खाण्याच्या चुकीच्या पद्धतींमुळे तुमच्या दातांचं आरोग्य धोक्यात आलंय का?

फोटो स्रोत, Getty Images
आपलं आरोग्य हे आपण जे खातो, पितो, ते कसं पचतं, आपली चयापचयाची शक्ती कशी आहे यावर अवलंबून आहे. कोणताही पदार्थ किंवा पेय आपल्या पोटात जातं तेव्हा त्याचा पहिला संबंध येतो दात आणि आपल्या मुखाचा.
दात, हिरड्या, जीभ अशा अवयवांचं आरोग्य नीट असेल तरच या अन्नपदार्थ आणि पेयांचा पुढचा प्रवास नीट होतो.
बहुतांशवेळा तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा आरोग्याचा विचार करता याला शेवटचं स्थान दिलं जातं. वास्तविक ज्या अवयवांचा पचन आणि इतर शारीरिक क्रियांमध्ये पहिला संबंध येतो त्या अवयवांच्या संरक्षणाला आणि काळजीला शेवटचं स्थान देणं धोकादायक ठरू शकतं. त्यामुळेच आपण येथे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी व दातांचं आरोग्य याचा विचार करणार आहोत.
युनायटेड किंग्डमच्या एनएचएस या राष्ट्रीय आरोग्य सेवेच्या माहितीनुसार त्या देशात प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात एकदा तरी हिरड्यांच्या संदर्भातील आजार होतो. ही स्थिती बहुतांश सर्वच देशात सारखी असावी.
हिरड्यांचे विकार हे दातांवर आणि त्याच्या आजूबाजूला बॅक्टेरियायुक्त प्लाक जमा झाल्यामुळे होतात. कधीकधी तो त्रासदायक नसतो पण काहीवेळेस ते तुमच्या नाजूक हिरड्यांचं पूर्ण नुकसान करू शकतात आणि त्यामुळे तोंडात दाहही होतो.
यासाठीच आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींचा आपल्या दातांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? आणि मुखाचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी काय केलं पाहिजे? याबद्दल आम्ही तज्ज्ञांकडून माहिती घेतली. ती येथे देत आहोत.
दातांच्या उत्तम आरोग्यासाठी दररोज काय करावं?
पूर्ण तोंडाचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी आधी दात नीट असले पाहिजेत. दररोज दोनवेळा दात घासावेत असं सुचवलं जातं. पण चुळा भरण्याचं काय? जेवणाआधी दात घासावेत की नंतर?
बुपा डेंटर केअरच्या तज्ज्ञ साकिना सय्यद सांगतात, “काही लोकांना खाण्यापूर्वी दात घासून त्यावर साचलेलं किटण म्हणजे प्लाक काढायला आवडतं. काही लोक ब्रेकफास्टनंतर दात घासतात. पण जर तुम्ही ब्रेकफास्टनंतर दात घासत असाल तर तुम्ही 30 मिनिटं थांबावं असं आम्ही सुचवतो कारण तुम्ही जर काही आम्लयुक्त असिडिक पदार्थ किंवा साखर घातलेले गोड पदार्थ खाल्ले असतील तर दातांवरील इनॅमल म्हणजे आवरण मऊ झालेलं असतं. त्यामुळे दात घासण्यापूर्वी त्यांचं पुनर्खनिजीकरण म्हणजे रिमिनरलाइज होण्यापर्यंत तुम्ही थांबावं.”

फोटो स्रोत, Getty Images
“साधारणतः रात्री झोपायला जाण्यापूर्वी तुम्ही दात घासावेत असं आम्ही सुचवतो आणि सकाळी एकदा घासावेत. दिवसाची अखेर टुथपेस्टने व्हावी. रात्री तुमचे दात घासून स्वच्छ करा. फ्लॉसने दातांमध्ये अडकलेले कण काढून टाका. मग पुन्हा दात स्वच्छ करा. यामुळे रात्रभर तुमच्या दातांचं रक्षण होईल.”
आहारात काय बदल करावा?
जास्त साखर असलेल्या गोड पदार्थांमुळे दातांचं आरोग्य बिघडतं हे सर्वांनाच माहिती आहे. पण इतरही काही पदार्थ तुमचे दात खराब करू शकतात का? दातांचं आरोग्य टिकून राहावं यासाठी काही विशिष्ट जीवनसत्वं आणि खनिजं असलेले पदार्थ खावेत का?

