आयपीएस, रॉ ते एटीएस; मालेगाव स्फोटाचा तपास करणाऱ्या हेमंत करकरेंची अशी होती कारकीर्द

फोटो स्रोत, PTI
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठीसाठी
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात NIA विशेष न्यायालयानं सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
या प्रकरणाच्या तपासाचं नेतृत्व आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांनी केलं होतं. हेमंत करकरे हे त्यावेळी राज्य दहशतवादविरोधी पथकाचे (ATS) प्रमुख होते.
मात्र, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास सुरू असतानाच, 2008 साली मुंबईवरील झालेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांविरोधात लढताना हेमंत करकरे शहीद झाले.
मालेगाव स्फोट प्रकरणाच्या तपासात हेमंत करकरे यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. अर्थात्, एटीएसने केलेल्या अटकेला राजकीय रंग मिळाल्यानंतर एटीएसवर अनेक आरोपही झाले. मात्र, एटीएसने तपास सुरू ठेवला.
कडक शिस्तीचे, तपासात निष्णात आणि नेमकंच मुद्द्याचं बोलणारे अशी महाराष्ट्र पोलीस दलात हेमंत करकरे यांची ओळख होती.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर, याच प्रकरणाचे तपास अधिकारी म्हणून काम केलेल्या हेमंत करकरेंचं नावही पुन्हा चर्चेत आलं आहे. आपण या बातमीतून करकरेंच्या कारकीर्दीचा थोडक्यात आढावा घेऊया.
मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास
मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास एटीएस प्रमुख म्हणून हेमंत करकरेंच्या नेतृत्वाखाली सुरू झाला.
स्फोटासाठी वापरण्यात आलेल्या बाईकपासून एटीएसने तपास सुरू केला आणि ऑक्टोबर 2008 मध्ये साध्वी प्रज्ञा ठाकूरला एटीएसने अटक केली. त्यानंतर नोव्हेंबरच्या सुमारास या प्रकरणी ले. कर्नल प्रसाद पुरोहित आणि त्यानंतर इतर आरोपींना एटीएसने अटक केली.
मालेगाव स्फोटानंतरच्या तपासाचं पत्रकार म्हणून वृत्तांकन केल्यानं तेव्हाच्या काही गोष्टी मला अजूनही आठवतात.
एटीएस प्रमुख असताना हेमंत करकरे चौकशीबाबत फारसं बोलत नसत.
पत्रकारांनी विचारल्यानंतर करकरे एवढचं सांगत असत की, "हा तपास कायद्याने सुरू आहे. प्रत्येक पाऊल कायद्याच्या चौकटीतूनच उचलण्यात आलंय. पुरावा आणि त्याची पडताळणी झाल्यानंतरच पुढचं पाऊल उचलण्यात आलं आहे."

फोटो स्रोत, Getty Images
एकीकडे चौकशी सुरू होती आणि दुसऱ्या बाजूला हे प्रकरण राजकीय वळण घेत होतं. देशात आणि राज्यात काँग्रेसचं सरकार होतं.
भारतीय जनता पक्ष तेव्हा विरोधी पक्षात होतं. त्यामुळे याला राजकीय रंग मिळणं स्वाभाविक होतं. भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी ही 'राजकीय कॉन्स्पिरसी' असल्याचा आरोप केला.
तेव्हा देशात 'भगवा दहशतवाद' या शब्दांवरून वाद सुरू झाला होता.
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी एटीएस अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली होती.
मालेगाव प्रकरणाच्या राजकीय वादामुळे हेमंत करकरे खूप प्रेशरमध्ये होते. त्यावेळी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होते, "या प्रकरणाला राजकीय रंग का मिळाला माहिती नाही. खूप प्रेशर आहे आणि या राजकीय वादापासून दूर कसं व्हायचं याचा मी विचार करतोय."

