धर्मेंद्र : जगातील सर्वात देखण्या पुरुषांमध्ये समावेश असलेला कवीमनाचा अभिनेता

    • Author, वंदना
    • Role, बीबीसी न्यूज

हिंदी चित्रपटसृष्टीतील 'ही-मॅन' म्हणून ओळख असणारे अभिनेते धर्मेंद्र यांचं नुकतंच निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. त्यांचा 8 डिसेंबर रोजी वाढदिवस असतो.

------------------------------

रुपेरी पडद्यावर ॲक्शन हिरो किंवा 'ही-मॅन' अशी प्रतिमा असलेले अभिनेते धर्मेंद्र कवी मनाचे व्यक्ती होते.

मात्र, ॲक्शन हिरो किंवा ही-मॅन सारख्या नावांनी ओळखले जाणाऱ्या धर्मेंद्र यांना जर या प्रतिमेच्या पलीकडे जाऊन जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तर ते यापलीकडे बरंच काही होते.

अनुपमा या चित्रपटात एक संवेदनशील लेखक, सामाजिक बांधिलकी जपणारा सत्यकाममधील आदर्शवादी जिद्दी तरुण, विनोदानं पोट धरून हसवणारा चुपके-चुपके चित्रपटातील प्रोफेसर परिमल...

धर्मेंद्र यांच्या अभिनयाचे असे अनेक पैलू होते.

वास्तविक आयुष्यात ते कवी, एक प्रेमी, एक पिता, जगातील सर्वात देखण्या पुरुषांमध्ये समावेश असलेले, दारूच्या व्यसनावर मात करणारा व्यक्ती आणि राजकारणातील वन-टाइम नेता होते.

नवाज शरीफसुद्धा होते धर्मेंद्रचे चाहते

1935 साली पंजाबात जन्मलेले धर्म सिंह देओल यांचा त्यांच्या नरसाली गावापासून ते मुंबईपर्यंतचा प्रवास हे एक सुंदर स्वप्नंच होतं.

अभिनेते धर्मेंद्र यांचे भारतात तर लाखो चाहते आहेतच. मात्र पाकिस्तानातदेखील त्यांचे असंख्य चाहते आहेत. यात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचादेखील समावेश आहे.

धर्मेंद्र यांनी एक किस्सा ऐकवला होता.

तो असा, "जेव्हा नवाज शरीफ भारतात आले होते, तेव्हा माझी त्यांच्याशी भेट झाली होती. नवाज शरीफ म्हणाले होते की त्यांचं कुटुंब कारमधून जात होतं, त्यावेळेस त्यांनी माझ्या घरासमोर त्यांची कार थांबवली होती. त्यांनी त्यांच्या पत्नी आणि मुलांना सांगितलं होतं - पाहा, हे धर्मेंद्र यांचं घर आहे."

महेश भट्ट यांच्यासाठी धर्मेंद्र यांनी ट्रक ड्रायव्हरकडून कपडे घेतले उधार

धर्मेंद्र त्यांच्या अभिनयासाठी प्रसिद्ध होतेच, तसंच त्यांच्या उदारपणाबद्दलचे किस्सेदेखील प्रसिद्ध होते.

लेखक राजीव विजयकर यांनी 'धर्मेंद्र - नॉट जस्ट अ ही-मॅन' हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात धर्मेंद्र यांचे असे अनेक किस्से देण्यात आले आहेत.

या पुस्तकात महेश भट्ट म्हणतात, "दो चोर या चित्रपटाच्या सेटवर मी सहाय्यक म्हणून काम करत होतो. मी नीट सूचना दिल्या नाहीत, त्यामुळे धर्मेंद्र यांचा ट्रक ड्रायव्हरचा पोशाख चित्रीकरण स्थळापासून दूर असलेल्या हॉटेलातच राहिला होता."

"ते दृश्य कोणत्याही परिस्थितीत सकाळी-सकाळीच चित्रीत होणं आवश्यक होतं. नाहीतर निर्मात्याचं मोठं नुकसान झालं असतं. मग मी धर्मेंद्र यांना माझी अडचण सांगितली."

ते पुढे म्हणतात, "धर्मेंद्र यांनी सहानुभुतीनं माझं म्हणणं ऐकून घेतलं. ते उठले, जवळच एक ट्रक ड्रायव्हर होता. ते त्या ड्रायव्हरकडे गेले. धरमजींनी त्या ड्रायव्हरनं घातलेले मळलेले कपडे तात्पुरते त्याच्याकडून घेतले आणि एक ड्रेसमॅननं केलेली चूक त्यांच्या उदारपणानं आणि कल्पनाशीलतेनं झाकून टाकली."

