातील सर्वांत मोठी घटना होती. यावेळी तुरुंगात चकमकही झाली. त्यात दोन कैदी ठार झाले. या गोंधळात पोलिसांच्या रायफल चोरल्या गेल्या.

युनायटेड स्टेट्‍स, डिपार्टमेंट ऑफ स्टेट्‍सच्या 2005 साली दहशतवादावर आलेल्या एका अहवालानुसार या घटनेत बंडखोरांनी 30 कैद्यांचं अपहरणही केलं. हे कैदी माओवाद्यांच्या विरोधी गटातले होते.

या घटनेने एक रंजक वळण घेतलं. या घटनेमागे अजय कानू यांचा हात होता असं पोलिसांनी सांगितलं. कानू हे एक बंडखोर नेते होते आणि ते सुद्धा कैदी होते. या तुरुंगात सुरक्षाव्यवस्था इतकी ढिसाळ होती की कानू त्यांच्या सहकाऱ्यांशी व्यवस्थित संपर्क करू शकत होते. मेसेजेसच्या माध्यमातून त्यांना आत यायलाही मदत करायचे असा आरोप पोलिसांनी केला. कानू यांनी मात्र हे आरोप फेटाळले.

अनेक बंडखोर त्या दिवशी पोलिसांच्या वेशात तुरुंगात असलेला धोबीघाट ओलांडून तुरुंगाच्या आतल्या परिसरात गेले. बांबूच्या काठ्यांनी शिडी तयार केली आणि भिंतीवर चढले आणि तुरुंगाच्या परिसरात उतरले. उतरल्यावर तिथून ते रांगत गेले आणि आपल्या रायफलमधून गोळीबार करायला सुरुवात केली.

स्वयंपाक सुरू असल्यामुळे कोठडीचे दरवाजे उघडे होते. यानंतर बंडखोर मुख्य दरवाज्याकडे गेले आणि ते उघडलं. तिथे असलेले सुरक्षा कर्मचारी हतबलपणे हे सगळं पाहत होते. जितके कैदी पळून गेले त्यापैकी 30 लोकांना कोर्टाने दोषी ठरवलं होतं. इतर कैदी आपला खटला कोर्टात येण्याची वाट पाहत होते. ते आरामात मुख्य दारातून पळाले आणि अंधारात बेपत्ता झाले. हे सगळं एक तासाच्या आत झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.

या सामूहिक तुरुंगफोडीच्या घटनेमुळे बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्थेची लक्तरं वेशीवर टांगली गेली. तसंच देशाच्या सर्वात गरीब भागात माओवाद्यांची घुसखोरी प्रचंड प्रमाणात वाढली. यावेळी बंडखोरांनी अगदी नियोजनबद्ध रीतीने हे सर्व पार पाडलं. कारण त्यावेळी निवडणुकांमुळे तुरुंगाची सुरक्षाव्यवस्था काहीशी शिथिल करण्यात आली होती.

स्थानिक पत्रकार राजकुमार सिंह यांना त्या रात्रीचा घटनाक्रम अगदी स्पष्टपणे आठवतो.

त्यांना फोन आला आणि ते बाईकने त्या निर्जन गावात गेले. आपल्या ऑफिसला जाण्याचा ते प्रयत्न करत होते. बऱ्याच अंतरावरून गोळीबाराचा आवाज येत होता. त्यामुळे तिथल्या हवेतच एक प्रकारचा तणाव निर्माण झाला होता असं ते सांगतात. हे बंडखोर शेजारच्या काही पोलीस ठाण्यांवर हल्ला करण्याचाही प्रयत्न करत होते.

ते मुख्य रस्त्यावर आल्यावर तिथल्या मिणमिणत्या रस्त्यांच्या दिव्यांच्या प्रकाशात त्यांना एक थरारक दृश्य दिसलं. पोलिसांचा गणवेश परिधान केलेल्या अनेक पुरुष आणि बायकांनी रस्ता रोखून धरला होता तसंच मेगाफोनच्या मदतीने घोषणाबाजी करत होते.

“आम्ही माओवादी आहोत. आम्ही लोकांच्या विरोधात नाही. आम्ही फक्त सरकारच्या विरोधात आहोत. तुरुंग फोडणं हा आमच्या आंदोलनाचाच एक भाग होता,” असं ते म्हणाले.

