बांगलादेशचे खासदार अन्वरुल अझिम यांची हत्या भारतात त्यांच्या मित्रानेच कशी घडवून आणली?

फोटो स्रोत, ANWARUL AZIM FACEBOOK
बांगलादेशचे खासदार अन्वरुल अझिम अनार यांची कोलकात्यात हत्या झाल्याचं उघड झालं आहे. तत्पुर्वी काही दिवस ते कोलकात्यात येऊन बेपत्ता झाले होते, अशी माहिती मिळत होती. मात्र आता त्यांची हत्या झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
अन्वरुल अझिम अनार यांच्या हत्येचा कट गेल्या दोन-तीन महिन्यांपासून शिजत होता अशी माहिती बांगलादेशच्या पोलिसांनी दिली आहे.
या हत्येचा कट ढाक्यातील गुलशन आणि वसुंधरा परिसरातील दोन घरांमध्ये झालेल्या अनेक बैठकांत रचला गेला, असं बांगलादेशच्या पोलिसांनी म्हटलं आहे.
पश्चिम बंगालमध्ये सीआयडीनं एक संशयिताला या ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे.
या प्रकरणात कोलकाता पोलिसांनी दोन गाड्याही ताब्यात घेतल्या आहेत.
ढाका मेट्रोपोलिटन पोलीस विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मोहम्मद हारुन उर रशिद यांनी आतापर्यंत झालेल्या तपासाची माहिती दिली.
अख्तरुज्जमा उर्फ शाहीन नावाचा माणूस या हत्याप्रकरणाचा मुख्य सुत्रधार आहे. शाहीन खासदार अझिम यांचा लहानपणापासूनचा मित्र आहे.
बांगलादेशचे पोलीस खासदार आणि शाहीन यांच्यात काही व्यावसायिक वाद होता का? याचा तपास करत आहेत.
गुन्हेगारांनी कोलकात्यात फ्लॅट भाड्यानं घेतला होता
ढाक्याचे मेट्रोपोलिटन पोलीस विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मोहम्मद हारुन उर रशीद यांनी खासदार अझिम यांच्या हत्येबाबत पुढील माहिती दिली.
जिहाद किंवा जाहिद नावाच्या व्यक्तीने आणि सियाम नावाच्या व्यक्तीने कोलकाताच्या संजिवा गार्डन्स अपार्टमेंट्समध्ये 25 एप्रिल रोजी एक फ्लॅट भाड्याने घेतला.
30 एप्रिल रोजी या हत्येचा कथित सूत्रधार शाहीन कोलकात्यात आला. त्याच्याबरोबर आणखी एक व्यक्ती आणि त्याची गर्लफ्रेंड होती. हे तिघे 30 एप्रिलला विमानाने कोलकात्यात आले.
हे तिघे संजिवा गार्डन्समधील भाड्याच्या घरात उतरले. इथं कुटुंब राहातंय असं दाखवण्याचा त्यांचा मनसुबा असावा.

फोटो स्रोत, UGC
या लोकांनी दोन महिने अझिम यांच्या दिनचर्ये लक्ष ठेवलं. अझिम 12 मे रोजी कोलकात्यात आले. ते बरानगर भागातले मित्र गोपाल विश्वास यांच्या घरी उतरले.
खासदार हत्याकांडात सहभागी असलेले हे तिन्ही लोकही तिथं पोहोचले. त्यांनी आणखी दोन लोकांना आपल्याबरोबर घेतलं.
हे लोक नियमित त्या फ्लॅटमध्ये ये-जा करत असत.
सूत्रधार शाहीन हे सगळं नियोजन करुन कोलकात्यात त्या पाच-सहा सहकाऱ्यांना मागे ठेवून 10 मे रोजी बांगलादेशात परतला.
अझिम कोलकात्यात आल्यावर ते त्यांना भेटायला गेले आणि त्यांनी हत्या केली.
फैसल नावाचा माणूस पांढऱ्या गाडीतून खासदारांना घेऊन फ्लॅटवर गेला. त्यानंतर तेथे मुस्तफिजुर नावाची व्यक्ती आली. तर जिहाद आणि सियाम आधीपासूनच तिथं होते.
फ्लॅटमध्ये गेल्यावर अर्ध्या तासाच्या आतच अझिम यांचा खून केला गेला. त्यानंतर त्यांच्या शवाचे तुकडे करुन त्याची विल्हेवाट लावली गेली.
हत्येनंतर प्रेताची विल्हेवाट कशी लावली?
पोलिसांच्या मते, अझिम यांची भारतात हत्या केली की, त्यांचं शव कधीच सापडू नये अशी त्याची विल्हेवाट लावायची योजना या लोकांनी केली होती.
त्यामुळंच अझिम यांच्या प्रेताचे अनेक तुकडे करण्यात आले. हाडं आणि मांस वेगवेगळं करण्यात आलं आणि त्यानंतर एका करड्या रंगाच्या सूटकेसमध्ये ते भरण्यात आलं.
जाहिद आणि मुख्य आरोपी सियाम ती सूटकेस घेऊन फ्लॅटबाहेर गेले.

