महेश सावंत कोण आहेत, ज्यांनी अमित ठाकरेंना हरवून सेनाभवनाच्या अंगणात ठाकरेंसाठी विजय खेचून आणला?

महेश सावंत
    • Author, आशय येडगे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या माहिम विधानसभा मतदारसंघाच्या लढतीत अमित ठाकरेंचा पराभव करून, उद्धव ठाकरे गटाचे महेश सावंत 'जायंट किलर' ठरले आहेत. महेश सावंत यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार सदा सरवणकर यांचा 1 हजार 340 मतांनी पराभव केला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे माहीममध्ये निवडणूक लढवत असल्याने हा मतदारसंघ चर्चेत आला होता. अमित ठाकरे यांना तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली.

शिवसेनेचा जन्म झालेला मतदारसंघ आपल्याकडे राखण्यात उद्धव ठाकरेंना यश मिळाल्याचं दिसतंय.

शिवसेना शिंदे गटाच्या सदा सरवणकर यांनीही या मतदारसंघात उमेदवारी दाखल केली आणि माहीममधली लढत चुरशीची होणार हे स्पष्ट झालं होतं.

मात्र माहीमच्या मतदारांनी माजी आमदार आणि राज ठाकरेंना नाकारत उद्धव ठाकरेंच्या विभाग प्रमुखाला आमदार म्हणून पसंती दिली.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

शिंदे गटाचे सदा सरवणकर दुसऱ्या क्रमांकावर राहिले असून अमित ठाकरेंना तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली आहे. मनसेसाठी हा पराभव धक्कादायक ठरला आहे.

माजी आमदार सदा सरवणकर, राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांना धूळ चालणारे महेश सावंत नेमके कोण आहेत? असा प्रश्न अनेकांना पडला असेल.

कोण आहेत महेश सावंत?

महेश सावंत हे 1990 पासून शिवसेनेत सक्रिय आहेत. सदा सरवणकर यांचे समर्थक म्हणून त्यांची ओळख होती.

सदा सरवणकर शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेले होते त्यावेळी महेश सावंतही त्यांच्यासोबत गेले होते. पण, पुन्हा ते शिवसेनेत परतले.

2017 ला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महेश सावंत यांनी सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर यांच्याविरोधात अपक्ष निवडणूक लढवली होती.

महेश सावंत
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

तेव्हापासून सदा सरवणकर आणि महेश सावंत यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले. तसेच शिवसेनेतील फुटीनंतर सदा सरवणकर शिंदेंसोबत गेले तेव्हा महेश सावंत ठाकरेंसोबत राहिले.

महेश सावंत यांच्याबाबत बोलताना ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य यांनी बीबीसी मराठीला सांगितलं की, "महेश सावंत यांचं कार्यकर्ता म्हणून शिवसैनिकांमध्ये नेटवर्क चांगलं आहे. तसेच काँग्रेसची सुद्धा 17 हजाराच्या घरात मतं इथं आहेत. त्याचा फायदा हा महेश सावंतांना होऊ शकतो.

"इथले सगळे माजी नगरसेवकही हे ठाकरेंसोबत आहेत. या मतदारसंघात मराठी मतदार, कोळी मतदार आणि मुस्लीम मतदार निर्णायक ठरणार आहेत. मराठी मतदारांचा कल आतापर्यंत तरी उद्धव ठाकरेंकडे राहिलाय," आचार्य सांगतात.

महेश सावंत यांच्याबाबत बोलताना उद्धव ठाकरेंच्या सेनेचे उपविभागप्रमुख यशवंत विचले म्हणाले की, "महेश सावंत यांच्याकडे एक सामान्य कार्यकर्ता म्हणून बघितलं जातं. त्यांचे वडील गिरणी कामगार होते. महानगरपालिकेच्या निवडणुकीत सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांच्याविरोधात अवघ्या काही मतांनी महेश सावंत पराभूत झाले होते. त्यामुळे हा विजय अधिक महत्त्वाचा आहे."

कुणाला किती मतं मिळाली?

माहीम मतदारसंघाच्या निकालात 18व्या फेरीअखेर ठाकरे गटाच्या महेश सावंत यांना 46 हजार 579 मतं मिळाली.

दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या शिंदे गटाच्या सदा सरवणकर यांना 45 हजार 239 मतं मिळाली. अमित ठाकरे यांना 30 हजार 703 मतं मिळाली आहेत.

