पंढरपूरचा विठोबा 'घागरीत' बंद केला तरी साने गुरुजींनी अस्पृश्यांसाठी मंदिर खुलं करुन दाखवलं

फोटो स्रोत, Sane Guruji Smarak Samiti, Pandharpur
- Author, डॉ. श्रीरंग गायकवाड
- Role, बीबीसी मराठीसाठी
पंढरपूरचं श्री विठ्ठल मंदिर तत्कालीन अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांसाठी वर्षानुवर्षे बंद होतं. त्यासाठी साने गुरुजींनी उपोषण करत आपले प्राण पणाला लावले. त्यामुळं मंदिर सर्वांसाठी खुलं झालं.
2024 साली कार्तिकी एकादशीला या घटनेला 77 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्तानं बीबीसी मराठीनं गुरुजींनी उभारलेल्या लोकलढ्याची ही कहाणी प्रसिद्ध केली होती :
“पंढरपूरचं विठ्ठल मंदिर हरिजनांना मोकळं व्हावं, म्हणून मी मरायला उभा राहिलो आहे. पंढरपूर म्हणजे महाराष्ट्राचं हृदय. महाराष्ट्राच्या जीवनाची किल्ली. पंढरपूरची कळ दाबली, तर महाराष्ट्रभर प्रकाश पडेल. या रूपानं महाराष्ट्रातील सर्व जीवनांतील अस्पृश्यता नष्ट व्हावी, दुष्ट रूढीची कुलपं गळून पडावीत. मी माझ्या प्राणांचं तेल घालण्यासाठी उभा आहे...” राज्यातील जनतेच्या हृदयाला हात घालणारं हे भाषण साने गुरुजी 1946-47 मध्ये गावोगावी जाऊन करत होते.
पंढरपूरचं श्री विठ्ठल मंदिर अस्पृश्य समजल्या जातींना खुलं करावं म्हणून 1946च्या नोव्हेंबरमध्ये प्राणांतिक उपोषण करण्याची घोषणा पांडुरंग सदाशिव साने गुरुजी यांनी केली.
4 नोव्हेंबरला प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात साने गुरुजी म्हणाले होते, “आज कार्तिकी एकादशी. प्लेग असला तरी पंढरपूरची यात्रा जमेल. विठ्ठलाच्या चरणांचे संतांनी ‘समचरण’ म्हणून वर्णन केले. ते चरण भेदभाव करीत नाहीत. ते सर्वांभूती सम आहेत. परंतु हरिजनांना त्या चरणांवर का बरं डोकं ठेवता येऊ नये?
"पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिराच्या व्यवस्थापकांना माझी प्रार्थना आहे की, त्यांनी देवाजवळ सर्व लेकरांस येऊ द्यावे. तशी त्यांनी घोषणा करावी. तोपर्यंत मी उपवास करीत राहीन. ”


'विठूराया मुक्ती' साठी दिग्गजांची चळवळ
वर्तमानपत्रांत ही बातमी वाचून सेनापती बापट, अच्युतराव पटवर्धन, एस. एम. जोशी आदी मंडळी तातडीनं साने गुरुजींना भेटायला गेली. त्यांनी गुरुजींना पाठिंबा दिला. त्याचबरोबर उपोषण करण्यापूर्वी महाराष्ट्रभर दौरा करावा.
जनतेला आपलं म्हणणं समजावून सांगावं. जनमतही आपल्या बाजूला उभं करावं, असं सुचवलं. त्यानुसार मंदिर प्रवेशाला अनुकूल असणाऱ्या लोकांचं एक 'हरिजन मंदिर प्रवेश मंडळ' स्थापन करण्यात आलं.
'हरिजन सेवक संघा'नं त्यासाठी पुढाकार घेतला आणि 7 जानेवारी 1947 पासून गुरुजींच्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात मुंबई, पुणे येथील विराट सभांपासून झाली.
