प्रकाश आंबेडकर : सत्तेपेक्षा आजोबांच्या नावाचे वलय अधिक महत्त्वाचे मानणारे नेते

प्रकाश आंबेडकर

फोटो स्रोत, FACEBOOK

    • Author, नितीन सुलताने
    • Role, बीबीसी मराठी

"माझ्याकडे बाबासाहेबांची संपत्ती नाही, पण माझ्याकडे बाबासाहेबांचा नातू आहे आणि तो मी आज समाजाच्या ओटीत टाकते.."

अकोल्यातील धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पहिल्याच ऐतिहासिक सोहळ्यात बाबासाहेबांच्या सूनबाई आणि प्रकाश आंबेडकरांच्या आई मीरा आंबेडकर यांनी आंबेडकरी जनतेसमोर काढलेले हे उद्गार आहेत.

हीच खऱ्या अर्थानं प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकरांच्या कारकिर्दीची सुरुवात होती, असं म्हणता येईल.

प्रकाश आंबेडकर राज्याच्या आणि देशाच्या राजकारणातलं महत्त्वाचं नाव आहे. सत्तेपासून कायम दूर राहिले असले तरी राजकारणातील त्यांच्या भूमिकेकडं कायमच सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांची वंचित बहुजडन आघाडी महाविकास आघाडीबरोबर जाणार असं वाटत होतं. पण तेव्हा ऐनवेळी जागांच्या मुद्द्यांवरून पुन्हा हे गणित फिसकटलं.

प्रकाश आंबेडकरांनी स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतली आहे. त्यांनी आतापर्यंत याद्यांमध्ये 34 उमेदवारांची घोषणा केली आहे. तर काही ठिकाणी त्यांनी उमेदवारांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे.

प्रकाश आंबेडकर यांची भूमिका ही मोदीधार्जिणी असल्याचा आरोप, साहित्यिक आणि विचारवंतांच्या बैठकीत करण्यात आला आहे.

मुंबईत पुरोगामी साहित्यिक आणि आंबेडकरवादी कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्या बैठकीत हा आरोप करण्यात आल्याचं लोकसत्ताच्या वृत्तात म्हटलं आहे.

आंबेडकरांच्या कारकिर्दीचा विचार करता त्यांनी घेतलेल्या भूमिकांवर अनेकदा टीका होत असते. त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासाचा आढावा घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.

मुंबईत जन्म, बाबासाहेबांनी दिलं नाव

यशवंत आणि मीरा आंबेडकर यांच्या घरी 10 मे 1954 रोजी प्रकाश आंबेडकरांचा जन्म झाला होता.

त्यांना भीमराव आणि आनंदराज असे दोन लहान भाऊ आणि रमाबाई नावाची बहीण अशी भावंडं आहे.

बाबासाहेबांचा फारसा सहवास त्यांना लाभला नाही. ते अवघ्या अडीच वर्षांचे असताना 1956 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं निधन झालं होतं.

संग्रहित छायाचित्र

फोटो स्रोत, VBA

पण तरी, बाबासाहेब आंबेडकर यांनीच प्रकाश आंबेडकर यांचं नामकरण केलं होतं, अशी माहिती काही रिपोर्ट्समधून समोर आली आहे.

प्रकाश आंबेडकर यांचं बालपण मुंबईत गेलं. वांद्र्यातील सेंट स्टॅनिस्लॉस हायस्कूलमध्ये त्यांचं शालेय शिक्षण झालं. मुंबईच्याच सिद्धार्थ कॉलेजमधून त्यांनी पदवी आणि वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं.

शाळेत ओळख लपवली

प्रकाश आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू असले तरी शालेय जीवनात त्यांचं बालपण इतर सामान्य मुलांसारखंच होतं.

ते प्रत्यक्ष बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत, याबाबत त्यांच्या शाळेतील क्वचितच दोन ते तीन जणांनाच माहिती होती.

प्रकाश आंबेडकरांनीही इतर मुलांप्रमाणे सामान्य आयुष्य जगावं, अशी शाळेच्या मुख्याध्यापकांची इच्छा होती.

इतर मुलांप्रमाणे मुक्तपणे वावरता यावं म्हणून त्यांची ओळख लपवण्याचा निर्णय मुख्याध्यापकांनी घेतला होता.

शाळेतील मुख्याध्यापक आणि एक-दोन इतर शिक्षक यांनाच त्यांची खरी ओळख माहिती होती. पण त्यामुळं इतर मुलं जे करत होते, ते सगळं मलाही करता आलं असं आंबेडकरांनी माध्यमांशी बोलताना अनेकदा सांगितलं आहे.