फोटो स्रोत, UGC
त्यानंतर सियाम परत आला आणि प्रेताचे उरलेले तुकडे घेऊन ते फ्लॅटबाहेर गेले. त्यानंतर एकेक जण बांगलादेशात परतले.
सूत्रधार शाहीन मात्र आधीच विस्तारा एअरलाइन्सने दिल्लीला गेला होता आणि तिथून तो कोलकात्यात 10 मे लाच आला होता. दिल्लीत दोन तास ट्रांझिट वेळ काढल्यावर तो कदाचित पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी काठमांडूमार्गे आणखी कोठेतरीही गेला असावा अशी शक्यता पोलिसांना वाटते.
तपास अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी अझिम यांच्या मोबाईलवरुन वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या लोकांना एसएमएस किंवा फोन केले जात होते.
रशीद सांगतात, मारेकऱ्यांचा उद्देश स्पष्ट होता, “पहिल्यांदा प्रेत पूर्णपणे गायब करणे आणि तपास अधिकाऱ्यांना मोबाईलचा काहीच सुगावा लागू नये. तसेच भारतीय पोलिसांच्या तपासाचा सुकाणू बांगलादेशच्या दिशेने वळू नये.”
अटक झालेल्या तिन्ही लोकांनी या हत्याकांडात सहभागी असल्याचं कबूल केलं आहे.
आरोपींच्या चौकशीसाठी कोलकाता पोलिसांचे दोन अधिकारीही बांगलादेशात येण्याची शक्यता आहे असं या पत्रकारपरिषदेत सांगण्यात आलं. गरज लागली तर बांगलादेश पोलिसांची एक टिम घटनास्थळाच्या तपासासाठी कोलकात्यात जाईल.
कोलकात्यात काय समजले?
कोलकाता पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान दोन कार जप्त केल्या आहेत. खासदार अझिम हत्येपूर्वी त्यापैकी एका कारमध्ये बसताना दिसले होते.
पोलिसांच्या सुत्रांच्या माहितीनुसार हत्येनंतर गुन्हेगार दुसऱ्या कारमधून फ्लॅटमधून बाहेर गेले होते.
कोलकाता पोलिसांनी गुरुवारी संशयित आरोपी झुबेरला ताब्यात घेतलं होतं. सध्या त्यांची प्राथमिक चौकशी सिरी आहे. अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही.
कोलकाता सीआयडीच्या तीन अधिकाऱ्यांनी ढाक्याला पोहोचल्यानंतर गुप्तचर शाखा (डीबी)च्या प्रमुखांबरोबर चर्चा केली आहे.

फोटो स्रोत, UGC
सीआयडीच्या सुत्रांच्या माहितीनुसार, ज्या झुबेर किंवा जिहादला ताब्यात घेतलं आहे तो बांगलादेशी नागरिक आहे.
हत्याकांडाशी संबंधित जो एफआयआर दाखल करण्यात आला आहे, त्यात सात जणांचा समावेश आहे. त्यात झुबेरचं नावही आहे, अशी माहितीही सुत्रांनी दिली आहे.
एफआयआरमध्ये जिहादशिवाय अख्तरुज्जमा, अमानुल्लाह, सियाम, मुस्तफिजुर, फैसल आणि शिलास्ती रेहमान यांची नावं आहेत. त्यापैकी तिघांना बुधवारी ढाक्यात अटक करण्यात आली होती.
झुबेर उर्फ जाहीदकडे प्रामुख्यानं अजिम यांच्या हत्येनंतर त्यांचे तुकडे कुठं फेकले यासंदर्भात चौकशी केली जात आहे.
कोलकात्यात फ्लॅट भाड्याने कसा घेतला
कोलकात्यात घर किंवा फ्लॅट भाड्यानं घेताना मालक, भाडेकरू आणि दलाल अशा तिघांनी फोटो आणि ओळखपत्रं देणं अनिवार्य आहे.
फ्लॅठ भाड्यानं घेताना त्याठिकाणी अख्तरुज्जमां उर्फ शाहीन, अमानुल्लाह सय्यद आणि शिलास्ती रेहमान राहतील असं सांगण्यात आलं होतं. एक मे रोजी न्यू टाऊन पोलीस ठाण्यात यासंबंधिची कागदपत्रं जमा करण्यात आली होती.

फोटो स्रोत, UGC
घर भाड्याने घेताना ओळखपत्र म्हणून या कटाच्या मास्टरमाईडनं म्हणजेच अख्तरुज्जमां उर्फ शाहीननं न्यूयॉर्कमधील ड्रायव्हिंग लायसन्सची प्रत दिली होती. त्यावर नंबर आणि फोटोही होते. त्यांनी मरीन इंजिनीअर असल्याचं सांगितलं होतं.
पण कोलकाताचे दागिने व्यापारी गोपाल विश्वास यांनी खासदार अझिम यांचे जवळचे मित्र असले तरी ते अख्तरुज्जमांला ओळखत नसल्याचं सांगितलं आहे.
"खासदार अन्वरुल अझिम यांच्याबरोबर जवळपास 25 वर्षांची जवळीक असूनही त्यांनी कधीच अख्तरुज्जमां नावाच्या व्यक्तीबद्द काहीही ऐकलं नाही," असं गोपाल यांनी बीबीसी बांगलाशी बोलताना सांगितलं.
गोपाल विश्वास यांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारेच पोलिसांनी हत्येचा तपास सुरू केला आहे.











