या देशातील लोक ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन चर्च सोडत आहेत, कारण...

इथियोपिया

फोटो स्रोत, Getty Images

इथियोपियाचं नाव ऐकताच आपल्याला डोळ्यासमोर अनेक प्रकारची चित्रं दिसू लागतात. पण तुम्ही नेमके कुठं आहात यावरही तुम्हाला काय चित्र दिसायचं हे अवलंबून असतं.

उदाहरण द्यायचं झाल्यास, तम्ही युरोपच्या दृष्टीकोनातून पाहिलं तर 80 च्या दशकादरम्यान इथियोपियामधील प्रचंड उपासमारीचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं.

पण आफ्रिकेच्या लोकांच्या दृष्टीनं पाहिलं तर, वसाहतवादी शक्तींना कधीही ताबा मिळवता न आलेली अशी ही भूमी आहे. त्यांच्यासाठी हे आफ्रिकेतील ऐक्य आणि स्वाभिमानाचं प्रतीक आहे.

इथियोपिया हा आफ्रिकेतील दुसरा सर्वाधिक लोकसंख्या असलेला आधुनिक देश आहे.

या देशाचं नेतृत्व अशा पंतप्रधानांच्या हातात आहे ज्यांना 2019 मध्ये शांततेच्या नोबेल पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.

पण वर्षभरानंतरच इथियोपियामध्ये गृहयुद्ध भडकलं. त्यात हजारो सामान्य नागरिकांचा बळी गेला.

इथियोपियातील समाजात ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन चर्चची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.

गृहयुद्धामुळं इथियोपियातील ऑर्थोडॉक्स चर्चमध्येच मतभेद निर्माण झाले. एकेकाळी या देशातील 44 टक्के लोक स्वतःला ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन म्हणून घ्यायचे.

इथियोपियातील समाज आणि राजकारणात ऑर्थोडॉक्स चर्चच्या प्रभावाला कोणीही आव्हान दिलं नव्हतं. पण आता हळूहळू इतर पंथांमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांचा आकडा वाढत आहे.

स्वतःचं ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन असं वर्णन करणाऱ्यांची संख्या वेगानं कमी होत आहे. त्यामुळं इथियोपियातील लोकांचा ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन चर्चवरील विश्वास कमी होऊ लागला आहे का? याबाबत आपण माहिती घेणार आहोत.

चर्चमध्ये मतभेद

इथियोपियातील ऑर्थोडॉक्स तेवाहेडो ख्रिश्चन चर्च जगातील सर्वांत जुन्या ख्रिश्चन चर्चपैकी एक आहे.

तेवाहेडोचा अर्थ 'एकता' असा आहे. इथियोपियामधील लोकांचे शासक हे राजा सोलोमन आणि राजा मैकाडाचे वंशज होते, अशी त्यांची भावना आहे. बायबलमध्ये त्यांचा अनेकदा उल्लेख होतो.

इथियोपियावर ऑर्थोडॉक्स तेवाहेडो चर्चचा प्रचंड परिणाम असल्याचं लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्सचे एक वरिष्ठ संशोधक मेब्राटू केलेचा म्हणाले. त्यामुळं देशाची विशिष्ट ओळख निर्माण झाली आहे.

ऑर्थोडॉक्स चर्चमध्ये पूर्वीपासूनच मतभेद राहिले आहेत. पण टिगरेमध्ये नोव्हेंबर 2020 मध्ये गृहयुद्धाच्या सुरुवातीनंतर ते मतभेद अधिक तीव्र झाले. तर ओरोमिया भागातील बंडामागंही ते महत्त्वाचं कारण होतं.

"ओरोमिया परिसरात चर्चच्या प्रशासकीय ढाच्यावरून कायम टीका झालेली पाहायला मिळाली आहे. पण चर्चला अनुयायांशी संवाद साधण्यासाठी मातृभाषेचा वापर करण्यात अपयश आल्याचं लोकांचं म्हणणं आहे."