महाराष्ट्राच्या बहुतेक जिल्ह्यातून गुरुजींचा दौरा झाला. रोज ठिकठिकाणी पाच ते सहा जाहीर सभा होत. या सभांना प्रचंड गर्दी होई. हजारो स्त्री-पुरुष गुरुजींचे विचार ऐकत आणि त्यांना पाठिंबा देत.
त्यांचा हा महाराष्ट्र दौरा चार महिने चालला. एकट्या पश्चिम महाराष्ट्रात गुरुजींनी तब्बल 400 सभा घेतल्या. त्यातून मंदिर प्रवेशाबद्दलची जोरदार जनजागृती झाली.

फोटो स्रोत, Sane Guruji Smarak Samiti, Pandharpur
या महाराष्ट्रव्यापी दौऱ्यामध्ये साने गुरुजींच्या सोबत सेनापती बापट, क्रांतीसिंह नाना पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील, स्वामी केवलानंद सहजानंद भारती, काकासाहेब बर्वे, आचार्य अत्रे या लोकनेत्यांच्या सहभागामुळं विठूराया मुक्तीची चळवळ महाराष्ट्रभर पोहोचली.
संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज, कुशाबा महाराज तनपुरे, दादा महाराज सातारकर आदी समाजधुरिणांसह सत्यशोधक सुधारक प्रबोधनाच्या चळवळीनं गुरुजींच्या आंदोलनाला पाठबळ दिलं.
महाराष्ट्रातील भाविक, वारकरी, फडकरी आणि दिंडी समाजानं या आंदोलनाला पाठिंबा दिला. ‘गोफण’ या वृत्तपत्राच्या मालक-संपादक जोडगोळीनं साने गुरुजींच्या उपोषणाच्या मागची भूमिका लोकांसमोर निर्भिडपणे मांडली.
त्यामुळंच सर्व जाती, धर्माच्या नागरिकांनी साने गुरुजींच्या भूमिकेला पाठिंबा दिला. या प्रबोधनाच्या आणि जनमानस घडविण्याच्या लढ्यात राष्ट्र सेवा दल सैनिक आणि महाराष्ट्र शाहिरी कलापथक अग्रभागी होतं.
10 लाख लोकांची स्वाक्षरी मोहीम
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळानं प्रसिद्ध केलेल्या ‘महाराष्ट्राचे शिल्पकार’ या पुस्तक मालिकेतील राजा मंगळवेढेकर लिखित ‘साने गुरुजी’ पुस्तकामध्ये वरील वृत्तांत सविस्तरपणे आला आहे. यात मंगळवेढेकरांनी गुरुजींना ‘सेनानी साने गुरुजी’ असं संबोधलं आहे.
मंगळवेढेकरांनी नमूद केल्यानुसार “साने गुरुजींना या लढ्याची प्रेरणा आचार्य विनोबा भावेंकडून मिळाली. 'पुणे करार झाला त्याला 14 वर्षे झाली. या अवधीत हरिजनांसाठी आम्ही किती मंदिरं उघडली, किती विहिरी मोकळ्या केल्या, हरिजनांना किती जवळ घेतलं, याचा हिशोब द्या', असं विनोबा म्हणाले होते. यातून साने गुरुजींना पंढरपूरच्या मंदिर प्रवेशासाठी प्रेरणा मिळाली आणि त्यांनी हालचाली सुरू केल्या.”
“मंदिर प्रवेशाबाबतच्या गुरुजींच्या प्रयत्नांना महाराष्ट्राच्या विविध भागांमधून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. हरिजन सेवक संघाच्या दस्तऐवजांनुसार, या सत्याग्रहादरम्यान 200 मंदिरं अस्पृश्यांसाठी खुली करण्यात आली.
साने गुरुजींच्या दौऱ्याला प्रतिसाद म्हणून काही विहिरीदेखील खुल्या करण्यात आल्या. पंढरपूरमधील मंदिर खुलं व्हावं यासाठी हरिजन सेवक संघानं घेतलेल्या स्वाक्षरी मोहिमेवर 10 लाख लोकांनी सह्या केल्या,” असं चैत्रा रेडकर यांनी 15 मे 2021च्या ‘साप्ताहिक साधना’मध्ये लिहिलेल्या लेखात म्हटलं आहे.
