अजित पवारांना जागा सोडावी लागेल म्हणून भाजपचे नेते शरद पवारांकडे जात आहेत का?

    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

कोल्हापूरच्या कागलमध्ये हसन मुश्रिफ आणि समरजित घाटगेंमधला कलगीतुरा नवा नव्हता. कागलच्याच नव्हे तर कोल्हापूरच्या राजकारणात मुरलेल्या मुश्रिफांना आव्हान द्यायला घाटगेंनी गेल्या काही वर्षांपासूनच सुरुवात केली होती. त्यासाठी ते भाजपाकडे गेले होते आणि भाजपानंही त्यांना तयार केलं होतं.

घाटगे काहीही झालं तरी मुश्रिफांविरुद्ध निवडणूक लढवणार हे निश्चितच होतं.

पण अजित पवार भाजपासोबत 'महायुती'त गेले आणि त्यांच्यासोबत हसन मुश्रिफही गेले. तिथं कागलचं गणित बिघडलं. 'महायुती'त ज्या जागा तीनही पक्षांनी गेल्या निवडणुकीत ज्या जागा जिंकल्या होत्या, त्या जागा त्या पक्षांकडेच राहतील हे स्पष्ट होतं. म्हणजे कागलची जागा मुश्रिफांचीच. आता प्रश्न घाटगेंच्या राजकीय कारकीर्दीचाच होता.

हेच शरद पवारांनी हेरलं. त्यांनी घाटगेंना आपल्याकडे बोलावलं आणि घाटगेंनीही ही संधी घेतली. देवेंद्र फडणवीस आणि भाजपापासून लांब जाऊन त्यांनी 'तुतारी' हाती धरली. आता कागलची लढाई सलग पाच वेळा जिंकलेल्या मुश्रिफांसाठीही चुरशीची झाली आहे.

कागल हे केवळ एक उदाहरण आहे. अशी गणितं आता अनेक मतदारसंघांमध्ये घडताहेत आणि बिघडताहेत. महाविकास आघाडी प्रत्यक्षात आल्याला पाच वर्षं होत आली आहेत. त्यांनी एकत्र काही पोटनिवडणुका पण लढल्या. कोणत्या जागा कोणाकडे याचा अंदाज येण्याचा वेळही त्यांना मिळाला.

पण त्या तुलनेत नव्यानंच तयार झालेली महायुती, गणितं स्थिर न झाल्यानं आणि प्रत्येक मतदारसंघांत आकांक्षांच्या लढाया जोरदार असल्यानं, कोणकोणाचं समाधान करायचं या प्रश्नात अडकलेली दिसते आहे.

हेच लोकसभा निवडणुकीच्या वेळेसही घडलं होतं आणि मुंबई, नाशिक, सातारा अशा महत्त्वाच्या जागांचे उमेदवार जाहीर शेवटच्या क्षणापर्यंत जाहीर होणं लांबलं होतं. त्याचा परिणाम काही जागा हातून जाण्यात झाला होता.

याच संदिग्धतेचा फायदा महाविकास आघाडी, मुख्यत: शरद पवार घेतांना दिसत आहेत. पवारांचं महाराष्ट्राभर फिरणं चालू आहे आणि जिथं संधी दिसते आहे तिथं विरोधी गटातला तगडे उमेदवार, ज्यांना आपल्या उमेदवारीचीच शंका आहे, त्यांना आपल्या गळाला लावण्याचे प्रयत्न चालू आहे.

समरजित घाटगे हे एकटेच नाहीत. अजून बरीच नावं, विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातली, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या जवळ गेली आहेत.

पश्चिम महाराष्ट्राचा गड

शरद पवारांच्या राजकारणाविषयी बोलतांना कायम पश्चिम महाराष्ट्राचा उल्लेख काही राजकीय निरीक्षक बलस्थान म्हणून करतात कारण या पट्ट्यातनं त्याचे बहुतांश उमेदवार सतत निवडून येत राहिले.

काही निरीक्षक ती त्यांची मर्यादाही मानतात, कारण इथल्यापेक्षा उर्वरित महाराष्ट्रातनं त्यांच्या पक्षाला सातत्यानं यश मिळालं नाही. पण पश्चिम महाराष्ट्र त्यांचा गड राहिला आहे असा इतिहास आहे.

2014 साली केंद्र आणि राज्यातून पवारांचा पक्ष बाहेर गेल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातले त्यांचे बरेच सहकारी त्यांना सोडून भाजपाकडे गेले.

पण दशकभरानं 2024 मध्ये राजकीय वारं बदलू लागल्यानंतर त्यांचे काही सहकारी परतू लागले आहेत. उदाहरणार्थ, अकलूजचे मोहिते पाटील. विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील परत आले.

धैर्यशील यांना माढा लोकसभा लढायची होती. पण तिथे रणजितसिंह निंबाळकर भाजपाचे खासदार होते. मोहिते भाजपात असूनही लढू शकणार नव्हते. त्यामुळे पवारांनी संधी देताच ते परत आले आणि माढ्याची निवडणूक जिंकून खासदार झाले.