रिपब्लिकन पक्षातून राजकारण प्रवेश

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू असल्यामुळं प्रकाश आंबेडकरांनी अगदी लहानपणापासूनच घरात नेते, सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते यांचा घरात राबता पाहिला.

त्यामुळं त्यांच्या राजकीय कारकिर्दीला अगदी बालपणीच सुरुवात झाली होती, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

त्यानंतर महाविद्यालयीन जीवनानंतर त्यांनी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात प्रत्यक्ष सहभाग नोंदवायला सुरुवात केली.

संग्रहित छायाचित्र

फोटो स्रोत, VBA

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर स्थापन करण्यात आलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या माध्यमातून त्यांनी राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं.

1983-84 मध्ये रिपब्लिकन पक्षाच्या संदर्भात मंथन करून पक्षाची पुनर्बांधणी करण्यात आली. त्यावेळी भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप) असं नाव नव्या आघाडीला देण्यात आलं. हीच भारिप बहुजन महासंघाची पायाभरणी म्हणता येील.

भारिप-बहुजन महासंघ

प्रकाश आंबेडकरांनी 1990 मध्ये राज्यसभेवर नियुक्तीनंतर, खासदार सदस्य म्हणून संसदेच्या वरिष्ठ सभागृहात प्रतिनिधित्व केलं.

प्रकाश आंबेडकरांनी सामाजिक राजकीय चळवळीमध्ये सक्रियपणे सहभाग घ्यायला सुरुवात केली होती. त्यावेळी दलितांबरोबरच बहुजन वर्गाच्या समस्यांकडं त्यांचं लक्ष वेधलं गेलं.

संग्रहित छायाचित्र

फोटो स्रोत, FACEBOOK

त्यामुळं त्यांनी राजकारणातीस सहभाग वाढवण्यासाठी दलितांशिवाय बारा बलुतेदार असलेल्या बहुजन समाजाती लोकांना एका छत्राखाली आणण्याचे प्रयत्न सुरू केले. हा प्रयोग म्हणजे बहुजन महासंघ.

पुढं प्रकाश आंबेडकरांनी भारिप आणि बहुजन महासंघ यांचं विलिनीकरण केलं आणि

4 जुलै 1994 रोजी भारिप-बहुजन महासंघ या नव्या राजकीय पक्षाची स्थापना झाली.

अकोल्याशी खास नाते

प्रकाश आंबेडकर 1980 मध्ये एका कार्यक्रमासाठी अकोल्यात गेले होते. पण काही कारणामुळं त्यांचा कार्यक्रम रद्द झाला. ते सर्किट हाऊसला थांबले होते.

त्यावेळी लंकेश्वर गुरुजी, पी.आर.महाजन अशा काही स्थानिक नेत्यांना कार्यक्रम रद्द होणं योग्य वाटलं नाही. त्यांनी प्रकाश आंबेडकरांना भेटून अकोटमधील फैलमध्ये सभा घेण्यासाठी राजी केलं.

सभेपूर्वी प्रकाश आंबेडकर शंकरराव खंडारे यांच्या घरी गेले. त्याठिकाणी त्यांचं अभूतपूर्व असं स्वागत झालं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा नातू येणार म्हणून तिथं तोबा गर्दी जमली होती. प्रचंड गर्दीतही लोक त्यांच्या पाया पडत होते. याच तुफान गर्दीत त्यांची सभा झाली.

या सगळ्याने प्रकाश आंबेडकर यांनाही आपुलकी निर्माण झाली. स्थानिक कार्यकर्त्यांशी आपुलकीचं नातं निर्माण झालं. यानंतर दोनच महिन्यांनी कार्यकर्त्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या आणखी एका सभेचं अकोटमध्ये यशस्वी आयोजन केलं.

प्रकाश आंबेडकर

फोटो स्रोत, VBA

पुढं प्रकाश आंबेडकरांनी कर्मभूमी म्हणून याच अकोला जिल्ह्याची निवड केली.

या ठिकाणी असलेलं सामाजिक वैविध्य पाहता इथं काहीतरी नवीन करून दाखवता येईल, असं त्यांचं मत होतं. तसंच याठिकाणी सामाजिक आर्थिक विकासाचा अभाव होता, त्यामुळं या भागाचा बदल घडवण्यासाठी त्यांनी अकोल्याची निवड केली होती.

आंबेडकरांचा नातू समाजाच्या ओटीत..

अकोल्यात करण्यात आलेल्या वेगवेगळ्या प्रयोगांपैकी एक म्हणजे याठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्याचा निर्णय.

