वडिलांच्या मारेकऱ्यांविरोधात वकील बनून दिला 16 वर्षांचा लढा, शेवटी मिळाला न्याय

फोटो स्रोत, Salman Saeed
- Author, मेघा मोहन
- Role, बीबीसी न्यूज
शगुफ्ता तबस्सूम अहमद या त्यांच्या कुटुंबीयांच्या सल्ल्यावरून कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी तयार झाल्या होत्या. पण त्यांना वकील म्हणून प्रॅक्टिस करण्याची काही इच्छा नव्हती.
लहानपणापासून वकीलच व्हायचं होतं, असं मात्र काही नव्हतं. पण वडिलांची हत्या झाल्यानंतर परिस्थिती बदलली.
त्यांच्या वडिलांच्या हत्येप्रकरणी न्याय मिळवण्यासाठी मारेकऱ्यांच्या विरोधातील 16 वर्षांच्या लढ्याबाबत त्यांनी बीबीसीच्या प्रतिनिधी मेघा मोहन यांच्याशी बातचित केली.
ज्या दिवशी मी माझे वडील डॉ. ताहेर अहमद यांच्या हत्येबद्दल ऐकलं, त्यादिवशीच्या माझ्या संमिश्र आठवणी आहेत. काही अगदी स्पष्ट आणि काही अपूर्णदेखील.
मला ती खोली आठवते, पण त्या खोलीत कोण होतं ते आठवत नाही. शुक्रवारचा दिवस होता, पण वेळ मात्र आठवत नाही. मला त्या दिवशी घरातील लँड लाईन फोनची बेल ऐकू आली होती, पण तो फोन माझ्या कुटुंबातील कोणी उचलला होता हे मला आठवत नाही.
माझ्या भावानं तो फोन केला होता.
"त्यांनी त्यांना शोधलं. त्यांचा खून झालाय."
माझ्या भावाचे हे शब्द सर्वांपर्यंत कोणी पोहोचवले हे मला नक्की माहिती नाही, पण त्या क्षणी माझ्यासाठी आयुष्य म्हणून जे काही होतं ते, तिथंच संपलं होतं.
माझी आई लगेच रडू लागली होती. आम्ही जे ऐकलं त्यानंतर आम्ही सगळे सुन्न झालो आणि अगदी नीरव शांतता पसरली होती. माझे वडील ज्या राजशाही विद्यापीठात भूविज्ञान आणि खाणकाम विभागात प्राध्यापक होते, त्याच परिसरातील सेप्टीक टँकमध्ये त्यांचा मृतदेह आढळला होता.
आमचे सगळे कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र मंडळी बांगलादेशची राजधानी ढाक्यात असलेल्या माझ्या भावाच्या घरी जमले होते. माझा भाऊ आमच्याबरोबर नव्हता. कारण, आदल्या दिवशीच तो कारने सहा तासांचा प्रवास करत भारत-बांगलादेश सीमेवरील राजशाही इथं वडिलांना शोधण्यासाठी गेला होता.
बाबांना कुणी का मारलं असावं?
माझे कुटुंबीय एकमेकांशी बोलू लागले होते. एकमेकांचंच बोलणं मध्येच थांबवत ते एकमेकांना प्रश्न विचारत होते.
कसं झालं? का झालं?
त्यांना कुणाला मारायचं होतं?
माझे वडील शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले अत्यंत विनम्र व्यक्ती होते. भारीतल्या किंवा महागड्या कार खरेदी करण्याऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरण्यावर किंवा अगदी पायी चालण्यावर त्यांचा भर असायचा. विद्यापीठातील विद्यार्थ्यांमध्ये ते लोकप्रिय प्राध्यापक होते.
बांगलादेशात त्या काळी म्हणजे जुन्या परंपरांचा पगडा होता. तरीही पत्नीबरोबर बाजारात जाऊन खरेदीला करणारे किंवा किचनमध्ये स्वयंपाक करायला मदत करणारे असे, ते पती होते. शिवाय 18 वर्षांची झाल्यानंतरही रस्ता ओलांडताना मी त्यांचा हात हाती घट्ट धरायचे, असा आधार असलेले पिता ते होते. पण मग, अशा व्यक्तीला मारावं असं कोणाला बरं वाटलं असेल?
हा प्रश्न म्हणजे माझ्या कुटुंबातील एका वाईट स्वप्नाची केवळ सुरुवात होता.