असेच प्रयोग शरद पवार विधानसभेतही करत आहेत असं दिसतं आहे. जे भाजपात आहेत, पण त्या मतदारसंघात मित्रपक्षाचा आजी आमदार आहे आणि त्यामुळे उमेदवारी मिळणं कठीण आहे, अशा उमेदवारांमध्ये चलबिचल आहे. त्यातले काही उमेदवार पवार हेरत आहेत असं चित्र आहे.

त्यातलं एक नाव हर्षवर्धन पाटील यांचं. ते शरद पवारांच्या संपर्कात असल्याची चर्चा होतीच. त्यातच मध्ये त्यांनी पुण्यात पवारांची भेट घेतल्यावर त्याला बळकटी आली. हर्षवर्धन इंदापूरमधून अनेकदा निवडून आले.

काँग्रेसमध्ये असतांना अगदी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतही त्यांचं कायम नाव असायचं. पण गेल्या दोन निवडणुकांमध्ये त्यांना सातत्यानं अपयश आलं.

2019 च्या निवडणुकीअगोदर ते भाजपात गेले होते. यंदाही रिंगणात उरतण्याची त्यांची इच्छा आहेच. पण आता अजित पवार भाजपचे मित्र आहेत आणि त्यांचे आमदार असणारे दत्ता भरणे इंदापूरचे महायुतीचे उमेदवार असणार हे निश्चित आहे.

त्यामुळे हर्षवर्धन यांना शरद पवारांचा पर्याय आहे. अर्थात पवार आणि पाटील या दोघांनीही निर्णय अद्याप जाहीर केला नसला तरीही पश्चिम महाराष्ट्रातली ही मोठी घडामोड ठरू शकते.

अर्थात केवळ भाजपाचेच लोक पवार हेरत आहेत असं नाही. जिथून गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार निवडून आले होते आणि आता ते अजित पवारांसोबत गेले आहेत, त्या मतदारसंघात तुल्यबळ उमेदवार शोधण्याचे प्रयत्न त्यांचाकडून चालू आहेत. त्यासाठी कधी आपल्या विरोधात असलेल्यांशीही त्यांच्या पक्षानं बोलणी सुरू केली आहेत.

त्यातले एक नाव, ज्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे, ते म्हणजे वाईच्या मदन भोसलेंचं. हे काँग्रेसचं घराणं. वडील प्रतापराव भोसले पवार विरोधक म्हणून ओळखले जायचे. मदन भोसले 2004 साली वाईचे आमदारही राहिले आहेत. मात्र राष्ट्रवादीच्या मकरंद पाटील यांचं राजकारण तिथे मोठं झालं.

मग 2019 मध्ये भोसले भाजपात गेले. हा मतदारसंघ विद्यमान आमदार म्हणून अजित पवारांकडेच जाण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे आता पाटील यांच्याविरुद्ध भोसलेंना आपल्या पक्षाकडून उमेदवारी देण्याचे शरद पवार यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भोसलेंसोबत दीर्घ बैठकही नुकतीच झाली.

राजकीय पत्रकार सुधीर सूर्यवंशी म्हणतात, "शरद पवारांच्या राजकारणाचं गमक म्हणजे ते आपलं होम ग्राउंड अगोदर पक्कं करतात. त्यासाठीच पश्चिम महाराष्ट्रात ते सध्या उमेदवार हेरत आहेत. लोकसभेलाही जर आपण पाहिलं अगोदर बारामतीत त्यांनी विजय मिळेल अशी बांधणी केली. मग पश्चिम महाराष्ट्र आणि नंतर इतर महाराष्ट्र असे ते फिरले. आताही तसंच दिसतं आहे.'

"दुसरं म्हणजे, नवे नेते तयार करण्याची ताकद पवारांमध्ये आहे. हे वारंवार सिद्ध झालं आहे. अलीकडेच त्यांनी म्हटलंही होतं की नवी पिढी या निवडणुकीत ते तयार करणार आहेत. ते सध्या त्यांच्या पक्षाच्या तिसऱ्या पिढीची बांधणी करत आहेत. त्याचे निकष म्हणजे त्या उमेदवाराची त्याच्या मतदारसंघात ताकद असेल आणि त्यात पवारांची स्वत:ची ताकद, म्हणजे जिंकण्याची शक्यता वाढते," सूर्यवंशी पुढे म्हणतात.

भाजपासाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षापेक्षा अजित पवारांचा पक्ष अधिक डोकेदुखी?

106 आमदारांसह भाजपा सध्या विधानसभेत सर्वांत मोठा पक्ष आहे. शिवाय सगळ्या 288 मतदारसंघांमध्ये सक्षम उमेदवार देण्याची त्यांची ताकद आणि संघटन आहे. पण महायुतीत आपल्या मित्रपक्षांसाठी जागा सोडतांना भाजपाला अडचण येते आहे हे स्पष्ट दिसतं आहे.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा त्रास तुलनेनं कमी आहे. कारण शिवसेनेसोबत भाजपाची युती पहिल्यापासून होती आणि जिथून शिंदेंचे आमदार निवडून आले आहेत, त्या जागा पूर्वीच युतीमध्ये त्यांना सोडण्यात आल्या आहेत. मात्र अजित पवारांच्या गटाला 'महायुती'त घेतल्यावर मात्र स्वपक्षाच्याच अनेक उमेदवारांची संधी धोक्यात आहे.