1986 मध्ये याठिकाणचा पहिला धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याचवेळी प्रकाश आंबेडकरांच्या आई मीराताई यांनी त्यांना समाजाप्रति समर्पित केलं.

“बाबासाहेबांनी हयातीत जे काही कमावलं ते सर्व समाजाला दिलं. माझ्याकडं बाबासाहेबांची संपती नसली, तरी माझ्याकडे बाबासाहेबांचा नातू आहे आणि तो मी आज समाजाच्या ओटीत टाकते..” असं त्यांनी यावेळी म्हटलं होतं.

तिथूनच समाजाचे नेते म्हणून प्रकाश आंबेडकर यांच्या प्रवासाची एका नव्या रुपानं सुरुवात झाली होती.

वंचितचा प्रयोग

प्रकाश आंबेडकरांनी 2018 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग केला. दलितांबरोबरच वंचितांचा झेंडा त्यांनी हाती घेतला.

2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी केलेल्या या प्रयोगाची चांगलीच चर्चा झाली.

लोकसभा निवडणुकीसाठी कोणत्याही मोठ्या पक्षाबरोबर हात मिळवण्याऐवजी त्यांनी असदुद्दीन ओवेसी यांच्या एआयएमआयएम पक्षाबरोबर आघाडी करण्याचा निर्णय घेत, पुन्हा एकदा राजकीय धक्कातंत्राचा वापर केला.

लोकसभा निवडणुकीत हे गणित चांगलं जुळून आलं. वंचितचा एकही खासदार निवडून आला नसला तरी त्यांच्या आघाडीतील एमआयएमचे इम्तियाज जलील छत्रपती संभाजीनगरमधून (तेव्हाचे औरंगाबाद) निवडून आले.

संग्रहित छायाचित्र

फोटो स्रोत, FACEBOOK/VBA

अनेक ठिकाणी वंचितच्या उमेदवारांनी दुसर्या तिसऱ्या क्रमांकाची मते घेतली आणि अनेक पक्षांची गणितं बिघडवली.

यावेळी वंचितनं जवळपास 40 लाख मतं घेतली. पण इतर निवडणुकांमध्ये त्यांना फारशी चमकदार कामगिरी करण्यात यश आलं नाही.

निवडणुकीतील यश-अपयश

प्रकाश आंबेडकरांनी सर्वात पहिली निवडणूक 1984 मध्ये अकोल्यातून लढवली होती. त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर 1989 मध्येही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

1990 मध्ये राष्ट्रपतींकडून प्रकाश आंबेडकरांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली.

त्यानंतर 1991 आणि 1996 मध्येही लोकसभेत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

प्रकाश आंबेडकर

फोटो स्रोत, FACEBOOK/VBA

पण 1998 मध्ये काँग्रेसच्या साथीनं त्यांनी लोकसभेत विजय मिळवला. त्यानंतर 1999 मध्येही त्यांना लोकसभा निवडणुकीत विजय मिळवण्यात यश आलं.

त्यानंतर मात्र 2004, 2009, 2014 आणि 2019 मध्येही लोकसभेत प्रकाश आंबेडकरांचा पराभव झाला.

'रिडल्स'साठीचे आंदोलन

प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं 1988 मध्ये केलेल्या एका आंदोलनाची चांगलीच चर्चा झाली होती.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या “रिडल्स ऑफ हिंदुइझम” नावाच्या पुस्तकातील काही मजकूर पुस्तकातून वगळण्याचा निर्णय त्यावेळी घेण्यात आला होता.

संग्रहित छायाचित्र

फोटो स्रोत, VBA

रिपब्लिकन पक्षानं या निर्णयाच्या विरोधात भूमिका घेतली आणि प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात आक्रमक आंदोलन केलं. त्यावेळी शिवसेनेनं या निर्णयाला पाठिंबा दिला होता.

विरोध दर्शवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी लाखोंच्या संख्येत विशाल मोर्चा काढला. त्यानंतर राज्य सरकारनं या प्रकरणात विरोध करणारे आणि पाठिंबा देणाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढला.

पुस्तकातील मजकूर कायम ठेवण्याचा निर्णय त्यानंतर घेण्यात आला होता.

भीमा कोरेगाव प्रकरणी आक्रमक

पुण्याजवळच्या भीमा कोरेगावमध्ये 1 जानेवारी 2018 रोजी हिंसा उसळली होती. 31 डिसेंबरला झालेल्या एल्गार परिषदेत उपस्थितांनी केलेल्या चिथावणीखोर भाषणांमुळं दंगल उसळल्याचा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला होता.

