You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमोल कोल्हे : ज्यांचा प्रचार केला, त्यांनाच पराभूत करून संसद गाठली, असा आहे प्रवास
- Author, प्राची कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठीसाठी
"छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीच्या तख्तासमोर न झुकता मराठी स्वाभिमान जपला. हाच विचार घेऊन आम्ही महाराजांचे मावळे दिल्लीसमोर महाराष्ट्राचा स्वाभिमान झुकू देणार नाही हा शब्द देतो. शिरुर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेच्या या उदंड प्रतिसादाने भविष्यात आणखी जोमाने काम करण्यासाठी 12 हत्तींचं बळ आता मला मिळाले आहे.”
"कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातल्या एका युवकाला 2019 च्या निवडणुकीत संधी दिली. माझी ना कुठली राजकीय पार्श्वभूमी...माझ्या घरात ना कुठे आमदारकी होती ना कुठे जिल्हा परिषद सदस्यत्व होतं...ना मी स्वत: इथं कुठली निवडणूक लढलो होतो.
बरं या सगळ्या गोष्टी असताना ना माझी परदेशात कंपनी आहे, ना माझा साखर कारखाना आहे,ना माझी शिक्षण संस्था आहे, ना माझी सूतगिरणी आहे.”
खासदार अमोल कोल्हेंच्या या दोन पोस्ट पाच वर्षांपूर्वीच्या डॉ. अमोल कोल्हे यांची आठवण करुन देणाऱ्या.
शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या डॉ. अमोल कोल्हे 2019 मध्ये शिरुर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले.
त्यांनी शिवसेनेचे तत्कालिन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला आणि लोकसभेत एन्ट्री घेतली.
अभिनेते म्हणून तेव्हा लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या कोल्हेंना लोकांच्या गराड्यातून वाट काढत सभेच्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला तब्बल चार-चार तासांचा उशीर व्हायचा.
सभेला पोहोचल्यावर कोल्हेंच्या भाषणाची सुरुवात काहीशी अशी असायची, "तुम्ही चार तास माझी वाट पाहताय... तुम्हाला मानाचा मुजरा!"
छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका केलेल्या या अभिनेत्याच्या त्यात आवेशातलं भाषण लोकांना आवडायचं.
मतांची समीकरणं जुळत गेली. 2019 साली 'मोदीलाटे'तही राष्ट्रवादी काँग्रेसचे जे चार खासदार निवडून आले होते, त्यामध्ये एक नाव अमोल कोल्हे यांचं होतं.
आता पुन्हा एकदा अमोल कोल्हे 'शिवपुत्र संभाजी' या महानाट्याच्या प्रयोगांच्या माध्यमातून तेच नरेटिव्ह घेऊन लोकांसमोर जाताना दिसत आहेत. पण यावेळी गणितं मात्र बदलली आहेत.
ज्या शिवसेनेतून ते बाहेर पडले, त्याच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांचा घरोबा आहे. त्यांच्यासमोर आव्हान आहे ते जुने प्रतिस्पर्धी शिवाजीराव आढळराव पाटील यांचंच. पण ते आता शिवसेनेसोबत नाही, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली आहे.
अभिनय ते राजकारण असा प्रवास
अमोल कोल्हेंचा जन्म नारायणगावमधला. नारायणगाव आणि पुण्यात त्यांचं शिक्षण झालं. पुढे मुंबईत त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण करत पदवी मिळवली.
डॅाक्टर म्हणून कामालाही सुरुवात केली. पण याच काळात अभिनयाच्या ओढीने कोल्हेंनी वेगवेगळ्या मालिकांमधून काम करायला सुरुवात केली.
'राजा शिवछत्रपती' या मालिकेमुळे त्यांना घरोघरी पोहोचवलं. त्यानंतर आलेल्या 'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेमुळे त्यांची लोकप्रियता अजूनच वाढली.
याच दरम्यान 2014 मध्ये त्यांनी राजकारणातही प्रवेश केला. शिवजयंतीच्या मुहूर्तावर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.
उद्धव ठाकरे आणि आदेश बांदेकर यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी सेनेत प्रवेश केला. यावेळी 'शिवसेना हा छत्रपती शिवरायांच्या विचारांनी चालणारा पक्ष आहे म्हणून तो माझा पक्ष आहे,' अशी भूमिका त्यांनी मांडली होती.
या प्रवेशानंतर शिवसेनेच्या उपनेते आणि प्रवक्तेपदी त्यांची नियुक्ती झाली. 2015 मध्ये पुणे जिल्हा संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी देखील त्यांना सोपवण्यात आली होती.
शिवसेनेत असण्याच्या काळात त्यांनी तत्कालीन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारयंत्रणेची धुरा वाहिली होती. शिवसेनेच्या स्टार प्रचारकांमध्ये त्यांचा समावेश होता.