फोटो स्रोत, Getty Images
मालेगाव स्फोट प्रकरणात अगदी चौकशीच्या सुरूवातीपासून ते आरोपींच्या अटकेपर्यंत हेमंत करकरे यांनी तपासाचं नेतृत्व केलं.
"आरोपींची चौकशी, पुरावे गोळा करण्याचं काम अशा प्रत्येक गोष्टीकडे बारीक आणि गांभीर्याने लक्ष दिलं," असं त्यावेळी त्यांच्यासोबत एटीएसमध्ये काम केलेले अधिकारी नाव न घेण्याच्या अटीवर सांगतात.
बरीच वर्षे गुन्हेगारी विश्वातील घडामोडींचं वृत्तांकन केलेले वरिष्ठ पत्रकार आणि लेखक जितेंद्र दीक्षित सांगतात, "मालेगाव प्रकरणी हिंदू संघटनांचा हात आहे, असं घोषित करून हेमंत करकरेंनी मोठा धोका पत्करला होता. त्यांना या प्रकरणाचे राजकीय पडसाद उमटतील याची जाणीव होती. तरीदेखील त्यांनी तपास केला आणि आरोपींना अटक केली."
अटकेत असलेल्या आरोपींकडून हेमंत करकरे आणि एटीएसच्या टीमवर त्यावेळी अनेक आरोप करण्यात येत होते.
2008 साली 'आजतक' वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हेमंत करकरेंना याबाबत विचारण्यात आलं, ते म्हणाले, "त्यांचे आरोप आम्ही गांभीर्याने घेतोय. याबाबत कोर्टात योग्य उत्तर दिलं जाईल."
"ज्या आरोपींविरोधात आम्हाला पुरावे मिळाले. त्यांना आम्ही अटक केलीये. ते कोणत्या संघटनेशी संबंधित आहेत याची चौकशी आम्ही केली नाही आणि याची गरजही नाही. आम्ही अटकेची कारवाई पुराव्यांच्या आधारे केली आहे."
मालेगावची चौकशी सुरू असतानाच 2008 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात हेमंत करकरे शहीद झाले. त्यांनी घातलेल्या बूलेटप्रूफ जॅकेटवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. त्यानंतर तत्कालीन काँग्रेस सरकारने बूलेटप्रूफ जॅकेट AK-47 साठी योग्य नव्हतं, असं मान्य केलं.
करकरेंच्या मृत्यूनंतर 2009 मध्ये त्यांच्या पत्नी कविता करकरेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं की, "माझे पती पोलीस दलाची नोकरी सोडण्याचा विचार करत होते."
हेमंत करकरेंची पोलीस कारकिर्द
हेमंत करकरे 1982 च्या भारतीय पोलीस दलातील म्हणजेच IPS अधिकारी होते. वयाच्या 26 व्या वर्षी त्यांची भारतीय पोलीस दलात नियुक्ती झाली आणि ते महाराष्ट्रात सेवेसाठी दाखल झाले.
महाराष्ट्र पोलीस दलात हेमंत करकरेंची ओळख कडक शिस्तीचे, तपासकामात अत्यंत शार्प, संयमी, आणि शांत अशी होती.
हेमंत करकरे यांच्यासोबत काम केलेले आणि सध्या पोलीस सेवेत असलेले IPS अधिकारी सांगतात, "हेमंत करकरेंनी कधीच शिस्तीच्या बाबतीत तजडोड केली नाही. ते ज्युनिअर अधिकाऱ्यांचं म्हणणं नेहमी ऐकून घ्यायचे. आम्हाला त्यांच्यासोबत बोलण्यात किंवा आमचं म्हणणं मांडण्यात कधीच दडपण वाटलं नाही."
महाराष्ट्र पोलीस दलात हेमंत करकरे यांनी विविध ठिकाणी काम केलं.
1990-1991 च्या सुमारास ते चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक होते. चंद्रपूरमध्ये त्यांच्या नेतृत्वात 23 महिन्यात 22 नक्षलींना अटक करण्यात आली होती.