दोन दिवसांपूर्वी म्हणजे, बुधवार 1 फेब्रुवारी 2006 रोजी माझे वडील ढाक्याहून राजशाही विद्यापीठात जाण्यासाठी बसमध्ये बसले होते.
त्यांना त्याठिकाणचा वर्दळ असलेला, सजीव असा परिसर अत्यंत आवडत होता. लहान असताना आमचं घर तिथंच होतं. विद्यापाठीकडून मिळालेल्या एका लहानशा घरात आम्ही राहत होतो. आम्हाला जे काही लागणारं होतं, ते सर्वकाही अगदी जवळपासच मिळायचं.
माझा भाऊ संजिद आणि मी आम्ही दोघं रोज सकाळी चालत शाळेत जायचो. तर संध्याकाळी विद्यापीठातील इतर प्राध्यापकांच्या मुलांबरोबर मैदानावर आम्ही खेळायचो. परिसरातील प्रत्येकाला आम्ही ओळखत होतो. आमच्यासाठी तेचं आनंदी आणि सुरक्षित असं छोटंस जग होतं.
पुढे संजिद आणि मी शिक्षणानंतर ढाक्याला गेलो. संजिदनं एका मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपनीसाठी एचआरचं काम सुरू केलं होतं.
'कायद्याचं शिक्षण घेत होते मात्र वकिली करण्याचं मनात नव्हतं'
वडिलांच्या सल्ल्यावरून मी विद्यापीठात कायद्याच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता. कारण त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट ही आमच्यासाठी आज्ञेसारखी होती. माझा मात्र वकिली करण्याचा उद्देश नव्हता.
पदवी घेतल्यानंतर एखाद्या आंतरराष्ट्रीय सार्वजनिक संस्थेमध्ये काम करावं किंवा शिक्षण क्षेत्रात जावं, असा माझा विचार होता. पण आमच्या कुटुंबासाठी काय योग्य असेल, हे कदाचित माझ्या वडिलांना तेव्हाच ठाऊक असावं.
मी 2006 मध्ये विद्यापीठात शिक्षण सुरू केलं आणि माझी आई ढाक्यात माझ्याबरोबर राहायला आली.
माझ्या वडिलांचा मृत्यू झाला त्या आठवड्यात ते आम्हाला भेटण्यासाठी म्हणून काही दिवसांसाठी ढाक्याला आले होते. बुधवारी 1 फेब्रुवारी 2006 रोजी दुपारी ते राजशाहीसाठी परत निघाले होते. त्यांनी तिथं सुरक्षित पोहोचल्याचं सांगण्यासाठी आईला फोनही केला होता.
त्यानंतर काही तासांना पुन्हा त्यांनी 9 वाजेच्या सुमारास पुन्हा आईला फोन केला होता. त्यांनी त्यावेळी झोपण्याची तयारी केली असावी असा विचार आम्ही केला. नंतर पोलिसांना त्यांची पँट बेडरूमच्या दाराला लटकलेल्या अवस्थेत आढळली होती.
त्यानंतर ते काही वेळासाठीच जीवंत असतील, कारण त्यांची हत्या 10 वाजेच्या आधी झाली होती, असं तपास करणाऱ्यांनी सांगितलं होतं.

फोटो स्रोत, Salman Saeed
माझे वडील त्यांचे एक सहकारी डॉ. मिया मोहम्मद मोहिउद्दीन यांच्या भवितव्यासंदर्भातील एका बैठकीत सहभागी होण्यासाठी विद्यापीठात आले होते. डॉ. मोहिउद्दीन यांचे पूर्वी आमच्या कुटुंबीयांशी अगदी जवळचे संबंध होते. पण काही दिवसांपूर्वीचं त्यांचं आणि माझ्या वडिलांचं नातं अचानक संपुष्टात आलं होतं.
माझ्या वडिलांना डॉ. मोहिउद्दीन यांनी केलेल्या साहित्यिक चोरीसंदर्भात काही गोष्टी समजल्या होत्या. त्यांनी इतर कर्मचाऱ्यांसमोर हा मुद्दा उपस्थित केला होता. विभागानं हा संपूर्ण मुद्दा कसा हाताळावा यासंदर्भात चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
पण माझ्या वडिलांना त्या बैठकीत सहभागी होताच आलं नाही. त्यांनी आमच्या फोनला उत्तरही दिलं नाही. तिथं काम करणारे (केअरटेकर) जहांगीर आलम यांनी ते घरी नव्हते असं म्हटलं. आश्चर्याची बाब म्हणजे, त्यानं वडिलांना आलेलंही पाहिलं नव्हतं.