बंडखोरांनी रस्त्यावर बॉम्ब पेरून ठेवले होते. त्यातील काही फुटत होते. त्यामुळे आजूबाजूची दुकानं उद्धवस्त झाली होती. या सर्व प्रकारामुळे गावात दहशत पसरली होती.

तरी गाडी पुढे दामटल्याचं सिंह यांनी सांगितलं. चौथ्या मजल्यावर असलेल्या आपल्या ऑफिसमध्ये ते गेले. तिथे त्यांना त्या कैद्याचा दुसऱ्यांदा फोन आला.

“सर्वजण पळून जाताहेत, मी काय करू?,” तो कैदी विचारत होता.

“जर सगळे पळताहेत तर तू पण पळ,” सिंह म्हणाले.

त्यानंतर निर्मनुष्य रस्त्यावरून तुरुंगाकडे गेले. जेव्हा ते तिथे पोहोचले तेव्हा तुरुंगाचा मुख्य दरवाजा उघडा होता. स्वयंपाकघरात केलेली खीर सगळीकडे पसरली होती. कोठडीचे दरवाजे सत्ताड उघडे होते. कोणताही पोलीस किंवा तुरुंगाधिकारी तिथे नव्हता.

एका खोलीत जमिनीवर दोन जखमी पोलीस अधिकारी होते. 'रणवीर सेना' ही उच्चवर्णीय जमीनदारांची एक संघटना होती. त्या संघटनेचा म्होरक्या बडे शर्मा याचा रक्ताच्या थारोळ्यातला मृतदेह त्यांना दिसला. बंडखोरांनी जाता जाता त्याची हत्या केली अशी माहिती नंतर पोलिसांनी दिली.

तसंच जमिनीवर आणि भिंतीवर हाताने लिहिलेली काही परिपत्रकं होती. त्यावर रक्ताचे डाग लागले होते.

“या प्रतीकात्मक कारवाईतून आम्हाला राज्य आणि केंद्र सरकारला इशारा द्यायचा आहे की जर त्यांनी क्रांतिकारकांना आणि संघर्ष करणाऱ्या लोकांना अटक केली, त्यांना तुरुंगात डांबून ठेवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना मार्क्सवादी क्रांतिकारी मार्गाने कसं बाहेर काढायचं हे आम्हाला माहिती आहे,” असं एका परिपत्रकावर लिहिलं होतं.

'अजय कानूंना मी भेटलो तेव्हा'

या तुरुंगफोडीचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप पोलिसांनी कानू यांच्यावर ठेवला होता. त्यांना मी काही महिन्यांपूर्वी बिहारची राजधानी पाटण्याला भेटलो.

कानू यांनी त्यावेळची परिस्थिती, आंदोलनाशी ते कसे जोडले गेले याविषयी तसेच त्या तुरुंगफोडीबद्दल सविस्तर चर्चा केली.

जेव्हा ही घटना झाली तेव्हा प्रसारमाध्यमांनी त्यांचं चित्र 'बिहारचा मोस्ट वाँटेड' अशा पद्धतीने रंगवलं होतं. कानू यांचा पोलिसांना त्याचा धाक होता आणि आदरही होता.

जेव्हा त्यांच्या कॉम्रेड्सने त्यांना एके-47 आणून दिली तेव्हा कशा पद्धतीने तुरुंगाचा आणि त्या परिस्थितीचा ताबा घेतला याचं यथासांग वर्णन पोलीस अधिकारी करतात.

काही बातम्यांमध्ये असं सांगण्यात आलं की त्यांनी अगदी सहज ते शस्त्र हाताळलं, बडे शर्मा यांना कथितरीत्या मारण्याच्या आधी पटापट मॅगझिन्स बदलले.

पंधरा महिन्यानंतर म्हणजे फेब्रुवारी 2007 मध्ये कानू यांना एक रेल्वे प्लॅटफॉर्मवरून अटक करण्यात आली. ते बिहारमधील धनबादमधून कोलकात्याला जात होते.

दोन दशकांनंतर मूळ 45 गुन्हेगारी खटल्यांपैकी सहा खटल्यांचा अपवाद वगळता कानूची मुक्तता करण्यात आली आहे. त्यात शर्मा यांच्या खुनाच्या खटल्याचाही समावेश आहे. यापैकी एका खटल्यात त्यांना सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली, कानू यांनी ती पूर्ण केली.