दिलीप कुमारमुळे निर्माण झाली अभिनयाची इच्छा

धर्मेंद्र यांच्या बालपणाबद्दल बोलायचं, तर त्यांचे वडील लुधियानाजवळच्या सानेवाल गावात गणिताचे शिक्षक होते. तिथे सिनेमा पाहणं ही खूपच दूरची गोष्ट होती.

लहानपणी, एकदा धर्मेंद्र यांनी चोरून दिलीप कुमार यांचा शहीद हा चित्रपट पाहिला. तो 1948 सालचा चित्रपट होता.

धर्मेंद्र म्हणतात की त्या चित्रपटानं आणि दिलीप कुमार यांनी त्यांच्या मनावर जणू काही गारुडच केलं होतं. एकप्रकारे त्याच दिवशी त्यांचं भवितव्य निश्चित झालं होतं.

नशीबानं देखील धर्मेंद्र यांना साथ दिली. 1958 मध्ये फिल्मफेअर मासिकानं एका टॅलंट हंटची घोषणा केली. त्यात बिमल रॉय आणि गुरु दत्त यांच्यासारखे दिग्गज देखील होते.

त्यावेळेस मलेरकोटला मध्ये नोकरी करत असलेले धर्मेंद्र तिथे जान मोहम्मद फोटो स्टुडिओमध्ये गेले. ते म्हणाले की काहीतरी असं करा की मी दिलीप कुमार होईल आणि माझी निवड होईल.

आणि तसंच झालंदेखील. गावातील मुलगा निवडला गेला आणि मुंबईत पोहोचला.

मग सुरू झाली एखाद्या चित्रपटाला साजेशी कहाणी. त्यात भावना होत्या, नाट्य होतं आणि शोकांतिकादेखील होती.

बिमल रॉय यांचे धर्मेंदू आणि बंदिनी

बिमल रॉय यांनी धर्मेंद्र यांना अभिनयाची पहिली संधी दिली होती. तो चित्रपट होता 'बंदिनी'. बिमल रॉय त्यांना 'धर्मेंदू' म्हणायचे.

अर्थात बंदिनी चित्रपट पूर्ण होण्यास वेळ लागला. या दरम्यान संघर्षाच्या काळात अर्जुन हिंगोरानी यांनी धर्मेंद्र यांना 'दिल भी तेरा हम भी तेरे' या चित्रपटात भूमिका दिली.

1966 मध्ये आलेल्या 'फूल और पत्थर' या चित्रपटानं खऱ्या अर्थानं सोलो हिरो म्हणून धर्मेंद्र यांची ओळख निर्माण झाली. या चित्रपटात एक दृश्य होतं की गुंड, दारुड्याच्या भूमिकेतील धर्मेंद्र त्यांचा शर्ट काढून एक भिकारी आणि विधवेच्या अंगावर टाकतात.

त्यावेळेस कोणत्याही हिरोची अशी बॉडी नव्हती. याच चित्रपटात ही-मॅनची पहिली झलक पाहायला मिळाली. याच चित्रपटानं धर्मेंद्र यांना फिल्मफेअरचं पहिलं नामांकनदेखील मिळवून दिलं.

अमिताभ बच्चन-राजेश खन्ना असूनही हिट

1960 चं दशक येईपर्यंत धर्मेंद्र यशाच्या पायऱ्या चढत होते, मात्र त्यांना मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावं लागत होतं.

60 च्या दशकाच्या सुरूवातीला जेव्हा धर्मेंद्र यांच्या करियरची सुरूवात होत होती, तेव्हा शम्मी कपूरचा जमाना होता. 1970 चं दशक सुरू होईपर्यंत राजेश खन्ना नावाचं वादळ आलं. तर धर्मेंद्र जेव्हा यशाच्या शिखरावर होते, तेव्हा अमिताभ बच्चन यांनी सर्वांवर गारुड केलेलं होतं.

मात्र या सर्व स्पर्धेतदेखील धर्मेंद्र बहुधा एकमेव अभिनेते होते जे 60 च्या दशकापासून ते 80 च्या दशकापर्यंत हिट मशीनप्रमाणे टिकून राहिले.