फ्रान्स

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

चर्चमध्ये गॅइझ भाषेचा वापर होतो. ही एक प्राचीन भाषा आहे. इथियोपियाच्या जुन्या उच्च वर्गाची भाषा राहिलेल्या अम्हारिक भाषेशी याचा संबंध राहिला आहे.

पण 1974 मध्ये इथियोपियाचे राजा हायले सलासी यांना सत्तेवरून हटवल्यानंतर ते उच्च वर्गाच्या नजरेत आले.

त्यानंतरच्या कारवाईत हजारो लोक मारले गेले. त्यात इथियोपिया नरेश आणि चर्चचे पेट्रीआर्क म्हणजे चर्चप्रमुखांचीही हत्या झाली होती. त्यानंतर आबुना मेरकोरियसला चर्चचे नवीन प्रमुख नियुक्त करण्यात आलं.

मेब्राटू केलेचा यांच्या मते, 1974 मध्ये राजा सलासीला हटवल्यानंतर बदललेल्या परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्यात अपयशी ठरल्याचा आरोप चर्चवर झाला. इथियोपियामध्ये लष्कराची सत्ता आली होती. त्यामुळे राजकीय परिस्थिती बदलली होती.

अनेक वर्षांच्या अस्थिरतेनंतर 1991 मध्ये इथियोपियामध्ये नवं सरकार सत्तेत आलं. यावेळी इथोयोपियातील ऑर्थोडॉक्स चर्चचे प्रमुख विदेशात गेले. त्यानंतर इथियोपियन ओर्थोडॉक्स चर्चची स्थापना झाली.

तर इथियोपियामध्ये आबुना पाउलस ओर्थोडॉक्स चर्चचे पेट्रिआर्क बनले आणि 2018 पर्यंत चर्चचा कारभार सांभाळला.

पण 2018 मध्ये आबी अहमद पंतप्रधान बनले आणि त्यांनी आबुना मेरकोरियस यांना देशात परत बोलावून घेतलं.

आबुना मेरकोरियस आणि चर्चचे विद्यमान प्रमुख म्हणजे पेट्रिआर्क आबुना मथायस यांच्यात करार झाला, पण त्या दोघांना एकत्र ठेवणं सोपं नव्हतं.

"पंतप्रधानांनी चर्चमध्ये निर्माण झालेले मतभेद दूर करण्यासाठी बाहेर काढलेल्या नेत्यांना देशात परत बोलावलं होतं. पण त्यामुळं चर्चवर अधिकार मिळवण्यासाठी दोघांमध्ये स्पर्धा सुरू झाली," असं मेब्राटू केलेचा म्हणाले.

इथियोपिया

फोटो स्रोत, Reuters

पंतप्रधान बनल्यानंतर आबी यांनी देशाच्या सत्तेच्या ढाच्यात बदलासाठी पावलं उचलली. त्यामुळं ते सत्तेत आल्यानंतर काही महिन्यांनी गृहयुद्धाला सुरुवात झाली.

नोव्हेंबर 2020 मध्ये टिगरेने केंद्र सरकारपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. त्याचा थेट परिणाम इथियोपियाच्या ऑर्थोडॉक्स चर्चच्या ऐक्यावर पडला. या युद्धाचा पहिला सर्वांत मोठा हल्ला अक्सुम शहरावर झाला. ते इथियोपियाच्या ऑर्थोडॉक्स चर्चचं केंद्र समजलं जातं.

इथियोपियातील लोकांच्या मते, या शहरातील चर्च ऑफ मेरी-अवर लेडी ऑफ जायोनमध्ये ख्रिश्चन आणि ज्यूंसाठी पवित्र समजल्या जाणाऱ्या आर्क ऑफ कोव्हॅनंटचं पाच हजार वर्षांपेक्षा अधिक काळापासून संवर्धन करून ठेवलं आहे.

