ओन्लीफॅन्स कुणाच्या मालकीची आहे? त्यांचा प्रॉफिट युक्रेन युद्धात ‘असा’ वापरला जातोय

    • Author, मालू कुर्सिनो
    • Role, बीबीसी न्यूज

ओन्लीफॅन्स या अडल्ट साईटचा निव्वळ नफा गेल्या वर्षात तुफान वाढला. त्या साईटच्या मालकाला 300 मिलियन डॉलर्सचा डिव्हिडंड मिळाला. त्यामुळे हा पॉर्नच्या साम्राज्याचा अनभिषिक्त सम्राट नक्की कोण आहे याबद्दल चर्चा परत सुरू झालीये.

लिओनिड रॅडव्हिन्स्की या साईटचे मालक आहे. 41 वर्षांचं रॅडव्हिन्स्की युक्रेनियन-अमेरिकन वंशाचे आहेत आणि त्यांची संपत्ती 2.1 बिलियन डॉलर्स इतकी आहे.

त्यांनी 2018 साली ही कंपनी गाय आणि टीम स्टोकली या पितापुत्रांकडून खरेदी केली. या दोघांनी ही कंपनी 2016 साली साडेबारा हजार डॉलर्स गुंतवून सुरू केली होती.

ही कंपनी खरेदी करण्यासाठी लिओनिड रॅडव्हिन्स्की यांनी लाखो डॉलर्स दिले असं म्हणतात. पण ते कोण आहेत, त्यांच्याकडे एवढा पैसा कुठून आला?

त्यांच्याविषयी काय माहिती समोर आली?

खरं सांगायचं तर लिओनिड रॅडव्हिन्स्की या व्यक्तीविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. रॅडव्हिन्स्की यांनी आपलं खाजगी आयुष्य गुप्त ठेवलं आहे. त्यांनी फारशा मुलाखतीही दिल्या नाहीत.

पण तरीही त्यांच्या आयुष्याबदद्ल एका लिंक्डइन अकाऊंटवर आणि वेबसाईटवर काही संकेत दिलेले आहेत.

त्यांच्या लिक्डइन अकाऊंटनुसार लिओनिड रॅडव्हिन्स्की एक व्हेंचर कॅपटलिस्ट गुंतवणूकदार, समाजसेवेसाठी भरपूर पैसा खर्च करणारे तंत्रज्ञान उद्योजक आहेत. या अकाऊंटवर असंही म्हटलंय की त्यांना ‘नव्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसमध्ये रस आहे’.

त्यांच्या स्वतःच्या वेबसाईटवर असं म्हटलंय की रॅडव्हिन्स्की यांनी गेल्या दोन दशकात ‘अनेक सॉफ्टवेअर कंपनी उभ्या केल्या आणि ओपन सोर्स चळवळीसाठी योगदान दिलं.’

रॅडव्हिन्स्की यांचा जन्म यूक्रेनमधल्या ओडेसा शहरात झाला. त्यांनी यूक्रेनमधल्या मदतकार्यासाठी क्रिप्टोकरन्सी वापरून दान केलं, ज्यांची कॉईनडेस्कने दिलेल्या माहितीनुसार 2022 साली किंमत होती 13 लाख डॉलर्स.

रॅडव्हिन्स्की म्हणतात की, “ते अनेक सामाजिक कार्यांसाठी पैसा, वेळ देतात, त्यासाठी काम करतात.”

प्रोग्रॅमिंग आणि सामाजिक कार्याव्यतिरिक्त, “त्यांना वाचायला, चेस खेळायला आवडतो आणि ते हेलिकॉप्टर उडवायला शिकत आहेत,” असंही त्यांच्या वेबसाईटवर म्हटलंय.

रॅडव्हिन्स्की कुठे राहातात?

ते लहान असताना त्यांचं कुटुंब अमेरिकेतल्या शिकागो शहरात स्थायिक झालं, असं डेली टेलिग्राफने म्हटलंय. आता ते फ्लोरिडात राहातात पण नक्की कुठे ते कोणालाही माहिती नाही.

फोर्ब्स मासिकाने म्हटलं होतं की त्यांचं लग्न झालंय, पण बीबीसी त्यांच्या जोडीदाराची ओळख पटवू शकलेलं नाही.

व्यवसाय कसा उभारला?