अनुपमामधील कवी आणि सत्यकाम

धर्मेंद्र यांच्या करियरबद्दल बोलायचं, तर 'अनुपमा' आणि 'सत्यकाम' हे माझे आवडते चित्रपट आहेत. ते ऋषिकेश मुखर्जींनी बनवले होते.

1969 मध्ये आलेल्या सत्यकाममध्ये धर्मेंद्र यांची भूमिका वेगळीच होती. स्वातंत्र्यानंतरच्या भारतात, सत्याला सर्वात वरचं स्थान देणारा सत्यप्रिय (धर्मेंद्र) त्याचं सर्वकाही पणाला लावण्याइतका आदर्शवादी असतो.

एखादं पात्र आपल्या मनात एकाच वेळी इतक्या भावना कशा काय निर्माण करू शकतो, याचा विचार करूनही आपण थक्क होतो. इतकं दु:ख, वेदना, प्रेम, भीती, सहानुभूती आणि अभिमान. ऋषिकेश मुखर्जीदेखील सत्यकामला त्यांचा आणि धर्मेंद्र यांचा सर्वोत्तम चित्रपट मानत असत.

तर अनुपमा या चित्रपटात धर्मेंद्र असे मनात घर करणारे लेखक होते, जो अशा मुलीच्या मनात स्थान मिळवतो, जिनं सर्वांसाठी मनाचे दरवाजे बंद केले आहेत.

तो लेखक जेव्हा गातो की 'या दिल की सुनो दुनियावालों या मुझको अभी चुप रहने दो... किंवा तो गातो, छलकाए जाम आइए आपकी आँखों के नाम, हे गीत गातो, तेव्हा तो तुमच्या मनाला खोलवर स्पर्श करून जातो.

चुपके चुपकेतील विनोदी भूमिका

नंतर धर्मेंद्र यांचे 'हकीकत', 'दिल ने फिर याद किया', 'ममता', 'मेरे हमदम मेरे दोस्त' यासारख्या चित्रपट आले. या चित्रपटांमध्ये बिमल रॉय, ऋषिकेश मुखर्जी, चेतन आनंद यांच्यासारख्या दिग्दर्शकांनी त्यांच्या अभिनयाला आणखी पैलू पाडले.

मग आलं 1970 चं दशक, ज्यात धर्मेंद्र यांचं वेगळंच रूप प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर दिसलं. त्यात ॲक्शन, रोमान्स, कॉमेडी, असं व्यावसायिक सिनेमात असणारं सर्वकाही होतं. या काळात धर्मेंद्र यांचे 'जीवन मृत्यू', 'सीता और गीता', 'चरस', 'ब्लॅकमेल', 'चुपके चुपके' हे एकापाठोपाठ एक हिट चित्रपट आले.

1975 साली शोले प्रदर्शित झाला. या चित्रपटातील वीरूच्या भूमिकेनं तर धर्मेंद्र यांची वेगळीच ओळख निर्माण झाली. तोपर्यंत त्यांची लोकप्रियता शिखरावर पोहोचली होती.

शोलेमधील पाण्याच्या टाकीवर चढण्याचा तो सदाबहार सीन कोण विसरू शकेल.

'व्हेन आय डेड, पोलीस कमिंग..पोलीस कमिंग, बुढिया गोईंग जेल...इन जेल बुढिया चक्की पीसिंग अँड पीसिंग अँड पीसिंग' हे संवाद आजदेखील प्रेक्षकांना पाठ आहेत.

टांगेवाल्या बसंतीबरोबर टांग्यावर रोमान्स करणारा वीरू लोकांना भावला होता. त्यामुळे या चित्रपटानं धर्मेंद्र यांचं स्टारडम प्रचंड वाढलं होतं.

'सर्वात देखणा अभिनेता'

धर्मेंद्र ऐन भरात असताना त्यांचा समावेश जगातील सर्वात देखण्या पुरुषांच्या यादीत करण्यात आला होता.

धर्मेंद्र यांचे आदर्श होते, दिलीप कुमार. एका कार्यक्रमात दिलीप कुमार म्हणाले होते की जेव्हा ते देवाला भेटतील तेव्हा त्याला विचारतील की देवानं त्यांना धर्मेंद्रसारखं देखणं का बनवलं नाही.

याबद्दल धर्मेंद्र बीबीसीला म्हणाले होते, "मी विचार करतो की लोक म्हणत असतील तर कदाचित खरंच असेल. ते मला ही-मॅन म्हणतात, ग्रीक गॉड म्हणतात. मी माझ्या गुणांमध्येदेखील उणिवा शोधत असतो. माझ्या चाहत्यांच्या मनात माझं जे स्थान आहे, ते मी गमावू नये याचाच मी विचार करतो."

