12 वी नंतर अशी मिळू शकते भारतीय रेल्वेमध्ये नोकरी, उत्तम करिअर हवंय? मग हे वाचा

    • Author, प्रियंका झा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

16 एप्रिल 1853.

याच ऐतिहासिक दिवशी देशातील पहिली प्रवासी ट्रेन धावली होती. त्या दिवसाला आता 172 हून अधिक वर्षे उलटून गेली आहेत.

आज 2025 मध्ये देशात दररोज सरासरी जवळपास 2 कोटी प्रवासी रेल्वेनं प्रवास करतात. रेल्वेनं इतक्या वर्षांमध्ये किती मजल मारली आहे हे त्यातून लक्षात येतं.

मात्र आज प्रवाशांबद्दल नाही, तर रेल्वेतील नोकऱ्यांबद्दल जाणून घेऊया.

भारतीय रेल्वेची टॅगलाईन आहे - लाईफलाईन टू द नेशन. अर्थात रेल्वेला देशाची जॉबलाईन आहे असंही म्हणता येऊ शकतं.

कारण देशात सर्वाधिक सरकारी नोकऱ्या देणाऱ्या विभागात रेल्वेचा समावेश होतो. रेल्वेत तब्बल 12 लाख लोक काम करतात.

दरवर्षी रेल्वेत नोकरीच्या कोणकोणत्या संधी निर्माण होतात?

रेल्वेत दरवर्षी काही पदांसाठी नोकरीच्या संधी निर्माण होत असतात. त्यात खालील पदांचा समावेश असतो.

  • तिकीट कलेक्टर
  • कमर्शियल ॲप्रेंटिस
  • असिस्टंट लोको पायलट
  • आरपीएफ कॉन्स्टेबल

याशिवाय रेल्वेत इतर पदंदेखील असतात आणि त्यांच्या नियमितपणे संधी येत असतात. अर्थात या नोकऱ्या वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे मिळतात.

भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्यासाठी उमेदवारांना रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड्स (आरआरबी) किंवा रेल्वे रिक्रुटमेंट सेल (आरआरसी) च्या माध्यमातून अर्ज करावा लागतो.

किंवा पोस्टनुसार होणाऱ्या स्पर्धा परीक्षेत पास व्हावं लागतं.

मात्र फक्त 12 वी झाल्यानंतर देखील भारतीय रेल्वेत एक उत्तम करियरची सुरुवात केली जाऊ शकते. कसं? ते जाणून घेऊया.

सध्या रेल्वेत 12 -13 लाख कायमस्वरुपी कर्मचारी काम करत आहेत. 2014 ते 2024 दरम्यान रेल्वेमध्ये पाच लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांची भरती झाली.

त्याआधी 2004 ते 2014 दरम्यान 4.11 लाख कर्मचाऱ्यांची भरती झाली होती. मात्र सध्या रेल्वेमध्ये ग्रुप सी मध्ये जवळपास 2.74 लाख पदं रिक्त आहेत.

ग्रुप सी म्हणजे सुपरव्हायझर, टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल ऑपरेशनल पोस्ट. उदाहरणार्थ स्टेशन मास्तर, लोको पायलट किंवा ट्रेन चालवणारे ड्रायव्हर, ज्युनियर इंजिनीअर आणि कारकुनाची पदं.

रेल्वेची विभागणी 18 झोन किंवा विभागांमध्ये करण्यात आली आहे. उदाहरणार्थ, उत्तर, पश्चिम, दक्षिण आणि पूर्व रेल्वे. नंतर या झोनची विभागणी अनेक डिव्हिजनमध्ये केली जाते.

या झोनमध्ये टेक्निकल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, मेडिकल, ऑपरेशनल आणि रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आरपीएफ) सारख्या विभागांमध्ये नोकरभरती होते.

रेल्वेतील नोकऱ्यांची मुख्यत: चार ग्रुपमध्ये होते विभागणी

रेल्वेत वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रता आणि कौशल्यांच्या आधारे ग्रुप ए, बी, सी आणि डी मध्ये नोकरभरती केली जाते.

  • ग्रुप ए : यूपीएससी परिक्षेद्वारे (इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिस, अकाउंट सर्व्हिस, इंजिनिअर सर्व्हिस).
  • ग्रुप बी : यातील बहुतांश पदांवर लोक ग्रुप सी मधून प्रमोशन घेऊन पोहोचतात.
  • ग्रुप सी : आरआरबी परिक्षेद्वारे (उदाहरणार्थ, तिकीट कलेक्टर, क्लर्क, लोको पायलट).
  • ग्रुप डी : आरआरसी परिक्षेद्वारे (10 वी पास असणाऱ्यांसाठी पद).

बहुतांश उमेदवार ग्रुप सी आणि ग्रुप डीमधील पदांसाठी अर्ज करू शकतात. 10 वी आणि 12 वी पास झालेले तरुण या दोन ग्रुपमध्ये भरती होऊ शकतात.

