'दोषी पाद्री बजिंदरला फाशी देऊ नका', बलात्कार पीडित महिलेनेच अशा प्रकारची मागणी का केली?

फोटो स्रोत, BAJINDER SINGH
पंजाबमधील पाद्री बजिंदर सिंगला बलात्काराच्या गंभीर आरोपाखाली न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. हे प्रकरण देशभरात मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय ठरले होते.
जालंधरमधील 'द चर्च ऑफ ग्लोरी अँड विस्डम'चा संस्थापक पाद्री बजिंदर सिंगला 2018 सालच्या एका बलात्कार प्रकरणात मोहाली न्यायालयानं दोषी ठरवलं. त्याला 1 एप्रिल रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
न्यायालयाच्या या निर्णयानंतर पोलिसांनी बजिंदर सिंगला अटक केली आहे.
यावेळी सुनावणीदरम्यान मोहाली न्यायालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
झिरकपूर येथे राहणाऱ्या पीडितेच्या तक्रारीवरून बजिंदर सिंगसह 6 जणांविरुद्ध 2018 साली बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. शुक्रवारी (28 मार्च) न्यायालयानं उर्वरित पाच आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
उल्लेखनीय म्हणजे, काही दिवसांपूर्वी बजिंदर सिंगवर लैंगिक छळाचा आणखी एक गुन्हा दाखल झाला होता. त्याचा तपास अजूनही सुरू आहे.


'आमच्यावर खूप दबाव होता'
न्यायालयाच्या निर्णयावर पीडित महिलेनं समाधान व्यक्त केलं आहे.
निर्णयानंतर पीडित महिला म्हणाली, "मी न्यायासाठी गेली सात वर्षे न्यायालय आणि पोलिसांच्या चकरा मारत होते. परंतु, आजच्या सुनावणीनंतर मला खूप आनंद झाला आहे. "
या सुनावणीनंतर त्यांनी न्यायाधीश आणि वकिलांचे आभार मानले.

"हा प्रवास एक मुलगी म्हणून खूप कठीण होता. तुमच्यावर गुन्हे दाखल केले जातात, त्यावेळी तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं. आमच्यावर खूप दबाव होता, आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या."
"त्याला फाशीची नव्हे, तर जन्मठेपेची शिक्षा व्हावी. तो तुरूंगातच राहावा, अशी माझी इच्छा आहे," असं पीडित महिला म्हणाली.
त्या पुढं म्हणाल्या की, बजिंदर सिंग धर्माच्या नावावर लोकांना मूर्ख बनवत आहे. त्यानं डीजीपींकडे सुरक्षेची मागणीही केली आहे.
काय म्हणाले वकील?
पाद्री बजिंदर सिंग याच्यावर आता अनेक आरोप होत आहेत. मात्र, आणखी बऱ्याच गोष्टी सर्वांसमोर उघड होतील, असं पीडित महिलेचे वकील अनिल के. सागर यांनी म्हटलं.
त्यांनी सांगितलं, "न्यायालयानं पाद्री बजिंदर सिंगला बलात्कार प्रकरणात दोषी ठरवलं आहे. या प्रकरणात 1 एप्रिल रोजी शिक्षा सुनावली जाईल."

त्याच्यावर सहा-सात कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही सर्व कलमे खूप गंभीर आहेत. या प्रकरणात एका आरोपीचा मृत्यू झाला आहे आणि न्यायालयानं पाच जणांची निर्दोष मुक्तता केली आहे.
कोण आहे पाद्री बजिंदर सिंग?
पाद्री बजिंदर हा हरियाणातील कर्नाल जिल्ह्यातील असून तो जाट समाजाचा आहे. त्याच्या चर्चच्या देशभरात 260 शाखा आहेत आणि त्याची सर्वात मोठी शाखा मोहाली जिल्ह्यातील न्यू चंदीगड येथे आहे.
पाद्री बजिंदर सिंग हा जालंधर जिल्ह्यातील ताजपूर गावात चर्च चालवतो. त्याला 'ग्लोरी ऑफ विस्डम चर्च' असं म्हणतात.
हरियाणातील यमुनानगर येथील जाट कुटुंबात जन्मलेल्या बजिंदर सिंगनं 15 वर्षांपूर्वी एका खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगवास भोगला होता. त्यावेळी त्यानं ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता.

