You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलच्या भूमिकेकडे जगाचं लक्ष, 'हे' आहेत 3 पर्याय
- Author, फ्रॅंक गार्डनर
- Role, बीबीसी, सुरक्षा प्रतिनिधी
इस्रायल-इराण संघर्षामुळं आखातात युद्धाची भीती निर्माण झाली आहे. इस्रायल इराणला कोणत्या पद्धतीनं प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे आणि त्यांनी तसं ते दिलं, सोबत त्यात अमेरिका देखील इस्रायलच्या मदतीला युद्धात उतरली तर आखातात युद्धाचा भडका उडण्याची भीती आहे.
इस्रायली लष्करानं म्हटलं आहे की इराणने रात्री सोडलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोनपैकी 99 टक्के त्यांच्या निशाण्यावर पोहोचण्याआधीच हवेतच पाडण्यात आले आहेत.
तर इराणनं म्हटलं आहे की दोन आठवड्यांपूर्वी सीरियातील इराणी दुतावासावर इस्रायलनं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला करण्यात आला होता.
इस्रायल-इराण संषर्घ आता इथून कोणत्या पातळीवर जाणार हे मुख्यत्वे काल रात्रीच्या हल्ल्याला इस्रायल कशा प्रकारे उत्तर देण्याचं ठरवतं त्यावर अवलंबून असणार आहे.
वाढलेला तणाव लक्षात घेऊन या भागातील देश, इराणची राजवट नापसंत असणारे देश आणि जगाच्या इतर भागातील देशांनी देखील संयम राखण्यास सांगितला आहे.
या प्रकरणात इराणची भूमिका अशी आहे की, ''प्रत्युत्तर देण्यात आलं, इथं हे प्रकरण संपलं, आता पुन्हा आमच्यावर हल्ला करू नका नाहीतर ज्यातून तुम्ही सावरू शकणार नाहीत असा तीव्र हल्ला आम्ही तुमच्यावर करू.''
मात्र इस्रायलनं आधीच जबरदस्त प्रत्युत्तर देण्याची भूमिका घेतली आहे आणि इस्रायलच्या सध्याच्या सरकारला त्यांच्या इतिहासातील सर्वाधिक आक्रमक सरकारांपैकी एक म्हणून मानलं जातं.
याआधी 7 ऑक्टोबरला हमासनं दक्षिण इस्रायलवर केलेल्या हल्ल्याला इस्रायलनं काही तासांतच प्रत्युत्तर दिलं आणि त्यानंतर सहा महिन्यांपासून गाझा पट्टीवर प्रचंड हल्ला चढवला आहे.
इराणनं इस्रायलवर केलेला हल्ल्याचा प्रत्यक्ष जमिनीवर जरी फारसा किंवा मर्यादितच परिणाम आढळून आला असला तरी इस्रायलचं सरकार आणि लष्कर या हल्ल्याकडं दुर्लक्ष करेल किंवा त्याला प्रत्युत्तर देणार नाही याची शक्यता नाही.
इस्रायलकडे आहेत 'हे' 3 पर्याय
शेजारील आखाती देशांचं शांततेचं आवाहन मान्य करू इस्रायल सध्या हल्ला करणार नाही. ज्याला 'व्यूहरचनात्मक संयम' म्हणतात तसा पावित्रा घेऊ शकतं.
पहिला पर्याय
थेट इराणवर प्रतिहल्ला करण्याऐवजी इस्रायल या भागातील इराणचे छुपे सहकारी असणाऱ्या संघटना म्हणजे लेबनॉनमधील हिजबुल्ला आणि सीरियातील लष्करी तळांवर हल्ला करू शकतं. कित्येक वर्षांपासून इस्रायल ते करत आलं आहे. त्याची पुनरावृत्ती होऊ शकते.
दुसरा पर्याय
इस्रायल इराणवर हल्ला करू शकतं. हा हल्ला खूप नियोजनपूर्वक केलेला, दीर्घपल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा असू शकतो. इराणनं काल रात्री ज्या लष्करी तळांवरून हल्ला केला त्याच तळांवर हा हल्ला केला जाऊ शकतो.
मात्र याकडे इराण व्यापक संघर्ष किंवा युद्ध म्हणून पाहण्याची शक्यता आहे. कारण इराणच्या छुप्या सहकारी संघटनांवर हल्ला करण्याऐवजी इस्रायल पहिल्यांदाच इराणवर थेट हल्ला चढवेल.
तिसरा पर्याय
इस्रायल या संघर्षात एक पाऊल आणखी पुढे टाकत जोरदार हल्ला करू शकतं. ज्यात ते इराणच्या सर्वात शक्तिशाली रेव्होलुशनरी गार्ड्स कॉर्प्स (आयआरजीसी)चे लष्करी तळ, प्रशिक्षण केंद्रे आणि कमांड सेंटर्सवर हल्ला करू शकतो.
शेवटच्या दोन पर्यायांमुळं हा संघर्ष आणखी तीव्र होण्याचा धोका आहे. असं झाल्यास इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युतर देण्यासाठी इराण पुन्हा इस्रायलवर हल्ला करू शकतो.
इथं सर्वात कळीचा मुद्दा हा आहे की इस्रायल-इराण संघर्षात अमेरिका ओढली जाणार की नाही.
कारण अमेरिकेने इस्रायलच्या बाजूने भाग घेतला तर आखातात इराण आणि अमेरिकी सैन्यामध्ये व्यापक स्वरूपाचं युद्ध होण्याचा धोका आहे.
(बीबीसी मराठीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरुमचे प्रकाशन)