'या' देशात पसरली आहे 'घोणस' सापाची दहशत... का मारले जात आहेत हे साप?

बांगलादेशात मागील काही महिन्यांपासून घोणस (रसेल्स वायपर) (Russell's Viper) या सापाची दहशत पसरली आहे.

मागील काही दिवसांपासून बांगलादेशात घोणस (रसेल्स वायपर) हा साप मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. विविध ठिकाणी सापाच्या इतर प्रजातींना घोणस (रसेल्स वायपर) असल्याचं समजून मारण्यात येतं आहे. घोणस (रसेल्स वायपर) च्या बाबतीत निरनिराळ्या अफवांना ऊत आला आहे.

बांगलादेशच्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत सांगितलं आहे की, बांगलादेशात आढळणाऱ्या सापांच्या 85 टक्क्यांपेक्षा अधिक प्रजाती विषारी नसतात. इतकंच काय घोणस (रसेल्स वायपर) हा साप जरी विषारी असला तरी विषारी सापांच्या यादीत तो नवव्या क्रमांकावर आहे.

मात्र सध्या बांगलादेशात घोणस (रसेल्स वायपर) या सापाविषयी दहशत पसरली आहे. परिणामी लोक या सापांना मारत आहेत. त्यातच घोणस बरोबरच इतर प्रजातीच्या सापांना देखील मारलं जातं आहे. यातील अनेक प्रजाती या बिनविषारी तर आहेतच शिवाय त्या पर्यावरणासाठी उपयुक्त आहेत.

जैव किंवा प्राणी तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, निसर्गातील जैव विविधेत साप महत्त्वाचा घटक आहे. ज्याप्रमाणे पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी इतर सजीव महत्त्वाचे असतात, त्याचप्रमाणे साप देखील पर्यावरणासाठी महत्त्वाचे असतात.

बांगलादेशात ज्याप्रकारे कोणताही विचार न करता अंदाधुंदपणे साप मारले जात आहेत, त्यातून त्याचा पर्यावरणावर काय परिणाम होईल? हा मुद्दा उपस्थित झाला आहे.

घोणसच्या संख्येत अचानक वाढ

मागील काही आठवड्यांपासून बांगलादेशात घोणस सापाची मोठ्या प्रमाणात चर्चा होते आहे. प्रसार माध्यमांमधून देखील ज्या मुद्द्यांवर सर्वाधिक बोललं जातं आहे त्या घोणस हा एक प्रमुख मुद्दा आहे. घोणस (रसेल्स वायपर) या सापाला बांगलादेशात चंद्रबोडा किंवा उलूबोडा म्हटलं जातं.

कधीकाळी घोणस हा साप बांगलादेशातून लुप्त झाला होता. मात्र 10-12 वर्षांपूर्वी अचानक या सापाच्या अस्तित्वाच्या खुणा दिसू लागल्या. घोणस चावल्यामुळं लोकांचा मृत्यू होण्याच्या घटना घडू लागल्या. सापावर संशोधन करणाऱ्यांचं म्हणणं आहे की 2013 पासून बांगलादेशात घोणस जास्त प्रमाणात दिसू लागले.

2021 मध्ये बांगलादेशच्या वायव्येकडील भागात विशेषत: पद्मा नदीच्या किनाऱ्यावर असणाऱ्या काही जिल्ह्यांमध्ये घोणस ( बांगलादेशात याला चंद्रबोडा म्हणतात) साप चावल्यामुळं दोन लोकांचा मृत्यू झाला होता तर इतर अनेकजण आजारी पडले होते. त्यावेळेस या घटनेनं सर्वत्र लक्ष वेधून घेतलं होतं, त्यावर चर्चा झाली होती.

या बाबतीत सरकारी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की या वर्षी मागील तीन महिन्यांच्या कालावधीत माणिकगंजमध्ये घोणस चावल्यामुळं पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यामधील बहुतांश जण शेतकरी होते. सध्या कापणीचा हंगाम सुरू आहे. पीकांनी डवरलेल्या शेतांमध्ये सापांचा उपद्वव असणं ही एक स्वाभाविक बाब मानली जाते.

फरीद अहसान चितगाव विद्यापीठात प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक आहेत. त्यांनी बीबीसीला सांगितलं की "घोणस साप पद्मा नदीच्या खोऱ्यात काठा-काठानं माणिकगंजच्या परिसरात पोचले आहेत."

दुसरीकडे राजशाही ( बांगलादेशातील एक शहर) मध्ये या आठवड्यात साप चावल्यामुळे राजशाही विद्यापीठातील एका विद्यार्थ्यासह दोन जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.

पीकांची कापणी करण्याच्या हंगामात घोणस मोठ्या संख्येनं आढळू लागल्यानं पद्मा नदीच्या काठावर असणाऱ्या प्रदेशातील शेतकऱ्यांमध्ये सर्वाधिक दहशत पसरली आहे.

