इंटरनेटमधील रोजगाराच्या असंख्य संधी : कमी गुंतवणुकीत व्यवसाय कसा सुरू करावा?

पैसे

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, सेल्व्हा मुरली
    • Role, बीबीसीसाठी

(मानवी विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेल्या विज्ञान आणि तंत्रज्ञानसंबंधीची नवी माहिती दृष्टीकोन असलेले लेख बीबीसी प्रसिद्ध करत असते. या लेखांमधील मते आणि वक्तव्ये ही पूर्णपणे लेखकांची आहेत, बीबीसीची नव्हे. - संपादक)

तुम्हाला नोकरीचा किंवा करत असलेल्या कामाचा कंटाळा आलाय का? तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, पण गुंतवण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत? तुम्ही व्यवसाय सुरू करण्यासाठी संधीच्या शोधत आहात? मग या लेखातून तुम्हाला नक्की मार्गदर्शन मिळू शकतं.

संगणकाचा शोध आणि इंटरनेटचा विकास यामुळं जगाला प्रगतीचा नवा मार्ग सापडला. संगणकाबरोबरच, इंटरनेटमुळं प्रत्येक देशात डिजिटल इकॉनॉमी नावाचं अफाट क्षेत्र तयार झालंय.

डिजिटल इकॉनॉमी क्षेत्रातील नोकरीच्या संधी दोन भागांत विभागता येतील.

1. माहिती तंत्रज्ञान सेवा

2. यूझरद्वारे तयार होणारा कंटेंट (UGC)

डिजिटल इकॉनॉमीचा विचार करता भारत या क्षेत्रातील आघाडीचा देश आहे. विशेषतः आऊटसोर्स होणाऱ्या क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होत आहेत.

भारतात यूझरद्वारे तयार होणारा कंटेंट म्हणजे UGC ला उल्लेखनीय व्यावसायिक यश मिळत आहे. फेसबूक, अॅमेझॉन, किंडल, यू ट्यूब, ट्रेल आणि शेअर चॅट या कंपन्यांच्या सेवा यात अव्वल स्थानी आहेत.

UGC ही अशी संकल्पना आहे ज्यात यूझर्स या अप्लिकेशन किंवा प्लॅटफॉर्मचा वापर करतात. त्याद्वारे भाषणं, पुस्तक किंवा व्हिडिओ असा कंटेंट तयार करतात आणि प्रेक्षकांचं लक्ष वेधून, त्याद्वारे जाहिराती किंवा विक्रीच्या माध्यमातून पैसे कमावतात.

UGC मध्ये अव्वल असलेल्या देशांत भारताचं नाव असण्यामागं देशाची लोकसंख्या हेदेखील एक मोठं कारण आहे. त्यामुळं अनेक विदेशी कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्यात प्रचंड रस आहे.

तंत्रज्ञान
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

या क्षेत्राचं महत्त्वं आणि त्यातील संधींबाबत आपण चर्चा केली. आता आपण अत्यंत कमी गुंतवणुकीतही व्यवसाय कसा सुरू करू शकतो, हे पाहुयात.

भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये नोकरीच्या अनेक संधी आहेत. त्यात सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट, सिनेमा ग्राफिक्स, मल्टीमीडिया डिझाईन, सेल्स आणि मार्केटिंग, नवीन कंटेंट तयार करणे, भाषांतर, डेटा साईट मॅनेजमेंट, वेबसाईट तयार करणे, अॅप डिझाईन, कंपनी अकाऊटिंग, कंपनी मार्केटिंग, कंपनीला विविध सेवा पुरवणे, डेटा एंट्री, ऑफिस वर्क, सर्च इंजीन अॅडाप्टेशन, चॅटबॉट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धीमत्ता) आणि वेलनेस गाईडन्स अशा विविध क्षेत्रात या संधी आहेत.

वर उल्लेख केलेल्या संधीच्या प्रत्येक क्षेत्रात 30 पेक्षा अधिक अंतर्गत क्षेत्रंही आहेत. म्हणजे ग्राफिक डिझाईनचा विचार करता, त्यात अॅडव्हरटाइजमेंट डिझाईन, लोगो डिझाईन, मॅगझिन डिझाईन इत्यादींचा समावेश आहे. या अंतर्गत असलेल्या क्षेत्रांची यादी बरीच मोठी आहे.

सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये कंप्युटर, इंटरनेट आणि अप्लिकेशन अशी तीन क्षेत्रं आहेत. त्याशिवाय क्लाऊड कम्प्युटिंग, चॅटबॉट, कस्टमर केअर आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचाही त्यात समावेश होतो आणि ही यादी आणखी वाढते.

