सुजात आंबेडकर: नॉन-व्हेज शब्दातून ब्राह्मणी प्रवृत्ती निर्माण झाली,' असं सुजात का म्हणाले?

सुजात
    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी

"भारतात ब्राह्मनायझेशन एवढं रुजलं आहे की नकारात्मक शब्द आमच्या जेवणाशी जोडला जातो. जे आमचं जेवण नाही ते नॉन-व्हेज, इथूनच ब्राह्मणी संस्कृती प्रवृत्ती निर्माण झालीय." अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी केली आहे.

बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत सुजात आंबेडकर यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. शाकाहार विरुद्ध मांसाहार, शिवसेनेसोबत आघाडीचा प्रस्ताव, धार्मिक तेढ आणि राजकारणात सक्रिय प्रवेश यासंदर्भात त्यांनी सविस्तर मुलाखत दिली. या मुलाखतीचा हा सारांश

प्रश्न - देशात सध्या शाकाहार विरुद्ध मांसाहार असं चित्र पहायला मिळत आहे. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात यावरूनच दोन विद्यार्थी गटात संघर्ष झाला. तुमचं काय मत आहे?

सुजात- नॉन-व्हेजची कोणती दुकानं बंद केली जातात? जी वंचित, खाटिक, कुरेशी यांची दुकानं आहेत. मॉल्स, मोठी दुकानं, स्विगीसारख्या अॅप्सवर मीट मिळतं का? तर मिळतं. त्यामुळे हा प्रश्न शाकाहार विरुद्ध मांसाहार असा नाही. हा अल्पसंख्याक विरुद्ध इतर असा वाद आहे. मोठ्या दुकानांच्या मीटच्या व्यावसायातून भाजप नेते सुद्धा कमवतात. तुमचा तत्वत: विरोध आहे तर ती दुकानं बंद करा.

व्हीडिओ कॅप्शन, ब्राह्मण दंगली पेटवतात असं सुजात आंबेडकर कशाच्या आधाराने म्हणतात?f

मांसाहाराला विरोध करणं किंवा मांसाहार करू न देणं म्हणजे आपला विचार दुसऱ्यावर थोपवण्याचा हा प्रकार आहे असंही मला वाटतं. हे ब्राह्मणायझेशन, संस्कृतायझेशन करण्याचा प्रयत्न आहे.

मी एवढे वर्षं परदेशात शिक्षणासाठी होतो. तिकडे सगळीकडे मटण, अंडी असंच म्हटलं जातं. परदेशात नॉन-वेज असा शब्द एकदाही मला आढलळला नाही. कारण भारतात ब्राह्मणायझेशन एवढं रूजलं आहे की, जे आमचं जेवण नाही ते नॉन-वेज. यामुळेच ब्राह्मणी प्रवृत्ती निर्माण झालीय.

तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये पाहिलं तर सर्वांत मोठे कत्तलखाने तिकडे भाजप नेत्यांचेच आहेत. म्हणजे बहुजनांच्या पोरांना रस्त्यावर उतरवायला लावतात आणि उच्चवर्णीयांची पोरं घरी सुरक्षित राहतात. मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये मीट दिलं जातं. तिथून भाजप नेत्यांना पैसे मिळतात. गरीबांच्या पोटावर मात्र पाय आणला जातो.

प्रश्न - तुम्ही औरंगाबादमध्ये असं वक्तव्य केलं की, दंगली घडवणारे सहसा उच्चवर्णीय ब्राह्मण असतात. हे वादग्रस्त वक्तव्य आहे असं वाटत नाही का?

सुजात - तुम्ही समाजशास्त्र आणि राजकीय अभ्यासक्रम शिकत असता तेव्हा क्लासमध्ये जाती, पोटजातींची नावं घेतली जातात. तुम्हाला याची मांडणी करायची असेल तर जातींची नावं घ्यावी लागतात.

सुजात

मी याचा अभ्यास करून हे बोललो आहे. दंगलींची अशी अनेक उदाहरणं आहेत. तुम्ही 'हेट स्पीच बाय हिंदू लीडर्स' हे गुगलवर सर्च करा, ही वक्तव्य कोणी केली आहेत ते बघा. नावावरून जात बघा त्यांची मग कळेल मी वक्तव्य का केलं. याविषयी आणखी बोलायचं झाल्यास बाबरी मशीद असो वा भीमा कोरेगाव, या प्रकरणात मिलिंद एकबोटे, मनोहर भिडे हे दोघं ब्राह्मण समाजाचे नेते मानले जातात, उच्चवर्णीय, उच्चवर्गीय यांनी कुणबी, मराठी, दलित बहुजन पोरांना भडकवलं. माझं वक्तव्य वादग्रस्त वाटत असलं तरी मी फूल प्रूफ डेटा सहीत बोलत आहे. मी दंगलींची उदाहरण घेऊन बोललो.

प्रश्न - तुम्ही हे दाखले जरी देत असला तरी असं वक्तव्य म्हणजे सरसकट जनरलायझेशन आहे असं वाटत नाही का? डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुद्धा बोलले होते की माझा ब्राह्मण्याला विरोध आहे ब्राह्मणांना नाही.