माहीममध्ये उमेदवारी जाहीर करताना काय झालं?

2019 मध्ये आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी ठाकरे कुटुंबातील व्यक्ती निवडणूक लढवत असल्यानं राज ठाकरेंनी आदित्य यांच्याविरोधात उमेदवार दिला नव्हता.

आता त्याची परतफेड म्हणून उद्धव ठाकरे अमित ठाकरेंच्या विरोधात उमेदवार देणार नाहीत अशा चर्चा सुरु होत्या. पण उद्धव ठाकरेंच्या सेनेने या मतदारसंघातून महेश सावंत यांना उमेदवारी जाहीर केली.

आदित्य ठाकरे आणि महेश सावंत

याबाबत बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले होते की, "आम्ही सौदेबाजी करत नाही, शिवसेनेची स्थापना झाली त्या भागात शिवसेना लढणार नाही असं होऊ शकत नाही."

त्यानंतर काही तासांतच महेश सावंत उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करून बाहेर पडले आणि आपल्याला उमेदवारी जाहीर झाल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

अमित ठाकरे

माहीम मतदारसंघाची रचना कशी आहे?

दादर, प्रभादेवी, शिवाजी पार्क आणि माहिमचा भाग हा परिसर माहिम विधानसभा मतदारसंघात येतो.

दादरमध्ये शिवसेनेचा जन्म झाला, त्यानतंर बाळासाहेबांची पहिली सभाही शिवाजी पार्कवर झाली, शिवसेनेचा दसरा मेळावाही शिवाजी पार्कवर न चुकता होतो. बाळासाहेबांचं स्मारकही शिवाजी पार्कमध्येच आहे. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेसाठी फार महत्त्वाचा आहे.

आधी दादर मतदारसंघ हा वेगळा होता. या मतदारसंघात 1990 पासून शिवसेनेचं एकहाती वर्चस्व होतं. मनोहर जोशी, विशाखा राऊत आणि नंतर 2004 ला सदा सरवणकर या मतदारसंघातून निवडून आले होते. पण, 2008 मध्ये या मतदारसंघाची पुनरर्चना होऊन दादर-माहिम असा विधानसभा मतदारसंघ तयार झाला.

आधीच्या माहिम मदारसंघातही 1990 पासून शिवसेनेचं वर्चस्व होतं. शिवसेनेच्या सुरेश गंभीर यांनी 2004 पर्यंत मतदारसंघ राखला होता. पण, 2008 ला मतदारसंघाची पुनरर्चना होऊन माहिम विधानसभा मतदारसंघ तयार झाला.

सदा सरवणकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि 2009 मध्ये काँग्रेसकडून निवडणूक लढवली.

शिवसेना भवन
फोटो कॅप्शन, शिवसेना भवन

शिवसेनेनं आदेश बांदेकरांना उमेदवारी दिली होती. तसेच मनसेही यावेळी निवडणुकीच्या रिंगणात होती. मनसेनं नितीन सरदेसाईंना मैदानात उतरवलं होतं. यावेळी नितीन सरदेसाई यांनी 48 हजार मतं घेत सदा सरवणकर यांचा पराभव केला होता, तर शिवसेनेचे आदेश बांदेकर तिसऱ्या स्थानावर होते. पण, 2014 च्या आधी सदा सरवणकर यांनी घरवापसी केली आणि शिवसेनेकडून पुन्हा आमदार झाले.

त्यांनी 6 हजार मतांनी शिवसेनेचा पराभव केला होता. 2014 ला सगळे पक्ष स्वबळावर लढल्यानं या मतदारसंघात भाजपनेही विलास आंबेकर यांना उमेदवारी दिली होती. यावेळी त्यांना 33 हजार मतं मिळाली होती. त्यामुळे इथं काही प्रमाणात भाजपला मानणारा वर्गही आहे हे विसरून चालणार नाही.

2019 च्या विधानसभा निवडणुकीतही सदा सरवणकर हेच शिवसेनेचे उमेदवार होते, तर मनसेनं त्यांचा उमेदवार बदलून संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली होती. यावेळी सरवणकरांनी 21 हजार मतांनी देशपांडेंचा पराभव केला होता. संदीप देशपांडेंना 42 हजार 690 मतं मिळाली होती.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.