माझ्या माहितीनुसार माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये जवळपास 520 प्रकारच्या रोजगाराच्या संधी आहेत. तुमची कौशल्यं, रोजगाराच्या संधी आणि गुंतवणुकीची रक्कम यावर त्या आधारित असून, यूझर कशाचीही निवड करू शकतात. आता काही उदाहरणांवर चर्चा करू.

ग्राफिक्स डिझाईन

फोटो स्रोत, Getty Images

ग्राफिक्स डिझायनिंग

ग्राफिक्स डिझायनिंग हे असं क्षेत्र आहे, ज्यात तुम्ही अत्यंत कमी गुंतवणुकीत किंवा गुंतवणुकीशिवायही पैसे मिळवू शकता. कारण तुम्हाला केवळ संगणकाचं ज्ञान आणि फोटोशॉप वापरता येणं गरजेचं असतं. प्रत्येक कंपनीला त्यांचा लोगो, व्हिजिटिंग कार्ड डिझाईन, लेटर पॅड इ. तयार करावे लागतात. तिथपासून अगदी कंपनीच्या सोशल मीडिया मार्केटिंगपर्यंत ते जातं. त्यामुळं या क्षेत्रात मोठी मागणी आहे.

तुम्हाला अगदी फोटोशॉपही येत नसेल, तरीदेखील चालू शकते. कारण तुम्ही कॅन्व्हासारखे ऑनलाईन अॅप वापरून अनेकप्रकारचे बॅनर सहजपणे तयार करू शकता.

पण तुम्हाला एखाद्या अॅप आणि वेबसाईटसाठी यूझर इंटरफेस आणि यूझर एक्सपिरियन्स तयार करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला फोटोशॉपबरोबरच कोरल ड्रॉ आणि इलेस्ट्रेटरचं ज्ञानही असायला हवं. त्यासाठी तुम्ही तुमच्या आसपासच्या भागामध्ये डीटीपीसारखा कोर्स करू शकता. या क्षेत्रात नेहमीच रोजगाराच्या संधी उपलब्ध असतात. या कामासाठी तुम्ही किती सर्जनशील आहात हे सर्वात महत्त्वाचं ठरतं.

अॅमेझॉन किंडलसारख्या प्लॅटफॉर्मवर ई बूक तयार करण्यासाठी तुम्हाला केवळ मायक्रोसॉफ्ट वर्ड आणि ओपन ऑफिस कसं वापरायचं त्याची माहिती असायला हवी. तुम्ही इतरांसाठी इ बूक्स तयार करून त्या माध्यमातून कमाई करू शकता.

सोशल मीडिया मार्केटिंग

फोटो स्रोत, Getty Images

सोशल मीडिया मार्केटिंग

सध्याच्या काळात प्रत्येक कंपनीला इंटरनेट मार्केटिंगची गरज असून ते आवश्यकही आहे. वर-वर पाहता ते सोपं वाटत असलं तरी त्यासाठी प्रचंड सर्जनशीलता, भाषेचं ज्ञान आणि प्रामुख्यानं शब्दभांडार असणं गरजेचं ठरतं.

त्याचबरोबर टीव्ही, रेडिओ, मॅगझिन आणि इंटरनेटसाठी जाहिराती तयार करण्याच्या क्षेत्रातही अनेक संधी आहेत. या कामाचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला इंटरनेटच्या माध्यमातून संधींची माहिती मिळते. पण त्यासाठी तुम्हाला प्रचंड संयम ठेवून खूप शोधाशोध करावी लागते.

वेबसाईट डिझाईन

आजच्या युगात प्रत्येक कंपनीला त्यांची वेबसाईट (संकेतस्थळ) हवं असतं. तुम्ही काही दिवसांपासून ते काही तासांतही वेबसाईट तयार करू शकता.

त्यासाठी तुम्ही कंटेट मॅनेजमेंट सिस्टीम सॉफ्टवेअरचा वापर करू शकता. तसंच वर्ल्डप्रेस, जूमला(Joomla), ड्रुपल (Drupal)आणि डिजियांगो (Dijango) अशा सॉफ्टवेअरचाही वापर करू शकता. तुम्हाला कोडींगचं ज्ञान नसलं तरी HTML संदर्भात थोडी माहिती असायला हवी.

तसंच पीएचपी (PHP) आणि सीएसएस (CSS) याची कार्यपद्धती समजून घेणंही गरजेचं असतं. त्यासाठी तुम्ही वेबसाईट डिझाईनचा कोर्स करून CSS, PHP आणि JavaScript शिकू शकता.

