रेल्वे तिकिटाच्या तत्काळ बुकिंगसाठी 'आधार' लागणार, 1 जुलै पासून होतील 'हे' बदल

भारतीय रेल्वे मंत्रालयाने आपल्या तिकिट बुकिंगच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. आता तत्काळ प्रकारचे तिकीट काढण्यासाठी आधार नंबर देणं आवश्यक आहे. रेल्वे बोर्डानं काल 10 जून रोजी एक परिपत्रक प्रसिद्ध केलं आहे. सामान्य प्रवाशांच्या उपयोगासाठीच हा बदल केल्याचं या पत्रकात म्हटलं आहे.

या पत्रकानुसार 1 जुलै 2025 पासून आधार प्रमाणित युजर्सच इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कार्पोरेशन म्हणजे आयआरटीसीच्या संकेतस्थळावरुन किंवा अॅपवरुन तत्काळ तिकीट बुक करू शकतील.

हे महत्त्वाचे बदल होतील

1 जुलैपासून जर तत्काळ तिकीट बुक करायचे असल्यास तुम्हाला आयआरटीसी खातं आधारशी जोडून घ्यावं लागेल.

तसेच 15 जुलैपासून रेल्वे तिकीट काऊंटर किंवा अधिकृत एजंटांकडून तत्काळ तिकीट बुक करण्यासाठी आधार निगडीत ओटीपी लागेल. ओटीपी ऑथेंटिकेट झाल्यावरच तत्काळ तिकीट बुक होईल.

तत्काळ बुकिंग सुरू झाल्यावर पहिल्या अर्ध्या तासापर्यंत एसी आणि नॉन एसी वर्गासाठी रेल्वेचे एजंट तिकीट बुक करू शकणार नाहीत असंही या पत्रकात म्हटलं आहे.

याचाच अर्थ ज्यादिवशी एखाद्या ट्रेनचं तत्काळ बुकिंग सुरू होईल त्यादिवशी रेल्वेचे अधिकृत एजंट सकाळी 10.00 ते 10.30 या काळात एसी वर्गासाठी आणि सकाळी 11.00 ते 11.30 या काळात नॉन एसी वर्गासाठी तत्काळ बुकिंग करू शकणार नाहीत.

यामुळे जे बल्क बुकिंग केले जात असेल त्याला आळा बसेल आणि त्याचा फायदा थेट बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना होईल. तसेच तोतया प्रवाशांवर, नाव बदलून प्रवास करणाऱ्यांवर देखील हा आळा बसू शकेल.

हा निर्णय लागू करण्यासाठी जे आवश्यक बदल करावे लागतील, ते करण्याचे आदेश रेल्वेचे संकेतस्थळ सांभाळणारी क्रिस संस्था आणि आयआरटीसीला देण्यात आले आहेत.

रेल्वेने आपल्या परिपत्रकात पुढे म्हटले आहे की तिकीट बुक करण्यासाठी असलेल्या अॅपवर आपले आधार जोडून घ्यावे. त्यामुळे येत्या काळात प्रवाशांची गैरसोय होणार नाही.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)