हल्ल्याच्या दरम्यान या चर्चला लक्ष्य करण्यात आलं. तसंच त्यानंतर ह्युमन राइट्स वॉचच्या रिपोर्टमध्ये एक दावा करण्यात आला. त्या दाव्यानुसार या चर्चमध्ये शरण घेणाऱ्या शेकडो लोकांना बाहेर काढून गोळ्या घालण्यात आल्या आणि त्यानंतर चर्चमध्ये लूटमार करण्यात आली.

7 मे 2021 ला टिगरेच्या चार आर्च बिशपनी एकत्रितपणे एक स्वतंत्र ढाचा तयार करण्याची घोषणा केली. चर्चनं युद्धाला विरोध केला नाही तसंच आबी सरकारशी जवळीक ठेवल्याचे आरोपही केले.

"आफ्रिकन युनियनच्या मध्यस्थीनंतर इथियोपियाचं सरकार आणि टिगरे लिबरेशन फ्रंट यांच्या प्रेटोरियामध्ये झालेल्या शस्त्रसंधीमुळं हिंसाचार थांबला. पण तरीही देशातील अनेक वादग्रस्त मुद्दे आणि टिगरेच्या भवितव्याशी संबंधित अनेक वाद सोडवणं अद्याप शिल्लक आहे. माझ्या मते, इथियोपियातील ऑर्थोडॉक्स चर्चमधील मतभेदांचा परिणाम देशाच्या अस्थिरतेवरही झाला आहे," असंही मेब्राटू केलेचा म्हणाले.

इथियोपियामध्ये ऑर्थोडॉक्स चर्च

युकेच्या ऑक्सफर्ड सेंटर फॉर मिशन स्टडीजचे सहयोगी प्राध्यापक राल्फ ली यांनी इथियोपियात ऑर्थोडॉक्स चर्चची स्थापना चौथ्या शतकात झाली होती, असं म्हटलं. म्हणजे युरोपचं ख्रिस्तीकरण होण्याच्याही आधी. तेव्हापासून 1974 च्या कम्युनिस्ट क्रांतीपर्यंत तो अधिकृत धर्म होता. पण ऑर्थोडॉक्स चर्च इथियोपियातील मुख्य चर्च किंवा ख्रिश्चन धर्माची मुख्य शाखा कसा बनला?

"सर्वांत आधी स्थापना झाल्यानं ते इथियोपियाचं मुख्य चर्च बनलं. त्यापूर्वी इथियोपियामध्ये कोणते धर्म होते, याबाबत अत्यंत कमी माहिती उपलब्ध आहे. इस्लामच्या उदयाच्या आधीपासूनच त्याठिकाणी चर्चची मुळं मजबूत झालेली होती. त्याठिकाणी मुस्लीम होते, पण ऑर्थोडॉक्स चर्चचा प्रभाव सर्वाधिक होता," असं राल्फ ली म्हणाले.

म्हणजे जगातील सर्वांत पहिल्या काही ख्रिश्चन देशांमध्ये इथियोपियाचा समावेश होतो. इस्लामचा इतिहास पाहता इथियोपियामध्ये इस्लामचा प्रसारही त्याच्या सुरुवातीच्या काही वर्षांमध्येच झाला होता. इथियोपियाचं दुसरं नाव एबिसिनिया आहे.

कुराणमध्ये पैगंबर मोहम्मद यांनी अत्याचाराने पीडित मुस्लिमांना एबिसिनियामध्ये शरण घेण्याचा सल्ला दिला होता. कारण ते तिथं सुरक्षित राहतील असं त्यांचं मत होतं. इथियोपियामध्ये ज्यू धर्माचा प्रसारही झाला होता. पण त्यांना ओळख मिळाली ती ख्रिश्चन ऑर्थोडॉक्स चर्चमुळं.

फ्रान्स

फोटो स्रोत, Getty Images

राल्फ ली यांच्या मते, गेल्या 1700 वर्षांमध्ये इथियोपियाचा समाज, राजकारण आणि संस्कृतीत पाळमुळं रोवण्यात ख्रिश्चन ऑर्थोडॉक्स चर्चची महत्त्वाची भूमिका राहिली. देशातील मुख्य धर्म असल्यानं त्यांचा प्रभाव खूप जास्त होता.