अखेर मंदिर मुक्ती आंदोलनासाठी साने गुरुजी पंढरपुरात दाखल झाले. 1 मे 1947 रोजी सकाळी चंद्रभागा नदीच्या वाळवंटात मोठी जाहीर सभा झाली. त्या आधीपासून पंढरीत सनातनी मंडळींनी मंदिर प्रवेश आंदोलनाच्या विरोधात सभा घेतल्याच होत्या.
'जाव साने भीमापार, नही खुलेगा विठ्ठल द्वार' अशा घोषणा जात होत्या. चंद्रभागेच्या सभेतही विरोध केला गेला.

फोटो स्रोत, Sane Guruji Smarak Samiti, Pandharpur
साने गुरुजींच्या या आंदोलनाला त्या काळात कोणी विरोध केला हे सांगताना संत साहित्याचे अभ्यासक ह. भ. प. ज्ञानेश्वर बंडगर म्हणाले, ‘‘4 फेब्रुवारी 1947 रोजी वारकऱ्यांची एक बैठक झाली. या बैठकीत अस्पृश्यांच्या प्रवेशासाठी चालवलेल्या प्रयत्नांचा, तसेच येऊ घातलेल्या अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेश बिलाचा तीव्र निषेध करण्याचा ठराव पास करण्यात आला.
अस्पृश्यांचा मंदिर प्रवेश हा धर्मपरंपरेला बाधा आणणारा आहे, असं समजून या मंदिर प्रवेशाला विरोध करण्यासाठी एक मंडळ नेमण्यात आलं. विठ्ठल मंदिरातील पुरोहित विशेषतः बडवे समाज अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशाच्या विरोधात होता.
श्रीपाद जेरेशास्त्री हे शंकराचार्य अस्पृश्यांना मंदिर प्रवेश देण्याच्या विरोधात ठाम उभे होते. पंढरपूर आणि इतरही अनेक ठिकाणच्या धर्मपंडितांचा मंदिर प्रवेशाला विरोध होता.
सनातनी धर्मधुरीण, पुरोहितशाही आणि सनातन्यांच्या प्रभावातले वारकरी अशा तिघांच्या अभद्र युतीतून गुरुजींच्या सत्याग्रहाविरोधात आघाडी उभारली गेली. त्यामुळं अखेर 1 मे 1947 रोजी साने गुरुजींनी प्राणांतिक उपोषणाला सुरुवात केली.’’
संत गाडगेबाबांच्या प्रेरणेनं कुशाबा तनपुरे महाराजांनी पंढरपुरात आपल्या मठातील जागा साने गुरुजींना उपोषणासाठी उपलब्ध करून दिली.
या आंदोलनामुळं पंढरपूरला आणि विशेषतः तनपुरे मठाला छावणीचं स्वरुप आलं. धर्मक्षेत्र असलेलं पंढरपूर कुरुक्षेत्र बनलं. पत्रकार आचार्य अत्र्यांनी आपल्या भाषणानं पंढरपूर दणाणून टाकलं.
‘असेंब्लीतल्या कायद्यापेक्षा, हृदयाचा कायदा श्रेष्ठ वाटतो’
महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचा गुरुजींच्या या उपोषणाला विरोध होता. कायदा होणारच आहे तर विरोध कशाला हा त्यांचा तर्क होता.
त्याबाबत चैत्रा रेडकर लिहितात, “गांधींनी तार पाठवली, विनोबांनी पत्र पाठवलं, तरीही साने गुरुजींनी उपोषणाचा निर्णय बदलला नाही. गांधींच्या पत्राला उत्तर देताना साने गुरुजींनी लिहिलं, ‘‘मंदिराबाबतचा कायदा केव्हा होईल तेव्हा होवो. माझे डोळे त्याकडं कधीच नव्हते. मी बडवे मंडळींसमोर उभा आहे. या उपवास काळात एखाद्या वटहुकुमानं मंदिर उघडलं, तर तांत्रिकदृष्ट्या प्रतिज्ञापूर्ती होईल; परंतु मला आनंद नाही. आत्मक्लेशानं ब्रिटिशांचीही हृदयं आम्ही वळवू पाहतो. मग बडवे मंडळींची मी का पाहू नये?’’