फोटो स्रोत, PROPHET BAJINDER SINGH MINISTRIES/FB
काही दिवसांपूर्वी एका महिलेनं पाद्रीवर लैंगिक छळाचा आरोप केला. या प्रकरणी कपूरथला पोलिसांनी शहर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 354-ए, 354-डी आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला.
पाद्री बजिंदर सिंग यापूर्वीही वादात सापडला आहे.
वर्ष 2023 मध्ये आयकर विभागानं जालंधरमधील पाद्री बजिंदरशी संबंधित जागेवरही छापेमारी केली होती.
पाद्री बजिंदर अनेक वर्षांपूर्वी एका खुनाच्या प्रकरणात तुरुंगात गेला होता.
पाद्री बजिंदर सिंगचं स्पष्टीकरण
पाद्री बजिंदर सिंग यानं जालंधरमध्ये पत्रकार परिषद घेऊन कपूरथला शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्याच्या संदर्भात त्यांच्यावरील लैंगिक छळाचे सर्व आरोप फेटाळले होते.
बजिंदर सिंगनं दुसऱ्या पाद्रीचं छायाचित्र दाखवून गेल्या पाच वर्षांपासून हा पाद्री आपल्यासोबत गैरवर्तन करत असल्याचं सांगितलं.
तो म्हणाला, "तो व्यक्ती तिथेच राहतो जिथे मी राहत होतो. तो आधी पाद्री झाला, मग नंतर मी बनलो. त्यामुळं नंतर तो माझ्याशी भांडायला लागला. त्यानं माझ्याबद्दल अपशब्द बोलायला सुरुवात केली."
"त्यानं माझ्यावर आरोप केले की, मी मुलींशी संबंध ठेवतो. आम्ही पंजाबमध्ये लोकांना अमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर राहायला शिकवतो, देवानं दाखवलेल्या मार्गावर चालायचं शिकवतो. माझ्यावर कोणताही वादाचा किंवा अंमली पदार्थांच्या व्यसनांचा आरोप नाही."

पाद्री बजिंदरनं त्या व्यक्तीवर दाखल केलेल्या एफआयआरची प्रतही दाखवली. माझ्याविरोधात रचण्यात आलेला हा कट आहे. तो पाद्री त्या मुलीबरोबर पत्रकार परिषदेत दिसतो असं बजिंदर सिंगनं म्हटलं होतं.
आरोप करणाऱ्या मुलीचा पतीही त्याच पाद्रीचा अनुयायी असल्याचं बजिंदर सिंगनं म्हटलं.
'पूर्वी ती आमच्या चर्चमध्ये यायची'
बजिंदर म्हणाला, "मी कोणाचे फोन उचलत नाही आणि मी कोणाला भेटतही नाही. माझं काम प्रार्थना करणं आहे. माझ्याकडे तेवढा वेळही नसतो."
"ते आता माझ्यावर आरोप करत आहेत. कारण दोन-अडीच वर्षांपूर्वी ते इथल्या चर्चमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करत होते."
"ते इथे फसवणूक करताना, लोकांकडे पैसे मागताना सापडले होते. आम्ही त्यांना आधी तोंडी ताकीद दिली होती. परंतु, त्यांनी आमचं ऐकलं नाही. तेव्हा आम्ही त्यांच्यावर गुन्हाही दाखल केला होता."
"ज्या दिवशी तिने माझ्याविरोधात तक्रार दाखल केली, त्या दिवशी तिचा मामा इथे चर्चेमध्ये होता. तो इथे शेजारीच राहतो. नंतर त्यांनी मामालाही इथं येण्यापासून रोखलं. माझ्यावर खोटे आरोप केले जात असल्याचं मामा म्हणतो."
तो पुढे म्हणाला, "इथं चर्चमध्ये कॅमेरे आहेत. त्यांच्याकडे कोणताही पुरावा नाही. मलाही मुलं आहेत, तेही अस्वस्थ आहेत. माझी मुलगी 14 वर्षांची आहे, मी असं का करेन?"
"माझी मुलगी मला सातत्यानं प्रश्न विचारत आहे. आम्ही एक कुटुंब आहोत. आमचं काम सेवा करणं, प्रार्थना करणं आहे. अशा प्रकारचं कृत्य आम्ही कसं करू शकतो?"
पाद्री बजिंदर सिंगचे प्रतिनिधी अवतार सिंग यांनी बीबीसीशी बोलताना सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
ते म्हणाले, "पाद्री बजिंदर सिंगवर लावण्यात आलेले आरोप खोटे आणि निराधार आहेत. हे सर्व आरोप एका कटाचा भाग आहेत."
आयकर विभागानं जालंधरमध्ये छापा टाकल्याची माहिती अवतार सिंग यांनी यावेळी दिली.
काही वर्षांपूर्वी घडलेल्या हत्येच्या प्रकरणाबाबत बोलताना अवतार सिंग यांनी हे प्रकरण बजिंदर सिंग पाद्री म्हणून रुजू होण्यापूर्वीचे असल्याचे सांगितले.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