"13 व्या शतकापासून ते 1970 च्या दशकात इथियोपियाचे राजा हाइले सेलासी यांच्यापर्यंत देशाचे सर्व राजे स्वतःला राजा सोलोमन आणि रानी शीबाचे वंशज समजत होते. तसंच राणी शिबाचा जन्म इथिोपियात झाला असल्याचंही म्हटलं जातं. शिवाय राणी शिबा आणि राजा सोलोमन यांचा मुलगा आर्च ऑफ द कोव्हेनंट ला इथियोपियाला आणलं होतं," असं राल्फ ली म्हणाले.

'आर्च ऑफ द कोव्हेनंट' हा लाकूड आणि सोन्यापासून तयार केलेला बॉक्स होता. त्यात सोनं आणि लाकडापासून बनवलेल्या बॉक्समध्ये असलेल्या चकतीवर ख्रिश्चन धर्माचे महत्त्वाचे संदेश लिहिण्यात आलेले आहेत, अशी ख्रिश्चन आणि ज्यूंची धारणा आहे. हे धार्मिक चिन्हं ख्रिश्चन आणि ज्यूंसाठी पवित्र मानलं जातं. पण बायबलमध्ये इथियोपियाच्या उल्लेखाचा विचार करता, याबाबत काही संशय असल्याचंही राल्फ म्हणाले.

"ग्रीक भाषेतील जुन्या लिखाणामध्ये इथियोपिया शब्द विशिष्ट भौगोलिक देशाबद्दल माहिती देणारा नसून ही इजिप्तच्या दक्षिणेतील एक जागा असल्याचे संकेत देतात. पण इथियोपियाच्या ओळखीचा तो एक महत्त्वाचा भाग नक्कीच आहे.

इथियोपियामध्ये ऑर्थोडॉक्स ख्रिश्चनांशिवाय इतर धर्माचे लोकही अनेक शतकांपासून राहतात. विशेषतः त्याठिकाणी मुस्लिमांची लोकसंख्याही खूप जास्त आहे. पण त्याठिकाणी कधीही मुस्लीम शासकांचं राज्य राहिलेलं नाही. "

चर्च आणि देशाच्या संबंधात तणाव

अमेरिकेतील अभ्यासक आणि उत्तर पूर्व आफ्रिकेतील तज्ज्ञ योहानस वोल्डेमरियम यांच्या ते, बायबलमध्ये ज्या इथियोपियाचा उल्लेख आहे, त्याचा आधुनिक इथियोपियाशी अत्यंत कमी संबंध आहे.

"तीन हजार वर्षांच्या संबंधाचा जो उल्लेख केला जातो, ती केवळ अख्यायिका आहे. इथियोपियाच्या राजांनी या अख्यायिकेचा वापर पाश्चिमात्य देशांबरोबरचे संबंध मजबूत करण्यासाठी केला."

1974 मध्ये अखेरचा राजा हाईले सलासी यांना सत्तेवरून हटवून त्यांची हत्या करण्यात आली. अशाप्रकारे सलासी राजवंशाचा काळ संपुष्टात आला. त्यानंतर एक डाव्यांचं सरकार आलं. त्याला डर्ग म्हटलं जात होतं. त्यानं धर्माला फार प्रोत्साहन दिलं नाही किंवा त्याला दाबण्याचाही प्रयत्न केला नाही.

1991 मध्ये डर्गला सत्तेतून बाहेर करण्यात आलं. अनेक जातीय गटांची आघाडी असलेल्या इथियोपियन पीपल्स रेव्होल्युशनरी डेमोक्रॅटिक फ्रंट किंवा ईपीआरडीएफची सत्ता आली. त्यानंतर बदलांचा काळ सुरू झाला. परिणामी अशा जातीय गटांचं सशक्तीकरण झालं.

