क्रिकेटर यश दयाळ कोण आहे, ज्यानं 'इस्लामोफोबिक' पोस्टमुळे माफी मागितली...

यश दयाळ

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, यश दयाळ

मुस्लीम धर्मियांबाबत आक्षेपार्ह स्टेटसप्रकरणी गुजरात टायटन्स संघातर्फे खेळणारा उत्तर प्रदेशचा गोलंदाज यश दयाळने माफी मागितली आहे.

यश दयाळने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. इस्लामोफोबिक अशा या पोस्टमुळे यशवर जोरदार टीका होऊ लागली.

टीका कायम राहिल्यामुळे यशने माफी मागितली आहे.

यश दयाळ

यशने लिहिलं आहे, "मित्रांनो त्या स्टोरीसाठी मी माफी मागतो. चुकून ती पोस्ट शेअर झाली. कृपया द्वेष पसरवू नका. धन्यवाद. मी प्रत्येक समाजाचा, धर्माचा सन्मान करतो."

9 एप्रिल 2023 रोजी इडन गार्डन्स इथे झालेल्या मुकाबल्यात यशच्याच गोलंदाजीवर रिंकू सिंगने सलग 5 षटकार लगावले होते.

कोण आहे यश दयाळ?

यश दयाळ डोमेस्टिक क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेशसाठी खेळतो. 1997 मध्ये उत्तर प्रदेशातल्या इलाहाबाद इथे जन्म झालेला यश डावखुरा गोलंदाज आहे.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये यशने 17 सामन्यात 58 विकेट्स घेतल्या आहेत. ट्वेन्टी20 सामन्यांमध्ये 33 विकेट्स घेतल्या आहेत. 2018 मध्ये यशने प्रथम श्रेणी सामन्यात पदार्पण केलं होतं. न्यूझीलंड अ संघाविरुद्ध भारत अ संघातर्फे यश खेळला आहे.

यश दयाळ, इन्स्टाग्राम, सोशल मीडिया

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, यश दयाळ

नव्या चेंडूसह शिस्तबद्ध गोलंदाजी करण्यात यश वाकबगार आहे. 2021-22 हंगामात विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत यशने 10 विकेट्स पटकावल्या होत्या.

2022 आयपीएल हंगामापूर्वी झालेल्या लिलावात गुजरात टायटन्स संघाने तब्बल 3.2 कोटी रुपये खर्चून यशला ताफ्यात समाविष्ट केलं. आयपीएल पदार्पणातच गुजरात संघाने जेतेपदावर नाव कोरलं होतं. गुजरातच्या विजयी मोहिमेत यशने 11 विकेट्ससह महत्त्वाचं योगदान दिलं होतं.

ते षटक आणि रिंकूचा प्रहार

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

गुजरात आणि कोलकाता यांच्यादरम्यानचा मुकाबला अंतिम षटकापर्यंत गेला होता. कोलकाताला जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता होती. कोलकातातर्फे रिंकू सिंग खेळत होता तर गुजराततर्फे यश दयाळ गोलंदाजीसाठी तयार होता.

यशने टाकलेल्या पहिल्या चेंडूवर उमेश यादवने हुशारीने एक धाव काढली आणि रिंकू सिंगला स्ट्राईक दिला. वादळापूर्वीचा हा क्षण अतिशय महत्त्वाचा ठरला.

दुसऱ्या चेंडूवर यशच्या हातून फुलटॉस गेला आणि रिंकू सिंगने लाँगऑफला षटकार लगावला.

तिसऱ्या चेंडूवर लेगस्टंपवर पडलेल्या चेंडूवर यशने डीप स्क्वेअर लेग क्षेत्रात भिरकावून दिला. या षटकाने कोलकातावरचं दडपण कमी झालं.

चौथ्या चेंडूवर यशच्या हातून फुलटॉस पडला आणि रिंकूने लाँगऑफ क्षेत्रात आणखी एक षटकाराची नोंद केली. या षटकारासह यश आणि पर्यायाने गुजरातवरचं दडपण वाढलं. क्षेत्ररक्षणात काही बदल करण्यात आले. गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने यशबरोबर चर्चा केली.

पाचव्या चेंडूवर ऑफ स्टंपबाहेर पडलेल्या चेंडूवर रिंकूने लाँगऑनच्या दिशेने चेंडू सीमारेषेबाहेर फटकावला. या षटकाराने यशवरचं दडपण वाढलं.

सहाव्या चेंडूवर ऑफस्टंपबाहेरच्या चेंडूवर जोरदार प्रहार करत रिंकूने इतिहास रचला. सलग 5 षटकार लगावणारा रिंकू आयपीएल स्पर्धेतला पहिला फलंदाज ठरला. पाचव्या षटकारासह विजयी जल्लोष करुन डगआऊटच्या दिशेने निघालेल्या रिंकूचं छायाचित्र यंदाच्या हंगामातीस संस्मरणीय क्षण ठरला.

यश दयाळ, इन्स्टाग्राम, सोशल मीडिया

फोटो स्रोत, ani

फोटो कॅप्शन, रिंकू सिंह

दुसरीकडे यशसाठी खच्चीकरण होईल असा क्षण होता. गुजरातने यानंतरच्या अनेक सामन्यांमध्ये यशला संघात घेतलंच नाही. त्याची तब्येत बरी नसल्याचं कर्णधार हार्दिकने सांगितलं.

गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 204 धावांचा डोंगर उभारला होता. विजय शंकरने 24 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकारांसह नाबाद 63 धावांची खेळी केली होती. साई सुदर्शनने 38 चेंडूत 53 धावांची खेळी केली होती. शुबमन गिलने 39 धावा केल्या होत्या.

या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताकडून वेंकटेश अय्यरने 83 धावांची खेळी करत विजयाचा पाया रचला. नितीश राणाने 45 धावा करत त्याला चांगली साथ दिली. पण हे दोघे बाद झाल्यानंतर कोलकाताच्या विजयाची आशा मावळली होती. शेवटच्या षटकात 29 धावा करण्याचं अशक्यप्राय वाटणारं आव्हान रिंकूच्या अविश्वसनीय खेळीने प्रत्यक्षात साकारलं. यशने त्या सामन्यात आधी चांगली गोलंदाजी केली होती. म्हणून कर्णधार हार्दिकने विश्वासाने चेंडू सोपवला होता. पण रिंकूने 21 चेंडूत 1 चौकार आणि 6 षटकारांसह नाबाद 48 धावांची खेळी केली. रिंकूलाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

यश या हंगामात 5 सामने खेळला. त्याला 2 विकेट्स मिळाल्या.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)