या सगळ्या प्रकारामुळं आईला काळजी वाटू लागली होती. तिनं माझ्या भावाला वडिलांचा शोध घेण्यासाठी राजशाहीला जायला सांगितलं. त्यानंतर 3 फेब्रुवारी 2006 रोजी माझ्या भावाला विद्यापीठाच्या परिसरात असलेल्या बागेजवळच्या एका सेप्टिक टँकमध्ये वडिलांचा मृतदेह सापडला. या प्रकरणाचा तपास हत्येच्या दिशेनं सुरू झाला होता.
काही क्षणासाठी अचानक संपूर्ण जगाच्या नजरा आमच्या कुटुंबाकडं वळल्या होत्या. माझ्या वडिलांची हत्या ही एक मोठी कहाणी, एक गूढ हत्या आणि घडलेला खराखुरा गुन्हा होता. वडिलांचा चेहरा टीव्हीवर झळकला, वृत्तपत्रांत छापून आला होता.
स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय माध्यमंदेखील रंजक बातमीसाठी कामूक वर्णनांचा तपशील शोधू लागले. सुस्वभावी, प्रसिद्ध, निरोगी व्यक्तीचा अशा प्रकारे मृत्यू होऊच शकत नाही, असं त्यांचं मत होतं. याबाबतचे अनेक प्रश्न अनुत्तरीत होते.

फोटो स्रोत, Salman Saeed
विद्यापीठातील एका प्राध्यापकाची हत्या कोण करेल? यासाठी खासगी शत्रूत्व कारणीभूत होतं का? कट्टरतावादी मुस्लीम? त्यांनी बांगलादेशच्या समाजाबद्दल काय म्हटलं होतं? असे अनेक प्रश्न येत होते.
या सर्व गोंधळाच्या स्थितीत मला माझी आई आणि भावाचं एक वेगळं रुप पाहायला मिळालं. ते दोघंही जोमानं या प्रकरणी लक्ष घालत होते. माझी आई भावासोबत राजशाहीला गेली. पोलिसांना घटनेची टाईमलाईन तयार करण्यासाठी आणि संशयितांबद्दल माहिती देण्यासाठी ते दोघं मदत करत होते.
काही आठवड्यांमध्ये पोलिसांनी माझ्या वडिलांच्या हत्येच्या आरोपात काही जणांना अटक केली. त्यात माझ्या वडिलांनी साहित्य चोरीचे आरोप लावलेले त्यांचे विद्यापीठातील सहकारी डॉ. मोहिउद्दीन, विद्यापीठातील केअरटेकर जहांगीर आलम आणि इतर चौघांचा त्यात समावेश होता. आलमचा भाऊ आणि मेहुणा यांचाही त्यात समावेश होता.
न्यायासाठीचा लढा
खटल्यादरम्यान जहांगीर आलम आणि त्याच्या नातेवाईकांनी मोहिउद्दीननंच त्यांना माझ्या वडिलांची हत्या करण्यासाठी सांगितलं होतं, अशी कबुली दिली. त्यासाठी मोहिउद्दीननं त्यांना पैसे, संगणक आणि विद्यापीठात नोकरी मिळवून देण्याचं आमीष दाखवलं होतं. मोहिउद्दीन यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळले.
2008 मध्ये राजशाहीच्या न्यायालयात चौघे दोषी ठरले आणि त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली, तर दोघांची मुक्तता करण्यात आली. हे सर्वकाही तिथं संपायला हवं होतं, पण तसं झालं नाही. चौघांनी अपील केलं आणि प्रकरण बांगलादेशच्या उच्च न्यायालयात वर्ग करण्यात आलं.
माझी आई आणि भाऊ वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्यानं झटत होते. दुसरीकडं मात्र मी त्यांना काही मदत करू शकत नसल्यानं अगदीच अपराधीपणाची भावना निर्माण झाली होती. राजशाहीतील न्यायालयाचा निर्णय आला तेव्हा मी नुकतंच किशोरवय ओलांडलं होतं.
माझ्या कुटुंबानं नेहमीच अत्यंत प्रेमानं, काळजीनं मला लहानाचं मोठं केलं होतं. अगदी वडिलांच्या मृत्यूनंतरही त्यांनी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्यावर भर दिला होता. त्यांनी मला भावनिक आणि आर्थिकदृष्ट्यादेखील कायम आधार दिला.
