झुरळाचं डोकं कापलं तरी ते जिवंत राहू शकतं का? जाणून घ्या विज्ञान काय सांगतं

तुमच्या आणि आमच्या घरात आढळणारी झुरळं लाखो वर्षांपासून पृथ्वीवर फिरत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तुमच्या आणि आमच्या घरात आढळणारी झुरळं लाखो वर्षांपासून पृथ्वीवर फिरत आहेत.
    • Author, भरत शर्मा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

झुरळ हे फक्त आपल्या घरातील अडथळा नाही, तर ते पृथ्वीवर कोट्यवधी वर्षांपासून टिकलेला जीव आहे. झुरळ हे डायनासोरपेक्षा जुने, रात्री सक्रिय होणारे आणि परिस्थितीशी जुळवून घेणारे कीटक मानले जातात.

रात्री स्वयंपाकघरात जाऊन अचानक लाइट लावली, तर किचन ओट्यावर, भांड्यांवर ठिकठिकाणी झुरळ फिरत असल्याचे दिसते. रात्री भांडी आणि पातेल्यांमध्ये ते फिरतात, छिद्रांमधून डोकावताना दिसतात, अँटेना काढून आपल्याला घाबरवतात.

महत्त्वाचं म्हणजे त्यांना मारण्यासाठी स्प्रे किंवा इतर किटकनाशक घेईपर्यंत ते गायबही होतात. या तात्पुरत्या उपायाने ते गायब झाले, तरी तितक्याच संख्येने किंबहुना जास्त संख्येने ते परत येतात. याचा आपल्या आरोग्यावरही परिणाम होतो.

जगात झुरळांच्या 4500 पेक्षा जास्त प्रजाती आढळतात. पण यापैकी सुमारे 30 प्रजाती मानवी वस्तींमध्ये आढळतात. झुरळ 'ब्लॅटोडिया' गटात येतात. यात वाळवीसुद्धा येते.

झुरळ पृथ्वीवर कधीपासून आहेत?

झुरळांचं अस्तित्व फार पूर्वीपासून म्हणजे अगदी डायनासोर युगाच्या आधीपासून होतं. विशेष म्हणजे ते आज आपल्यासोबतही आहेत.

झुरळांची पृथ्वीवरील सर्वात जुन्या कीटकांमध्ये गणना केली जाते. जीवाश्मांशी निगडीत पुराव्यांनुसार, त्यांचा उगम कार्बोनिफेरस काळाशी जोडला आहे. पण हा कार्बोनिफेरस काळ किंवा युग नक्की काय होतं?

ही गोष्ट 35 कोटी वर्षे जुनी आहे. होय, तुम्ही बरोबर वाचलं. 35 कोटी वर्षांपूर्वीही झुरळ अस्तित्वात होते. दिल्ली विद्यापीठाच्या किरोडीमल कॉलेजमधील झूलॉजी (प्राणीशास्त्रज्ञ) विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. नवाज आलम खान यांनी याबद्दल सांगितलं.

झुरळ

फोटो स्रोत, Getty Images

डॉ. खान यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं, "झुरळ डायनासोरपेक्षाही जुने आहेत. जेव्हा आपण प्राचीन काळाबाबत बोलतो, तेव्हा मिझोझोइक काळाची चर्चा होते. त्या काळी डायनासोरही अस्तित्वात होते."

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

"या काळात जुरासिक काळही होता. त्याला डायनासोरचा सुवर्ण काळ म्हणतात. त्याआधी कार्बोनिफेरस काळ होता. त्यात प्राचीन जीव-जंतू आढळले. त्या वेळीही झुरळ अस्तित्वात होते. सुमारे 30-35 कोटी वर्षांपूर्वीही होते आणि आजही ते आहेत."

मेरठ येथील चौधरी चरण सिंह विद्यापीठातील झूलॉजी विभागाचे सहप्राध्यापक डॉ. दुष्यंत कुमार चौहान यांनीही याला दुजोरा दिला.

