लहान मुलांबरोबर खोडसाळपणा करणं किती धोकादायक? वाचा

prank

फोटो स्रोत, VIRAL VIDEO

    • Author, आदर्श राठौड
    • Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी

मागच्या काही दिवसांपूर्वी आंध्रप्रदेश आणि तेलंगणमध्ये एक प्रँक व्हीडिओ बनवण्याचा ट्रेंड सुरू होता. लोक अनोळखी मुलांना त्यांच्या कारमध्ये लिफ्ट द्यायचे आणि त्यांचं अपहरण झालंय म्हणून सांगायचे. मग ही मुलं घाबरून ओरडू लागायची, रडायची.

अनोळखी व्यक्तींच्या गाडीत बसू नये, याची जाणीव करून देण्यासाठी आपण हा व्हीडिओ बनवत असल्याचं त्या लोकांचं म्हणणं होतं. पण लाइक्स आणि व्ह्यूजसाठी मुलांचा छळ केल्याबद्दल त्यांच्यावर बरीच टीका देखील करण्यात आली.

आता आणखी एक प्रँक सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात काही पालक आपल्या लहान मुलांच्या डोक्यावर अंडी फोडत आहेत.

टिक-टॉक आणि इंस्टाग्रामवर जगभरातून #eggcrackchallenge टॅग असलेले हजारो व्हीडिओ तयार करण्यात आलेत. आणि लाखो लोकांनी हे व्हीडिओ पाहिले आहेत

या व्हीडिओमध्‍ये दिसणारी बहुतेक मुलं एकतर लहान आहेत किंवा पाच-सहा वर्षांची आहेत.

या व्हीडीओमध्ये काही मुलांच्या डोक्यावर अंडी फुटल्यावर ते चकित होतात, तर काहीजण त्यांना दुखावल्याविषयी बोलतात तर काहीजण रडू लागतात, तर काहीजण त्यांच्या पालकांना बाजूला ढकलतात.

लहान मूल

फोटो स्रोत, Getty Images

यावरून असं दिसतं की बरीचशी मुलं या प्रँकमुळे दुखावली आहेत, ती अजिबात खूश नाहीयेत. पण दुसऱ्या बाजूला त्यांचे पालक मात्र जोरजोरात हसत होते

मानसशास्त्रज्ञ सांगतात की, मुलांना असे प्रँक किंवा चेष्टा समजत नाही.

प्रँक म्हणजे काय?

लखनौमधील मानसशास्त्रज्ञ राजेश पांडे सांगतात की, प्रँक म्हणजे मजेसाठी एखाद्याला व्हीक्टिम अर्थात बळी बनवणं.

एखादी गोष्ट करून लोकांना आनंद मिळेल, त्यांना मजा येईल अशा गोष्टीला प्रँक म्हणता येईल. जसं की एखादा विनोद...यात ऐकणाऱ्याला आणि ऐकवणाऱ्या अशा दोघांना मजा येते.

प्रँक मध्ये मजा-मस्ती असते पण यात व्यक्तीवर एकप्रकारे प्रयोग करणं सुरू असतं. पण अडचण अशी आहे की त्या प्रयोगात त्या व्यक्तीला दुखापत होऊ शकते, तो घाबरू शकतो किंवा त्याला वाईट वाटू शकतं.

एक उदाहरण देताना राजेश पांडे सांगतात, "वर्गात जाणाऱ्या एखाद्या मुलाला पायात पाय अडकवून पाडलं तर सगळेजण हसतील. पण पडणाऱ्याला मात्र दुखापत होऊ शकते. याला देखील प्रँक म्हणता येईल. पण असं मनोरंजन चुकीचं आहे."

प्रँक आणि छळ यामधील अंतर

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

लहान मुलांसोबत सुरू असलेले प्रँक बघून काही लोक अस्वस्थ होतात कारण प्रँक करणं आणि एखाद्याचा छळ करणं यात एक बारीकसं अंतर असतं.

ज्याच्यासोबत हा प्रँक सुरू असतो तो जर कमजोर असेल तर ही चेष्टा त्रासदायक ठरू शकते.

चेष्टेचा एक नियम आहे - 'पंच अप, नॉट किक डाउन'. म्हणजेच जे कमजोर आहेत त्यांची चेष्टा न करता जे ताकदवान आहेत त्यांची चेष्टा करा. आणि लहान मुलांसोबत जी चेष्टा केली जाते त्यात ती मुलं लक्ष्य ठरतात.