12 वी पास झालेल्यांना पुढील पदांवर नोकरी मिळू शकते,

  • ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट
  • अकाऊंट क्लर्क कम टायपिस्ट
  • कमर्शियल कम तिकिट क्लर्क
  • ज्युनियर टाइम कीपर
  • तिकीट कलेक्टर (टीसी)
  • रेल्वे कॉन्स्टेबल (आरपीएफ)
  • स्टेशन मास्तर (काही नॉन-टेक्निकल पदं)
  • गुड्स गार्ड

तुम्ही सायन्स बॅकग्राऊंडचे असाल तर असिस्टंट लोको पायलट (एएलपी) आणि टेक्निशियन सारखी पदंदेखील असतात.

10 वी पास झाल्यानंतर जी मुलं इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये (आयटीआय) शिकण्यासाठी जातात, त्यांच्यासाठी रेल्वे हा चांगला पर्याय आहे.

पगार आणि सुविधा

रेल्वेच्या नोकऱ्यांमधून फक्त स्थैर्यच मिळत नाही, तर अनेक सुविधादेखील मिळतात.

  • सुरुवातीचा पगार : 25,000 रुपये ते 45,000 रुपये मासिक पगार.
  • वार्षिक पॅकेज : 3.5 लाख रुपये ते 5.5 लाख रुपये

याच्यासोबत पुढील सुविधा मिळतात,

  • मोफत किंवा सवलतीच्या दरात ट्रेनचा पास
  • रेल्वे क्वार्टरमध्ये राहण्याची सुविधा
  • वैद्यकीय सुविधा
  • पेन्शन

कोणाला अर्ज करता येतो?

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास (काही पदांसाठी आयटीआय किंवा पदवी आवश्यक).

किमान गुण : 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक.

वयाची अट : सर्वसाधारणपणे 18 ते 30 वर्षे (एससी/एसटी/ओबीसी/पीडब्ल्यूडी साठी सूट मिळते).

रेल्वेतील भरतीसाठी कशाप्रकारे निवड केली जाते. क्रम जाणून घ्या.

  • ऑनलाइन अर्ज (आरआरबी/आरआरसी वेबसाईट)
  • कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (सीबीटी) - जीके, गणित, रीजनिंग, विज्ञान, करंट अफेअर्स
  • स्किल टेस्ट / पीईटी (फिजिकल एफिशिएन्सी टेस्ट)
  • डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन
  • वैद्यकीय चाचणी

या सर्व पायऱ्या पार केल्यानंतर मेरिट लिस्ट तयार होते. त्यानुसार उमेदवारांना संधी दिली जाते.

अर्ज कसा करावा?

नोटिफिकेशन आरआरबीच्या अधिकृत वेबसाईटवर येतात.

शुल्क: 500 रुपये (सीबीटी-1 दिल्यानंतर 400 रुपये परत मिळतात)

आवश्यक कागदपत्रं: शैक्षणिक प्रमाणपत्र, ओळखपत्र, फोटो आणि इतर कागदपत्रं.

अर्ज करण्याची सर्व प्रक्रिया आता ऑनलाईन स्वरुपात असते.

करिअरमधील प्रगतीचं काय?

रेल्वेतील नोकरीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे प्रमोशन आणि स्थैर्य. क्लर्कपासून स्टेशन मास्तरपर्यंत प्रमोशनचा मार्ग मोकळा असतो.

एएलपी ते लोको पायलट ते सीनियर लोको पायलटपर्यंत प्रमोशन होऊ शकतं.

रेल्वे कॉन्स्टेबल ते इन्स्पेक्टरपर्यंत प्रमोशन होतं.

कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेणारे शिक्षक, जीत राणा म्हणतात की, ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसायचं असेल त्यांनी सर्वात आधी गेल्या वर्षी विचारण्यात आलेले प्रश्न आधीच सोडवून घेणं महत्त्वाचं ठरतं.

यामुळे सर्वसाधारणपणे कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, याचा त्यांना अंदाज येईल.

ते म्हणतात की, विद्यार्थ्यांनी पूर्ण अभ्यासक्रम लक्षात घ्यावा. मग प्रत्येक विषयाचा वेगवेगळा सराव करावा.

विशेषकरून गणितासाठी सरावाची आवश्यकता असते. प्रत्येक विद्यार्थ्यानं परीक्षेआधी किमान 100 मॉक टेस्ट दिल्या पाहिजेत.

यामुळे परीक्षेच्या वेळेस कोणत्याही प्रकारची चूक होत नाही आणि विद्यार्थ्यी दिलेल्या वेळेचा योग्य वापर करू शकतात.

मग वाट कसली बघता आहात, मोबाईल हातात घ्या आणि सर्च सुरू करा, कारण नोकरीसाठी ट्रेन वाट पाहते आहे!

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.