ते म्हणतात, "झुरळ डायनासोरपेक्षाही जुने आहेत. हे इनव्हर्टिब्रेट गटात येतात, म्हणजे त्यांच्याकडे पाठीचा कणा नसतो. व्हर्टिब्रेट म्हणजे असे जीव ज्यांना पाठीचा कणा असतो. झुरळाचे पृथ्वीवर आगमन डायनासोरपेक्षा आधी झाले आणि बाकीचे जीव त्यानंतर आले."

पण इतक्या काळापर्यंत टिकणं इतकी मोठी गोष्ट का आहे? डॉ. नवाज आलम खान म्हणतात की, कोट्यवधी वर्षांत पर्यावरण, हवामान आणि परिस्थिती यामध्ये खूप बदल झाले. या बदलांमुळे अनेक जीव नामशेष झाले किंवा गायब झाले. त्याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे डायनासोर.

"डायनासोर व्यतिरिक्त इतर अनेक जीव नष्ट झाले. पण झुरळाबाबत तसं झालं नाही. ते जसे होते, आजही तसेच आहेत. एवढ्या मोठ्या काळात त्यांच्यात थोडेफार बदल झाले आहेत, पण त्यांच्यात मोठा बदल दिसत नाही."

म्हणूनच झुरळ इतरांपेक्षा जरा वेगळे आहेत. ते लाखो वर्षांपासून आहेत आणि त्यांच्या शारीरिक रचनेत कोणताही मोठा बदल झालेला नाही.

'झुरळाचं डोकं कापले तरी ते जिवंत राहू शकतं'

झुरळाचं शरीर निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार आहे. त्याचं शरीर तीन भागांत विभागलं जातं- हेड, थोरेक्स आणि एब्डोमन. हेड म्हणजे डोकं, एब्डोमन म्हणजे पोटाचा भाग आणि या दोन्ही भागांच्या मधल्या भागाला थोरेक्स म्हणतात.

तसेच पुढच्या भागात दिसणारे दोन अँटेना हे झुरळाचे संवेदनशील अवयव आहेत. यांचा वापर करून ते आपलं सभोवतालचं वातावरण आणि वस्तू तपासतात.

डॉ. दुष्यंत कुमार चौहान सांगतात, "झुरळाच्या शरीरावर दिसणारे काळसर-तपकिरी कवच म्हणजे एग्झोस्केलेटन. हा खूप मजबूत असतो आणि चिटिनने बनलेला असतो. चिटिन म्हणजे तीच गोष्ट ज्यापासून आपले नखे तयार होतात.

एग्झोस्केलेटन म्हणजे बाहेरील कवच किंवा झुरळाचं बाह्य आवरण. हे खूप संरक्षण देणारं असतं, म्हणजे झुरळाला सुरक्षित ठेवतं. हे पर्यावरणातील बदल आणि शत्रूंपासून त्याचं रक्षण करतं."

तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण झुरळाचं डोकं कापलं किंवा ठेचलं तरीही ते जिवंत राहू शकतं. पण हे कसं शक्य आहे?

जगभरात झुरळाच्या 4500 हून अधिक प्रजाती आढळून येतात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जगभरात झुरळाच्या 4500 हून अधिक प्रजाती आढळून येतात.

डॉ. नवाज आलम खान सांगतात की, जसं माणसाच्या शरीरात मेंदू असतो आणि तो संपूर्ण शरीराला नियंत्रित करतो, तसंच झुरळाच्या शरीरात गँगलिअन्स असतात.

पण हे फक्त त्यांच्या डोक्यात नसून शरीराच्या वेगवेगळ्या भागातही असतं. त्यांच्या शरीरातील अनेक नसा एकत्र येऊन गँगलिअन्स तयार होतात. डोक्यातही, थोरेक्समध्येही आणि एब्डोमनमध्येही गँगलिअन्स असतं.

झुरळाच्या डोक्यात जो गँगलिअन्स असतो, त्याला सुप्रायसोफेगियल किंवा सबसोफेगियल गँगलिअन्स म्हणतात. हे एकत्र येऊन मेंदूचं काम करू शकतं, म्हणून याला झुरळाचा मेंदू म्हटलं जातं.

डॉ. खान म्हणतात, "जर झुरळाचं डोकं कापलं गेलं, तरी थोरेक्स आणि एब्डोमनमधील गँगलिअन्स शरीराचं नियंत्रण घेतात. त्यामुळे झुरळ एक आठवडा पर्यंत जिवंत राहू शकतात."