रविवारी राजशाहीमधील चारघाट भागातील सारदा इथं पद्मा नदीच्या काठावर असणाऱ्या पोलिस अकादमी परिसरातून आठ छोटे घोणस (सापाची पिल्ले) पकडण्यात आले होते. मात्र प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार पोलिसांनी या सापांना मारून टाकलं होतं.

फरीदपूरमधील एक राजकीय नेत्यानं जाहीरपणे घोषणा केली होती की घोणस साप मारणाऱ्यांना प्रति साप 50 हजार टका (बांग्लादेशी चलन) इतकं बक्षीस दिलं जाईल. मात्र रविवारी त्यांनी आपली घोषणा मागे घेतली.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, घोणस सापाची दहशत पसरली आहे. त्यामुळे या सापांना मारण्यात येत आहे. मात्र घोणसबरोबरच शंखिनी, अजगर, घरगिन्नी, दाराज, ढोंढा आणि गुईसाप यासारख्या इतर प्रजातीतील सापदेखील मारले जात आहेत.

विशेष महत्त्वाची बाब म्हणजे सापांच्या या इतर प्रजाती घोणस साप खातात आणि पर्यावरणाचा तोल सांभाळतात. मात्र या उपयोगी सापांना मारण्यात येत आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितलं की सोशल मीडियावर घोणसबद्दल मोठ्या प्रमाणात नकारात्मक माहिती पसरल्यामुळं लोकांमध्ये या सापाची दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे लोक कोणताही विचार न करता साप मारत आहेत. त्यातून निसर्गाचे मित्र मानले जाणारे इतर बिनविषारी प्रजातीचे साप देखील मारले जात आहेत.

मुख्य वन संरक्षक मोहम्मद अमीर हुसैन चौधरी यांनी बीबीसीला सांगितलं की, "घोणस हा काही आक्रमक साप नसतो. आपल्याकडून घोणसला काही धोका निर्माण झाल्यावरच तो हल्ला करतो. सापाला मारण्याची आवश्यकता नाही. लोकांनी फक्त सतर्क राहिलं पाहिजे. लोकांमध्ये या बाबतीत जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत."

वन विभागाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की वैद्यकीय सेवांच्या आकडेवारीनुसार देशात दरवर्षी साप चावल्यामुळं जवळपास साडे सात हजार लोकांचा मृत्यू होतो. यातील 120 मृत्यू घोणस चावल्यामुळं होतात.

हुसैन सांगतात, "ज्या शेतांमध्ये पीकं असतात, त्या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात साप असतात. त्यामुळेच स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि स्वयंसेवक लोकांनी विनाकारण साप मारू नये म्हणून आणि शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी काम करत आहेत. लोकांमध्ये जागृती निर्माण झाल्यावर आणि सोशल मीडियावर यासंदर्भातील नकारात्मक माहिती कमी झाल्यावर काही दिवसांमध्ये घोणसबद्दल निर्माण झालेली ही दहशतसुद्धा बरीचशी कमी होईल."

पर्यावरणासाठी साप किती महत्त्वाचे?

तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, जैव-विविधतेच्या संरक्षणासाठी सापांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. साप निसर्गाचे मित्र असतात आणि पर्यावरणाचा ते अविभाज्य अंग आहेत. पर्यावरणात साप महत्त्वाचे आहेत. निसर्ग साखळीत मांसाहारी प्राण्यांमध्ये सापांचं स्थान वरचं आहे.

'बांग्लादेश में साँप और साँप के काटने की रोकधाम और उपचार' या पुस्तकात म्हटलं आहे की साप खूपच आळशी आणि निरुपद्रवी जीव असतात. सापांना माणसांची भीती वाटते. त्यामुळेच माणसांना पाहताच किंवा त्यांची चाहूल लागताच ते स्वत:चा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात. मात्र सापांवर हल्ला केल्यास स्वसंरक्षणासाठी ते प्रतिहल्ला करतात आणि चावतात. पर्यावरणाचं आणि त्याचबरोबर सजीवसृष्टीचा समतोल राखण्यासाठी साप महत्त्वाचे असतात.

मोहम्मद अबू सईद आणि मोहम्मद फरीद अहसान यांनी संयुक्तपणे हे पुस्तक लिहिलं आहे.

या पुस्तकाचे लेखक आणि चितगाव विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागातील प्राध्यापक मोहम्मद फरीद अहसान यांनी बीबीसीला सांगितलं की "निसर्गचक्रात साप शिकारी असू शकतो आणि त्याचबरोबर त्याची शिकार देखील होऊ शकते. त्यामुळेच ज्याप्रकारे साप इतर प्राणी खाऊन पर्यावरणाचा तोल साधतात त्याचप्रमाणे ते देखील इतर प्राण्यांचं खाद्य बनून पर्यावरणाचा तोल साधण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात."