त्यावेळचा घटनाक्रम पुस्तकातून सांगताना राजा मंगळवेढेकर लिहितात, “गुरुजींनी मंदिर प्रवेशासाठी दौरा सुरू केला आणि नंतर उपोषण करणार म्हणून त्या वेळच्या काँग्रेस मंत्रिमंडळानं एप्रिलच्या अखेरीस घाईघाईनं मंदिर प्रवेशाचं बील सादर केलं होतं.
'त्यावरून कायदा होणारच आहे, मग उपोषण कशाला?' असाही प्रचार विरोधक करीत होते. गुरुजींना त्या वेळचे काँग्रेस श्रेष्ठीही तसा सल्ला देत होते. पण गुरुजींनी त्यांना नम्रपणे सांगितलं होतं, ‘असेंब्लीतल्या कायद्यापेक्षा मला हृदयाचा कायदा श्रेष्ठ वाटतो.’

उपोषणाचा एकेक दिवस उलटू लागला तशी गुरुजींची प्रकृती क्षीण होत चालली. सर्वत्र चिंतेचं वातावरण पसरलं. अशा परिस्थितीतच त्या वेळच्या मध्यवर्ती कायदेमंडळाचे अध्यक्ष दादासाहेब मावळंकर हे 5 मे रोजी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी म्हणून आले होते.
पंढरपुरातलं स्फोटक वातावरण पाहून त्यांनी लगेच हालचालींना सुरुवात केली. बडवे मंडळींशी वाटाघाटी केल्या. उपलब्ध 1938चा 'टेंपल अॅक्ट' पाहिला आणि त्यांनी त्यानुसार बडवे मंडळींना समजावून सांगितलं.
या चर्चेचा परिणाम तरुण बडवे मंडळींवर झाला. त्यांनी बदलत्या काळाची चाहूल ओळखली. वृद्धांना बाजूला सारून तडजोडीची भूमिका घेतली. त्यांनी तसं निवेदन न्यायालयात सादर केलं.
हरिजनांना मंदिर प्रवेश देण्यासाठी बडव्यांची हरकत राहिली नाही. दादासाहेबांनी गुरुजींची भेट घेऊन त्यांनाही सर्व कायदेशीर बाजू समजावून दिली. कारण अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार मंदिराचे ट्रस्टी बडवे हे गुरुजी म्हणतात तसे मंदिराचे दरवाजे हरिजनांना खुले करू शकत नव्हते, ही वस्तुस्थिती होती.
दादासाहेबांनी तीच गुरुजींना सांगितली. उपोषण मागं घेण्याची विनंती केली. गुरूजींनी सर्व वस्तुस्थिती लक्षात घेऊन मोठ्या नाखुषीनं ही विनंती मान्य केली. 10 मे 1947 रोजी गुरुजींनी आपलं 10 दिवसांचं उपोषण सोडलं!’’
‘घागर विठोबा’ची कहाणी
सानेगुरुजींच्या या ऐतिहासिक उपोषणानंतर काय घडामोडी घडल्या, याचं सविस्तर वर्णन ‘होय होय वारकरी’ या ज्ञानेश्वर बंडगर लिखित पुस्तकात आलं आहे.
ते लिहितात, “पाच जणांच्या बडवे कमिटीनं मंदिर खुलं करण्याचं निवेदन कोर्टात दिलं. त्याला विरोध करणारे पाच अर्ज कोर्टात दाखल झाले. त्यात 88 बडव्यांचा एक अर्ज कोर्टात होता. 100 पैकी 88 बडवे म्हणजे, 88 टक्के बडव्यांचा साने गुरुजींचा सत्याग्रह यशस्वी झाल्यानंतरही विरोध कायम होता.