कानू यांची प्रतिमा

कानू यांची प्रतिमा भीतीदायक असली तरी ते अतिशय बोलके आहेत. ते अतिशय मुद्देसूद बोलतात. तुरुंगफोडीत त्यांचा फारसा सहभाग नसल्याचं सांगतात.

एकेकाळी अतिशय धोकादायक आणि बंडखोर असलेलेला कानू यांनी आपला रोख आता राजकारणाकडे वळवला आहे. आता ते गरीब आणि मागास लोकांसाठी लढणार असल्याचं सांगतात.

कानू यांचे वडील कनिष्ठ वर्गातील शेतकरी होते. ते कानू यांना दिवसरात्र रशिया, चीन आणि इंडोनेशिया येथे होत असलेल्या कम्युनिस्ट आंदोलनाच्या कथा सांगत असत.

ते आठवीत असताना त्यांच्या वडिलांच्या सहकाऱ्यांनी त्यांना राजकारणात पाऊल ठेवून क्रांतीला हातभार लावण्याची गळ घातली. उच्चवर्णीयांना त्यांचा असलेल्या विरोधाने कानू यांच्या मनात फार लवकर मूळ धरल्याचं ते सांगतात. एकदा एका फुटबॉल मॅचमध्ये त्यांनी गोल केला. विरुद्ध संघात जमीनदाराचा मुलगा होता. त्यानंतर सशस्त्र उच्चवर्णीयांनी त्यांच्या घरावर हल्ला केला.

“मी घरात स्वत:ला डांबलं. ते मला आणि माझ्या बहिणीला शोधत आले. आमच्या घरात हैदोस घातला, सगळं उद्धवस्त केलं. अशा प्रकारे भीती हे अस्त्र वापरून हे उच्चवर्णीय आमच्यावर नियंत्रण मिळवायचे,” ते सांगतात.

कॉलेजमध्ये असताना ते राज्यशास्त्र शिकले. सगळ्यात विरोधाभास म्हणजे त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या विद्यार्थी सेनेचं नेतृत्व केलं. त्यांनी माओवादाविरुद्ध मोर्चा उघडला होता. पदवी मिळवल्यानंतर त्यांनी एका शाळेची स्थापना केली. मात्र बिल्डिंगच्या मालकाने त्यांना बाहेर काढलं. आपल्या गावात परतल्यावर स्थानिक जमीनदाराशी त्यांचा संघर्ष आणखी वाढीस लागला. स्थानिक पातळीवरील एका महत्त्वाच्या नेत्याचा खून झाला तेव्हा 23 वर्षीय कानू यांचं नाव पोलीस एफआयआरमध्ये आलं आणि ते भूमिगत झाले.

“तेव्हापासून जवजवळ आयुष्यभर फरारच आहे. मी कामगार आणि शेतकऱ्यांना एकत्र आणायला कमी वयात घर सोडलं आणि माओवादी म्हणून भूमिगत झालो,” ते म्हणाले. त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात (मार्क्सवादी लेनिनवादी) प्रवेश केला. हा क्रांतिकारी कम्युनिस्टांचा गट आहे.

“मुक्तता, त्यातही गरीबांची मुक्तता हाच माझा व्यवसाय होता. उच्चवर्णीयांच्या जातीय अन्यायाविरुद्ध उभं राहायचं होतं. मी सततच्या शोषणाविरुद्ध आणि अन्यायाविरुद्ध लढलो,” ते सांगतात.

30 लाखांचे होते बक्षीस

ऑगस्ट 2002 मध्ये बंडखोर नेते म्हणून ते ओळखले जाऊ लागले. त्यांच्यावर 30 लाखाचं बक्षीस होतं. कानू तेव्हा भूमिगत नेत्यांच्या भेटी घेऊन नवी रणनीती आखत असत.

एकदा ते पाटण्याला एका ठिकाणी जात होते. तेव्हा एका गजबजलेल्या चौकात एक गाडी त्यांच्यासमोर आली. “अगदी क्षणार्धात, साध्या वेशातील लोक बाहेर आले. त्यांनी बंदुका काढल्या आणि मला आत्मसमर्पण करायला सांगितलं. मी कोणताही विरोध केला नाही आणि शरण आलो,” ते म्हणाले.