"माणसं नाक किंवा तोंडाने श्वास घेतात, पण झुरळाच्या शरीरावर लहान-लहान छिद्रं असतात, ज्यांना स्पायरॅकल्स म्हणतात. हे त्यांच्या श्वसन प्रणालीसारखं काम करतात आणि झुरळ याच छिद्रांमधून श्वास घेतात."

"हे स्पायरॅकल्स शरीराच्या वेगवेगळ्या भागात असल्यामुळे झुरळ त्यातून वायूंची देवाणघेवाण करू शकतात, म्हणजेच श्वास घेऊ शकतात. म्हणून डोकं कापलं तरीही ते जिवंत राहतात."

डोकं नसलं तरी ते श्वास घेऊ शकतात. तर मग ते एक आठवड्याभरात कसं मरतात?

रेडिएशनच्या (किरणोत्सर्ग) बाबतीत झुरळाचं शरीर खूप उपयुक्त आहे आणि ते त्याला सहन करू शकतात. (प्रतिकात्मक फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रेडिएशनच्या (किरणोत्सर्ग) बाबतीत झुरळाचं शरीर खूप उपयुक्त आहे आणि ते त्याला सहन करू शकतात. (प्रतिकात्मक फोटो)

डॉ. खान सांगतात, "झुरळ अन्नाशिवाय एक महिना जिवंत राहू शकतो, पण पाण्याशिवाय ते फक्त एक आठवडा जिवंत राहतो. कारण ते पाण्याशिवाय टिकू शकत नाही."

"जर झुरळाचं डोकं कापलं किंवा ठेचलं गेलं, तर त्याचं तोंड राहणार नाही आणि पाणी पिता येणार नाही. पाणी मिळालं नाही तर ते फक्त आठवडाभर जिवंत राहू शकतं. त्यांना पाणी आणि ओलसर वातावरण गरजेचं असतं."

रात्रीच्या वेळी झुरळं जास्त का दिसतात?

तुमच्या लक्षात आलं असेल की, झुरळ रात्री जास्त दिसतात आणि दिवसा गायब होतात. खरं तर ते गायब होत नाहीत, फक्त लपतात. पण का?

वास्तविक, झुरळ हे निशाचर असतात. ते रात्री सक्रिय असतात. दिवसा ते अंधाऱ्या, ओल्या ठिकाणी लपतात. रात्री ते अन्न आणि पाणी शोधण्यासाठी बाहेर पडतात. याचा एक फायदा असाही आहे की, ते आपल्या शत्रूंपासून सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करतात.

डॉ. दुष्यंत कुमार चौहान म्हणतात, "झुरळ बर्‍याचदा स्वयंपाकघर आणि बाथरूममध्ये दिसतात. कारण ते अन्न आणि ओलसर जागा शोधतात. ते घरातील उरलेलं अन्न खातात, म्हणून आपल्याला घरात दिसतात. दिवसा ते लपून राहतात आणि रात्री बाहेर येऊन अन्न आणि पाणी शोधण्यासाठी बाहेर पडतात."

झुरळ

फोटो स्रोत, Getty Images

त्यांनी सांगितलं, "झुरळ हे निशाचर असतात, म्हणून त्यांना प्रकाश आवडत नाही. रात्री ते जास्त सक्रिय असतात. दिवसा जरी ते कुठे दिसले, तर लगेच अंधाऱ्या कोपऱ्याकडे धावण्याचा प्रयत्न करतात."

डॉ. खान यांनीही यावर भाष्य करताना सांगितलं की,'झुरळाच्या 4500 प्रजातींपैकी सुमारे 30 प्रजाती माणसांच्या आसपास राहतात. ते जास्त ओल्या ठिकाणी राहतात. स्वयंपाकघरात त्यांना अन्न मिळतं आणि बाथरूममध्ये ओलसर वातावरण मिळतं."