त्यांच्यासोबतच सनातनी महाराजांचे आणि धर्मपंडितांचेही अर्ज होते. पण त्याचा उपयोग होणार नाही हे सनातनी जाणून होते. कोणत्याही क्षणी कोर्टाचा निकाल येऊन अस्पृश्यांना मंदिर खुलं होऊ शकतं याची त्यांना भीती होती. त्यावर त्यांनी एक हास्यास्पद उपाय शोधून काढला.

ते महापूजेचं निमित्त करुन मंदिरात गेले. तिथं देवाचं तेज एका घागरीत काढण्यासाठी काही मंत्र म्हटले. आता खरा विठोबा मंदिरात नाहीच. तो आमच्या 'घागरी'त आहे, असा अजब दावा त्यांनी केला. 'घागर विठोबा' म्हणून हा विठोबा पंढरपुरात प्रसिद्ध झाला.
1947 सालची आश्विन वद्य तृतीया म्हणजेच 17 ऑक्टोबर 1947 रोजी या 'घागर विठोबा'चा 'अवतार' झाला. पुढं 30 ऑक्टोबरला कोर्टानं 88 टक्के बडव्यांसह पाचही अर्ज फेटाळत मंदिर अस्पृश्यांना खुलं केलं. त्याच दिवशी पंढरपुरात जल्लोष साजरा करण्यात आला.
काही अस्पृश्य मानलेल्या भाविकांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. पुढं हळूहळू सर्वच वारकरी महाराज लोक मंदिरावरचा बहिष्कार उठवू लागले. 1997 मध्ये म्हणजे या घटनेनंतर 50 वर्षांनी अनेकांनी हा बहिष्कार उठवला.”
कसा झाला मंदिर प्रवेश?
मंदिर प्रवेशाच्या या इतिहासावर पांडुरंग भानुदास डिंगरे यांनी ‘मंदिर प्रवेशाचे महाभारत’ नावाचं पुस्तक लिहिलं आहे. त्यात साने गुरुजींच्या उपोषणानंतर अस्पृशांचा मंदिर प्रवेश कसा झाला, याचा सविस्तर वृत्तांत आला आहे.
या पुस्तकात नोंदवल्यानुसार, “प्रांतिक हरिजन सेवक संघानं केलेल्या आवाहनानुसार येत्या कार्तिकी एकादशीला म्हणजेच सोमवार दिनांक 24 नोव्हेंबर 1947 हा दिवस महाराष्ट्रभर ‘हरिजन मंदिर प्रवेश दिन’ म्हणून पाळावा.
साने गुरूजींनी विठ्ठल मंदिर हरिजनांना खुले व्हावे यासाठी, महाराष्ट्रभर जोराचा प्रचार केला व शेवटी श्री पांडुरंगाच्या पायापाशी उपवासही सुरू केला. या सर्व गोष्टींचा योग्य तो परिणाम होऊन, बडवे पंच कमेटीने निवेदन केले. ते कोर्टाने ग्राह्य मानून, 1 नोव्हेंबरपासून हरिजन श्रीपांडुरंगाचे दर्शन अव्याहतपणे घेत आहेत.”
कार्तिकी एकादशीला हजारो भाविक, अस्पृश्य पंढरपुरात जमले. त्याचंही वर्णन ‘मंदिर प्रवेशाचे महाभारत’ या पुस्तकात करण्यात आलं आहे. त्यात नमूद केल्यानुसार, "मुंबई सरकारचे उद्योगमंत्री नामदार गणपतराव तपासे यांनी कार्तिक शुद्ध एकादशीच्या पवित्र दिवशी चंद्रभागेचे स्नान करून श्री विठ्ठल रूक्मिणी, भक्तराज पुंडलीक व श्री गोपालकृष्णाचें भक्तिपूर्वक दर्शन घेतले.