इथियोपिया

फोटो स्रोत, Getty Images

"ईपीआरडीएफनं आघाडी करत इथियोपियामध्ये अनेक जातीय आणि प्रादेशिक आव्हानांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला होता. उत्तर इथियोपियात ओर्थोडॉक्स चर्च शक्तिशाली होतं पण त्यांच्यात ऐक्य नव्हतं. त्यांच्यात जातीय मतभेद होते. आबीची सत्ता आल्यानंतर ही फूट अधिक प्रखरपणे समोर येऊ लागली," असं योहानस वोल्डेमरियम म्हणाले.

आबी अहमद यांना एरिट्रियाबरोबरच्या सीमा वादाशी सबंधित युद्ध संपवून शांतता करार करण्यासाठी 2019 मध्ये नोबेल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. देशातील राजकीय नियंत्रण हटवल्यामुळंही त्यांचं कौतुक झालं. त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या.

ओरोमो समुदायाचे आबी अहमद यांचे वडील मुस्लीम तर आई ख्रिश्चन होती. पण ते स्वतः मुस्लीम नाहीत. ओरोमा समुदायाची दीर्घ काळ अवहेलना होत राहिली. आबी हे प्रभावी ओम्हारा या तिगरेयाई जातीय समुदायातील नाहीत किंवा ऑर्थोडॉक्स ख्रिश्चनही नाहीत. त्यामुळं त्यांनी नेतृत्व करणं ही इथियोपियातील समाजासाठी एक मोठी बाब होती.

"इथियोपियासाठी हा संकटाचा काळ आहे. माझ्या मते, इथियोपिया मोडकळीस येत आहे. ईपीआरडीएफच्या विरोधात नाराजी आणि विरोधामुळं 2018 मध्ये आबी पंतप्रधान बनले. ओरोमियाचे लोक इथियोपियामध्ये बहुसंख्याक आहेत. पण अनेक वर्ष ते वंचित राहिले. त्यांनी ओम्हारा परिसरातील लोकांबरोबर आघाडी केली."

याच कारणांमुळं 2020 मध्ये युद्ध सुरू झालं होतं. केंद्र सरकार आणि टिगरे सुरक्षा दलांमध्ये प्रेटोरियामध्ये झालेल्या करारानंतर 2022 मध्ये युद्ध थांबलं. पण ती केवळ एक राजकीय तडजोड होती. त्यामुळंच याचा मतभेद कमी होण्यासाठी फायदा झाला नाही. पण चर्चसमोर यापेक्षाही वेगळी अनेक आव्हानं आहेत.

नवी परिस्थिती, नवे कल

कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये वर्ल्ड ख्रिश्चानिटीचे सहयोगी प्राध्यापक योर्ग हाउस्टाइन यांनी इथियोपियामध्ये गेल्या 20-30 वर्षांमध्ये लोकांचा धार्मिक कल बदलला असल्याचं सांगितलं आहे.

"इथियोपिया हा कायम ख्रिश्चन आणि मुस्लिम देश राहिला आहे. पण ख्रिश्चन धर्मातही अनेक लोक ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन धर्मापासून दूर जात, ख्रिश्चन धर्माच्या प्रोटेस्टंट शाखेकडं वळत आहेत. त्याचं एक कारण-पेंटेकोस्टलर (Pentecostlar) यांचं करिश्माती आंदोलन आणि त्याची वाढती लोकप्रियता हे आहे."

काही अंदाजांनुसार आता इथियोपियामध्ये ऑर्थोडॉक्स ख्रिश्चनांची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या 50 टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे. इथियोपियाची जवळपास साठ टक्के लोकसंख्या 25 वर्षांपेक्षा कमी वयाच्या नागरिकांची आहे.

मग, या तरुणांचा बायबलशी संबंध असलेल्या इथियोपियाच्या प्रतिमेबद्दल भ्रमनिरास झाला आहे का? कारण यामुळं प्रसिद्ध कलाकार बॉब मार्लेच्या संगीत आणि आंदोलनाला प्रेरणा मिळाली होती.