त्यांनी मुंबई क्राइम ब्रांच आणि अँटी-नार्कोटिक विभागातही काम केलं होतं.
तसंच, हेमंत करकरेंनी रिसर्च अँड अनॅलिसिस विंग अर्थात 'रॉ' या भारताच्या गुप्तचर विभागात 7 वर्षे काम केलं होतं. ते व्हिएना, ऑस्ट्रियामध्ये काउंसिलर होते.

फोटो स्रोत, The Write Place
महाराष्ट्रात परत आल्यानंतर काही महिने ते मुंबई पोलिसांच्या प्रशासन विभागाचे सहपोलीस आयुक्त होते. त्यानंतर जानेवारी 2008 मध्ये त्यांची दहशतवादविरोधी पथकाच्या म्हणजेच ATS च्या प्रमुखपदी नियुक्ती झाली. त्यावेळी एटीएस प्रमुख हे पद काटेरी मुकुटासारखं होतं.
करकरे एटीएसमध्ये असताना त्यांच्यासोबत काम केलेले एक अधिकारी नाव न प्रसिद्ध करण्याचा अटीवर सांगतात की, "करकरेंनी पदभार स्वीकारल्यानंतर एटीएसच्या रडारवर कोण-कोण आहे, याची माहिती घेतली आणि त्यांच्याकडे असलेली काही नावं त्या यादीमध्ये समाविष्ट करण्यास सांगितली."
त्यांच्या माहितीचा खूप फायदा झाला, असंही हे अधिकारी सांगतात.
पत्रकार जितेंद्र दीक्षित यांनी करकरेंचं काम जवळून पाहिलंय. ते म्हणतात, "हेमंत करकरे स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी म्हणून प्रसिद्ध होते. त्याचं पोलीस दलात इंटेग्रिटीसाठी नाव होतं. ते फार कमी बोलायचे आणि एक जंटलमन अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती."
हेमंत करकरेंना पोलीस सेवेत तीन गोल्ड मेडल मिळाले आहेत. तर चांगल्या पोलीस सेवेसाठी राष्ट्रपती पदक देऊनही त्यांचा सन्मान करण्यात आला होता.
2008 साली मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांविरोधात त्यांनी जीवाची बाजी लावली. अखेरीस याच हल्ल्यात ते शहीद झाले. पुढे त्यांना मरणोत्तर 'अशोकचक्र' देण्यात आलं.
करकरेंनी दिलेली टीप आणि विमान अपहरण प्रकरणाचा छडा
IC-814 विमान अपहरण प्रकरणाचा छडा लावण्यातही हेमंत करकरे यांनी दिलेल्या टीपची मोठी मदत झाली होती. करकरे तेव्हा केंद्रीय गुप्तचर यंत्रणेत सेवेत होते. ज्यांच्याकडे करकरेंनी ही माहिती दिली, त्या मुंबई क्राईम ब्रांचचे तत्कालीन प्रमुख डी. शिवानंदन यांनीच बीबीसी मराठीला हे सांगितलं.
IC-814 विमान अपहरण प्रकरणात अब्दुल लतिफला भेंडी बाजारातून अटक करण्यात हेमंत करकरे यांनी दिलेल्या माहितीचा मोठा उपयोग झाल्याचं मुंबईचे माजी पोलीस आयुक्त डी. शिवानंदन यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.
डी. शिवानंदन यांनी याबाबत बीबीसी मराठीला सांगितलं, "त्यावेळी हेमंत करकरे गुप्तचर यंत्रणेत कार्यरत होते. त्यांना काही नंबर संशयास्पद आढळले. त्यांनी ते क्राईम ब्रांचचा हेड म्हणून माझ्याकडे दिले होते. त्यानंतर आम्ही भेंडी बाजार आणि जोगेश्वरीसह इतर ठिकाणी छापे मारून अब्दुल लतिफ आणि दोन नेपाळी नागरिकांना अटक केली होती."