ता. 23 रोजी हरिजन मंदिर प्रवेशाचा कायदा सर्व मुंबई प्रांताला लागू झाल्यामुळे, श्री पांडुरंगाचे दर्शन घेऊन कार्तिकी यात्रा पुरी करण्याकरिता नामदार तपासे आपल्या कुटुंबीयांसह मुद्दाम पंढरपूर आले होते. सोमवारी सकाळी 10 वाजता पंढरपूरला त्यांचे आगमन झाले.
12 वाजता नामदार तपासे यांनी पवित्र चंद्रभागा तीर्थांत स्नान केले. नी काँग्रेस कार्यकर्त्यांसमवेत ते चंद्रभागेच्या वाळवंटातील श्री पुंडलिकरायाच्या दर्शनास गेले. पुंडलिकाचे दर्शन घेऊन, महाद्वार घाटाने नामदार तपासे श्री विठ्ठलाच्या दर्शनाला गेले.

बरोबर बराच जनसमुदाय असल्यामुळे, वाळवंटापासून नामदेव पायरीपर्यंत एक मिरवणूकच निघाली. राष्ट्रनेत्यांच्या नी 'पुंडलीक वर दे' च्या जयजयकारांत मिरवणूक नामदेव पायरीपाशी येताच, 5-7 सनातन्यांनी आरोळ्या ठोकून, आपला विरोध नामदारांच्या कानावर घालण्याचा प्रयत्न केला.
येवढ्या अफाट अनुकूल समाजात, आपला आवाज बुडून जाऊ नये म्हणून, पाश्चात्य लाऊडस्पीकरच्या मदतीने तो मुद्दाम मोठा करण्याचीही खास व्यवस्था सनातन्यांनी केली होती. परंतु लाख दोन लाख वारकरी पंढरपूरला जमले असता, सनातन्यांना हाताच्या बोटावार मोजण्याइतकेही विरोधक मिळू शकले नाहीत.
यातच त्यांच्या विरोधाची परस्पर किंमत नी शोभा झाल्याने, या किरकोळ विरोधाकडे एक कारूण्यपूर्ण दृष्टिक्षेप टाकून नामदार तपासे यांनी मंदिरांत प्रवेश केला.
प्रवेशद्वारांपाशी बडवे कमिटीच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. नामदारांनी भाविक बुद्धीने मंदिराचे निरीक्षण केले. हजारो वर्षे दूर लोटलेल्या हरिजन समाजाचे प्रतिनिधी म्हणून श्री पांडुरंगाच्या चरणाला कडकडून मिठी मारली.
श्री पांडुरंगाच्या गळ्यात पुष्पमाला घातल्या नी डोळे भरून पांडुरंगाला पाहून घेतले. चिरविरहानंतरच्या या भेटीचे दृश्य खरोखरीच अंतःकरण पिळवटून टाकणारे होते. बडव्यांनी श्रीपांडुरंगाच्या गळ्यांतील हार नामदाराच्या गळ्यांत घातला नी प्रसाद म्हणून नारळ अर्पण केला.
दर्शनानंतर बडवे कमिटीच्या वतीने नामदारांचा सत्कार करण्यात आला. श्री व्यंकोबा, लक्ष्मी, राही, सत्यभामा, यांचे दर्शन घेऊन नामदार मंत्री रुक्मिणीमातेच्या मंदिरात आले. नामदारांनी रुक्मिणीचे दर्शन घेतल्यावर, त्यांना तीर्थप्रसाद देऊन नंतर उत्पात कमिटीतर्फे त्यांचा सत्कार करण्यांत आला.
रात्री वारकऱ्यांच्या प्रचंड जाहीर सभेत नामदारांचे हृदयस्पर्शी भाषण झाले. सभेत रामभाऊ भोगे यांनी साने गुरूजीवर लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशनही नामदारांच्या हस्ते झाले."
पुढं मुंबई विधीमंडळात अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश देणारा कायदा झाला आणि देहू, आळंदी येथील मंदिरांसह राज्यातील इतर मंदिरं सर्वांसाठी खुली झाली.
