डिजिटल प्लॅटफॉर्मवर कुणी महिलेशी अश्लील वर्तन करत असेल, त्रास देत असेल तर काय करावे?

प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधीक फोटो
    • Author, स्नेहा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

श्वेताला डान्स करायला फार आवडतं. ती तिच्या डान्सचे छोटे छोटे व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट करते. तिचं म्हणणं आहे, तिला या गोष्टींतून सर्वाधिक आनंद मिळतो.

मात्र एक दिवस तिच्या फोटोसह इंस्टाग्रामवर काहीतरी अश्लील मजकूर लिहिल्याचं पाहून तिला प्रचंड धक्का बसला.

ती पोस्ट काढून टाकण्यासाठी अनेक दिवस लागले. मात्र या घटनेमुळे श्वेता (बदललेलं नाव) पुरती हादरली. तिला आता डिजिटल माध्यमांवर सुरक्षित वाटत नाही.

महिलांना बरोबरीचे अधिकार देण्याच्या दृष्टीने पावले टाकली जात असताना समानता आणि सुरक्षिताही महत्त्वाची मानली जाते. मात्र, डिजिटल हिंसेने या मार्गातील अडचणी वाढवल्या आहेत.

जाणून घेऊया डिजिटल हिंसा म्हणजे काय? आणि त्याविरोधात काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात?

डिजिटल हिंसा म्हणजे काय ?

भारतात डिजिटल क्रांतीमुळे प्रत्येकापर्यंत मोबाईल आणि इंटरनेट पोहोचले आहे. यामुळे नक्कीच लोकांना सशक्त आणि जागरूक बनवलं. मात्र या डिजिटल युगात हिंसेचंही विकृत रूप प्रत्येकापर्यंत पोहोचलं, ज्या हिंसेचा सामना महिलांना वर्षानुवर्षे करावा लागला आहे.

संयुक्त राष्ट्राच्या लोकसंख्या निधी (UNFPA) च्या मते या सगळ्यांचा थेट महिला आणि तरुणींच्या बदनामीशी जोडलं जातं. यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिमाण होतोच, शिवाय त्या मुख्य प्रवाहापासून दूर जातात.

आत्मविश्वास घटल्यामुळे त्यांच्या कामाच्या ठिकाणी, शाळेत किंवा नेतृत्व करण्याच्या ठिकाणी भाग घेण्याच्या मानसिकतेवर परिणाम होतो.

ग्राफिक्स
ग्राफिक्स
  • ऑनलाईन हॅरॅसमेंट, हेट स्पीच, फोटोंसोबत छेडछाड, ब्लॅकमेल, अश्लील मजकूर किंवा फोटो पाठवणे यासह अनेक बाबींचा डिजिटल हिंसेत समावेश होतो.
  • युएनएच्या नियमानुसार एक किंवा अधिक व्यक्तींद्वारे केलेली हिंसा जिची पाळेमुळे लैंगिक भेदभाव आणि लैंगिक असमानतेमध्ये शिरलेली असतात आणि ती वाढविण्यासाठी डिजिटल मीडिया किंवा कम्युनिकेशन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो त्या सर्व बाबींचा यामध्ये समावेश होतो.
  • द इकॉनॉमिस्टच्या इंटेलिजन्स युनिटच्या एका सर्व्हेनुसार जगभरात 85 टक्के महिलांना कोणत्या न कोणत्या स्वरूपात ऑनलाईन हिंसेचा सामना करावा लागतो.
  • भारतात राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या आकडेवारीनुसार महिलांविरोधात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण कोविडनंतर अधिक वाढले आहे. ज्यामध्ये ब्लॅकमेलिंग, बदनामी, फोटोंसोबत छेडछाड करणे, अश्लील साहित्य पाठवणे, बनावट खाते उघडणे आदी बाबींचा समावेश आहे.
प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधीक फोटो

श्वेताच्या प्रकरणात तिचे फोटो अपलोड करणाऱ्याला ती ओळखत नाही. तिने पोस्ट रिपोर्ट केल्यानंतर ते फोटो हटविण्यात आले.

मात्र रिमझिम (बदललेलं नाव) हिची केस वेगळी होती. रिमझिमच्या म्हणण्यानुसार तिच्यासोबत जे घडलं होतं, त्या प्रकरणात जर कुटुंबीयांनी साथ दिली नसती तर ती कायदेशीर लढाई लढू शकली नसती.