"ते मला सहा वर्षं ज्युनिअर ऑफिसर होते, पण आमचे खूप जिव्हाळ्याचे संबंध होते. आमचे कौटुंबिक संबंधसुद्धा होते. IC 814 प्रकरणाच्या तपासानंतर ते काही काळ व्हिएन्नामध्ये कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी अनेकदा मला तिकडे येण्यासाठी आमंत्रित केलं पण मी जाऊ शकलो नाही."
"ते अत्यंत कर्तव्यदक्ष अधिकारी होते, त्यांच्यावर जे काही आरोप ते जिवंत असताना किंवा नंतर झाले आहेत ते खरे नाहीत. लोक त्यांच्याबद्दल बोलताना त्यांच्या राजकीय विचारसरणीला अनुसरून बोलतील, पण ते कुठल्याही विचारधारेकडे झुकणारे नव्हते. दबावात येऊन कुठल्यातरी विचारधारेच्या बाजूने बोलणारे ते मुळीच नव्हते. त्यांनी नेहमी कायद्यानुसार काम केलं. ते कुठल्याही अमिषाला बळी पडणारे नव्हते."

फोटो स्रोत, Getty Images
क्राईम रिपोर्टर्स आणि हेमंत करकरे
माझ्यासारख्या मुंबईतील बहुतांश क्राईम रिपोर्टर्सचा हेमंत करकरेंशी पहिल्यांदा संबंध ते एटीएस प्रमुख बनल्यानंतरच. त्याआधी मुंबईतील क्राईम रिपोर्टर्सना ते फारसे माहिती नव्हते.
एटीएस प्रमुख बनल्यानंतर त्यांच्याशी संपर्क आला, पण ते प्रसारमाध्यमांशी फार बोलायचे नाहीत.
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या तपासासंदर्भात माहितीसाठी पत्रकार त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न करायचे. पण ते फार वेळा पत्रकारांना भेटले नाहीत.

तपासासंदर्भात जास्त न बोलणारे, मोजक्याच प्रश्नांची उत्तरं देणारे अधिकारी म्हणून ते ओळखले जात आणि तपासातील महत्त्वाच्या गोष्टी प्रसारमाध्यमांशी ऑफ द रेकॉर्डही त्यांनी कधीच शेअर केल्या नाहीत.
वरिष्ठ पत्रकार सुनिल सिंह सांगतात, "मालेगाव स्फोटाच्या तपासावेळी करकरे जास्त कोणाशीच संपर्कात नव्हते. प्रसारमाध्यमांशी बोलायचे नाहीत आणि बाईटही द्यायचे नाहीत. त्यामुळे क्राइम रिपोर्टर्स नाराज होते. पण एक पोलीस अधिकारी म्हणून त्यांना पोलीस दलात खूप मान होता."
2008 मध्ये मी देखील टीव्ही रिपोर्टर होतो. करकरेंशी मालेगाव संदर्भात पत्रकारांनी भेटण्याचा आणि प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. पण फार कमीवेळा त्यांनी याबाबत चर्चा केली किंवा माहिती दिली.
मालेगाव स्फोट प्रकरणी त्यांनी दिल्लीतील एका वरिष्ठ पत्रकाराला मुलाखत दिली होती. त्यामुळे मुंबईतील क्राइम रिपोर्टर्स नाराज झाले होते.
हेमंत करकरे मूळचे कुठले?
हेमंत करकरेंचा जन्म डिसेंबर1954 मध्ये नागपूरमध्ये झाला. त्यांनी वर्ध्याच्या सरकारी शाळेतून प्राथमिक आणि त्यानंतर इंग्रजी माध्यमातून पुढचं शिक्षण पूर्ण केलं.
1975 साली नागपूरच्या विश्वेश्वर्या इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजिमधून त्यांनी मेकॅनिकल इंजीनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर केंद्र सरकारच्या नॅशनल प्रॉडक्टिलव्हिटी काउंसिल आणि हिंदुस्तान लिव्हर कंपनीत नोकरी केली होती.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