साने गुरूजींच्या लढ्याचं स्मारक
मंदिर प्रवेशासाठी साने गुरूजींनी दिलेल्या लढ्याचं कुठल्याही प्रकारचं स्मारक वगैरे पंढरपुरात नव्हतं. या लढ्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं दोन वर्षांपूर्वी स्मारक उभारण्यासाठी राष्ट्र सेवा दलाचे राजाभाऊ अवसक यांनी पुढाकार घेतला.
ह. भ. प. बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली ज्या ठिकाणी साने गुरुजी उपोषणाला बसले होते, त्याच जागेवर तनपुरे महाराज मठामध्ये हे स्मारक उभं राहिलं.
मठाच्या चारोधाम मंडपातील या स्मारकात साने गुरूजींच्या पुतळ्यासह, मंदिर प्रवेश लढ्याची माहिती आणि चित्रं पाहता येतात.

फोटो स्रोत, Sane Guruji Smarak Samiti, Pandharpur
8 नोव्हेंबर 2022 रोजी शरद पवार यांच्या हस्ते या स्मारकाचं उद्घाटन झालं. पंढरपुरातील या स्मारकाबाबत बोलताना स्मारक समितीचे अध्यक्ष राजाभाऊ अवसक म्हणाले, ‘साने गुरुजींचा सामाजिक समतेचा लढा पुढच्या पिढीला माहिती व्हावा, पंढरपूर सामाजिक समतेच्या लढ्याचे आद्यपीठ व्हावं, यासाठी आम्ही हे स्मारक या ठिकाणी उभारलं आहे.
या स्मारकाच्या उभारणीसाठी विचारवंत आ. ह. साळुंखे डॉ. सदानंद मोरे, प्रा. श्रीमती चैत्रा रेडकर यांनी मार्गदर्शन केलं आहे.
तर स्मारक पूर्ण होण्यासाठी डॉ. श्रीरंग गायकवाड, दादासाहेब रोंगे, उपेंद्र टन्नू, अवधूत म्हमाणे, दत्तात्रय कोंडलकर, डॉ. अनिल जोशी, अशोक क्षीरसागर, सारंग कोळी, शिवाजी पांडुरंग शिंदे, शिवाजी मारुती शिंदे, नागेश अवताडे, तात्या कोळी, प्रकाश आणि अनुपमा पोळ, तसेच निशिकांत परचंडराव आदींनी प्रयत्न केले.
मंदिराचा ताबा कोणाकडं जाणार?
बडव्यांनी केलेल्या विरोधामुळं पंढरपूरच्या मंदिर प्रवेशाचं आंदोलन चर्चेत आलं. साने गुरुजींनी केलेलं उपोषण, जनमताचा रेटा, कायदा आणि न्यायालयाच्या निर्णयामुळं बडव्यांना माघार घ्यावी लागली. परंतु आजही ही न्यायालयीन लढाई सुरू आहे.
त्याबाबत पंढरपुरातील ज्येष्ठ पत्रकार सुनील उंबरे यांनी सांगितलं, की “श्री विठ्ठलाच्या दर्शनाला आलेल्या भोळ्या-भाबड्या वारकऱ्यांना देवाचं पौराहित्य करणारे बडवे आणि उत्पात ही मंडळी मानसिक, आर्थिक आणि शारिरीक त्रास देत असल्याच्या वारकरी, भाविकांच्या तक्रारी होत्या.
त्यामुळं 1967 – 68 मध्ये श्री विठ्ठल मंदिरातून ‘बडवे-उत्पात हटाव’चा नारा देण्यात आला. या प्रकरणी राज्य सरकारनं नाडकर्णी आयोगाची नियुक्ती केली. या आयोगानं वारकऱ्यांच्या तक्रारींची शहानिशा करुन सरकारला अहवाल सादर केला.
या अहवालाच्या आधारे राज्य सरकारनं 1973 मध्ये स्वतंत्र मंदिर कायदा तयार केला. त्यानंतर 1985 मध्ये सरकारनं मंदिर ताब्यात घेतलं. याविरोधात बडवे, उत्पात न्यायालयात गेले. त्यावर न्यायालयानं मंदिराचं कामकाज सरकारनं पाहावं आणि देवाची पूजाअर्चा, रुढी, परंपरा बडवे, उत्पातांनी पाहाव्यात असे आदेश दिले.’’