त्यामुळे लहान असो वा मोठे... प्रँक हा नेहमीच मजेशीर असेल असं नाही.

रॅचेल मेलव्हिल-थॉमस या ब्रिटनमधील असोसिएशन ऑफ चाइल्ड सायकोथेरपिस्टच्या प्रवक्त्या आहेत.

त्या सांगतात की, प्रँक हा तेव्हाच यशस्वी मानला जाऊ शकतो जेव्हा एखाद्याला त्याच्यासोबत झालेला विनोद समजून येईल. यात त्याचं कोणतंच नुकसान व्हायला नको आणि यात तोही हसला पाहिजे.

त्या पुढे सांगतात, "आपल्याला सगळ्यांना सोबत हसायचं असतं. यामुळे लोकांमध्ये जवळीक वाढते. विनोद तेव्हाच मजेदार असतो जेव्हा पीडित स्वतःही हसू लागतो. पण जेव्हा तुम्ही एखाद्याच्या डोक्यावर काहीतरी वस्तू मारता तेव्हा तो प्रँक, प्रँक न ठरता छळ ठरतो."

मुलांच्या निरागस मनावर होणारे परिणाम

प्रँकमध्ये समोरच्या व्यक्तीला माहीत नसतं की त्याच्यासोबत आता चेष्टा केली जाणार आहे. ती गोष्ट घडल्यावर तो व्यक्ती चकित होतो, पण मुलांच्या बाबतीत तसं घडत नाही. त्यांना तो प्रँक समजत नाही.

लहान मुलं विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात असतात. कोणताही विनोद लगेच समजणं त्यांच्यासाठी कठीण असतं. मुलं लहानपणापासूनच मजेदार गोष्टींबद्दल शिकू लागलेली असतात.

लहान मूल

फोटो स्रोत, Getty Images

काही संशोधकांना असं आढळून आलंय की, पाच ते सहा वर्षांच्या वयात मुलांना व्यंग समजायला सुरुवात होते. काही मुलांना वयाच्या चार वर्षापासूनच विनोद समजू लागतात. ही शिकण्याची प्रक्रिया पौगंडावस्थेपर्यंत चालू राहते.

एखादी गोष्ट किंवा घटना मजेदार आहे हे समजण्यासाठी विसंगती ही एक मुख्य गोष्ट आहे. याचा अर्थ अपेक्षेपेक्षा काहीतरी वेगळं असं. म्हणूनच काही लोकांना विचित्र, व्यंग असलेल्या, असामान्य किंवा अतिशयोक्तीपूर्ण अशा गोष्टी मजेशीर वाटतात. उदाहणार्थ, कार्टून.

प्रँकमुळे मुलांचं मनोबल ढासळतं का?

मुलांना अगदी लहानपणापासूनच गोष्टींमध्ये काहीतरी बदल आहे किंवा त्या विचित्र आहेत हे समजू लागतं.

रॅचेल मेलव्हिल-थॉमस म्हणतात, "उदाहरण म्हणून घ्यायचं झालंच तर हत्तीच्या डोक्यावर टोपी पाहणं मुलांना मजेदार वाटतं. पण अंडी फोडण्यासारख्या प्रँक मध्ये काही उणीवा आहेत. आपण सुरुवातीला मुलांमध्ये आशा निर्माण करतो की आपण स्वयंपाक करू पण मध्येच त्यांना झटका देतो आणि त्यांच्या डोक्यावर अंड फोडतो."

लहान मूल

फोटो स्रोत, Getty Images

इंग्लंडमधील यॉर्क सेंट जॉन युनिव्हर्सिटीच्या डेव्हलपमेंटल सायकॉलॉजिस्ट पेज डेव्हिस यांनी मुलांमधील ह्यूमर म्हणजेच विनोदाच्या विकासाच्या प्रक्रियेवर एक पुस्तक लिहिलं आहे.

त्या सांगतात, "अंड डोक्यावर फोडण्याच्या प्रक्रियेमध्ये पालकांना माहीत असतं की ते काय करणार आहेत, पण मुलांना ते माहीत नसतं. त्यामुळे वाडग्यात अंड फोडण्याऐवजी त्यांच्या डोक्यावर अंड का फोडलं हे त्यांना समजत नाही. काही व्हीडिओ मध्ये तर मुलांना समजत देखील नाही त्यांच्यासोबत नेमकं काय सुरू आहे. त्यामुळे त्यांचं मनोबल खचतं."