कुणीतरी परिचयातीलच व्यक्तीने तिच्या फोटोंसोबत छेडछाड करून सोशल मीडियावर अपलोड करणं सुरू केलं होतं. तिने तो आयडी रिपोर्ट केला असता समोरील व्यक्तीने अनेक आयडी बनवून तिला त्रास देणे तसेच ब्लॅकमेल करणे सुरू केले.

रिमझिम सांगते, "या प्रकरणात समोरच्या व्यक्तीला पूर्ण विश्वास होता की त्याला कोणतीही भीती नाही पण माझ आयुष्य मात्र पूर्णपणे उद्ध्वस्त होईल."

रिमझिम आणि श्वेताला या प्रकरणांमध्ये एक समान गोष्ट होती, ती म्हणजे याचा खोलवर परिणाम त्यांच्या मनावर झाला. यातून बाहेर पडण्यासाठी त्यांचा खूप वेळ गेला.

कायद्यात यासाठी काय तरतुदी आहेत?

बीबीसीने जेव्हा याबाबत व्यवसायाने वकील असणाऱ्या सोनाली कडवासरा यांच्यासोबत चर्चा केली तेव्हा त्याचं म्हणणं होतं, भारतात यासाठी कायदा आहे, मात्र वर्षानुवर्षे चालणारे खटले ही खरी समस्या आहे.

त्यांच्या मते, "डिजिटल हिंसेविरुद्ध लढण्यासाठी भारतात अनेक कायदे आहेत, त्यासाठी सर्वांत आधी या दोन गोष्टी करणं गरजेचं आहे. ते म्हणजे तुम्ही ज्या समाजमध्यमांवर आहात तेथे तुम्हाला त्रास देणारा आयडी तुम्ही ब्लॉक किंवा रिपोर्ट करू शकता."

"हे गुन्हे सायबर गुन्हेगारीमध्ये मोडतात. तुम्ही सायबर गुन्हे रिपोर्टींग पोर्टलवर जाऊन तेथूनही गुन्हा दाखल करू शकता," सोनाली सांगतात.

सोनाली कडवासरांच्या मते, कायद्यात याविरोधात अनेक तरतुदी आहेत, हे नविन नसून आधीपासूनच समाविष्ट आहेत. आयटी अॅक्टनुसार कलम 66, 67, 71 ही सर्व कलमं डिजिटल हिंसेविरोधात संरक्षण देतात.

लाल रेष

याही बातम्या वाचा :

लाल रेष
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

जर एखाद्याने त्याच्या स्वःच्या नावाने आयडी तयार केली आणि त्याद्वारे तो तुमच्यावर नजर ठेवत असेल, तुमच्या फोटोंसोबत छेडछाड करत असले, किंवा अश्लील संदेश पाठवत असेल किंवा महिलांना लज्जा उत्पन्न होईल असे कोणतेही कृत्य केल्यास आयटी अॅक्टनुसार तक्रार केली जाऊ शकते.

अज्ञात व्यक्तीविरोधातही त्याच्या आयडीच्या नावाने तक्रार केली जाऊ शकते.

सोानाली कडवासरा सांगातात, "भारतात या प्रकरणांसाठी कायदा ही समस्या नसून प्रकरण दाखल झाल्यानंतर ती लवकर तडीस नेली जात नाही ही आहे. यासाठी काहीतरी नविन उपाययोजना आणणं गरजेचं आहे.

सध्याच्या काळात आपली ओळख लपवून एखादी फेक आयडी तयार करून दुसऱ्या व्यक्तीला त्रास देणं खूपच सोपं झालं आहे. विनाओळख आयडी तयार करण्याची प्रक्रिया थोडीशी अवघड करायला हवी. जेणेकरून संबंधीत व्यक्तीपर्यंत लवकरच पोहोचता येईल.

पोलिसांनीही अशा प्रकरणांत अधिकाधिक संवेदनशीलता दाखवायला हवी. फक्त बलात्कार आणि खून अशाच प्रकरणांत त्यांचे डोळे उघडतात. खरंतर लहान ठिणगीलाही तेवढंच गंभीरपणे घेतलं गेलं पाहिजे. लहान लहान गोष्टीच मोठ्या गुन्हेगारीचं रूप घेतात.

