इथिओपियाचा ‘दुःखी’ प्रिन्स, ज्याचा मृत्यू एकाकी झाला... अवशेष परत करण्यास इंग्लंडचा नकार

फोटो स्रोत, Alamy
- Author, जिबात तामिराट आणि सिसिलिया मेकॅन्ले
- Role, बीबीसी प्रतिनिधी
इंग्लंडमधल्या विंडसर कॅसल या ठिकाणी दफन करण्यात आलेल्या इथिओपियाच्या राजकुमाराचे अवशेष संबंधितांना देण्याचं बकिंगहॅम पॅलेसनं नाकारलं आहे.
19व्या शतकात इथिओपियाच्या राजाचं दफन करण्यात आलं होतं. सात वर्षांचा असतानाच प्रिन्सअलेमायू यांना इंग्लंडला अनाथ म्हणून नेण्यात आलं. प्रवासादरम्यान त्यांच्या आईचं निधन झालं.
राणी व्हिक्टोरिया यांनी या मुलाच्या विकासासाठी प्रयत्न केले आणि त्याच्या शिक्षणाची व्यवस्था केली. 18वर्षांचा असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या घरच्यांना त्यांचे अवशेष इथिओपियात हवे होते.
त्यांचा जन्म इथिओपियात झाला होता. त्यामुळे त्यांचे अवशेष आम्हाला द्यावेत असं इथिओपियातल्या राजघराण्याचे फासील मिनास यांनी बीबीसीला सांगितलं.
त्यांचं युकेत दफन होणं योग्य नाही असं त्यांनी सांगितलं. बीबीसीला दिलेल्या निवेदनात बकिंगहॅम पॅलेसच्या प्रवक्त्याने यामागची भूमिका स्पष्ट केली.
विंडसर कॅसल इथे सेंटजॉर्जेस चॅपेल इथे त्यांना ज्या ठिकाणी दफन करण्यात आलं तिथे पुन्हा खोदकाम केल्यास बाकीच्या शवपेट्यांनाही धक्का बसू शकतो, असं त्यांनी सांगितलं आहे.
इथिओपियाच्या राजघराण्याची मागणी आम्ही समजू शकतो. चॅपेलमधील अधिकाऱ्यांनीही यासंदर्भात विचार केला. प्रिन्स अलेमायूयांच्या स्मृतींचं जतन व्हावं असा आमचाही प्रयत्न आहे. परंतु गेलेल्या व्यक्तीच्या अवशेषांचं योग्य पद्धतीने जतन होणं आवश्यक आहे, असं त्यांनी म्हटलं.
रॉयल हाऊसहोल्डने इथिओपियाच्या शिष्टमंडळाची प्रिन्स अलेमायू यांच्या स्मारकाला भेट देण्याची विनंती मान्य केली होती.
प्रिन्स अलेमायू इतक्या लहान वयात इंग्लंडला कसे पोहोचले हे राजघराणं आणि मुत्सदी डावपेचांचं अपयश असं म्हणता येईल. 1862 मध्ये साम्राज्य वाढवण्याच्या उद्देशाने प्रिन्स अलेमायू यांचे वडील ट्रेवडोस दुसरे यांनी इंग्लंडशी हातमिळवणी केली. पण त्यांच्या पत्रांना राणी एलिझाबेथ यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

फोटो स्रोत, Getty Images
या प्रकरणाने चिडलेल्या राजांनी सगळी सूत्रं स्वत:च्या हातात घेतली. युरोपातील काही लोकांना त्यांनी ताब्यात घेतलं. यामध्ये ब्रिटिनच्या राजदूताचाही समावेश होता. याची परिणती लष्करी मोहिमेत झाली. 13,000 ब्रिटिश आणि काही भारतीय फौजा इथिओपियाच्या ताब्यात असलेल्या लोकांच्या सुटकेसाठी तैनात करण्यात आल्या.
ब्रिटिश संग्रहालयाचा माणूसही या फौजेचा भाग होता. एप्रिल 1868 मध्ये त्यांनी ट्रेवडोस यांच्या मकडाला इथल्या गडाला वेढा घातला. इथिओपियाच्या उत्तरेला हा गड आहे.
इंग्लंडच्या फौजांनी अवघ्या काही तासात त्यांची सुटका केली. इथिओपियाच्या राजाने असं ठरवलं की ब्रिटिशांच्या तुरुंगात खितपत पडण्यापेक्षा स्वत: आयुष्य संपवेन अशी भूमिका घेतली. इथिओपियाच्या लोकांसाठी ते आदर्श आदरणीयगटात गेले.
लढाईनंतर ब्रिटिशांनी इथिओपियातून हजारो सांस्कृतिक आणि धार्मिक हस्तनिर्मित वस्तू चोरुन नेल्या. सोनेरी मुकूट, हस्तलिखितं, आभूषणं आणि कपडे यांचा समावेश होता.
इतिहासकारांच्या मते, हा खजिना नेण्यासाठी डझनभर हत्ती आणि खेचरं लागली. या सगळ्या वस्तू आता युरोपातली वेगवेगळी संग्रहालयं आणि वाचनालयांमध्ये खाजगी कलेक्शन म्हणून जतन करण्यात आला आहे. ब्रिटिशांनी राजाचा मुलगा राजकुमार अलेमायू आणि त्याची आई साम्राज्ञी तिरुवर्क वुबे यांनाही नेलं.
अँड्र्यू हेवन्स यांनी अलेमायूच्या आयुष्यावर ‘प्रिन्स अँड द प्लंडर’ हे पुस्तक लिहिलं आहे. यात ते उल्लेख करतात ती अलेमायू आणि त्याच्या आईला ब्रिटनमध्ये नेण्याचा ब्रिटिशांचा उद्देश त्यांचं संरक्षण करणं हा असू शकतो. कारण ट्रेवडोस यांचे शत्रू मकडलाजवळ पोहोचले होते.