मी मन लावून अभ्यास करत होते, कायद्याच्या पुस्तकांवर लक्ष केंद्रित करत होते. मात्र, तरीही आयुष्यात नेमकं काय करायचं हे मला कळत नव्हतं. 2011 मध्ये माझ्या वडिलांचा खटला हायकोर्टात पोहोचला.
कोर्टानं डॉ. मिया मोहिउद्दीन यांना जामीन मंजूर केला, आणि खटल्याच्या काळापर्यंत त्यांची सुटका करण्यात आली. त्यांनी स्वतःच्या बचावासाठी 10 पेक्षा जास्त वकील नियुक्त केले होते. त्यामुळं त्यांचा युक्तिवाद तगडा होणार हे जवळपास स्पष्ट होतं.
तेव्हाच अचानक, मला माझं भविष्य स्पष्टपणे दिसू लागलं. जीवनात मी काय करू शकते हे मला जाणवलं. माझ्या वडिलांच्या मारेकऱ्यांच्या विरोधातील खटल्यात मी माझ्या कायद्याच्या अभ्यासामुळं मदत करू शकणार होते. मी त्यावेळी एका वेगळ्याच स्थितीत होते. माझ्या अवतीभोवती अनेक विश्वं होती.
मी माझ्या कुटुंबाबरोबर होते, त्यामुळं त्यांना कायदेशीर दस्तऐवज समजावून सांगू शकत होते. मला पोलिसांबद्दल माहिती होती, माझ्या वडिलांबद्दल माहिती होती आणि अगदी दोन आरोपींबद्दलही माहिती होती. कदाचित वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी या खटल्यात माझी नितांत गरज लागणार होती.

फोटो स्रोत, Salman Saeed
न्याय मिळाला तरी अनेक प्रश्न अनुत्तरित
मी 2012 मध्ये कायद्याची पदवी पूर्ण केली आणि लगेचच आमच्या म्हणजे फिर्यादींच्या वकिलांना खटल्यासाठी मदत करू लागले. खरं पाहता बांगलादेशात गुन्हेगारी प्रकरणांत वकिली करणाऱ्या महिलांची संख्या फार जास्त नाही.
मात्र, या प्रकरणात प्रत्येकाला माझं महत्त्व माहिती होतं, त्यामुळं सर्वांनी माझं स्वागत केलं. हा माझ्यासाठी निर्णायक वळणाचा क्षण होता. मी इतर सर्व कामं, खटले बाजूला ठेवले आणि पूर्णपणे वडिलांच्या प्रकरणावर लक्ष केंद्रित केलं.
2013 मध्ये हायकोर्टाचा निर्णय आला. न्यायालयानं माझ्या वडिलांचे सहकारी डॉ. मिया मोहम्मद मोहिउद्दीन आणि केअरटेकर जहांगीर आलम यांची मृत्यूदंडाची शिक्षा कायम ठेवली. मात्र इतर दोन जण म्हणजे आलमचा भाऊ आणि मेहुणा यांची मृत्यूदंडाची शिक्षा कमी करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.
अजूनही न्याय मिळाला नव्हता....
त्या दोघांनी मदत केली, मात्र वडिलांच्या हत्येमागचे मास्टरमाइंड मोहिउद्दीन आणि आलम होते, असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं.
पण अजूनही सर्वकाही संपलेलं नव्हतं.
केअरटेकर आणि त्याच्या नातेवाईकांनी हत्येबाबत कबुली दिली होती. मोहिउद्दीननं त्यांना संपर्क साधून पैसे दिल्याचंही सांगितलं होतं. तरीही मोहिउद्दीन यांच्या वकिलांनी आणखी एक अपील दाखल केलं होतं. यावेळी त्यांनी बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयात अपील केलं होतं.
मी सगळे दस्तऐवज चाळून काढले. कागदपत्रं तयार केली. घटनेची टाईमलाईन, आरोपींच्या संदर्भात संपूर्ण माहिती मिळवली. मी सातत्यानं वकिलांशी चर्चा करत होते आणि माझ्या आई आणि भावाचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करत होते. त्या सर्वांनी अनेक रात्री जागून, कित्येक दिवस अगदी अनेक रमजानमध्येही फक्त एकाच गोष्टीसाठी प्रार्थना केली होती.
ती म्हणजे, वडिलांना शांतता आणि न्याय मिळवून देण्यासाठी. मी आता किशोरवयातली आणि 2006 मध्ये वडिलांच्या हत्येमुळं संपूर्ण जग हरपल्याची भावना असलेली भांबावलेली तरुणी नव्हते, तर एका उद्देशाच्या दिशेनं निघालेली तिशीमधली वकील होते.