प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेत हिंदुत्ववादी संघटनांवर या दंगलप्रकरणी आरोप केले होते. तसंच दंगलीच्या निषेधार्थ 3 जानेवारी 2018 रोजी महाराष्ट्र बंदची हाकही दिली होती.

या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगानं प्रकाश आंबेडकर यांनाही चौकशीसाठी बोलावत, त्यांची चौकशी केली होती.

प्रकाश आंबेडकरांनी या घटनेप्रकरणी पोलिस आणि सरकारवर गंभीर आरोप केले होते.

औरंगजेबाच्या कबरीला भेट

प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेमुळं जून 2023 मध्ये एका वादाला तोंड फुटल्याचा पाहायला मिळालं होतं.

राज्यातील राजकीय वातावरणात टोकाचं ध्रुवीकरण सुरू असतानाच प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट देत त्याठिकाणी फुलं वाहिली होती. त्यानंतर हा वाद निर्माण झाला होता.

“औरंगजेबानं 50 वर्षे राज्य केलं होतं, हे तथ्य कोणालाही मिटवता येणार नाही,” असं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी कबरीला भेट दिल्यानंतर केलं होतं.

ठाकरे-आंबेडकर एकत्र आणि पुन्हा वेगळे

महाविकास आघाडीनंतर उद्धव ठाकरेंचा आणखी एक मोठा निर्णय होता प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीबरोबर हातमिळवणीचा.

जानेवारी 2023 मध्ये प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांच्यात युतीची घोषणा करण्यात आली होती. त्याआधी आणि नंतरही दोघे अनेकदा एका मंचावर आले.

प्रबोधनकार ठाकरे आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरुषांचे नातू एकत्र आल्यानं चांगलीच चर्चा झाली होती.

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे.

फोटो स्रोत, ANI

पण प्रकाश आंबेडकरांचं शरद पवारांशी फारसं जमत नसल्यानं मविआमध्ये असलेल्या ठाकरेंबरोबरची ही आघाडी किती टिकणार याबाबत शंका होती आणि ती खरी ठरलीही.

लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात महाविकास आघाडीचं वंचितबरोबरचं गणित जुळलं नाही त्यामुळं प्रकाश आंबेडकरांनी वेगळं लढण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडीवर त्यांनी टीकाही केली.

सत्तेपेक्षा नावाचे वलय मोठे

प्रकाश आंबेडकरांवर अनेकदा त्यांच्या भूमिका किंवा राजकीय निर्णयांवरून टीकाही केली जाते. राजकारणात यश न मिळाल्याचंही त्या अंगानं विश्लेषण केलं जातं.

पण त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये काहीही राजकीय महत्त्वाकांक्षा नसल्याचं वारंवार सांगितलं आहे. तशी महत्त्वाकांक्षा असती तर तडजोड करून सत्तेत सहभागी झालो असतो, असं आंबेडकरांनी म्हटलं आहे.

“ठरवलं तर मला भाजपसोबत जाण्यापासूनही कोणी अडवू शकत नाही. पण विचारसरणीशी तडजोड करणार नाही,” असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे.

राजकीय सत्तेपेक्षा माझ्या आजोबांच्या नावाचं वलय खूप मोठं आहे, त्यामुळं सत्तेबाबत फार काही वाटत नाही असं स्पष्ट मत प्रकाश आंबेडकरांनी मांडलेलं आहे.

“हेतू स्पष्ट पण फलित विपरित”

प्रकाश आंबेडकरांच्या प्रवासाचा विचार करता त्यांच्या आतापर्यंतच्या राजकीय भूमिकांचा फायदा हा प्रामुख्यानं उजव्या विचाराच्या पक्षांना झाला असल्याचं मत, राजकीय विश्लेषक जयदेव डोळे यांनी मांडलं.

आपण घेतलेल्या निर्णयांची फलश्रुती काय होणार याचा विचार केल्याशिवाय निर्णय घ्यायचा नसतो. आपल्यामागे किती मतदान असू शकतं याचा अंदाज नेत्यांना यायला हवा, असंही डोळे यांनी म्हटलं.

“वैचारिक निष्ठा ही असलीच पाहिजे, पण त्या वैचारिक निष्ठेचं फलित काय होणार याकडेही नेत्यांचं लक्ष असायला हवं. दोन पावलं माघारही घेता यायला हवी.”

प्रकाश आंबेडकरांचे हेतू स्पष्ट असतात, पण त्या हेतूचं फलित हे त्यांच्या विपरित जातं, त्यामुळं त्यांना टीका सहन करावी लागते असं विश्लेषण डोळे यांनी केलं.

हेही वाचलंत का?