"ती अख्यायिका खूप पूर्वी संपुष्टात आली होती आणि 1974 च्या क्रांतीनंतर ती पूर्णपणे नष्ट झाली. शहरीकरणासारख्या अनेक कारणांमुळं इथियोपियातील तरुणांचा आधुनिक विचारसरणकडं ओढा वाढला आहे. त्यांचा कल प्रोटेस्टंट पेंटेकोस्टेलिझमकडे वाढत आहे. कारण पेंटेकोस्टेलिझम वैयक्तिक विकास आणि आर्थिक सुधारणांवर जोर देतं," असं योर्ग हाऊस्टाइन म्हणाले.

पण इथियोपियामध्ये इस्लाम हा अत्यंत वेगानं वाढणारा धर्म म्हणून पुढं आला आहे, हेही लक्षात ठेवायला हवं. देशातील एक तृतीयांश लोकसंख्या स्वतःला मुस्लिम समजते. आबी अहमद विकास आणि शांतीची नवी आशा घेऊन सत्तेत आले होते. पण लवकरच ती आशा धूसर होऊ लागली.

इथियोपिया एक विशाल आणि गुंता असलेला देश आहे, हेही एक मोठं आव्हान आहे. त्याचवेळी त्यांचे सोमालिया, सुडान, साउथ सुडान आणि एरिट्रिया अशा शेजाऱ्यांशी संबंधही अत्यंत कठिण आहेत.

योर्ग हाउस्टाइन म्हणाले की, इथियोपियामध्ये केंद्र आणि प्रादेशिक सरकारांमध्ये असलेल्या संघर्षाचा मोठा इतिहास आहे. बहुधर्मी, बहुजातीय आणि बहुभाषी देशात सोयी सुविधांचं समान वितरण हे कायम आव्हानात्मक ठरत असतं.

पण इथियोपियातील विविधतेला योग्य दिशेनं पुढं नेणं आणि सर्व जाती तसंच सांस्कृतिक गटांमध्ये शातता आणि ऐक्य कायम ठेवणं हे देशासमोरचं एक मोठं आव्हान ठरलं.

तर मग आता महत्त्वाच्या प्रश्नाकडं वळुयात - इथियोपियन लोकांचा ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन चर्चवरचा विश्वास कमी होत आहे का?

या चर्चची मुळं इथियोपियाच्या इतिहासात खोलवर रुतलेली आहेत. तुम्ही याठिकाणी गेले तर दगडात कोरलेले सुंदर चर्चचं बारीक नक्षीकाम तुम्हाला प्रभावित केल्याशिवाय राहणार नाही. त्यापैकी अनेक चर्च युरोपातील चर्चपेक्षा जुने आहेत. याठिकाणी एक हजार वर्षांपेक्षाही अधिक वर्षांपासून 'आर्च ऑफ द कोव्हेनंट'ला सुरक्षित ठेवण्यात आलं आहे.

शेकडो वर्षांपासून लाखो लोकांचा ऑर्थोडॉक्स चर्चवर विश्वास राहिला आहे. पण आता लोक ख्रिश्चन धर्माच्या इतर शाखांमध्ये आणि इस्लामकडे वळत आहेत. चर्चच्या घंटा, अजान आणि पेंटेकोस्टलर (Pentecostar) प्रार्थनेचा आवाज तुम्हाला इथियोपियामध्ये सगळीकडं ऐकायला मिळतो.

लोकांच्या मते, धर्मावरील विश्वास हा व्यक्तीला स्वतःला अधिक चांगल्या पद्धतीनं ओळखण्यासाठी जगण्यासाठी मदत करतो. पण ऑर्थोडॉक्स तेवाहेडो चर्च हाच याचा एकमेव मार्ग आहे, यावर आता अनेक लोकांचा विश्वासही राहिलेला नाही.