'रांचीला जाईन, बाईक्सवर फिरेन, माझ्याकडे खूप वेळ' निवृत्तीच्या प्रश्नावर महेंद्रसिंग धोनी काय म्हणाला?

    • Author, मनोज चतुर्वेदी
    • Role, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या शेवटच्या टप्प्यात तळाशी असणाऱ्या संघांनी एकामागून एक धक्कादायक विजय मिळवण्याची मालिका सुरूच ठेवली आहे.

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्सने यंदा निराशाजनक कामगिरी केली.

गुणतालिकेच्या सगळ्यात शेवटच्या स्थानी राहिलेल्या या संघाला स्पर्धेच्या शेवटच्या सामन्यात मिळालेला विजय नक्कीच सुखावून गेला असेल.

सीएसकेने पहिल्या क्रमांकावर असलेल्या गुजरात टायटन्सचा 83 धावांनी पराभव केला आणि टायटन्सच्या टॉप-2 मध्ये राहण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का पोहोचवला.

चेन्नईचा हा शेवटचा सामन होता. त्यामुळं धोनीच्या चाहत्यांसाठी या पर्वात त्याला पाहण्याची शेवटची संधी होती. तसंच गेल्या काही पर्वांपासून पडत असलेला प्रश्न यावेळीही चाहत्यांच्या मनात होता.

तो प्रश्न म्हणजे, धोनी पुढच्या वर्षी खेळणार की नाही?

निवृत्तीबाबत धोनी काय म्हणाला?

मागील काही वर्षांपासून ज्या ज्या आयपीएल स्पर्धांमध्ये धोनी सहभागी होतो, ती स्पर्धा त्याची शेवटची असल्याची चर्चा होत असते. ही आयपीएल देखील त्याला अपवाद ठरली नाही.

सामन्यानंतर बोलताना धोनी म्हणाला, "मी आता निवृत्तीचीही घोषणा करणार नाही आणि असंही म्हणणार नाही की मी पुढच्या वर्षी नक्की खेळणार आहे."

तो म्हणाला की, "माझ्याकडे हा निर्णय घेण्यासाठी अजून चार ते पाच महिन्यांचा वेळ आहे. तुम्हाला नेहमीच सर्वोत्तम परिस्थितीत रहावं लागतं. मैदानातल्या आकड्यांमुळे खेळाडू निवृत्त होऊ लागले तर अनेकांना 22 व्या वर्षी निवृत्त व्हावं लागेल."

धोनी म्हणाला, "आता मी रांचीला जाईन, तिथे माझ्या बाईक्सवर फिरेन. माझ्याकडे भरपूर वेळ आहे आणि मग मी विचार करून निर्णय घेईन."

या सामन्यातली चेन्नईची कामगिरी उत्तम होती असं धोनीने सांगितलं. धोनी म्हणाला, "या हंगामात आम्ही चांगली फिल्डिंग करू शकलो नाही. पण, या सामन्यात चांगले झेल पकडले. आता ऋतुराज परत येईल तेव्हा त्याला जास्त गोष्टींची काळजी करण्याची गरज नसेल."

धोनीचं पुढे काय होऊ शकतं?

या सामन्याआधी अनेकांनी असे अंदाज लावले होते की, हा धोनीचा नेतृत्वातला चेन्नईचा शेवटचा सामना असेल. धोनी पुढच्या वर्षी जरी खेळला तरी नवीन कर्णधार असेल, यावर्षी ऋतुराज गायकवाड जखमी झाल्यामुळे धोनीला संघाचं नेतृत्व करावं लागलं होतं.

धोनी ज्या मैदानावर खेळायला उतरतो ते मैदान पिवळ्या रंगाची जर्सी घातलेल्या लोकांमुळे धोनीमय होऊन जातं. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर देखील हेच दिसून आलं.

चेन्नईच्या संघाला यावर्षी अपेक्षेनुसार कामगिरी करता आली नाही. मात्र तरीही शेवटच्या सामन्यात धोनी अतिशय शांत राहून संघाचं नेतृत्व करत होता.

त्याच्या जुन्या सवयीनुसार तो केवळ इशारे करून फिल्डर्सना मैदानावर तैनात करत होता.

अनेकदा धोनी ज्यासाठी ओळखला जातो त्या मजेशीर टिप्पण्या देखील स्टम्प माईकमध्ये ऐकू येत होत्या.

चेन्नईच्या संघातील नवीन खेळाडूंची चमकदार कामगिरी

चेन्नईच्या संघातील काही खेळाडू जखमी झाल्यानंतर त्यांच्याजागी निवड झालेल्या काही तरुण खेळाडूंनी हे दाखवून दिलं की त्यांच्यावर विश्वास टाकला तर संघाचं नशीब बदलू शकतं.

मुंबईकर आयुष म्हात्रेमुळे चेन्नईच्या फलंदाजीत जीव ओतला गेला. नंतर उर्वील पटेल आणि डेवाल्ड ब्रेव्हिस यांनी चेन्नईचं रुपडंच बदलून टाकलं. गुजरात टायटन्सवर मिळवलेल्या विजयातही या तिघांची भूमिका महत्त्वाची ठरली.

चेन्नईला कधीच आक्रमक खेळासाठी ओळखलं जात नाही. पण हळूहळू या संघात आधुनिक पद्धतीचा आक्रमक खेळ रुजू लागला आहे.

डेवाल्ड ब्रेव्हिस हुकमी एक्का ठरू शकतो

दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेव्हिसला 'बेबी एबी' म्हणजेच 'बेबी डिव्हिलियर्स' म्हटलं जातं. पण या सामन्यात त्याने केलेली फलंदाजी बघून नवज्योत सिंग सिद्धू म्हणाला की आता त्याला 'बेबी' म्हणणं गरजेचं नाही त्याचा उल्लेख करण्यासाठी 'ब्रेव्हिस'च पुरेसं आहे.

गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात डेवाल्ड ब्रेव्हिसने 23 बॉलमध्ये 57 धावा काढून संघाची धावसंख्या 200च्या पुढे नेण्यात मदत केली. डेवाल्ड ब्रेव्हिस या सामन्याचा सामनावीर ठरला.

काही सामन्यांमध्ये का होईना पण त्याने केलेल्या फलंदाजीमुळे चेन्नईच्या भविष्यात त्याचा महत्त्वाचा वाट असेल हे स्पष्ट झालं आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.