आमच्या नजरा न्यायालयाच्या वेळापत्रकाकडं लागलेल्या होत्या. खटल्याच्या सुनावणीसाठी आम्हाला आठ वर्षे वाट पाहावी लागली होती.
वडिलांसाठीच मी माझं काम सुरू ठेवणार
मिया मोहिउद्दीन चांगला जनसंपर्क दांडगा होता आणि ते श्रीमंतदेखील होते. त्यांचे मेहुणे बांगलादेशच्या राजकारणातील मोठे व्यक्ती होते.
त्यांच्याकडं आवश्यक त्या सोयीसुविधा आणि वकिलांची एक मोठी फौज होती. माझ्या वडिल्यांच्या हत्येशी मोहिउद्दीन यांचा काहीही संबंध नसल्याचा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केला.
उलट माझे वडील आणि ते कायम जवळचे मित्र होते आणि त्यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नसून सर्व पुरावे परिस्थितीजन्य असल्याचा युक्तिवादही करण्यात आला.
मात्र, इतर तिघांनी दिलेला कबुली जबाब आणि मोहिउद्दीन यांचं घटनेनंतरचं वर्तन हे कुटुंबाच्या निकटवर्तीय व्यक्तीसारखं नव्हतं, याकडं मात्र त्यांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं होतं.
मोहिउद्दीन हे सुरुवातीला कायम आमच्या घरी भेटण्यासाठी येत असायचे. मात्र, मृत्यूनंतर ते वडिलांच्या अंत्ययात्रेतही सहभागी झाले नव्हते.
विशेष म्हणजे, विद्यापीठातील सहकाऱ्यांपैकी केवळ तेच अंत्ययात्रेत उपस्थित नव्हते. शिवाय त्यांनी नंतरही कधीही आमची कुटुंबीयांची भेट घेऊन, आधार देण्याचादेखील प्रयत्न केला नाही.
सुप्रीम कोर्टात प्रलंबित असलेल्या खटल्यांच्या संख्येमुळं 2021 च्या अखेरीपर्यंत माझ्या वडिलांच्या हत्येप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली नव्हती. अखेर 5 एप्रिल 2022 रोजी जस्टीस हसन फोज सिद्दीकी यांच्या नेतृत्वातील न्यायाधीशांनी मोहिउद्दीन यांना माझ्या वडिलांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवत त्यांची मृत्यूदंडाची शिक्षा कामय ठेवली.
न्यायालयाच्या निकालानंतर मी कुटुंबाच्या वतीनं आमचं म्हणणं, एका निवेदनाद्वारे सर्वांसमोर मांडलं.
त्यात म्हटलं होतं की, "न्यायालयाच्या निर्णयाने आम्ही आनंदी आहोत, पण आनंद हा शब्द योग्य आहे का हे मला माहिती नाही. गेली 16 वर्ष आमच्या कुटुंबासाठी कशी होती, हे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत." या वेदना कल्पनेच्या पलिकडच्या अशा होत्या. माझ्या वडिलांचा मृत्यू ज्याप्रकारे झाला होता, त्याचा विचार करता मी जीवनात कधीतरी शांतीचा अनुभव करू शकेल का? असं मला कधीकधी वाटतं.
माझ्या वडिलांना न्याय मिळवून देण्याच्या संघर्षाचा माझ्या जीवनावर एवढा परिणाम झाला की, जणू माझं संपूर्ण जीवन एकाच जागी थांबलेलं होतं. लोक मला विचारतात की, जीवनात स्थिर-स्थावर होण्याचा किंवा स्वत:च्या कुटुंबाबाबतचा माझा विचार काय आहे? कदाचित माझ्या वडिलांच्या मारेकऱ्यांना शिक्षा मिळेल त्यानंतर.. कदाचित त्यानंतर हे सर्व संपेल. माझे वडील हेच माझं जग होते. ते अत्यंत साधे, सभ्य आणि हुशार असे व्यक्ती होते.
केवळ मोहिउद्दीन यांना नोकरी गमावण्याची भीती वाटली म्हणून, मारेकऱ्यांनी माझ्या वडिलांबरोबर जे काही केलं ते विचारांच्या पलीकडचं आहे. पण आता माझ्या वडिलांसाठीच मी माझं काम सुरू ठेवणार आहे. न्यायासाठी संघर्ष करण्याचं आणि चांगलं जीवन जगण्याचं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