मानसिक आरोग्यावरही होतो परिणाम -

रिमझिम सांगते, "मी तासनतास रडत असे, कायम विचार करायची की ज्यांनी त्या पोस्ट पाहिल्या असतील ते माझ्याबाबत काय विचार करत असतील. मी सतत याच चिंतेत असायचे की या ब्लॅकमेलिंगमधून बाहेर पडण्याचा मार्ग मला मिळेल का? मला सगळीकडे केवळ अंधार दिसायचा."

"मला पोलिसांकडे जाण्याचीही भीती वाटायची. कारण तक्रार करून एका दिवसात हे संपणार नव्हतं. मी अभ्यास करू, नोकरीचा विचार करू की माझं लग्न ठरत होतं त्याकडे लक्ष देऊ, मला काहीच सुचत नव्हतं," रिमझिम सांगते.

रिमझिमने एक दिवस धाडस एकवटून कुटुंबीयांना सर्व परिस्थिती सांगितली. त्यांच्या सल्ल्यानुसार ती पोलिसांत गेली. मात्र, या सगळ्या घडामोडींदरम्यान ती मानसिक तणावात गुरफटत गेली.

सुरूवातीला तिला वाटलं हे प्रकरण फारफार तर वर्षभर चालेल. मात्र अनेक वर्षे हे सुरूच राहीलं आणि तिची मन:स्थिती ढासाळत गेली.

ग्राफिक्स

फोटो स्रोत, Getty Images

क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट डॉ. पूजाशिवम जेटली सांगतात, "पितृसत्ताक व्यवस्थेचे परिणाम जसे बाहेर दिसतात, तेच ऑनलाईन स्पेसमधेही पहायला मिळतं. ऑनलाईन स्पेसमध्ये लोकांना असं वाटतं की ते काहीही बोलू शकतात आणि कुणाला कसाही त्रास देऊ शकतात.

"जर एखादी महिला आपल्या कामाबाबतही समाजमाध्यमांवर बोलत असेल तरीही तिच्यावर लैंगिक शेरेबाजी, शारीरिक व्यंगावरून टीका केली जाते. किशोरवयीन तरुणींसोबत हा प्रकार जास्त घडताना दिसतो," पूजाशिवम सांगतात.

पूजाशिवम जेटली सांगतात, "अशा प्रकरणात मदत मागण्यासाठी माझ्याकडे बहुतांश किशोरवयीन तरुणी येतात. त्यांच्यासाठी डिजिटल विश्व एक असं जग असतं जेथे त्या आपला बराच वेळ व्यतित करत असतात.

जर त्यांना तिथे 'हरॅसमेंट', 'बुलिंग' अशा समस्यांचा सामना करावा लागला तर गोंधळून जातात. अशा स्थितीत कुणाकडे मदत मागावी आणि काय करावे असे प्रश्न त्यांना पडतात. शिवाय येथून बाहेर पडावे तर आपले मित्र, आपले गृप यातूनही आपण बाहेर फेकले जाऊ अशी भीती त्यांना सतावते."

या सगळ्यांशी कसं लढायचं ?

पूजाशिवम जेटली सांगतात, ब्लॉक करणे, इग्नोर करणे हा एक चांगला उपाय आहे.

एक पर्याय असाही असतो, की तुम्ही आपत्तीजनक कमेंट्स शेअर कराव्या त्यामुळे तुम्हाला तुमच्या पाठीराख्या गटाचा पाठिंबा मिळतो.

काही वेळा काही लोकांना डिजिटल माध्यमांवर खूपच अडचणींचा सामना करावा लागतो. अशावेळी काही काळासाठी सर्व बंद करून ठेवणे हा एक उपाय आहे, जेणेकरून मानसिक शांतता लाभेल.

अशाच गोष्टी शेअर कराव्यात ज्यात तुम्ही कम्फर्टेबल आहात.

प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधीक फोटो

स्वत:चे अकाऊंट प्रायव्हेट ठेवणे हाही एक उपाय आहे.

डिजिटल माध्यमांचा शक्य तेवढा कमी वापर करणे.

काही गोष्टी जर आपल्यासाठी कायम त्रासदायक ठरत असतील तर तशा तेथून बाहेर पडणं हाच योग्य मार्ग आहे. आपण एखादी नकारात्मक गोष्ट वारंवार पाहत असू तर त्याचा नकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होतो.

महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकरणात तज्ज्ञांची मदत जरूर घ्यावी.

( या बातमीतील पीडित व्यक्तींची नावे बदलण्यात आली आहेत.)

( बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)