ई-कॉमर्स

फोटो स्रोत, Getty Images

ऑनलाईन कॉमर्स वेबसाईट डिझाईन

ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मसाठी वेबसाईट तयार करण्याच्या क्षेत्रात आजही अनेक संधी आहेत. तातडीनं वेबसाईट बनवण्यासाठी शॉपिंग कार्ट(Shopping Cart) नावाचे काही सॉफ्टवेअर आहेत.

तसंच WooCommerce, Shopify, Megento आणि Open Cart हेही आहेत. तमिळनाडूची कंपनी झोहो कॉमर्स नावानं ऑनलाईन शॉपिंग सेवा पुरवते. त्यासाठी तुमच्याकडं PHP कोडिंगचं ज्ञान असायला हवं.

या संधीचं वैशिष्ट्य म्हणजे, तुम्ही एखाद्या कंपनीसाठी वेबसाईट डिझाईन केले तर, तुम्हाला त्या वेबसाईटच्या व्सवस्थापनाच्या संदर्भातील कामही मिळू शकतं. त्यातून स्थिर उत्पन्न तयार मिळू शकतं.

बिझनेस अॅनालिटिक्स

पैसा

फोटो स्रोत, Getty Images

विक्रेत्यांना विक्री वाढवण्यासाठी मदत करणारे अनेक अॅप आहेत. त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी ते याचा वापर करू शकतात. गुगल डेटा स्टुडिओ (Google Data Studio), टॅब्लो ( Tableau) आणि झोहो अॅनालिटिक्स (Zoho analytics) यात मदत करू शकतात.

 तुम्ही जवळच्या शहरातून किंवा ऑनलाईन पद्धतीनं डेटा सायन्समध्ये सर्टिफिकेट कोर्स करू शकता.

अकाऊंटन्सी मॅनेजमेंट

देशातील अनेक कंपन्यांना त्यांचा जीएसटी फाईल करावा लागतो. त्यामुळं तुम्ही जीएसटी भरण्याचं, जीएसटी बरोबरच सॉफ्टवेअरच्या माध्यमातून अकाऊंटिंग, इनव्हॉइस सॉफ्टवेअर मॅनेजमेंट आणि पॉइंट ऑफ सेल मॅनेजमेंट अशी कामंही तुम्ही करू शकता.

डेटा कलेक्शन, डेटा प्रोसेसिंग

सध्या सगळ्याच कंपन्या डेटावर आधारित काम करतात. त्यामुळं डेटा कलेक्शन डेटा ऑर्गनायझेशन आणि अॅनालिसिस, भाषांतर, जाहिरातींसाठी कंटेंट तयार करणे आणि प्रूफ रिडींग अशा प्रकारच्या संधी या क्षेत्रात उपलब्ध आहेत.

त्यामुळं अधिक संधी उपलब्ध व्हाव्या यासाठी तुम्हाला तुम्हाला भाषेशी संबंधित कौशल्य, सर्जनशीलता आणि नेटवर्किंगशी संबंधित कौशल्य अवगत असायला हवी.

गुगल शीट

गुल शीट हे आपल्याला अगदी साध्या एक्सेल शीटसारखे दिसतं. पण याच्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळी कामं करून लाखो मायक्रो अॅप तयार करू शकतात.

त्यासाठी तुम्हाला संगणकाचं ज्ञान असायला हवं. हे कसं करावं हे शिकण्यासाठी इंटरनेटवर अनेक प्लॅटफॉर्म आहेत. क्लासेसही उपलब्ध आहेत. त्यात काही मोफत असतात तर काही शुल्क आकारतात.

ग्राहक सहाय्य आणि चॅटबॉट

लहान कंपन्यांपासून ते मोठ्या समुहांपर्यंत सर्वांचं ग्राहक सहाय्यता केंद्र असतं. पण अगदी लहान कंपन्यांनी अद्याप अशी केंद्रं सुरू केलेली नाहीत. तुम्ही त्यांना यासाठी मदत करण्याचा प्रयत्न करू शकता. यासाठीही इंटरनेटवर अनेक अॅप उपलब्ध आहेत.

तुम्हाला थोडं फार कोडींग येत असेल तर तुम्ही चॅटबॉट तयार करू शकता. आज अॅप तयार करण्याच्या संदर्भातही अनेक संधी असून त्यासाठी कोडींगचं ज्ञान असायलाच हवं, असं नाही.