फोटो स्रोत, Getty Images
1868 मध्ये ब्रिटन आल्यानंतर अलेमायूची परिस्थिती आणि त्यांचं अनाथ असणं यामुळे इंग्लंडच्या राणी व्हिक्टोरिया यांना त्याच्याबद्दल सहानुभूती वाटली. या दोघांची भेट इंग्लंडच्या दक्षिण किनारपट्टीवर असलेल्या राणीच्या हॉलिडे होममध्ये झाली.
राणीने मान्य केलं की ती अलेमायूला आर्थिक मदत करेल. तिने त्यांचं पालकत्व कॅप्टन ट्रिस्टॅम चार्ल्स स्पीडी यांच्याकडे दिलं. स्पीडी अलेमायूला इथिओपियातून ब्रिटनला घेऊन आले होते.
आधी ते एकत्र राहिले आणि मग कॅप्टन स्पीडी अलेमायूला घेऊन जगभर फिरले. ते दोघं भारतातही येऊन गेले.
पण मग अलेमायूचं रितसर शिक्षण व्हावं असा निर्णय घेण्यात आला. त्याला ब्रिटिश पब्लिक स्कूलमध्ये पाठवण्यात आलं. पण तिथे तो खूश नव्हता. नंतर त्याला सँडहर्स्टमधल्या रॉयल मिलिटरी कॉलेजमध्ये पाठवण्यात आलं. तिथे त्याला इतर टवाळ मुलांकडून त्रास झाला.
प्रिन्स अलेमायूला अतीव इच्छा होती की परत इथिओपियाला जावं. हेवन्स यांच्या पुस्तकात काही पत्रांचा संदर्भ आहे ज्यात असा उल्लेख केलेला आहे. पण त्याची मागणी फेटाळून लावण्यात आली.
इथिओपियाच्या राजघराण्याच्या वंशज अबेबेख कासा बीबीसीशी बोलताना म्हणतात, “मला त्याच्याबद्दल वाईट वाटतं. जणूकाही मी त्याला ओळखत होते. त्यालाही आफ्रिकेतल्या इथिओपियातून निर्वासित करण्यात आलं आणि तो तिकडे बेघरासारखा राहिला.”
सरतेशेवटी अलेमायूला घरीच शिक्षण देण्याची सोय करण्यात आली. पण नंतर तो आजारी पडला, कदाचित न्युमोनियाने. पण एका क्षणी त्याने औषधं घेण्याचं नाकारलं कारण त्याला वाटत होतं त्याच्यावर विषप्रयोग झालाय.
जवळपास 10 वर्षं परदेशात आश्रित म्हणून काढल्यानंतर वयाच्या 18 व्या वर्षी 1879 मध्ये त्याचा मृत्यू झाला.
त्याच्या आजारीपणाच्या बातम्या ब्रिटनच्या राष्ट्रीय वर्तमानपत्रांमध्ये छापून आल्या आणि त्याच्य मृत्यूनंतर राणी व्हिक्टोरिया यांनी त्यांच्या डायरीत अलेमायूच्या मृत्यूनंतर वाटलेल्या दुःखाबद्दल लिहिलं.

फोटो स्रोत, Alamy
अलेमायूच्या मृत्यूची तार सकाळी आली, मला धक्काच बसला. तो एका परक्या देशात, एकटा, कोणाही नातेवाईक सोबत नसताना मृत्यू पावला हे खूप दुःखद आहे, त्यांनी लिहिलं.
“त्याचं आयुष्य सुखी नव्हतं तर अनंत अडचणींनी बनलेलं होतं. तो फारच संवदेनशील होता कारण त्याला वाटायचं की त्याच्या रंगामुळे लोक सतत त्याच्याकडे टक लावून पाहातात.”
राणी व्हिक्टोरिया यांनी त्याच्या दफनाची व्यवस्था विंडसर कॅसलमध्ये केली.
प्रिन्स अलेमायूचे अवशेष परत मिळावेत ही मागणी नवी नाहीये.
2007 साली इथिओपियाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जिर्मा वोल्डे-जिओर्जिस यांनी राणी एलिझाबेथ यांना रितसर विनंती केली होती की अलेमायूचे अवशेष परत पाठवण्यात यावेत पण त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही.
“आम्हाला तो परत हवाय. त्याने एका परक्या देशात असावं हे आम्हाला पटत नाही,” अबेबेख म्हणतात.
“त्याचं आयुष्य दुःखाने भरलेलं होतं. मी त्याचा विचार करते तेव्हा मला रडू येतं. जर त्यांनी त्याचे अवशेष परत देण्याचं मान्य केलं तर मला वाटेल की तो जिवंत घरी परतलाय,” त्या पुढे म्हणतात.
अबेबेख यांना अपेक्षा आहे की नवे राजे चार्ल्स यांच्याकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळेल.
प्रा. आऊला पॅनखर्स्ट ब्रिटिश-इथिओपियन संबंधांमधले तज्ज्ञ आहेत. त्या म्हणतात, “पूर्वस्थिती स्थापित करणं किंवा परतफेड करणं यामुळेच जुन्या चुका सुधारता येतात आणि दोन देशांमधले संबंध सुधारू शकतात.”
ते म्हणतात की अलेमायूचे अवशेष परत केल्यामुळे ब्रिटनला आपल्या भूतकाळाचा पुनर्विचार करता येईल आणि आपल्या वसाहतवादी भूतकाळातल्या चुका मान्य करता येतील.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