विद्यमान आमदारांच्या पक्षाला ती जागा सोडायची असं सूत्र असल्यानं, राष्ट्रवादीच्या आमदारांच्या मतदारसंघांमध्ये वर्षानुवर्षं तयारी करणाऱ्या भाजपाच्या नेत्यांना त्यांच्या आकांक्षांना मुरड घालावी लागणार आहे.

परिणामी या नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. या अस्वस्थतेत महाविकास आघाडी, त्यातही शरद पवारांचा पक्ष, संधी शोधतो आहे आणि जिंकण्याची ताकद असणाऱ्या उमेदवारांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करतो आहे.

अहमदनगरच्या कोपरगांव मतदारसंघात असा प्रयत्न पहायला मिळू शकतो. इथून राष्ट्रवादीचे आशुतोष काळे सध्या आमदार आहेत जे अजित पवारांसोबत गेले आहेत. काळेंनी भाजपाच्या नेत्या स्नेहलता कोल्हेंचा 2019 मध्ये पराभव केला होता.

आता त्यांचा मुलगा आणि भाजपा नेते विवेक कोल्हे हे सध्या शरद पवारांच्या संपर्कात आहेत. काही दिवसांपूर्वी पवारांसोबत त्यांनी गाडीतून केलेला प्रवास चर्चेचा विषय ठरला होता.

जर कोल्हेंना शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं कोपरगांवमधनं तिकिट देऊ केलं आणि त्यांनी ती उमेदवारी स्वीकारली, तर भाजपाचा अजून एक नेता पवारांच्या गळाला लागू शकतो.

असे अनेक मतदारसंघ आहेत, जे महायुतीत अजित पवारांकडे जाणार असल्यानं राजकीय भवितव्यासाठी तिथल्या भाजपाच्या नेत्यांमध्ये चलबिचल चालू आहे. तिथं भाजपा आणि राष्ट्रवादी समोरासमोर उभे आहेत.

पुणे शहरातल्या वडगाव शेरी मतदारसंघातून सुनील टिंगरे आमदार आहेत. पण तिथून पूर्वी आमदार राहिलेले भाजपाचे नेते जगदीश मुळीकही इछुक आहेत.

अंमळनेरमध्ये अजित पवार गटाचे अनिल पाटील आमदार आहेत. उत्तर महाराष्ट्रात भाजपाची मोठी ताकत आहे आणि या मतदारसंघात पक्षाचे शिरीश चौधरी इच्छुक आहेत.

मावळमध्ये असा संघर्ष पहायला मिळू शकतो. सुनील शेळके आमदार आहेत, पण माजी मंत्री असलेले भाजपाचे बाळा भेगडे पुन्हा आमदारकीच्या शर्यतीत उतरण्याच्या तयारीत आहेत.

"आघाड्यांच्या राजकारणात कायम हा प्रश्न येतोच. आघाडीत उद्धव ठाकरे आणि युतीत अजित पवार नवीन आहेत. त्यामुळे त्या दोघांच्या वाट्याला ज्या जागा जातील, त्या दोन मूळ पक्षांच्या जागांमधून कमी होतील. जेव्हा अशी स्थिती येते तेव्हा जागा धोक्यात आलेले प्रस्थापित पर्याय शोधू लागतात. ज्या जागा महाविकास आघाडीत शरद पवारांकडे आहेत तिकडचे लोक त्यांच्याकडे जातील. ज्यांना आघाडीत जागा मिळणार नाही, ते युतीत जागा शोधतील. तुम्हाला आठवत असेल की अब्दुल सत्तार कॉंग्रेसमध्ये होते, पण तिकडून ते शिवसेनेकडे आले होते," राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सांगतात.

"पण जरी एका पक्षातून उमेदवारीसाठी दुसऱ्या पक्षात गेले तरीही जागा कमी पडतात. यंदा तर दोन आघाड्यांमध्ये प्रत्येकी तीन पक्ष आहेत. त्यामुळे मतदारसंघांमध्ये बंडखोरी निश्चित मोठी होणार आहे. 1995 साली सर्वाधिक म्हणजे 45 अपक्ष निवडून आले होते. मला वाटतं यंदाच्या निवडणुकीत ते रेकॉर्ड तुटेल," देशपांडे पुढे म्हणतात.

त्यामुळे निवडणुका येईपर्यंतचे दिवस आता रोज नव्या हालचालींचे असतील. अनेक जण अजूनही जागावाटपाच्या चर्चांकडे लक्ष ठेवून आहेत.

जसजशी ती बोलणी पूर्ण होतील आणि निर्णय होतील, आघाडी आणि युती दोघांदरम्यान मोठी हालचाल अपेक्षित आहे. दोघे एकमेकांचे सक्षम उमेदवार आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतील.

( बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)