सापांच्या माध्यमातून नैसर्गिकरित्या कीटकांची संख्या नियंत्रित ठेवली जाते. एक शिकारी म्हणून साप किटक खातात आणि पर्यावरणाचा समतोल साधतात.

प्राणी शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की जवळपास शंभर वर्षांपूर्वी या परिसरात घोणस साप आढळायचे. मात्र निसर्गचक्रात आणि पर्यावरणात झालेल्या बदलांमुळे आता घोणसच्या संख्येत वाढ झाली आहे. म्हणजेच गुई साप, बेजि, घार, गरुड आणि इतर पशूपक्षी जे या घोणस खायचे त्यांची संख्या घटली आहे. घोणसची संख्या वाढण्यामागचं हे प्रमुख कारण आहे.

अहसान म्हणतात, "पर्यावरणात तसंच निसर्ग साखळीत बदल झाला आहे आणि तेच घोणसची संख्या वाढण्यामागचं कारण आहे. घोणस खाणाऱ्या पशू पक्ष्यांची संख्या घटली आहे. त्यामुळेच घोणसच्या संख्येत वाढ होते आहे."

साप मारल्यामुळे पर्यावरणावर काय परिणाम होणार?

तज्ज्ञांचं म्हणणं आहे की साप हे निसर्गाचाच एक भाग आहेत. सापांना मारल्यामुळं संपूर्ण निसर्ग चक्र आणि पर्यावरणावर विपरित पिरणाम होईल. शेतांमधील सापांना मारल्यामुळं त्या भागात उंदरांची पैदास वाढेल आणि त्यातून उपद्रव निर्माण होईल.

सर्वसाधारणपणे दरवर्षी 10 ते 20 टक्के पीक उदरांमुळे नष्ट होतं. कोणताही विचार न करता साप मारल्यामुळं उंदरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल. याचा फटका बसून शेतमालाच्या उत्पादनात घट होईल.

मुख्य वन संरक्षक हुसैन म्हणतात, "साप उंदीर आणि बेडूक खातात. तर बेजी, बागदास, गंधोगोकुळ आणि रानमांजर सापांना खातात. त्याचबरोबर शंखचूड आणि कोब्रासारखे काही साप घोणस आणि इतर प्रजातीचे साप खातात. ज्या शेतांमध्ये पीकं असतात त्या शेतांमध्ये साप उंदीर खातात. उंदीर खाऊन एकप्रकारे साप त्या पीकाचं संरक्षण करतात आणि शेतकऱ्यांना मदतच करतात. मात्र जर सापांना इतक्या मोठ्या प्रमाणात मारणं सुरूच राहिलं तर निसर्गातील एक शिकारी जीव कमी होईल आणि त्याचा निसर्गसाखळीवर विपरित परिणाम होईल."

हुसैन यांचं म्हणणं आहे की "हा सर्व प्रकार थांबला नाही तर भविष्यात उंदरांच्या संख्येत मोठी वाढ होईल. उंदरांमुळं पीकं नष्ट होतील. साहजिकच शेतमालाच्या उत्पादनात घट होईल. त्याचा नकारात्मक परिणाम अन्न साखळीवर होईल. म्हणजेच जर सापांना मारणं सुरूच राहिलं तर भविष्यात त्यातून खूप मोठं नुकसान होईल हे स्पष्ट आहे."

ढाका विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक मो. अमीनुल इस्लाम भुइया म्हणतात की सापाबद्दल असलेल्या नकारात्मक दृष्टीकोनामुळे बांग्लादेशात कोणताही विचार न करता सापांना मारलं जातं आहे. मात्र निसर्ग चक्रात सापांची जागा इतर कोणताही सजीव घेऊ शकत नाही.

त्यांनी बीबीसीला सांगितलं की, "निसर्गात सापाची एक विशिष्ट भूमिका आणि स्थान आहे. दुसरा कोणताही सजीव त्यांची जागा घेऊ शकत नाही. निसर्गात प्रत्येक सजीवाचा दुसऱ्या सजीवावर परिणाम होत असतो. त्यामुळेच सापांची संख्या कमी झाल्यास सर्व अन्नसाखळीवरच त्याचा परिणाम होईल."

वन्यजीव अधिनियम 2012 नुसार घोणस सापांचा समावेश संरक्षित प्रजातींच्या यादीत करण्यात आला आहे. या कायद्यानुसार घोणस मारणं, पकडणं किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणं हा दंडनीय गुन्हा आहे.

याच दरम्यान पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं सुद्धा नागरिकांना साप न मारण्याचं आवाहन केलं आहे.