के. एल. राहुल-आथिया: याआधी या क्रिकेटपटूंनी केलं आहे अभिनेत्रींशी लग्न

फोटो स्रोत, @KLRAHUL
क्रिकेटपटू के.एल.राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी या दोघांचं सोमवारी लग्न झालं.
अथियाचे वडील आणि अभिनेता-उद्योगपती सुनील शेट्टी यांनी लग्नानंतर प्रसारमाध्यम प्रतिनिधींची भेट घेतली आणि मिठाईचं वाटप केलं.
तेव्हा बोलताना सुनील शेट्टी म्हणाले, छोटेखानी सोहळ्यात राहुल आणि अथियाचं लग्न झालं. मी आता अधिकृतपणे सासरा झालो आहे. आयपीएलच्या हंगामानंतर रिसेप्शन होऊ शकतं असंही त्यांनी सांगितलं.
राहुलने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करताना लिहिलं, तुझ्या प्रेमाने माझं आयुष्य उजळून निघालं आहे. घरचे, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत आम्ही लग्न केलं. आम्हाला प्रचंड आनंद आणि समाधान मिळालं. कृतज्ञतापूर्वक आम्ही सगळ्या चाहत्यांनी दिलेल्या प्रेमाचा स्वीकार करतो. भावी आयुष्यासाठी तुमचं प्रेम, आशिर्वाद मिळेल अशी आशा आहे.
राहुल आणि अथिया यांचं लग्न होण्यापूर्वी डेटिंग, अफेअरचे किस्से चर्चेत होते. सोशल मीडियावर ते एकमेकांशी कोपरखळ्या लगावत संवाद साधताना दिसायचे.

क्रिकेट आणि बॉलीवूडचं हे कनेक्शन नवं नाही. क्रिकेट आणि बॉलीवूड एकत्र येण्याचा पहिला योग जुळवून आणला नवाब मंसूर अली खान पतौडी आणि अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी.
27 डिसेंबर 1969 रोजी शर्मिला टागोर आणि मंसूर अली खान पतौडी यांचं लग्न झालं होतं. ही जोडी अतिशय लोकप्रिय होती, आहे.
यानंतर संगीता बिजलानी, गीता बसरा, हेझल कीच, सागरिका घाटगे, अनुष्का शर्मा या अभिनेत्रींचं क्रिकेटपटूंशी लग्न झालं.
भारतीय संघाचं रनमशीन ठरलेला विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा या बहुचर्चित जोडीने 11 डिसेंबर 2017 रोजी इटलीत लग्न केलं. या दोघांना आता एक मुलगी असून तिचं नाव वामिका असं आहे.

विराटआधी 2016 मध्ये युवराज आणि हेझल कीच या जोडीची चर्चा होती. त्यांचं लग्न झालं. एका टीव्ही शो मध्ये युवराजने सांगितलं होतं की तीन वर्ष हेझलला भेटण्याचा प्रयत्न करत होता.
हेझलने या नात्यात तेव्हा स्वारस्य दाखवलं नव्हतं. यानंतर दोघांच्या सामाईक मित्राने भेट घडवून आणली. दोघांनी 2015 मध्ये इंडोनेशियातल्या बाली इथे साखरपुडा केला होता. वर्षभरानंतर चंदीगढपासून 40 किलोमीटवर अंतरावरच्या गुरुद्वारात लग्न केलं.
गेल्या वर्षी या दोघांना मुलगी झाली. तिचं नाव ओरियन कीच सिंह असं ठेवलं आहे.

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज झहीर खान आणि चक दे फेम अभिनेत्री सागरिका घाटगे यांचं 2017 मध्ये लग्न झालं.
युवराज आणि हेझल यांच्या लग्नात झहीर-सागरिका एकत्र दिसल्यानंतर त्यांच्या नात्याची चर्चा होऊ लागली होती. एप्रिल 2017 मध्ये दोघांचा साखरपुडा झाला. 23 नोव्हेंबर 2017 मध्ये दोघांचं लग्न झालं.
भारतीय संघाचा अव्वल फिरकीपटू हरभजन सिंह आणि अभिनेत्री तसंच मॉडेल गीता बसरा यांचं 2015 मध्ये धूमधडाक्यात लग्न झालं.
दोघांची ओळख लंडनमध्ये झाली. गीता बसरा यांचा जन्मही इंग्लंडमध्येच झाला आहे. एका टेलिव्हिजन मुलाखतीत दोघांनी सांगितलं की लग्नाआधी आठ वर्ष एकमेकांच्या संपर्कात होते. दोघांना एक मुलगी आहे.

भारताची माजी मिस इंडिया संगीता बिजलानी आणि भारतीय संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांची एकमेकांशी ओळख 1990 मध्ये झाली. अझर यांचं आधी लग्न झालं होतं. त्यांना दोन मुलंही होती. संगीता यांच्यासाठी अझर यांनी 1996 मध्ये पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला.
दोघांच्या नात्यात वितुष्ट आल्यामुळे 2010 मध्ये ते विभक्त झाले.

क्रिकेट आणि बॉलीवूड एकत्र येण्यात मंसूर नवाब अली पतौडी आणि शर्मिला टागोर यांची प्रेमकहाणी कारणीभूत आहे. नवाब पटोदी यांनी शर्मिला यांचा होकार मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. पतौडी यांनी शर्मिला यांना चार वर्ष पत्रं लिहिली. फुलंही पाठवली. पॅरिसमधल्या एका ठिकाणी पतौडींनी शर्मिला यांना प्रपोज केलं. 1969 मध्ये दोघांचं लग्न झालं. 2011 पतौडी यांचं निधन झालं. पतौडी आणि शर्मिला यांना तीन मुलं आहेत.
अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री सोहा अली खान या मुलांनी शर्मिला यांचा अभिनयाचा वारसा पुढे चालवला आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता)