सुजात - बरोबर आहे. मी सुद्धा ब्राह्मणांविरोधात नाही, ब्राह्मणशाहीच्या विरोधात बोलत आहे. लोकांच्यविरोधात नाही विचाराच्या विरोधात आहे.

प्रश्न - प्रकाश आंबेडकर बुधवारी (13 एप्रिल) अकोल्यात असं बोलले की, शिवसेनेला युतीचा प्रस्ताव दिला आहे. तुम्ही शिवसेनेसोबत यूती करून महाविकास आघाडीत सामील होणार का?

सुजात- खरं तर याविषयी प्रकाश आंबेडकरच योग्य सांगू शकतील. कारण यावर बोलायला मी काही पदाधिकारी नाही. पण भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं आहे.

2024 मध्ये भाजप आलं तर संविधानाला धोका आहे. त्यांच्या नावात जनता असं असलं तरी ते जनतेविरोधी आहे. भाजपविरोधी आघाडी झाली तर आम्ही त्याचं स्वागतच करू.

प्रश्न - यापूर्वी तुम्ही शिवसेनेवर टीका केलीय. शिवसेना आजही म्हणते की ते हिंदुत्ववादी पक्ष आहे मग तुम्ही युती करणं हा विरोधाभास नाही का?

सुजात- आताच्या परिस्थितीत खरंच हे लागू होतं का? राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आता एकत्र आहेत. पण कायम एकमेकांविरोधात बोलत आले आहेत. सत्ता वाचवण्यापेक्षा संविधान वाचवण्यासाठी एकत्र येत असतील तर आमचा पाठिंबा आहे.

प्रश्न - तुम्ही नुकतंच एका जाहीर सभेत म्हटला की, आता इतर मतदारांचाही आपल्याला विचार करायला हवा. पक्ष वाढवण्यासाठी अल्पसंख्यांकांसह इतर मतदारांसाठीही काम करणार का?

सुजात - वंचित बहुजन आघाडीत अल्पसंख्यांकांसह एलजीबीटीक्यू असे अनेक लहान घटक जोडले जात आहेत.

सध्या समाजात तेढ निर्माण करण्याचं काम केलं जात आहे. दोन धर्मांमध्ये वाद पेटवण्याचा प्रयत्न केला जातोय. 2014 पासून नरेंद्र मोदींची लाट सुरू झाली तेव्हापासून हे होत आहे. जेव्हा सेक्यूलर देश हिंदुत्ववादाकडे वळला. भाजपसारखा पक्ष हे करू पाहत आहे.

चैत्यभूमी

प्रश्न - राज ठाकरे सुद्धा आता त्यांच्यासारखीच भूमिका घेत आहेत. तुम्हाला याविषयी काय वाटतं?

सुजात- राज ठाकरे काय करतात ते त्यांनाच माहिती. मला आज त्यांच्यावर बोलायचं नाही.

प्रश्न - राजकारणातील घराणेशाहीवर कायम टीका होत असते. भाजपनेही यावर टीका केलीय. नरेंद्र मोदी तर म्हटले आहेत की, घराणेशाही लोकशाहीसाठी धोकादायक आहे.

तुमच्या पक्षाचा आणि भारिपचाही विचार केला तर नेतृत् कायम आंबेडकर कुटुंबाकडे राहिलं, अशी टीका तुमच्यावरही होऊ शकते.

सुजात - गांधी, ठाकरे, पवार कुटुंबात एक स्टेट पावर होती. पिढीजात सत्ता त्यांच्या घराण्यात वारसाने आली. बाबासाहेबांनी पक्ष काढला नाही, जो पिढीजात माझ्याकडे आला. मी कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. माझ्याकडे कुठलंही पद नाही. मी अध्यक्ष नाही.

मी आतापासूनच नाही तर याआधी 2015 पासून विविध आंदोलनात सहभागी झालोय. विद्यार्थी आंदोलन, महाविद्यालयातील आंदोलन मी करत आलोय. आमचा पक्ष आंदोलनाच्या भूमिकेतून उभा राहतोय त्याची तुलना पिढीजात सत्ता उपभोगणाऱ्यांशी करू शकत नाही.

वंचित बहुजन आघाडीचं नेतृत्व रेखाताईंकडे (रेखा ठाकूर) जाणार आहे. तुम्हाला कल्पना असेल की प्रकाश आंबेडकर यांच्यावर शस्त्रक्रिया झाली तेव्हा प्रभारी अध्यक्ष रेखाताई होत्या.

प्रश्न- तुम्ही पूर्णवेळ राजकारणात सक्रिय झाला आहात का?

सुजात - हे मलाच माहिती नाही अजून. माझं ठरलं की मी सांगतो. माझं उच्च शिक्षण पूर्ण झालं आहे आता. मी भारतातच असणार आहे. पण पुढे वाटचाल कशी असेल ते लवकरच कळेल.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)