“1985 ते 2014 या कालावधीत सरकार आणि बडवे हे समन्वयानं मंदिराचा कारभार पाहात होते. दरम्यान तब्बल 35 वर्षे न्यायालयात खटला सुरू होता.
"शेवटी 2014 मध्ये या खटल्याचा निकाल लागला आणि सर्वोच्च न्यायालयानं बडवे, उत्पात आणि सेवाधारी यांचे अधिकार संपुष्टात आणत मंदिर राज्य सरकारच्या ताब्यात दिलं. त्यानुसार गेली 10 वर्षे राज्य सरकार मंदिराचा कारभार पाहात आहे.
"या दरम्यान बडवे, उत्पातांनी न्यायालयात दाद मागण्याचा प्रयत्न केला, पण न्यायालयानं खटला दाखल करुन घेण्यास नकार दिला. तथापि गेल्या वर्षभरापूर्वी भाजप नेते डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी या विषयात लक्ष घातलं असून मुंबई उच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे,” असं उंबरे यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Sane Guruji Smarak Samiti, Pandharpur
यापाठीमागं डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांची भूमिका काय आहे, याबद्दल उंबरे यांनी सांगितलं, “डॉ. स्वामीच्या मते सरकारला कोणतंही मंदिर ताब्यात घेण्याचा अधिकार नाही. एखाद्या मंदिरात वादविवाद आहेत, अनियमितता आहे, तर सदर मंदिर काही काळासाठी ताब्यात घेण्याचा अधिकार सरकारला आहे, पण मंदिर काय स्वरूपी स्वतःकडं ठेवण्याचा अधिकार नाही."
"तामिळनाडूमधील पद्मनाभ, चिदंबरम् आदी मंदिरं तेथील सरकारनं वेगवेगळ्या कारणासाठी ताब्यात घेतली होती. त्याबाबत डॉ. स्वामी यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाला त्यांची बाजू पटल्यानं मंदिरं पूर्वीच्या व्यवस्थापनाकडं सुपूर्द करण्यात आली.
"तोच आधार घेत डॉ. स्वामी पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिराबाबत मुंबई उच्च न्यायालयात गेले आहेत. याप्रकरणी गेल्या वर्षभरात चार ते पाच सुनावण्या झाल्या आहेत. न्यायालयानं राज्य सरकारला याबाबत भूमिका मांडायला सांगितली आहे. ही सुनावणी वेगानं सुरू असून येत्या वर्षभरातच याचा निकाल येणं अपेक्षित आहे," असं उंबरे सांगतात.
दरम्यान, डॉ. स्वामी यांच्या भूमिकेला ‘मंदिर बचाव कृती समिती’नं विरोध दर्शविला आहे. या समितीनं न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना पत्रकार सुनील उंबरे म्हणाले, “या सगळ्या घडामोडींत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व्यवस्थापन मात्र तटस्थ आहे. कारण डॉ. स्वामी यांच्या याचिकेला न्यायालयात सरकारचं उत्तर देत आहे. दुसरीकडं सरकारचं हे उत्तर किती दमदार असेल, याबाबत ‘मंदिर बचाव समिती’ला साशंकता आहे.
"डॉ. स्वामी यांच्या भूमिकेला जसा विरोध आहे, तसा पाठिंबादेखील मोठ्या प्रमाणात आहे. वारकरी संप्रदायातील काही मंडळी आणि हिंदुत्ववादी संघटना डॉ. स्वामी यांच्या भूमिकेचं जोरदार समर्थन करत आहेत. सध्या तरी हा विषय न्यायालयात प्रलंबित आहे. त्याचा निकाल काय लागेल, याची उत्सुकता उभ्या महाराष्ट्राला लागली आहे,” असं उंबरे सांगतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