2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकांच्या वेळी त्यांच्याकडे पुणे आणि पिंपरी चिंचवडचं संपर्कप्रमुख पद होतं.
या निवडणूकांमध्ये शिवसेनेची पिछेहाट झाली. या दरम्यान त्यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहित या पराभवाची जबाबदारी स्वीकारली होती.
उद्धव ठाकरेंनी आपल्यावर विश्वास दाखवला, पाठीशी उभे राहिले. मात्र तो विश्वास सार्थ ठरवण्यात आपण कमी पडलो, असं उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटलं होतं.
आधी शिवसेना, नंतर राष्ट्रवादी
2019 च्या निवडणुकीआधी मात्र अमोल कोल्हेंनी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' केला. यानंतर अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं.
"आज देशाच्या राजकारणात फार मोठी अस्वस्थता आहे. तरुणाईला योग्य दिशेची गरज आहे. ही जाणीव शरद पवारांसारख्या नेतृत्वामध्ये आहे. त्यामुळे त्यांचे हात बळकट करावे म्हणून मी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला आहे," अशी भावना अमोल कोल्हेंनी व्यक्त केली होती.
याचबरोबर लहानपणी ज्या शरद पवारांना पाहण्यासाठी त्यांच्या गाडीमागे पळायचो, त्याच शरद पवारांसोबत काम करायला मिळणे भाग्याचे असल्याचेही त्यांनी म्हटलं होतं.
या प्रवेशानंतर अमोल कोल्हेंना शिरुर लोकसभेमधून राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली. त्यांच्यासमोर आव्हान होतं ते सलग तीन वेळा निवडून आलेल्या आणि 2014 मध्ये त्यांनी ज्यांचा प्रचार केला, त्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचं.
अभिनेते म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोल्हेंना पाहण्यासाठी मतदारसंघातल्या सभांमध्ये गर्दी होत होती. याच निवडणूकीत त्यांनी थेट घोड्यावरुन प्रचार करतही लक्ष वेधलं होतं.
सलग पंधरा वर्ष खासदार असलेल्या शिवाजीराव आढळराव पाटलांचा 58 हजार 878 मतांनी कोल्हेंनी पराभव केला.
खासदार चित्रीकरणात व्यस्त, राजीनाम्याची चर्चा आणि माघार
कोल्हेंची खासदार झाल्यावरची कारकीर्द मात्र काहीशी संमिश्र राहिली आहे.
खासदार झाल्यानंतर कोल्हेंना त्यानंतरच्या विधानसभा निवडणूकीत थेट पक्षाचा महत्त्वाचा चेहरा म्हणून जबाबदारी देण्यात आली. यानंतर त्यांनी राज्यात 'शिवस्वराज्य यात्रा' काढली. अमोल मिटकरी आणि अमोल कोल्हे यांनी महाराष्ट्र पिंजून काढला होता.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अनेक ठिकाणी त्यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. जिथे पोहोचता येत नाही, तिथे फेसबुक लाईव्हवरून संवाद साधत त्यांनी लक्ष वेधून घेतलं होतं.
दुसरीकडे संसदेमध्ये ते शेतकरी प्रश्नांपासून इतर अनेक प्रश्नांवर लक्ष वेधत राहिले. संसदेच्या अधिवेशनांमध्ये त्यांची हजेरी होती 61 टक्के, तर पाच वर्षांमध्ये त्यांनी 29 चर्चांमध्ये सहभाग नोंदवला, तर 621 प्रश्न मांडले.
या प्रश्नांमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न, कोव्हिड-19 संदर्भातील प्रश्न, शिवनेरीचा विकास यासह बैलगाडा शर्यतीसंदर्भातील प्रश्नांचा समावेश होता. पण याच काळातल्या त्यांच्या उलटसुलट भूमिकांमुळे आणि पक्षांतर्गत राजकारणामुळे मतदारांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण होईल अशी परिस्थिती दिसत होती.
शूटिंगमध्ये अडकलेल्या कोल्हेंची मतदारसंघातली उपस्थिती कमी झाली. 2021 मध्ये अचानक त्यांनी एकांतवासात जातोय अशी पोस्ट टाकत संपर्काच्या बाहेर जाण्याचा निर्णय घेतला.
काही दिवस संपर्काबाहेर असलेल्या कोल्हेंना राजकारण सोडायचे आहे का अशा चर्चा यानिमित्ताने रंगल्या. यानंतर परतत त्यांनी पुन्हा एकदा राजकारणात सहभाग नोंदवायला सुरुवात केली. पण या दरम्यान कोल्हे खासदारकीचा राजीनामा देणार असल्याच्या आणि राजकारण सोडणार असल्याचा चर्चा होतच राहिल्या.