बाल मनोचिकित्सक रॅचेल मेलव्हिल-थॉमस देखील हीच चिंता व्यक्त करतात. त्या म्हणतात, "पाच वर्षांखालील मुलांसाठी तुम्ही आधार आहात. त्यांना विश्वास असतो की, तुम्ही त्यांना कधीच दुखावणार नाही. पण जर तुम्ही त्याच्या डोक्यावर अंडी फोडली तर त्या विश्वासाला तडा जाईल."

आई-वडील का समजू शकत नाही?

या प्रँक मध्ये आणखीन एक अडचण आहे ती म्हणजे हे व्हीडिओ मुलांच्या परवानगीशिवाय रेकॉर्ड करून ऑनलाइन पोस्ट केले जातात.

मुलांना शारीरिक इजा करणारे प्रँक मजेशीर कसे काय असतील असाही प्रश्न उपस्थित होतो. आणि विशेष म्हणजे या व्हीडिओ मध्ये बऱ्याच मुलांच्या भावना दुखवल्या आहेत हे स्पष्ट दिसतंय.

बाल मनोचिकित्सक रॅचेल मेलव्हिल-थॉमस आश्चर्य व्यक्त करत म्हणतात की, अशा प्रँक व्हीडिओंवर मुलांची प्रतिक्रिया नकारात्मक असते, पण आई - वडील मात्र यावर हसतात.

हे अॅट्यूनमेंटच्या विरुद्ध आहे. उदाहरणार्थ आपल्या मुलाला दुखापत झाल्यावर वेदनादायक प्रतिक्रिया देणारी आई उलट भावना व्यक्त करते. एखाद्या परिस्थितीत मुलांनी कसं वागलं पाहिजे याचे धडे यातून मिळत असतात. पण प्रँकमध्ये घडणारं वर्तन नेमकं याउलट आहे.

संशोधकांचं म्हणणं आहे की, पीडित व्यक्तीच्या भावनिक प्रतिक्रियेवर आधारित प्रँक व्हीडिओ ही सोशल मीडियाची काळी बाजू आहे.

मेलव्हिल-थॉमस म्हणतात, "हे सगळं करून आई वडिलांना लाइक्स, व्ह्यूज आणि बरेचसे फायदे मिळत असतात. पण त्या परिस्थितीत आपल्या मुलाला काय वाटतं याचा विचार ते करू शकत नाहीत. चेष्टा करताना ते मुलांच्या गरजेपेक्षा त्यांच्या स्वतःच्या गरजांकडे जास्त लक्ष देत असतात."

खबरदारी आवश्यक आहे

अशा प्रँकचा मुलांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि पालकांसोबतच्या त्यांच्या नातेसंबंधावरही परिणाम होऊ शकतो.

चाइल्ड सायकोथेरपिस्ट थॉमस मेलव्हिल सांगतात की, अशा परिस्थितीत एखाद्या प्रँकचा मुलावर काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. तुमचं उद्दिष्ट काय होतं हे इथं महत्त्वाचं नाही.

त्या पुढे सांगतात की, "पालकांनी मुलांना असं म्हणायला पाहिजे की, दुसऱ्या एकाचं बघून मी पण असं करण्याचा विचार केला. पण मला आता लक्षात आलंय की असं करणं चुकीचं आहे. सॉरी."

असं करणं महत्वाचं आहे कारण पालक हे त्यांच्या मुलांसाठी आदर्श असतात. तुम्ही जेव्हा त्यांना सॉरी म्हणता तेव्हा एकप्रकारे तुम्ही त्यांना शिकवत असता की एखाद्या गोष्टीचा पश्चाताप झाल्यावर तुम्ही काय करायला हवं."

मानसशास्त्रज्ञ राजेश पांडे म्हणतात की, "हसण्यासाठी, मौजमजा करण्यासाठी इतरही बरेचसे मार्ग आहे. जेव्हा तुम्ही प्रँक करता तेव्हा तुम्हाला मजा घेण्याची इच्छा असते. पण त्या समोरच्या व्यक्तीवर मानसिक परिणाम काय झालाय हे तुम्ही मोजू शकत नाही."

केवळ गंमत म्हणून एखाद्याला घाबरवणं, त्रास देणं योग्य नाही. ना मोठ्यांसोबत ना लहानांसोबत.. असं कोणाही सोबत करणं चुकीचं आहे.

या कथेची मूळ लिंक येथे आहे, वाचण्यासाठी क्लिक करा.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)