फोटो स्रोत, Getty Images
यावर आहारतज्ज्ञ अना ग्रुम सांगतात, “दातांच्या आरोग्यासाठी ड जीवनसत्व आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठी क जीवनसत्व महत्त्वाचं आहे. आणि खनिजांमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस आवश्यक आहेत.”
हिरड्यांजवळच्या उतींचं आरोग्य चांगलं राहाण्यासाठी क जीवनसत्व आवश्यक आहे. उतींची हानी भरुन काढण्यासाठी ते गरजेचं जीवनसत्व आहे. तसेच आहारात 'क' जीवनसत्व पुरेसं घेतलं नाही, तर हिरड्यांतून रक्तही येऊ शकतं.
'ड' जीवनसत्वामुळे शरीराला हाडं आणि दातांच्या आरोग्यासाठी पुरेसं कॅल्शियम राखता येतं आणि दातांच्या आरोग्यासाठी कॅल्शियमबरोबर फॉस्फरस काम करतं.
'क' जीवनसत्वाचा अभाव तसा दुर्मिळ आहे, परंतु जर तुम्ही तुमच्या आहारातून 'क' जीवनसत्व पुरेसं घेत नसाल तर आता त्याचा समावेश करुन त्याचं प्रमाण वाढवता येईल. टोमॅटो, मिरची, ब्रोकोली आणि बटाट्यातही क जीवनसत्व विपुल प्रमाणात असते. आहारामधून ड जीवनसत्व मिळवणं तसं कठीण आहे. पण मासे, अंडी, मांस यातून ते मिळू शकतं. हिवाळ्यामध्ये ड जीवनसत्वाची पूरक औषधं घ्या असं एनएचएस सुचवतं.

फोटो स्रोत, Getty Images
दुग्धजन्य पदार्थ, ब्रोकोली, काही हिरव्या पालेभाज्या, संंत्री, टोफू, जीवनसत्व आणि आवश्यक पोषणमुल्यं मिसळून केलेले ब्रेड यातून कॅल्शियम मिळतं. तर मांस, अंडी, कठीण कवचाची फळं, दुग्धजन्य पदार्थ, पूर्ण तृणधान्यं, सुकामेवा यातून फॉस्फरस मिळतं.
युनायटेड किंग्डममध्ये हिरड्यांच्या आरोग्याबद्दल एक प्रयोग करण्यात आला. यात 30 लोकांचं दोन गटात विभाजन केलं. त्यात एका गटाला दाह कमी करणारे पदार्थ खायला दिले तसेच त्यांच्या आहारातून प्राणिजन्य पदार्थ आणि प्रक्रिया केलेली कर्बोदकं काढून टाकली, तसेच ओमेगा 3 फॅटी अँसिड, क, ड जीवनसत्व, अँटीऑक्सिडंट्स, तंतुमय पदार्थांचा समावेश केला.
त्यांच्या हिरड्यांचं निरीक्षण केल्यावर दुसऱ्या गटाच्या तुलनेत त्यांच्या हिरड्यांचा दाह कमी झाल्याचं आणि रक्त येण्यासारखे प्रकार कमी झाल्याचं समजलं. अर्थात हा एक लहान प्रमाणावर केलेला अभ्यास आहे. आणखी ठोस निष्कर्ष काढण्यासाठी अधिक अभ्यासाची गरज आहे.
साकिना सय्यद सांगतात, आम्ही लोकांना समतोल आहार घ्यायचं सुचवतो. त्यात हिरव्या पालेभाज्या, कठीण कवचाची फळं, इतर भाज्या असाव्यात.
कोणती फळं आणि पेयं टाळावीत?
फेसाळ, गोड, भरपूर साखर असलेल्या पेयांबरोबर काही इतर फळं आणि पेयं टाळली पाहिजेत. त्यांच्यामुळे हिरड्या आणि दातांची हानी होऊ शकते.
उदाहरणासाठी ही यादी पाहा-
- गरम पाण्यात लिंबू पिळून प्यायलं तर दातांवरचं इनॅमल खराब होतं.
- सुकीफळं नीट खाल्ली नाहीत तर ती दाताला चिकटतात आणि ती काढणं अवघड असतं
- वेफर्स-क्रीस्प्स-पापड- चिप्स दाताला चिकटू शकतात.
- अतिगोड असलेली पेयं
- फेसाळत्या पेयातला वायू असिडिक असतो तो त्रासदायक ठरू शकतो.
- आंबवलेले पदार्थ असिडिक असतात त्यामुळे दातावरील इनॅमलचं विदारण होऊ शकतं.
सतत वरचेवर खात राहाणं
तुम्ही साखरयुक्त पदार्थ तसेच अति स्टार्च असलेले पदार्थ खाता तेव्हा तुमच्या तोंडातील पीएच प्रमाण कमी होतं. साखरेवर जीवाणू जगतात आणि ते असिड सोडतात. त्यामुळे तोंड असिडिक होतं. त्यामुळे प्रत्येक अर्ध्या तासाला खात असाल तर त्या असिडिक वातावरणातून दांताना आजिबात मोकळा वेळ मिळत नाही. त्यामुळे दातांची झीज होते.
ब्रिटीश डेंटल असोसिएशनचे संशोधक सल्लागार प्रा. डॅनियल वॉलम्स्ले सांगतात, “जर तुम्ही सतत हे पदार्थ खात राहिलात तर त्यामुळे तयार होणारं असिड तुमच्या दातांमध्ये पोकळी तयार करू शकतं.”
दुर्देवाने यामध्ये फळांचाही समावेश होतो.
“तुम्ही दिवसभर प्रमाणाबाहेर सतत अतिगोड फळं खात राहिलात तरीही दातांचं नुकसान होऊ शकतं”, असं साकिना सय्यद सांगतात.
त्यामुळे असं वरचं खाणं दिवसभरात दोन-तीनवेळा खावं आणि इतर साखरयुक्त पदार्थ आणि असिडिक पदार्थ जेवणाच्यावेळेस खाण्यासाठी ठेवावेत.
प्रा. डॅनियल वॉलम्स्ले सांगतात, “जेवताना अन्न चावल्यामुळे लाळ उत्पन्न होते, ती अल्कलाइन असते आणि साखर व आम्लयुक्त पदार्थ-पेयं सौम्य करण्यासाठी मदत करते. लाळेमुळे असिड्स आणि दातात अडकलेले कण बाहेर पडण्यास मदत होते तसेच असिडची तीव्रता कमी होण्यास मदत होते आणि दातांचं रक्षण होतं.”