पुढे तीन वर्ष कानू यांची रवानगी वेगवेगळ्या तुरुंगात करण्यात आली. कारण ते पळून जायची पोलिसांना भीती होती.

“कानू यांची प्रतिमा अचाट होती. ते अगदी चलाख बुद्धीचे होते,” एका पोलीस अधिकाऱ्याने मला सांगितलं. प्रत्येक तुरुंगात कानू यांनी भ्रष्टाचाविरुद्ध लढण्यासाठी कैद्यांची संघटना तयार केली होती.

अन्नधान्याची चोरी, आरोग्याच्या असुविधा, लाच याविरुद्ध लढण्यासाठी या संघटना तयार केल्याचं कानू सांगतात. एका तुरुंगात त्यांनी तीन दिवस उपोषण केलं होतं. “तेव्हा खूप संघर्ष व्हायचा. पण तुरुंगातसी परिस्थिती सुधारावी यासाठी मी सातत्याने मागणी करायचो,” कानू म्हणतात.

भारतातल्या गर्दीने गजबजलेल्या तुरुंगांबद्दलही कानू सांगतात. जहानाबाद मधील तुरुंगात क्षमतेपेक्षा दुप्पट कैदी होते असं ते म्हणतात.

“तिथे आम्हाला झोपायला जागा नसायची. 40 कैद्यांसाठी असलेल्या बराकमध्ये 180 कैदी होते. म्हणून मग आम्ही एक व्यवस्था तयार केली. आमच्यापैकी 50 लोक चार तास झोपायचो आणि इतर लोक अंधारात गप्पा मारत बसलेले असायचे. चार तास झाले की दुसरा गट झोपायचा. त्या चार भिंतींच्या आड असं आमचं आयुष्य होतं,” कानू सांगतात.

2005 मध्ये झालेल्या तुरुंगफोडीत कानू पळून गेले. “आम्ही जेवणाची वाट पाहत होतो तेव्हा गोळीबार झाला, बॉम्ब फुटले, सगळीकडे गोळ्या डागल्या गेल्या. सगळीकडे गोंधळ माजला. माओवादी आले. आम्हाला ओरडून ओरडून पळून जायला सांगत होते. सर्वजण अंधारात पळालो. मी काय तुरुंगात राहून मरायला हवं होतं का?,” कानू विचारतात.

कानू जितक्या साधेपणाने हे सगळं सांगतात त्यावर अनेकांचा विश्वास नाही.

“हे सगळं इतकं साधं नाही,” असं पोलीस अधिकारी सांगतात, “जर स्वयंपाक संध्याकाळच्या वेळेस तयार होतो, कोठडीचं दारही लवकर बंद होतं. तर त्यादिवशी इतका उशीर का झाला? त्यामुळे या तुरुंगफोडीत आतल्या कैद्यांचाच सहभाग आहे या शंकेला आणखी दुजोरा मिळतो.”

जे कैदी तेव्हा पळून गेले होते ते डिसेंबरच्या मध्यात परत आले होते. काही स्वेच्छेने आले, काही आले नाहीत. पळून गेलेला एकही बंडखोर परत आला नाही.

या तुरुंगफोडीच्या मागे मास्टरमाईंड तुम्ही होतात का असं विचारल्यावर ते हसले, “माओवाद्यांनी आमची सुटका केली. अशी सुटका करणं हेच त्यांचं काम आहे,” ते म्हणाले.

जेव्हा हाच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला तेव्हा ते एकदम शांत झाले. त्यांनी तुरुंगाच्या काळातील एक किस्सा मला सांगितला तेव्हा हा विरोधाभास आणखी गहिरा झाला.

एकदा एका पोलीस अधिकाऱ्याने त्यांना विचारलं की पुन्हा एकदा तुरुंग फोडण्याचा विचार आहे का? तेव्हा ते उत्तरादाखल म्हणाले, “सर, एखादा चोर चोरी करताना सांगून करत असतो का?”

कानू यांचे ते शब्द हवेत तरंगत राहिले. इतक्या मोठ्या तुरुंगफोडीत आपला काहीच सहभाग नव्हता असं म्हणणाऱ्या माणसाचे ते शब्द होते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)