अभिनयानं प्रेक्षकांना भुरळ पाडणारा हा कलाकार नृत्यकौशल्यात मात्र जेमतेमच होता. मात्र तरीदेखील जट पगला यमला दिवाना सारखी त्यांची गाणी अत्यंत लोकप्रिय झाली.

या गाण्याबद्दल धर्मेंद्र बीबीसीला म्हणाले होते, "चित्रपटात मी लोकांसमोर नाचण्यास नकार दिला होता. त्यामुळे माझ्यासाठी आणि रेखासाठी क्रेन आणण्यात आली. मग मी असा खुललो की माझा संकोचच निघून गेला. तुमचा धरम बेशरम झाला."

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची प्रेमकहाणी

याच काळात धर्मेंद्र हेमा मालिनीवरच्या प्रेमात आकंड बुडालेले होते. अर्थात धर्मेंद्र यांचं प्रकाश कौर यांच्याशी आधीच लग्न झालेलं होतं. 1980 साली धर्मेंद्र यांनी ड्रीमगर्ल हेमा मालिनी यांच्याशी लग्न केलं, तेव्हा त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता.

लेखक राम कमल मुखर्जी यांनी 'बिआँड द ड्रीम गर्ल' हे हेमा मालिनी याचं चरित्र लिहिलं आहे. त्यात मुखर्जी यांनी लिहिलं आहे, "1974 मध्ये जितेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या आई-वडिलांनी दोघांचा विवाह करण्याचा निर्णय घेतला होता...अर्थात तोपर्यंत हेमा मालिनी यांच्या आयुष्यात धर्मेंद्र आले होते."

"धर्मेंद्र यांना जेव्हा या लग्नाबद्दल माहित झालं, तेव्हा ते थेट मद्रासला पोहोचले, जिथे हे लग्न होणार होतं. धर्मेंद्र हेमा मालिनीशी एकांतात बोलले आणि मग ते लग्न झालं नाही."

नंतर धर्मेंद्र चित्रपट निर्मातेदेखील झाले. त्यांनी सनी देओल आणि बॉबी देओल या त्यांच्या मुलांना विजेता फिल्म्ज या बॅनरखाली लाँच केलं.

मुलांना जरी चित्रपटांच्या दुनियेत आणलं तरी मुलींना या क्षेत्रात आणण्यासाठी धर्मेंद्र तयार नव्हते. ईशा आणि अहाना या मुलींनी चित्रपटात काम करावं असं त्यांना वाटत नव्हतं.

करियर यशाच्या शिखरावर असताना धर्मेंद्र यांना दारूचं व्यसन जडलं होतं. त्यामुळे त्यांचं बरंच नुकसानदेखील झालं. ते स्वत:देखील हे मान्य करतात.

बी ग्रेड चित्रपटातील धर्मेंद्र

सत्यकाम आणि चुपके-चुपके सारखे अप्रतिम चित्रपट करणाऱ्या धर्मेंद्र यांना 1990 च्या दशकात पापी देवता, वीरू दादा, डाकू भैरव सिंह, महा शक्तिशाली यासारख्या चित्रपटात भूमिका कराव्या लागल्या. त्यांच्या या भूमिका पाहणं हे त्यांच्या अनेक चाहत्यांसाठी वेदनादायी होतं.

लेखक राजीव विजयकर यांनी 'धर्मेंद्र- नॉट जस्ट ए ही मॅन' हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात ते लिहितात, 1990 ते 2003 पर्यंतच्या कालखंडाला धर्मेंद्र यांच्या करियरमधील रेट्रोग्रेड काळ म्हणता येऊ शकतं. 1999 मध्ये कांति शाह यांचा मुन्नीबाई हा चित्रपट आला होता. या चित्रपटापासून धर्मेंद्र पूर्णपणे बी ग्रेड चित्रपटांचा भाग झाले.

याच पुस्तकात राजकुमार संतोषी म्हणतात, "धरमजींचा चाहता म्हणून मी म्हणू शकतो की त्यांचा जो काही नाईलाज असेल, मात्र सी ग्रेड चित्रपट करून त्यांनी त्यांचा करिश्मा पुसट केला आणि त्यांच्या चाहत्यांचा विश्वास मोडला."

