पाऊस पडल्यानंतरच कीटकांचे थवे का येतात? कीटकांना खाणं योग्य असतं का?

    • Author, के. सुभगुनम
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

मान्सूनचे ढग दाटू लागताच आणि पाऊस पडू लागताच, अनेक घरांमध्ये कीटक मोठ्या संख्येनं येऊ लागतात. इतके की जणूकाही त्यांचा पूरच येतो.

गावांमध्ये, पावसाळ्यात घराभोवती उडणाऱ्या माशा, कीटक यांना पकडताना आपण लोकांना पाहतो.

ते कीटक पकडतात, त्यांचे पंख काढतात आणि त्यांना बांबूच्या टोपलीत गोळा करतात.

टोपलीभर कीटक गोळा केल्यानंतर, ते त्यांना एका तव्यावर तळतात. त्यानंतर त्या कीटकांचं डोकं आणि शरीर वेगळं केलं जातं.

मग काट्यानं, त्या कीटकांचं डोकं आणि उरलेले पंख वेगळे केले जातात. भाजलेल्या कीटकांना अनेक प्रकारे खाल्लं जातं. त्यांची पावडर केली जाते आणि अन्नात त्यांचा वापर केला, इतरही वेगवेगळ्या प्रकारे ते खाल्ले जातात.

मात्र हे कीटक पावसाळ्यातच का येतात? त्यांचा जीवनकाल फक्त एक दिवसाचाच असतो हे खरं आहे का? त्यांना खाणं योग्य असतं का?

यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही कीटकशास्त्रज्ञांनी बोललो.

हे कीटक नेमके कुठून येतात?

आपल्यापैकी अनेकांना माहीत नसतं की वाळवी ही काही कीटकांची वेगळी प्रजाती नसते. खरं तर वाळवी म्हणजे पंख वाढलेली वाळवी किंवा कीटक.

किबंहुना, वाळवी ही कीटकांच्या पुढील पिढीच्या जन्माचं मुख्य कारण असतं.

मुंग्यांप्रमाणेच वाळवीदेखील समूहानं राहणारे जीव असतात. वाळवी मोठ्या संख्येनं एकत्र राहतात. म्हणजे त्यांची एक वसाहतच असते. ती काही हजारांपासून ते लाखोपर्यंत असू शकते.

ज्याप्रमाणे मधमाशा आणि मुंग्या यासारखे कीटक समूहानं राहतात त्याचप्रमाणे वाळवीदेखील चार गटांमध्ये वसाहती करून राहतात. ते चार गट म्हणजे राणी, राजा, कामकरी आणि सैनिक वाळवी.

राणी वाळवी ही घरं, लाकडं पोखरण्यासाठी जबाबदार असते. ती दर मिनिटाला 25 अंड्यांपासून ते दररोज काही हजार अंडी घालते.

वाळवीमध्ये एक अद्भूत वैशिष्ट्यं असतं. ते मधमाशा आणि मुंग्यासारख्या सामाजिक जीवनशैली असणाऱ्या समूहात राहणाऱ्या कीटकांमध्ये नसतं.

"सर्वसाधारणपणे प्रजननाच्या प्रक्रिया संपली की नर मुंगी किंवा नर मधमाशी मरतात. मात्र वाळवीच्या बाबतीत राणी आणि राजा दोन्ही एक वसाहत तयार करतात," असं डॉ. प्रियदर्शन धर्मा राजन म्हणाले. ते बंगळूरूतील अशोका फाउंडेशन फॉर एन्व्हायर्नमेंटल रिसर्चमध्ये कीटकशास्त्रज्ञ आहेत.

डॉ. प्रियदर्शन राजन म्हणाले, राणी वाळवीच्या शरीरात शुक्राणू साठवण्याची क्षमता नसते. त्यामुळे राजा वाळवी तिच्यासोबतच राहतो आणि अनेक वर्षे प्रजननाचं काम करत राहतो.

त्याशिवाय, ते म्हणाले की वसाहतीमध्ये ज्याप्रमाणे एक राणी आणि एक राजा असतो. त्याचप्रमाणे तिथे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात काही नर आणि मादी वाळवीदेखील असतात.

डॉ. राजन म्हणाले, "जर वसाहतीचे मुख्य सदस्य असलेले राजा किंवा राणी यांचा मृत्यू झाला, तर या दुसऱ्या स्तरातील नर आणि मादा वाळवी त्यांची जागा भरून काढतात. त्यामुळे, त्यांच्या या सामाजिक रचनेमुळे वसाहतीत अनेक वर्षे प्रजननाची क्रिया होत नवीन पिढी येत राहते."

आपण अनेक ठिकाणी वाळवीची उंच वारूळं पाहिलेली आहेत. त्याकडे पाहिल्यावर आपल्या लक्षात येतं की त्या वारूळानं अनेक पिढ्या पाहिल्या आहेत.

पावसाळ्यात घरांवर मोठ्या थव्यानं येणाऱ्या वाळवी आणि त्यांची वारूळं यांची वाळवीच्या ढिगाऱ्याच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका असते.

कीटक फक्त पावसाळ्यातच का येतात?

डॉ. प्रियदर्शन यांच्या मते, वाळवीच्या एखाद्या वसाहतीत, फक्त राणी आणि राजा वाळवीच त्याच्या अस्तित्वासाठी आणि वाढीसाठी जबाबदार नसतात. तर प्रजननाची क्षमता असलेले अनेक नर आणि मादी वाळवीदेखील त्यासाठी जबाबदार असतात.