फोटो स्रोत, Getty Images
साकिना सय्यद सांगतात, “दात घासणं तसेच दातांमधील कण पूर्णपणे काढून टाकणं आवश्यक आहे. दात घासण्याबरोबर फ्लॉसिंगही आवश्यक आहे. त्यामुळे जीवाणू बदलतात.”
मौखिक आरोग्याचं महत्त्व सांगताना पुण्यातील डॉ. प्रियांका जोशी सांगतात, “चेहरा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो आणि सुहास्य वदनाने समोर येणाऱ्या व्यक्तीसोबत आपण अगदी सहज जोडले जातो. मौखिक आरोग्यात दातांची उत्तम काळजी घेणं आवश्यक आहे. त्यामुळे निरोगी आयुष्यासोबतच आत्मविश्वास देखील वाढतो. संपूर्ण आरोग्यपूर्ण जीवनामध्ये तोंडाच्या(मौखिक) आरोग्याचा फार मोठा वाटा आहे.मौखिक आरोग्य फक्तं दातांशी निगडित नसून आपले दात जागेवर धरून ठेवण्यासाठी असणार्या हिरड्या,आतील त्वचा अणि जीभ यांची देखील स्वच्छता राखणे हे आहे..
आपल्या दैनंदिन कामामध्ये तोंडाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी काही सोप्या गोष्टींचा अवलंब केल्यास आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.
तोंडाच्या आरोग्याची सुरूवात स्वच्छ दातांनी होते. त्यासाठी रोज दिवसातून 2 वेळा फ्लोराइडयुक्त टूथपेस्ट ने घाई न करता वेळ लावून ब्रश करणे गरजेचे आहे. दातांचे चर्वण पृष्ठभाग तसेच जीभ देखील आपण ब्रश चा साह्य़ाने स्वच्छ करू शकतो. दिवसातून किमान एकदा तरी mouthwash चा वापर करणे गरजेचे आहे.या शिवाय जेवणानंतर खळखळून चूळ भरणे,अडकलेले अन्नकण floss cha सहाय्याने स्वच्छ करणे यांनी देखील तोंडाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
दातांची काळजी लहान मुलांनी कशी घ्यावी याबद्दल सांगताना डॉ. प्रियांका जोशी सांगतात, “वयाच्या साधारणतः तिसऱ्या वर्षापासून तोंडात दात यायला सुरूवात होते. तेव्हापासूनच त्यांची काळजी घेतली गेली पाहिजे. लहान मुलं गोड पदार्थांचे अती प्रमाणात सेवन करतात, म्हणून पालकांनी मुलांच्या इतर स्वच्छतेसोबतच दात व तोंडाची स्वच्छता ठेवली पाहिजे.”
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