"25 वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी जे कमावलं होतं तो प्रतिमेला त्यांनी धक्का पोहोचवला. ही खूप दु:खी करणारी गोष्ट आहे."

ॲक्टिंग मेरी महबूबा, कभी यह रूठ जाती है..

वयानुसार धर्मेंद्र ज्याप्रकारे चित्रपटातून आणखी चमकले असते, ते कमीअधिक प्रमाणात होऊ शकलं नाही..

लंडनमध्ये दिलेल्या मुलाखतीत एकदा धर्मेंद्र मला म्हणाले होते, "ॲक्टिंग माझ्यासाठी प्रेमिका आहे, माझं त्यावर प्रेम आहे. ज्याप्रकारे प्रियकर-प्रेयसीमध्ये भांडण होतं...कधी अभिनय रुसतो, तेव्हा मी त्याचं मन वळवतो, कधी मी रुसतो तेव्हा अभिनय माझं मन वळवतं. मात्र मी त्याला सोडलं नाही."

ही खरी गोष्ट आहे की धर्मेंद्रनं अभिनय कधी सोडला नाही. मधून मधून ते त्यांच्या या प्रेयसीला भेटण्यासाठी जात असत आणि भूमिका चांगली असेल तर त्यात त्यांचं ते जुनं रूप, अंदाज पाहायला देखील मिळायचा.

जॉनी गद्दार या चित्रपटात त्यांच्या गँगचे सदस्य वयस्कर धर्मेंद्र यांच्या क्षमतेवर शंका व्यक्त करतात. त्यावेळेस ते म्हणतात - 'इट्स नॉट द एज, इट्स द मायलेज'. म्हणजेच वयावर जाऊ नका, क्षमता लक्षात घ्या.

लाईफ इन अ मेट्रोमध्ये आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात आपली प्रेयसी नफिसा अलीबरोबर काही क्षण घालवणारा मिस्टर अमोल असो की रानी और रॉकी की प्रेम कहानीमधील स्मरणशक्ती गमावलेला प्रियकर असो.

काही काळासाठीच असेल, त्यांची ती जुनी शान पुन्हा दिसली.

धर्मेंद्र आणि राजकारण

चित्रपटांच्या दुनियेतून त्यांनी राजकारणातदेखील प्रवेश केला. अटल बिहारी वायपेयी यांच्या सांगण्यावरून त्यांनी बिकानेरमधून लोकसभेची निवडणूकदेखील लढवली. खासदार म्हणून ते निवडून आले. मात्र राजकारणात येणं ही मोठी चूक असल्याचं ते मानत असत.

अभिनयाव्यतिरिक्त उर्दू आणि शायरी यांच्यावर धर्मेंद्र यांचं नेहमीच प्रेम होतं.

मी एकदा त्यांना उर्दू भाषेवरील प्रेमाबद्दल विचारलं होतं. त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं होतं की, -"एहसानमंद हूँ ज़बांने उर्दू तेरा तेरी जबां में बयान-ए- ऐहसास-ए-दिल आ गया"

धर्मेंद्र असेच होते, भावनिक, रोमँटिक, कवी मनाचा असलेला एक ॲक्शन स्टार.

प्रसिद्धी आणि स्टारडमबद्दल मी त्यांना एक प्रश्न विचारला असता, त्यांनी उत्तर दिलं होतं, होती है तारीफ़ अहमियत की, इंसानियत की मगर कदर होती है. तरजीह न दे ओहदे को इंसानियत पे, बंदे पर ख़ुदा की तब नज़र होती है..

त्यांच्या अभिनयात एक साधेपणा, एक सौम्यता होती. ती कधी रुपेरी पडद्यावर दिसली, तर कधी ही-मॅनच्या प्रतिमेखाली दबलेली राहिली.

मात्र धर्मेंद्र यांचा हा शोध कधी संपला नाही.

त्यांच्याच एका चित्रपटातील एक संवाद आहे - "कुछ पाने की चाह, कुछ और बेहतर की तलाश ..इसी चक्कर में इंसान अपना सब कुछ खो बैठता है जो उसके पास होता है.तलाश कभी ख़त्म नहीं होती. वक़्त ख़त्म हो जाता है..."

हादेखील योगायोगच आहे की डिसेंबरमध्ये धर्मेंद्र यांचा इक्कीस हा चित्रपट प्रदर्शित होईल तेव्हा या देखण्या, अष्टपैलू अभिनेत्याला त्यांचे चाहते शेवटचं रुपेरी पडद्यावर पाहतील.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)