You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाराष्ट्रात महायुती की महाविकास आघाडी? जाणून घ्या विविध संस्थांचे एक्झिट पोलचे अंदाज
भारतात पुढचं सरकार कुणाचं येणार? या प्रश्नाचं सुस्पष्ट उत्तर मिळण्यासाठी काही तास उरले आहेत. कारण 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत.
मात्र, आज लोकसभेच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर विविध संस्थांचे एक्झिट पोल समोर आले. निवडणूक निकालाचा अंदाज येण्यासाठी एक्झिट पोलकडे पाहिलं जातं. अर्थात, एक्झिट पोल अनेकदा चुकीचेही ठरल्याचे दिसून आले आहेत.
वेगवेगळ्या संस्थांनी जाहीर केलेल्या एक्झिट पोलनुसार देशात पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं (NDA) सरकार येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
असं असलं तरी महाराष्ट्र मात्र एनडीएसाठी आव्हानात्मक ठरल्याचं एक्झिट पोलमध्ये दिसून येतंय. कारण महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वातील महायुतीला अपेक्षित यश एक्झिट पोलमधून तरी मिळाल्याचं दिसून येत नाहीय.
बहुतेक सर्वेक्षण संस्थांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुतीला 50-50 टक्के जागा येण्याचा अंदाज वर्तवलाय.
महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांबाबत अनेक धक्कादायक निकाल एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आले आहेत. महाराष्ट्राबाबत वेगवेगळ्या संस्थांनी वर्तवलेले निकाल खालीलप्रमाणे :
एबीपी सी-व्होटरचा अंदाज
एबीपी सी-व्होटर या संस्थेने जाहीर केलेल्या महाराष्ट्रातील अंदाजानुसार, महाराष्ट्रात महायुतीला 22 ते 26 जागा मिळतील, तर महाविकास आघाडीच्या पारड्यात 23 ते 24 जागा मिळतील.
या एक्झिट पोलमधली महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजपला एकूण 17 जागा देण्यात आल्या आहेत, तर दुसऱ्या स्थानी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 9 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
शिंदे गटाला 6, अजित पवार गटाला 1, शरद पवार गटाला 6, काँग्रेसला 8 आणि एक जागा अपक्ष उमेदवाराला मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
टीव्ही नाईन-पोलस्ट्रॅटचा अंदाज
टीव्ही नाईन-पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात महायुतीला 22 जागा, तर महाविकास आघाडीला एकूण 25 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पक्षनिहाय आकड्यांचा विचार केला तर टीव्ही-नाईन-पोलस्ट्रॅटच्या आकडेवारीनुसार :
- भाजप - 18 जागा
- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) - 14 जागा
- राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) - 6 जागा
- शिवसेना (शिंदे गट) - 4 जागा
- काँग्रेस - 5 जागा
- अपक्ष - एक जागा
इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल
इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला 28 ते 32 जागा, महाविकास आघाडीला 16 ते 20 जागा आणि इतरांना 0 ते 2 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पक्षनिहाय अंदाजाचा विचार केला तर भाजपला 20 ते 22 जागा, शिंदे गटाला 8 ते 10 जागा, अजित पवार गटाला 1 ते 2 जागा, ठाकरे गटाला 9 ते 11 जागा, शरद पवार गटाला 3 ते 5 जागा आणि काँग्रेसला 3 ते 4 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
चाणक्य आणि द स्ट्रेलिमाचा अंदाज
चाणक्य या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार, एक्झिट पोलमध्ये महायुतीला 28 ते 38 जागा मिळतील. महाविकास आघाडीला 10 ते 20 जागा आणि अपक्ष उमेदवाराला एकही जागा मिळणार नाही असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
द स्ट्रेलीमा या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार महायुतीला 24 ते 27, महाविकास आघाडीला 20 ते 23 जागा आणि एक सांगलीची जागा मात्र अपक्ष उमेदवार म्हणजेच विशाल पाटील यांच्याकडे जाईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
न्यूज 18 च्या एक्झिट पोलनुसार महायुतीला जास्त जागा
न्यूज-18च्या एक्झिट पोल नुसार महायुतीला 32 ते 35 जागा आणि मविआला 15 ते 18 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
असं असलं तरी न्यूज 18 च्या जागांची बेरीज ही महाराष्ट्रातील एकूण मतदारसंघांच्या आकड्यांच्या पलीकडे जात आहे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.
देश पातळीवरील एक्झिट पोलचा अंदाज काय आहे?
देशपातळीवरचे एक्झिट पोलचे अंदाज पाहिल्यास बहुतेक सगळ्याच संस्थांनी पुन्हा एकदा भाजपप्रणित एनडीएचं सरकार येण्याचं भाकित वर्तवलं आहे.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज या संस्थांनी वर्तवला असला तरी भाजप त्यांचा '400 पार'ची घोषणा मात्र किमान एक्झिट पोलमध्ये पूर्ण करताना दिसत नाहीय.
आता राष्ट्रीय पातळीवरचे एक्झिट पोलचे अंदाज पाहूया :
दैनिक भास्कर या संस्थेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीएला 281 ते 350 जागा मिळतील.
इंडिया आघाडीला 145 ते 201 जागा तर 33 ते 49 जागा इतर उमेदवारांना मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
'इंडिया न्यूज - डी डायनामिक्स' या संस्थेच्या आकडेवारीनुसार एनडीएला 371 जागा, इंडिया आघाडीला 125 जागा आणि 47 जागा इतरांना मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
एनडीटीव्ही 'जन की बात' या संस्थेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एनडीएला 362 ते 392 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे, इंडिया आघाडीला 141 ते 161 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 10 ते 20 जागा इतरांना मिळतील असा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.
न्यूज नेशन या संस्थेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एनडीएला 342 ते 372, इंडिया आघाडीला 153 ते 169 आणि 21 ते 23 जागा इतरांना मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
रिपब्लिक भारत मॅट्रीझच्या आकडेवारीनुसार, एनडीएला 353 ते 368, इंडिया आघाडीला 118 ते 133 आणि 43 ते 48 जागा या इतरांना मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.