राष्ट्र्वादीतल्या फुटीनंतर संभ्रम राहिला
राष्ट्रवादीतल्या फुटीदरम्यानही हेच दिसत राहिलं. अजित पवारांनी केलेल्या बंडानंतरच्या शपथविधीला कोल्हेंची उपस्थिती होती. त्यानंतर मात्र आपल्याला काय घडतेय याची कल्पना नव्हती आणि सुप्रिया सुळे देखील भेटल्याने शरद पवारांच्या संमतीनेच हे होत आहे असं वाटल्याचं स्पष्टीकरण देत त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
अजित पवारांना पाठिंबा देणाऱ्या पत्रावर कोल्हेंची सही असल्याचा उल्लेख वारंवार केला जातो.
या सगळ्या गोंधळादरम्यानच अमोल कोल्हे हे द्विधा मनस्थितीत असून खासदारकीचा राजीनामाही देणार असल्याचं सांगितलं गेलं. पण नंतर अमोल कोल्हेंनी आपण शरद पवारांसोबत असल्याचं स्पष्ट केलं.
यानंतर पुन्हा एकदा त्यांनी अजित पवारांची भेट घेतली. ही भेट कामासाठी असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.
पण पुन्हा एकदा कोल्हे कोणासोबत याच्या चर्चा सुरु झाल्या. यानंतर मात्र कोल्हेंनी थेट भूमिका घेतली आणि छत्रपती शिवरायांसाठी निष्ठा महत्वाची होती म्हणत आपण शरद पवारांसोबत असल्याचं स्पष्ट केलं आणि 'शेतकरी आक्रोश मोर्चा'ची घोषणा केली.
डिसेंबर महिन्यात निघालेला हा मोर्चा शिरुर आणि बारामती मतदारसंघातून फिरला. मोर्चात सहभागी लोकांची संख्या मात्र तुलनेने कमी राहिली.
आक्रोश मोर्चाच्या शेवटी शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहिले.
अजित पवारांचं कोल्हेंना चॅलेंज
मोर्चाच्या आधी सुरु असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी कोल्हेंना थेट आव्हान दिले.
ज्यांना निवडून देण्यासाठी फिरलो ते गेल्या पाच वर्षात फिरकले नाहीत, असं म्हणत कोल्हेंना येत्या निवडणुकीत पाडणार असल्याचं जाहीर वक्तव्य केलं.
कोल्हेंनी मात्र या पार्श्वभूमीवर थेट टीका करण्याचं टाळलं. पण बऱ्याच गोष्टी बाहेर येऊ शकतील, असं सूचक वक्तव्यही केलं.
आमदारांची मनं राखण्यासाठी तुम्हीच मतदारसंघात फिरकू दिलं नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
गेल्या वर्षभरात कोल्हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चाही रंगल्या. पण गेल्या काही महिन्यांमध्ये मात्र त्यांची शरद पवारांसोबत सातत्याने उपस्थिती पाहायला मिळते आहे.
आगामी निवडणुकीसाठी त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून मतदारसंघात दौऱ्यांनाही सुरुवात केली आहे. तसंच आपल्या नाटकाच्या माध्यमातूनही मतदारसंघातल्या लोकांपर्यंत ते पोहोचत आहेत.
त्यांच्या पुढाकारातून होऊ घातलेले इंद्रायणी मेडिसीटीसारखे प्रकल्प मात्र अजूनही कागदावरच राहिले आहेत.
नाशिक रेल्वेेचा मुद्दा, नाशिक हायवेचा मुद्दा, बिबट प्रवण क्षेत्राचे प्रश्न , शेतमालाचे बाजारभाव (कांदा आणि दूध) असे अनेक मुद्दे ते मांडताना दिसतात.
एक नाशिक हायवेचा मुद्दा सोडला तर बाकी कोणतेही प्रश्न सुटलेले दिसत नाहीत. बैलगाडा शर्यती सुरू झाल्याचं क्रेडिट त्यांनी घेतलं, तरी मतदार मात्र पूर्णपणे ते देताना दिसत नाहीत.
शिरुर मतदारसंघातील समीकरणं पाहिली तर मंत्री दिलीप वळसे पाटील, दिलीप मोहिते, अतुल बेणके हे आमदार अजित पवारासंसोबत तर आमदार महेश लांडगे हे भाजपचे आमदार आहेत.
शिरुरचे आमदार अशोक पवार वगळता शरद पवारांसोबत सध्या विद्यमान आमदार नाहीत.
मतदारसंघातील सुरुवातीच्या काळातील अनुपस्थिती, वारंवार दिसलेला संभ्रम आणि राजकीय गणितं पाहता कोल्हेंसाठी ही निवडणूक आव्हानात्मक असणार आहे हे नक्की. यामुळेच कदाचित ते आपल्या कलेचाच आधार घेत पुन्हा एकदा मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.