"जीव दोन प्रकारचे असतात- रात्री निशाचर (नॉक्टरनल) आणि दिनचर (डायअरनल). झुरळ रात्री सक्रिय असतात, त्यांना प्रकाश आवडत नाही, त्यामुळे ते कोपऱ्यात लपतात. स्वयंपाकघर आणि बाथरूमचे कोपरे अंधार, ओलसर आणि अन्न मिळण्यास सोयीचे असतात, म्हणून झुरळ तिथे जास्त दिसतात."

अण्वस्त्र हल्ल्यातही झुरळं जगू शकतात?

झुरळाचं आयुष्य प्रजातीनुसार वेगवेगळं असतं.

काही झुरळ 150 ते 170 दिवसांपर्यंत जगतात, तर काहींचं आयुष्य साधारण एक वर्षापर्यंत असतं.

डॉ. चौहान म्हणतात, "जर्मन झुरळाचं साधारण आयुष्य 150 ते 170 दिवसांचं असू शकतं. मादी थोडं जास्त जगू शकतात, त्यांचं आयुष्य 180 दिवसांपर्यंत असू शकतं."

अणूहल्ला झाला की कोणीही वाचणार नाही, पण झुरळं जगतील असं अनेकदा म्हटलं जातं, यात किती तथ्य आहे?

त्यांच्या मते, "हे खरं नाही. जेव्हा अणू हल्ला किंवा प्रचंड स्फोट होईल, तेव्हा झुरळही उष्णतेमुळे मरतील. त्यांच्या पेशी फुटतील."

"झुरळामध्ये रेडिएशन सहन करण्याची क्षमता इतर जीवांपेक्षा 15 पट जास्त असते. पण ज्या ठिकाणी प्रत्यक्ष हल्ला होईल, तिथे तेही जिवंत राहू शकणार नाहीत."

तज्ज्ञांच्या मते, "झुरळामधील जनुकांमुळे ते बदलांना जास्त सहन करू शकतात. म्हणजे, ते परिस्थितीनुसार बदलू शकतात. रेडिएशनच्या बाबतीत त्यांचं शरीरही त्यांना मदत करतं आणि ते सहन करू शकतात."

डॉ. खान यांनी बीबीसीला सांगितलं, "अण्वस्त्र हल्ल्यात झुरळ जिवंत राहतील का, हा प्रश्न अनेकदा विचारला जातो. जिथे हल्ला होईल तिथे झुरळ जिवंत राहतील असं नाही, पण ते रेडिएशन सहन करू शकतात. आपल्याबाबतीत तसं शक्य नाही शक्य."

झुरळ

फोटो स्रोत, Getty Images

"माणसांसोबत असं शक्य नाही. तो आजारी पडेल, मरेल. पण झुरळामध्ये काही प्रतिकारशक्ती असते, तरी त्याची कमकुवत बाजू म्हणजे पाण्याची गरज. पाणी न मिळाल्यास ते मरणार आहेत, आणि महत्त्वाचं म्हणजे ते खूप जास्त उष्णता किंवा थंडी सहन करू शकत नाहीत."

"आणि शेवटी सर्वात महत्वाचा प्रश्न, झुरळापासून सुटका कशी मिळवता येईल, कारण कितीही पळवलं तरी ते परत येतात?"

या प्रश्नाचं उत्तर देताना डॉ. खान सांगतात की, "सिट्रस फळांमध्ये (लिंबूवर्गीय फळ) एक घटक असतो, ज्याला लिमोनिन म्हणतात. जसा एखादा वास आपल्याला आवडत नाही आणि त्याचा आपल्याला त्रास होतो.

"तसंच झुरळांसाठी हा लिमोनिन असतो. म्हणून झुरळांना पळवण्यासाठी बाजारातील उत्पादनांमध्ये हा घटक वापरला जातो."

पण झुरळही काही कमी नसतात. तुम्हाला दिसेल की जर ते त्यातून वाचले आणि नाहीसे झाले. तर काही काळानंतर किंवा दिवसांनंतर ते पुन्हा दिसतात. हे कसं घडतं?

डॉ. खान एका ओळीत सांगतात की, "झुरळ परिस्थितीशी जुळवून घेण्यात खूप पुढे असतात. ते या सर्व गोष्टींशी जुळवून घेतात आणि त्यांचा प्रतिकार करतात. याच कारणामुळे ते लाखो वर्षांपासून टिकून आहेत."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)