पॉर्न इंडस्ट्रीशी संबंधित असलेला ऑन्लीफॅन्स हा रॅडव्हिन्स्की यांचा पहिला बिझनेस आहे. त्यांनी शिकागो जवळच्या नॉर्थवेस्टर्न विद्यापीठात 2002 साली अर्थशास्त्राची पदवी घेतली. तेव्हापासून ते वेगवेगळ्या व्यवसायांचा भाग होत राहिले.

ओन्लीफॅन्सची पॅरेंट कंपनी फेनिक्सचे एकमेव शेअरहोल्डर होण्याआधी त्यांनी सायबरटॅनिया नावाचा वेबसाईट रेफरल बिझनेस सुरू केला होता.

फोर्ब्स मासिकानुसार पॉर्न कंटेटसाठी पासवर्ड आणि यूझर लिंक वापरण्याचा व्यवसाय 1990 च्या उत्तरार्धात सुरू झाला.

ओन्लीफॅन्स विकत घेण्याआधी रॅडव्हिन्स्की यांचा अडल्ट वेबकॅमच्या बिझनेस होता.

बीबीसीने त्यांची मुलाखत घेण्यासाठी त्यांना संपर्क केला, पण त्याला काही प्रतिसाद मिळाला नाही.

ओन्लीफॅन्सची पॅरेंट कंपनी कोणती?

फेनिक्स ही कंपनी ओन्लीफॅन्सची पॅरेंट कंपनी आहे. रॅडव्हिन्स्की अमेरिकेत राहात असले तरी ही कंपनी यूकेमध्ये रजिस्टर झालेली आहे.

तसंच या कंपनीचे चीफ फायनान्शिअल ऑफिसर ली टेलर यूकेतच स्थायिक झालेले आहेत असं कंपनीच्या रेकॉर्डसवरून दिसतं.

सार्वजनिक दस्तावेजांनुसार दिसतं की ओन्लीफॅन्सचे गुंतवणूकदार आणि संस्थापक गाय स्टोकली यांनी डिसेंबर 2021 मध्ये ओन्लीफॅन्सची पॅरेंट कंपनी फेनिक्समधून राजीनामा दिला.

याच महिन्यात गाय यांचा मुलगा टीम स्टोकली यांनी ओन्ली फॅन्सच्या चीफ एक्झिक्युटिव्ह पदाचा राजीनामा दिला. त्यांनी म्हटलं की, ‘मला काहीतरी नवीन करायचं आहे.’

रॅडव्हिन्स्की यांनी विकत घेतल्यापासून ओन्लीफॅन्सची भरभराट झाली आहे. आता ही साईट फक्त पॉर्नग्राफीशी संबधित नाहीये. याचे काही सर्वात मोठे कंटेट क्रिएटर आता सेफ-फॉर-वर्क (सार्वजनिक ठिकाणी पाहाता येईल असं) कंटेट पोस्ट करतात.

ओन्लीफॅन्स किती पैसा कमवतं?

या कंपनीचा ऑगस्ट 2023 मधला एकूण नफा होता 525 मिलियन डॉलर्स. गेल्यावर्षीच्या तुलनेत या नफ्यात 93 मिलियन डॉलर्सची घसघशीत वाढ झाली आहे.

गेल्या वर्षी ओन्लीफॅन्स साईटवर कंटेट पोस्ट करणाऱ्या क्रिएटर्सच्या संख्येत 47 टक्क्यांनी वाढ झाली आणि तिथे आता जवळपास 3.2 मिलियन कंटेट क्रिएटर आहेत तर यूझर्सची संख्या 27 टक्क्यांनी वाढून आता 239 दशलक्ष यूझर्स झालेले आहेत.

पण या साईटवर टीकाही होत राहाते आणि सरकारी यंत्रणांचं बारीक लक्ष यावर असतं.

2021 साली बीबीसी न्यूजने रिपोर्ट केलं होतं की लहान मुलांचे पॉर्न व्हीडिओज या साईटवर न येऊ देण्यात, त्यासाठी कडक नियम बनवण्यात ओन्लीफॅन्स कमी पडतंय.

ओन्लीफॅन्सने त्यावेळी म्हटलं होतं की त्यांची वय पडताळणी करण्याची यंत्रणा सरकारी नियमांनुसार जशी असायला हवी त्यापेक्षा चांगली आहे.

हेही वाचलंत का?

बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.