"ते पावसाळ्यात बाहेर पडतात आणि प्रजननासाठी उंच उडतात. या घरट्यातून किंवा वारूळातून बाहेर आलेल्या पंख असलेल्या वाळवीला आपण कीटक म्हणतो," असं ते म्हणतात.

कीटकशास्त्राच्या अभ्यासक सहनाश्री रामकृष्णय्या याबद्दल सविस्तर माहिती देतात.

त्या म्हणाल्या, "वाळवी ज्या पोळ्यांमध्ये किंवा वारूळांमध्ये राहतात, तिथून ते हजारोंच्या संख्येनं बाहेर पडतात आणि नवीन वारूळं तयार करतात."

हे करण्यासाठी त्यांच्यासाठी पावसाळा हीच आदर्श वेळ का असते, याबद्दल त्यांनी सांगितलं.

मान्सूनमध्ये हवा खूप दमट असते. सहानाश्री म्हणतात की आर्द्रता आणि उष्णता यांचं मिश्रण या काळात असतं. हे वाळवीसाठी अतिशय योग्य, परिपूर्ण वातावरण असतं.

पावसाळा हा फक्त वाळवीसाठीच प्रजनन काळच नसतो, तर तो इतर अनेक प्रजातींसाठी महत्त्वाचा असतो. यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे या ऋतूमध्ये मोठ्या प्रमाणात अन्न उपलब्ध असतं.

वाळवीच्या वारूळांबद्दल किंवा ढिगाऱ्याबद्दल सहानाश्री म्हणाल्या, "पाऊस पडल्यानंतर, मातीत ओलावा येतो. त्यामुळे माती मऊ होते. त्यामुळे नव्यानं जोडले गेलेल्या किंवा प्रजननात सहभागी झालेल्या वाळवीच्या जोड्यांना जमिनीत छिद्र पाडणं आणि नवीन वारूळ तयार करणं सोपं होतं."

वाळवी किंवा हे कीटक फक्त एकच दिवस जगतात किंवा त्यांचा जीवनकाल फक्त एक दिवसाचाच असतो, याबाबत विचारलं असता, त्या म्हणाल्या, "ते खरं नाही."

त्या पुढे म्हणाल्या, "सहसा प्रजननासाठी काही हजार जोड्या वारूळातून बाहेर पडतात. मात्र त्यांचा मृत्यूदर खूप जास्त असल्यामुळे, त्यातील फार थोडे वाचतात आणि नवीन वारूळ तयार करतात. हे शेकडो किंवा हजारो कीटक चटकन मरतात, यावर त्यांचा जीवनकाल एक दिवसाचा असतो हे मिथक आधारित असावं."

लोक कीटक किंवा वाळवी खाऊ शकतात का?

वारूळातून मोठ्या संख्येनं बाहेर पडणाऱ्या वाळवीचा मृत्यूदर खूप जास्त असतो. कारण आसपासच्या वातावरणात पक्षी, कीटक भक्षक जीव आणि बेडूक असतात.

त्याचवेळी कीटकशास्त्रज्ञ डॉ. प्रियदर्शन म्हणतात की वाळवीच्या किंवा कीटकांच्या उच्च मृत्यूदरामागे मानव हेदेखील एक कारण आहे.

सहानाश्री म्हणतात की भारताच्या अनेक भागांमध्ये वाळवी किंवा कीटक अन्न म्हणून खाण्याची प्रथा अस्तित्वात आहे.

त्या पुढे म्हणतात, "पावसाळ्यात जेव्हा हे कीटक प्रचंड संख्येनं बाहेर पडतात, तेव्हा ग्रामीण भागातील लोक त्यांना अन्नसाठी गोळा करतात. काही ठिकाणी, या कीटकांना वाळवलं जातं, भाजलं जातं आणि मग मसूरसारख्या डाळीत ते मिसळून त्याचा अन्न म्हणून वापर केला जातो."

सहानाश्री म्हणतात की एकेकाळी या कीटकांना अतिशय पौष्टिक, स्वादिष्ट अन्न मानलं जात होतं. "यातून ग्रामीण भागातील अन्नाची परंपरा आणि प्रोटीनच्या शाश्वत स्रोतांमधील दृढ संबंधांचं प्रतिबिंब उमटतं."

हे कीटक किंवा वाळवी खाणं योग्य असतं का आणि त्यात खरोखरंच मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतं का? हा प्रश्न विचारल्यावर आहारतज्ज्ञ प्रियंका म्हणाल्या, "अन्न म्हणून या कीटकांना खाण्याची प्रथा अजूनही विविध प्रदेशांमध्ये आहे. आपण ज्याप्रमाणे कोंबडी, बोकड आणि इतर प्राणी खातो, त्याप्रमाणेच ते आहे."

"त्यामुळेच निरोगी पद्धतीनं हे कीटक खाण्यात कोणतीही समस्या नाही. मात्र, त्यामध्ये खूप प्रोटीन असतं असं जरी म्हटलं जात असलं, तरी भारतात अद्याप त्यावर मोठ्या प्रमाणात वैज्ञानिक अभ्यास करण्यात आलेला नाही," असं त्या म्हणाल्या.

भारतात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा, झारखंड, छत्तीसगड, मेघालय आणि आसाम या राज्यांमध्ये अजूनही या कीटकांना अन्न म्हणून खाण्याची पद्धत आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.