थोडक्यात काय तर संधी या कधीही कमी नसतात. पण आपल्याला स्वतःसाठी संधी निर्माण कराव्या लागतात. आपल्याला असलेल्या थोड्याफार संगणकाच्या ज्ञानाचा वापर करूनही आपण अशा अनेक संधींचा लाभ घेऊ शकतो.

आपण माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील रोजगाराच्या संदर्भात चर्चा केली. आता आपण यूझरद्वारे तयार होणाऱ्या कंटेंटबद्दल (UGC) चर्चा करुयात.

थोडक्यात UGC मध्ये आधीच उपलब्ध असलेल्या सोयीसुविधा, साधनं यांचा वापर करून फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर्स मिळवले जातात आणि त्यामाध्यमातून पैशाची कमाई होत असते.

इंटरनेट

फोटो स्रोत, Getty Images

युट्यूब

आतापर्यंत केवळ प्रेक्षक असलेले अनेक लोक आता यू ट्यूबवर चॅनल्स सुरू करून व्हिडिओ अपलोड करू लागले आहेत.

हा पैसा कमावण्याचा सोपा मार्ग वाटत असला तरी यासाठी परिश्रम आणि सातत्य असणं हे सर्वात महत्त्वाचं ठरत असतं.

तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून कमाई करायची असेल तर तुमच्याकडे यू ट्यूबवर किमान 1000 सबस्क्रायबर्स असणं गरजेचं असतं.

संच तुमचे व्हिडिओ पाहिल्याचा कालावधी 4000 तास असायला हवा. हे दोन्ही नियम गेल्या एका वर्षात पूर्ण झालेले असावे लागतात.

तुम्ही इतरांचा कंटेंट वापरत असाल तर त्यासाठी तुम्हाला यू ट्यूबच्या दिशानिर्देशांचं पालन करायला हवं. तुम्ही ते केलं नाही, तर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

अशा चॅनलच्या माध्यमातून तुम्ही यूट्यूबवर दररोज कमाई करू शकता. त्याचप्रमाणं तुम्ही फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनही अशीच कमाई करू शकता.

ई-बुक्स

लेखक आणि नवोदीत लेखक हे त्यांची पुस्तकं अॅमेझॉन किंडल, गेन रिडर्स अशा ठिकाणी अपलोड करून त्यामाध्यमातून कमाई करत असतात.

जर पुस्तकाची या प्लॅटफॉर्मवर विक्री झाली तर तुम्हाला सेवा शुल्क कपात करून महिन्याला काही रक्कम मिळू शकते.

सोशल मीडिया इनफ्लुएन्सर

हे काही लोकांसाठी नवं असू शकतं. पण हादेखील पैसा कमावण्याचा मार्ग आहे. इनफ्लुएन्सर म्हणजे प्रचंड फॉलोअर्स असलेले लोक. त्यामुळंच यूट्यूबर नेहमी लाईक, कमेंट आणि चॅनल सबस्क्राईब करा असं सांगत असतात.

इनफ्लुएन्सर बनण्यासाठी तुम्हाला सातत्यानं प्रेक्षकांसाठी उपयोगी असा कंटेंट तयार करत राहावं लागतं.

जोपर्यंत या जगामध्ये लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर असेल, तोपर्यंत माहितीच्या या जगतात कमाईच्या अनेक संधी उपलब्ध असतील. त्यापैकी ही केवळ काही उदाहरणं होती. याशिवायही या क्षेत्रात अनेक संधी आहेत.

प्रसिद्ध 'मर्फी लॉ' यानुसार एक काम पूर्ण झालं की, लगेचच दुसरी गरज निर्माण होत असते. त्यामुळं आपण मिळालेली कामं पूर्ण करत राहायला हवी.

आपल्या सर्जनशीलतेचा आणि सोबतच काही ट्रिक्सचा वापर करा, त्याला परिश्रमाची जोड द्या आणि या माध्यमातून आपल्या आपल्या जीवनाचा आणि आसपासच्या समाजाचा स्तर उंचावण्याचा प्रयत्न करा.

(लेखक सेल्व्हा मुरली हे संगणक क्षेत्रातील अग्रेसर नाव आहे. कृष्णगिरी जिल्ह्यात ते एक सॉफ्टवेअर फर्म चालवतात. त्यांना तमिळनाडू सरकारकडून 'चीफ मिनिस्टर तमिल कम्प्युटिंग अवॉर्ड' हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी तमिळ भाषेत संगणक क्षेत्राशी संबंधित अनेक लेख लिहिलेले आहेत.)

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)